वासोटा ट्रेक एक अविस्मरणीय सफर
दि.१२ आणि १३ फेब्रुवारी 2022
भटकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आणि माझ्या फोटो च्या माध्यमातून आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच- एक अविस्मरणीय जंगल प्रवासआतापर्यंत बरेच किल्ले पाहिले. पण वासोटा कायम कायम बघण्याची आतुरता नेहमीच लागलेली असते . काही दिवसांपूर्वी AMK सर्वांनीच सुखरूप केल्यानंतर आता एखादा निवांत आणि संपूर्ण निसर्ग सौंदर्य लाभलेला एखादा पुढचा ट्रेक घ्यावा म्हणून मंडळी आग्रही होती आणि लगेच समोर उभा राहिला निसर्ग सौंदर्याने वेढलेला वासोटा आणि प्लान झाला परंतु पुन्हा एकदा आम्हा भटक्यांच्या मानगुटीवर बसलेल्या भुताने आपले डोके वर काढले आणि ट्रेक स्थगित करावा लागला साहजिकच सर्वांचाच हिरमोड झाला परंतु एक अशा होती हे भूत जास्त काळ टिकणार नाही म्हणून सगळ्यांना ग्रुप न सोडण्याचा सल्ला देऊन निर्बंध उठन्याची वाट पाहू लागलो आणि तो दिवस उजेडला माझा साताऱ्याच्या मित्रा चा फोन आला आजच राजेंबरोबर मीटिंग झाली आणि संपूर्ण क्षमतेने वासोटा चालू करण्यास परवानगी दिली. अन क्षणाचा ही वेळ न दवडता ग्रुप वर आनंदाची बातमी दिली आणि ट्रेक ची तारीख काढून आम्ही पुढील नियोजन चालू केले. आणि सुरवातीला 40 मेंबर चे नियोजन कधी 50 शी पार झाले कळलेच नाही आणि मग ओढ लागली 12 फेब्रुवारीच्या वासोटा ट्रेकची. आणि यातच भर पडली पहिल्या कॅम्पिंगची.
वासोटा गडाच्या इतिहासात मागे डोकून बघितल्यास वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या या शिखरावर राहण्यास आले व त्यांनी या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ’वसंतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. तसेच या गडास व्याघ्रगड देखील म्हणतात मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले. पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
असा हा ट्रेक ठरल्या प्रमाणे 12 तारखेला श्रीरामपूर वरून आमच्या 50 नवीन जुन्या ट्रेकर्स ची सांगड करून शनिवारी सकाळी चालू झाला .परंतु रस्ता मधील ट्राफिक मुळे रस्त कटता कटत नव्हता आणि अगदी पोहोचण्याच्या काही अंतरावर आमच्या गाडीचे एक चाक पंक्चर झाले . त्यात घाट रस्ता आणि काळोखी रात्र ती वेळ आम्हा सर्वांसाठीच एक आव्हान होत अशा परिस्थितीत सर्वांनीच टायर बसवण्यास खूप मदत केली त्यातच महिला भगिनींनी त्या वेळेत चिडचिड न करता खेळात मन गुंतवून ठेवल. त्या बद्दल खरच त्यांचे देखील मनापासून धन्यवाद सर्व काही आलबेल झाल्यानंतर आमचा प्रवास सुरु झाला आणि काही वेळातच आम्ही आमच्या हॉटेल वर पोहचलो तिथे पोहचल्यावर सर्वांनी फ्रेश होऊन लागलीच सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेतला त्यातही माझ्या तरी आजपर्यंत च्या खाण्यात असे चिकन खाल्ले इतके रुचकर ते होते आणि त्यानंतर मस्त बासुंदी वर ताव मारावा हा हेतू होता परंतु व्हेज वाल्यानी आमच्या साठी तीही ठेवली नाही असं हा आस्वाद घेऊन कॅम्पिंग साठी सर्व पोहचलो एव्हाना बऱ्यापैकी तसा उशीर झाला होता .कॅम्पिंग साठी बरेचशे खेळ आणि गाण्याचे नियोजन होते पण वेळेअभावी आम्ही ते घेऊ शकलो नाही. तरी देखील जो काही वेळ मिळाला त्या वेळेचा योग्य सदुपयोग करून सर्वांनी डान्स मस्ती धमाल मुळे अनोळखी जणांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर रविवारी सकाळी आम्ही वासोट्याकडे जायला मार्गस्थ झालो. तब्बल एक तासाच्या बोटीच्या प्रवासात सर्वांनीच प्रतिकूल परिस्थितीत देखील मनसोक्त फोटोचा आनंद लुटला अन आम्ही पायथ्याला पोहचलो. फॉरेस्ट ची परवानगी घेऊन लगेचच किल्ल्याकडे कूच केली.ह्या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे साठी पार केलेल्या काही मंडळींची जिद्द पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा देखील उत्साह हा वाढत होता .सहयाद्रीच्या जंगलातून आम्ही धोपटमार्गाने आम्ही किल्ल्यावरती पोहचलो. दुपारचे जेवण करून आम्ही वासोट्याच्या भटकंतीला सुरुवात केली. मारुती मंदिर, वाड्याचे अवशेष, महादेव मंदिर, बाबू कडा आणि दूरवर पसरलेला सह्याद्री नजरेत कायमचा जेरबंद करून गडउतार करण्यास सुरुवात केली .येताना पाण्यातील प्रवास तर एक सुंदर अनुभुती देऊन गेला त्यात सूर्य मावळतीला होता त्या मुळे शिवसागर चा जलाशय च रूप तर अवर्णनीय होते असा हा सुंदर नजारा मी माझ्या कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला
रात्री येताना रस्त्यात जेवणासाठी थांबल्या नंतर त्या ठिकाणी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्या गाडीत बसताना माझी नजर गेली अन क्षणाचा ही विलंब न करता मी लगेच त्यांचा फोटो घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो त्यांच्या ते लक्षात आल्याने त्यांनी जवळ बोलावून माझा मोबाईल त्यांच्या साथीदारकडे देऊन आमचा फोटो घेण्यास सांगितले त्त्यांचे चरण स्पर्श घेताना तर अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे अश्रु येत होते. खरचं असा ह्या ट्रेक ची सांगता अशा प्रकारे होऊ शकेल असे मनातही नव्हते . वासोट्याची ही केलेली जंगल सफर आम्हा सर्वांसाठी च अविस्मरणीय होती. असंख्य आठवणी सोबत घेऊन परतणारी मंडळी पुढच्या ट्रेकचा परीक्षेत आहेत .
सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपूर