Wednesday, October 4, 2023

गणपती गडद वॉटरफॉल रॅपलिंग ट्रेक

 गणपती गडद ट्रेक

दि.०१ ऑक्टोबर २०२३

गणपती गडद 



   ह्या पावसाळी भटकंती चे माझे नियोजन हे आधीच पक्के होते त्या दृष्टीने असे काही ठिकाण निवडले होते जे या सोशल मीडिया आणि पावसाळी गर्दी पासून दूर असेल जिथे फक्त न फक्त निसर्ग अन आपण असू अशाच ठिकाणी भेट देयची त्या दृष्टीने च आत्तापर्यंत चे ह्या पावसाळी भटकंती चे आमचे नियोजन हे अगदी उत्तम रीत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित पार पाडले.यातील  काही  ठिकाणे तर अशी होती ती अगदी या सोशल मीडिया पासून दुर्लक्षित त्या मुळेच कदाचित जेव्हा आम्ही हे ट्रेक करून यायचो तेव्हा लोक विचारायचे कुठे आहे हा spot त्याचा प्रत्यय प्रत्येकाला आलाच असेल.त्या मधील च आमचा पुढचा ट्रेक adventure मध्ये मोडणारा होता शितकडा waterfall rappling चा हा ट्रेक रेग्युलर ट्रेक सारखा नसल्यामुळे काही कारणास्तव तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे मी ते ठिकाण बदलुन.पुढचा adventure ट्रेक निवडला तो म्हणजे गणपती गडद waterfall rappeling चा.

आता हे गडद म्हणजे नेमकी काय तर डोंगरात कोरलेली लेणी अथवा गुहा. गणपती गडदला जायचं झाल्यास प्रवास मोठा आहे पण हा ट्रेक वसूल आहे. गणपती गडदचा प्रवास म्हणजे  आळेफाटा माळशेज,आणि ह्या घाटावर आणि नाणेघाट वर नजर ठेवण्यासाठी असलेला मोरोशी चा भैरवगड आणि मग गणपती गडद हे गाव म्हणजे पायथ्याशी असलेलं सोनावळे. सोनावळे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला डोंगरात कोरलेली लेणी दिसते तेच गणपती गडद.

तसेच या गावाला खेटून च पळु हे गाव लागते गावाबद्दल असे सांगितले जाते. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्‍यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु  (पळुन आलेल्या मोर्‍यांमुळे "पळु") असे नाव पडले असावे.

        संपूर्ण रात्रीचा प्रवास करून सकाळी पाच वाजताच्या सुमारास आम्ही सोनावले गावात पोहोचलो निसर्गाच्या सानिध्यात फ्रेश होऊन चहा नास्ता चा आस्वाद घेतला आता इथून पुढे दीड तासांचा ट्रेक करून गुहेपासून आम्ही rappeling सुरवात करणार होतो तत्पूर्वी ग्रुप मधील जवळपास सर्वच सदस्य हे पहिल्यांदाच rappeling चा अनुभव घेणार होते त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून rappeling कशा पद्धतीने करायचे याचे थोडक्यात मार्गदर्शन करून सरळ वर चढायला  सुरुवात केली.पाऊस नसल्याने हवेत  प्रचंड दमट पणा होता त्यामुळे हालत होणार हे नक्कीच होतं खरं तर गणपती गडद करायचं झाल्यास पाऊस हा असायलाच हवा. चोहोबाजूंनी बाजुंनी फेसाळते धबधबे तेंव्हाचं निसर्गसौंदर्य काही औरच असतं. पण असो आम्ही सुमारे 07 च्या सुमारास चालायला सुरुवात केली गावात गावकऱ्यांची भात शेती चा सुगंध हा चोहोबाजूंनी दरवळत च होता .

      पुढेच एक ओढा वाहत होता तिथेच जवळ काही विरगळी शेवटच्या घटका मोजत असताना दिसल्या वीरगळ म्हणजेच विरपुरुषांच्या प्रति उभारण्यात आलेला स्तंभ त्या स्तंभावर त्या विरपुरुषा चे तीन ते चार चौकटीत युद्ध प्रसंग कोरलेले असतात त्याला च वीरगळ म्हणतात तेथील  ओढा पार करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो गप्पा मारत मारत आम्ही पुढे जात होतो जसंजसे पुढे जात होतं तसंतसं आम्हाला आमचं ध्येय जवळ दिसत होतं पण वाट लांबची होती कारण आत्ताशी पाऊलवाट होती. अजून चढाईला वेळ होता. पण एवढ्या गरमीमध्येसुद्धा एकच गोष्ट चांगली होती की ह्या जंगलात बघायला खूप काही मिळाले. छोटे छोटे कीटक नवीन नवीन फुलं पक्षी पाहत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला होता.

  आता मात्र चढाईला सुरुवात झाली होती. सुमारे अर्धा तासाचीच असणारी चढाई दमट वातावरणामुळे जास्तच वाटत होती म्हणून आरामात वर चढत आता आम्ही थेट गणपती गडद च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाजूलाच तुषार रुपी धबधबा पडतच होता तेथून थेट गडदीत प्रवेश केला गडदीतुन समोरचा निसर्ग स्पष्ट दिसत होता समोर तीन तलाव उजव्या बाजूला नाणेघाट.

        समोरचा  निसर्ग शांतपणे अनुभवून आम्ही गडदीतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे गडदीमध्ये बऱ्यापैकी शांतता होती.आता इथून पुढे आम्ही सर्व ज्याची वाट पाहत होतो तो rappeling चा थरार अनुभवण्यासाठी साठी सज्ज होतो.एक एक करून सर्वांनी हर्णेस हेल्मेट परिधान करून उतरायला सुरुवात केली सुरवातीला थोडे घाबरल्या सारखे वाटते पण एकदा की rappel करून खाली आलो की पुन्हा पुन्हा rappeling कारावेसे वाटते हाच फरक आहे rappeling आणि rock climbing चा हं rock climbing मध्ये पूर्ण पणे तुमच्या शरीराचा कस लागतो.

आयुष्यात आपण पण काहीतरी थ्रिल अनुभवलं याचा सुखद अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

तो सुखद अनुभव गाठीशी बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली जस जसे आम्ही खाली उतरत होतो तस तसे  मागे वळून बघितल्यावर गणपती गडदचे खरे सौंदर्य नजरेस पडत होते.त्याकडे ५ मिनिटं एक टक लावून बघून पुन्हा आपली वाट धरली आणि थेट गावात जाऊन थांबलो. 

एव्हाना ०४ वाजले होते आणि पोटात कावळे कोकायला सुरवात झालीच हाती गावात उतरून रुचकर अशा शाखाहरी आणि मांसाहार चा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

     आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा एक technical event होता म्हणून सोबतीला आमची सह्याद्रि मधील भागिनी साह्य गिरी adventure ची कुसुम विशे हिच्या मदतीने हा event सुखरूप पार पडला कुसुम बद्दल सांगायचे झाल्यास ती एक cirtified रॉक क्लायम्बर तर आहेच आणि रेस्क्युअर शिवाय स्वतःच घर    सांभाळून गेली कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच  पावसात पाण्यात,पुरात अडकलेल्या माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील वाचवणारे, किंबहुना जीवदान देणारे देवदूतच आहेत ते. रात्री-बेरात्री, वेळी-अवेळी दऱ्याखोऱ्यात अडकलेले रस्ता चुकलेले ट्रेकर्स पर्यटक यांना तर ते मदत करतातच परंतु दरीत पडलेले मृतदेह, काही वेळेस कुजलेले मृतदेह मेडिकेटेड करून,स्वच्छ करून कित्येक  हजार फुटांवरून वर आणणे आणि पोलिसांच्या मदतीने ते ताब्यात देणे असे कठीण आणि निस्वार्थी कार्य ते करत आहे.कोणत्याही मोबदल्याशिवय हे कार्य करत आहेत त्यांच्या या महान कार्याला माझा आणि माझ्या टीमचा सलाम.  हॅट्स ऑफ कुसुम आणि दीपक विशे.

सचिन भांड पाटिल

सह्याद्रि परिवार श्रीरामपूर











Friday, August 11, 2023

बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशालगड मोहीम (भाग-०२)

 

पन्हाळगड ते विशालगड पदभ्रमंती

दि.०५ आणि ०६ ,२०२३

भाग :- ०२



  पहाटे जाग येऊनसुद्धा कोणीही एकमेकांना उठवले नाही. सर्वांनाच झोप हवी होती. नाईलाजानेच साडेसहा ला उठलो. चहा व "ओघाने"  येणारे कार्यक्रम उरकले. नंतर चविष्ट असे उपीट  चा नाष्टा करून आवरा आवर केली एव्हाना अनेक ट्रेकिंग क्लबच्या लोकांची गर्दी गावात दिसू लागली गावातली कमी आणि ही बाहेरून आलेली लोकांची गर्दीच जास्त दिसत होती प्रत्येक ग्रुप च्या शिवगर्जनेमुळे सारा आसमंत दुमदुमत होता  गावात एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मार्गस्थ होण्यास सुरुवात केली . आता घाई करायलाच हवी होती.  त्या गर्दीतूनच वाट काढत आता भातशेतांसोबत "हिरवळ" सुद्धा बघत पुढे जाऊ लागलो.



. वाटेवर दगडावर काढलेले ते बाण दिसू लागल्यामुळे किल्ल्यावर आल्यासारखे वाटत होते.  झाडे , खडक , जमेल त्या ठिकाणी ट्रेकरच्याच  नजरेत भरतील असे काढलेले ते बाण आमचा उत्साह वाढवत होते. आंबेवाडी ही पुढची वाडी होती. पावसाच्या हलक्या सरी जरी अधूनमधून येत असल्या तरी पावसाळी वातावरणामुळे दम चांगला राहत होता आणि डोळ्यांचे पारणे जागोजागी फिटत होते. आंबेवाडी नंतर दोन नकाशात नसलेल्या वाड्या लागल्या:  कळकेवाडी  आणि रिंगेवाडी! कुठल्यातरी एक वाडीबाहेर मोठ्ठी विहीर लागली. तेथे पुढे जरा वेळ विश्रांती घेतली. जंगलातल्या वाटा कापताना डिस्कवरी वरच्या MAN VS WILD या मालिकेची आठवण होत होती.

जमिनीवर अभावानेच माती दिसत होती. गळलेल्या पानांमुळे सगळी वाट झाकली गेली होती. अशा विरळ मनुष्य वस्तीच्या वाडीत कोणाला काही  झाले तर काय करत असतील, त्याला डॉक्टर कडे कसे नेत असतील हा विचार मनात घुंगवत होता. अशातच  एका ओढ्या पाशी थांबून बिस्किटांचा व गोड पुऱ्या चा नाश्ता केला. तेथे तुरळक फोटो सेशनसुद्धा झाले.

पाटेवाडीला पोहोचण्यास बराच वेळ लागत होता, मात्र २ वाजत आले तरीहि वाडीची चिन्हे दिसेना. अशातच अजून एक अनपेक्षित वाडी लागली: माळेवाडी. माळेवाडीहून पाटेवाडी २ किलोमीटर चालताना. चक्क डांबरी रस्तापण आहे. त्यावरून जाताना मात्र आता कंटाळा येत होता. अशा वेळी तो चिखलाचा रस्ताच हवाहवासा वाटत होतं पुढे परत चिखलाचा रस्ता लागला वाटेत एका ठिकाणी गुढगाभर चिखलात पाय रुतला ही फजिती एकदा तरी व्हायचीच होती. ती झाली. धनगरवाडा येईपर्यन्त फारसे कोणीच कोणाशी बोलले नाही. 

म्हसवड्याचे घनदाट जंगल:.  हे पार केल्यानंतर म्हसवडे गाव लागते अशी माहिती होती. जंगलाची वाट थोडी सुकर झाली. "निबीड" हा शब्द ज्याकडे पाहून लिहावा असे हे जंगल आहे. या जंगलात बिबटे, गवे, भेकर, हरणे असे प्राणी आहेत असे आम्हाला तिथे समजले. रात्री या जंगलातून जाण्याची वेळ आली नाही हे नशीबच! सूर्यप्रकाशात झकास दिसत असणारे ते जंगल रात्री नक्कीच भयाण वाटत असणार. जंगलाने आम्हाला अनेक सुंदर दृश्ये दाखवली. अनेक ओढ्यांनी आमचे दुखरे पाय भिजवले.


 म्हसवडे गाव ओलांडताना मलकापूर-अणुस्कुरा महामार्ग लागतो. त्या फाट्याला पोचेपर्यंत माझ्या बाबत एक घटना घडली ओढ्यावर बांधलेल्या बंधाऱ्यावर पाण्यात उडी मारताना एका दगडावर पाय घसरला आणि तळपायाच्या घोट्यापाशी काहितरी इजा होणार असे जाणवले  पाण्यातून बाहेर आल्यावर त्याची प्रचीती आलीच आणि आता उर्वरित राहिलेला ०८ किलोमीटर चा टप्पा पार करणे म्हणजे माझ्यासमोर दिव्य परीक्षाच  होती त्यातच त्या जंगलात आमच्यातील काहींना जळू चा अनुभव देखील आलाच पुढे कसेबसे ०४ किलोमीटर अंतर पार केल्यावर महामार्ग लागला 

आता इथून पुढे पायाच्या दुखापतीमुळे  मला चालणे शक्य नव्हते म्हणून बाकी सदश्यांना पुढे जाण्यास सांगितले पांढरेपाणी येईपर्यन्त डोळ्यांत पाणी येणेच फक्त बाकी होते.त्यात कुठेच मोबाइल ला range नसल्यामुळे रस्त्यात एका ग्रुप च्या महिला रस्ता भरकटल्याने रस्त्यातच थांबलेल्या होत्या त्यांना  सोबत घेऊन पांढरपनी येथे पोहोंचलो तिथे त्यांचा ग्रुप त्यांची वाटच पहात होता तिथेच आमचे अमरावती चे सदस्य देखील  होतेच त्यांना पण पुढे जाण्यास सांगितले कारण इथून पुढे मी लिफ्ट घेऊन जाणार होतो त्यातच एका ग्रुप ची गाडी तिथे आली त्यांच्या बरोबर मी माझा प्रवास चालू केला आणि थोड्याच वेळात आमची पण  गाडी येताना दिसली आणि मी अमच्यागाडीत बसून पावनखिंड येथे पोहचलो एव्हाना आमचे सर्व सदस्य पावनखिंडीत  पोहोचलेच होते.

सध्या जी पावनखिंड म्हणून दाखवतात, तो आहे एक ओढा. या ओढ्याचे पुढे एका फेसाळत्या धबधब्यात रुपांतर होते. आम्ही धबधब्याच्या शेजारील शिडीने खिंडीत उतरलो. आम्हाला समांतर कोसळत असलेले पाणी मधेच खट्याळपणे आमच्या अंगावर शिंतोडे उडवत होते.  खिंडीतून वाहत जाणाऱ्या पाण्याचे दृश्य अवर्णनीय होते.


आता सर्वच जण ज्या पावनखिंडीच दर्शन घेतात तीच खरी पावनखिंड आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण ही खिंड म्हणजे एका बाजूला पूर्णपणे बंद आहे त्यातच माझी ही शंका आमच्यासोबत असलेल्या दुसरा गाईड कृष्णा ने दूर केली ही खिंड म्हणजे पावनखिंड नाहीच ह्या खिंडीचे पहिल्यांदा भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक चित्रपट काढला होता त्यांना हे लोकेशन चांगले वाटले म्हणून त्या चित्रपटाचं चित्रीकरण त्यांनी इथे केले याबत चे स्पष्टीकरण खुद्द पेंढारकर यांनी या आधीच केलेले आहे वास्तविक या जागेचा उल्लेख कुठेच आढळत नाही कृष्णाने सांगितल्या प्रमाणे आणि वाचनात देखील आल्याने खरी खिंड ही फरसबंदी च्या वाटेवर आहे तिकडे फारसे कुणी जात नाही हे ऐकल्यावर फरसबंदी ची वाट पुन्हा परत येऊन करायचीच म्हणून मनोमन श्रद्धा ठेवून त्या भूमीचे दर्शन घेऊन आम्ही पावनखिंड गावात आलो सगळ्यांनी रुचकर अशा मसुर आणि पनीर च्या भाजी चा आस्वाद घेतला  आता बऱ्यापैकी अंधार झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनाच कामे  असल्याने विशाळगड न करता आम्ही आमचे ऊत्तम प्रकारे नियोजन करणाऱ्या संकेत आणि कृष्णा चा निरोप घेऊन श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो

श्रीरामपूर मध्ये गाडी पोचली तेव्हा पहाटेचे ०५ वाजले होते सहनशक्तीची कसोटी पाहणारा ट्रेक अखेर पूर्ण केला होता,याची आगळेच समाधान मनात होते. मसाई पठाराची हिरवाई  डोळ्यांना कायम निववत राहो आणि पावनखिंडीचे ते साहसी पाणी मनाला कायम पवित्र ठेवो अशीच काहीशी भावना (कदाचित यापेक्षा सोप्या शब्दांत मांडलेली) सगळ्यांच्या मनात होती... दोन दिवस आम्ही निसर्गासोबत जगलो होतो..खूप काही शिकलो  होतो. 

हि मोहीम म्हणजे 350 वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सुखरुप पोहोचले;पण हि वाट किती अवघड, खडतर होती याची जाणीव आम्हाला भर दिवसा, क्षणाक्षणाला पावलोपावली होत होती. त्यावेळी उर अभिमानाने भरून येत होता. अंगावर शहारे येत होते. स्वतः च्या प्राणाची आहुती देणारे शिवा काशीद, जीवात जीव असे पर्यंत लढवणारे बाजी प्रभू,फुलाजी,त्यांना साथ देणारे रायजी बांदल आणि त्यांचे  300 ते 350 बांदल मावळे आणि इतर  यांचा पराक्रम ऐकून, वाचून होतो. त्याची प्रचिती याची देही याची डोळा अनुभवून कृतार्थ झालो. (समाप्त)

टीप:- वरील लेखात वाड्यांची नावे जशी आठवली तशी घेण्यात आलेली आहे त्यामुळे अनावधानाने ती कदाचित मागेपुढे होऊ शकतात

सचिन भांड पाटील

सह्याद्रि परिवार,श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot.com




Thursday, August 10, 2023

बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम (भाग ०१)

 


बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम

दि.०५ आणि ०६ ऑगस्ट २०२३

भाग :-०१


काही निवडक आवडता ट्रेक झाल्यावर त्या ट्रेक चा वृतांत हा हवाच आणि या ट्रेकला तर हवाच ना ! खरं सांगायचं झालं तर गो.नी.दांडेकर, प्र.के.घाणेकर सारख्या इतिहास तज्ञ मंडळींनी बरेचशे लिखाण केलेल्या असल्यामुळे आणि सिनेमाद्वारे पावनखिंडीचा इतिहास आपल्या समोर आलेला असल्यामुळे मला खास करून या ट्रेक विषयी काहीही  लिहिणे म्हणजे मोठेच धाडस वाटत आहे, मात्र प्रत्येक ट्रेकरची जशी चाल वेगळी तशी प्रत्येकाची लेखनशैली सुद्धा वेगळी ! आणि याशिवाय या आवडत्या ट्रेक विषयी"मी ट्रेकला जावून आलो  फोटो काढले नाही आणि  वर्णन लिहिले नाही", तर, तो ट्रेक कसा पूर्ण झाला म्हणणार.म्हणून या ट्रेक चा इतिहासात फारसे न डोकवता पन्हाळगडावरून  शिवाजी महाराजांची पालखी धरून सलग २० तास धावणाऱ्या त्या अज्ञात भोईंना  श्रद्धांजली अर्पण करून या वर्णनाला सुरुवात करणे योग्य होईल.

भयानक धाडसी आणि जिवावर बेतू शकतील असे आखलेले बेत नंतर कसे कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनतात , याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक ! शिवरायांचे असामान्य धैर्य, बाजीप्रभूंचे अतुलनीय शौर्य, मर्द मराठ्या मावळ्यांची असीम स्वामीनिष्ठा, या सर्वांची साक्ष देऊ शकणारे जंगल, नद्या , ओढे म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! मसाईचे हिरवेकंच पठार, पुन्हा पुन्हा मन ओढ घेईल असे पांढरे शुभ्र ओढे आणि रौद्रसुंदर पावनखिंड म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! (वर्णन संपलेले नाहीये)

आत्ता कुठे वर्णन सुरु होतंय..

वरील सर्व गोष्टी ऐकून वाचून आधी २२ आणि २३ जुलै चा बेत आखला पण प्रचंड गर्दी आणि पाऊस या मुळे मी ही मोहीम ५ आणि ६ ऑगस्ट ला घेण्याचे ठरवले आणि पन्हाळा येथील संकेत बरोबर चर्चा करून  या ट्रेकची आखणी केली. 



               ०४ तारखेला रात्री ०७ वाजता निघायचे  ठरले होते. पण नेमकी  मेडिकल वर आज गर्दी उसळली होती सर्व जण "वेळेवर" जमून जाण्याचा ट्रेक करणे हे माझे एक स्वप्न आहे. बहुधा ते कधी प्रत्यक्षात येईल काय माहित.  असो.  रात्री ०८  वाजता आमचा श्रीरामपूर मधून प्रवास चालू झाला  ह्या ट्रेक ला महिला सदस्य नसल्यामुळे  बस मध्ये कल्ला तर होणारच  नेहमीचा दंगा आणि हास्याचे सातमजली फवारे चा आनंद घेत प्रवास पार पडला. प्रवास आणि झोप हे जरा आमच्या बाबतीत म्हणाल तर ३६ चा आकडा असल्या सारखे  त्यामुळे  नेहमीप्रमाणे रात्रभर जागूनच काढावी लागली


दिवस पहिला : ०५ ऑगस्ट : 

पन्हाळा आणि हिरवीगार मसाईची चादर

सकाळी ०७ वाजता आम्ही पन्हाळगड ला पोचलो. पावसाळा आणि निसर्ग याविषयी वाचलेली सर्व वर्णने आठवावीत अशी दृश्ये आम्हाला साद घालत होती जणू म्हणत होती : "०२ दिवस मला डोळ्यांत भरून घ्या, मनात साठवून घ्या, माझ्याबरोबर जरा निकोप बना." 

       पन्हाळा किल्ल्याला महाभारतापासून इतिहास आहे. पराशर मुनींचे येथे वास्तव्य होते. तसेच पूर्वी नाग लोक येथे राहत असत. यावरून या जागेला "पन्नगालय" (नागांचे घर) असे नाव पडले. पुढे इ.स. १११२ साली शिलाहार राजा भोजने या ठिकाणी किल्ला बांधला व त्याला  "पन्हाळा" हे नाव दिले. त्यापुढे यादव राजा सिंधन , आदिलशाह यांनी या किल्ल्यावर राज्य केले आणि १६५९ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ला संपूर्ण पाहावयाचा म्हटले तर अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल, इतकी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पण उशीर झाल्यामुळे जास्त ठिकाणे  न पाहता बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले तसाही आमचा ट्रेक पन्हाळगड "आणि" विशाळगड असा नसून पन्हाळगड "ते" विशाळगड असा पदभ्रमंती चा होता. 

चहा आणि नास्ता करून आमच्या सोबत असलेल्या पन्हाळा येथील संकेत ने थोडक्यात ह्या पदभ्रमंती चा इतिहास आमच्या समोर मांडला आणि पन्हाळगड च्या बागेला प्रदक्षिणा घालून.राजदिंडी चा मार्ग धरला, जेथून आम्हाला गड उतरावयाचा होता.जेथून राजे सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटले होते.  आता आम्हाला अनेक वाड्या पार करायच्या होत्या. त्यातील पहिली होती: "तुरुकवाडी". जेमतेम अर्ध्या तासात या वाडीवर पोचलो.येथून एक डांबरी रस्ता म्हाळुंगे या गावी जातो, मात्र आम्हाला मसाई पठारावर जायचे असल्याने डोंगरातील वाट धरून त्या वाटेने पुढे कूच केले.  हा रस्ता बराच चढणीचा होता.ओढ्याचे गार पाणी चेहऱ्यावर मारून पुढे निघालो. म्हाळुंगे गावाचे धनगर वाटेत दिसत होते. चढणीची वाट आता एकदाची संपली आणि कोकणातल्या एखाद्या आडगावी फिरत असताना जसा अचानक समुद्र समोर दिसून वेडे व्हावे, तसे आमचे झाले.




मसाई पठार 


 समोर साक्षात हिरवा समुद्र पसरला होता. अथांग हिरवा.. नजर जाईल तिथपर्यंत हिरवा... क्षितिजापर्यंत हिरवाच !!! मसाईचे जादुई पठार याचि देही याचि डोळा पहिले. डोळे भरून पहिले. "धरतीने हिरवा शालू पांघरणे" हा वाक्प्रचार इथे आल्यावरच बनला असेल अशी खात्री झाली. भारताला जर कधी ऑलिम्पिक स्पर्धा भरवायला मिळाल्या, तर सर्व खेळांची मैदाने सामावून सुद्धा उरेल, इतके विस्तीर्ण हे पठार आहे. येथे फोटो-सेशन झाले हे सांगणे न लगे.पठारावर चारचाकी, दुचाकी गाड्या घेऊन येणाऱ्या लोकांना बंदी आहे; त्यामुळे चराऊ गवत कमी होते आणि येणारी माणसे कचरासुद्धा करतात हे अगदी रास्त आहे. पठारावरून मार्ग कापायला सुरुवात केली.

वाटेत एक मंदीर लागले, मात्र ते मसाईचे नव्हते. "देखल्या देवा दंडवत (तो मात्र मनापासून)" करून पुढे निघालो. मसाईचे मंदीर अपेक्षेपेक्षा लांब होते. तेथे पोचेपर्यंत अनेकदा पावसाची रिपरिप लागली. श्रावण अगदी क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस ही त्याची ओळख जपत होता. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन सोबत आणलेल्या चपाती भाजी वर उभ्या उभ्या थोडाफार ताव मारून पुढील रस्ता समजावून घेऊन  तसे निघालो. वाट चुकवण्यापुरते धुके आम्हाला तसे आम्हला आडवे आले नाही .

त्यानंतर विनाथांबा कुंभारवाडी कडे कूच केली रस्त्यात लहान लहान मुलांनी आम्हाला "दादा , गोळ्या द्या" असे विनवून हेलावून सोडले. गोळ्यांचा मुबलक साठा असल्याने त्यांच्या हातावर गोळ्या ठेवून आम्ही कुंभारवाडीकडे प्रस्थान केले.वाटेत लहान मुले चहा चहा ची किटली घेऊन उभी होतीच मग काय सह्याद्रि आणि चहा ही तर माझी कमकुवत बाजू त्यामुळे सह्याद्रि मध्ये चहा ना घेताच पुढे कसे जाणार  आता बराच कच्चा  रस्ता सुरु झाला होता. चिखल आणि पाणी यांनीच जणू रस्ता बांधला होता. कुंभारवाडी वाडीवरून खोतवाडी कडे जाताना डांबरी रस्ता लागला या रस्त्याने जाताना डावीकडे कुंवार खिंड दिसते. 



कुंवारखिंड (खडकमाळ आळी :-)) 

एकावर एक असे पांढऱ्या खडकांचे थर रचलेले असे ते उंच खांब मोठे सुंदर दिसत होते. खोतवाडी येण्यास बराच वेळ गेला. तिथे आमची गाडी आलेली होती ती या साठी की कुणाला काही त्रास झाला तर त्यांना गाडीने मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तेथेसुद्धा तेथील लहान मुलांना गोळ्यांची वाटणी झाली.वाटेत रस्त्याच्या बाजूला भात लावणी चालू होती मग आम्हला भातलावणी करतानाच फोटो काढण्याचा मोह आवरलं नाही आणि ती सुद्धा हौस करून घेतली भाताची खचरे चिखलाचा रस्ता तुडवत करपेवाडी इथे आमचा मुक्काम ठरला होता. वाटेत अनेक गावकऱ्यांना आम्ही वाट आणि लागणारा वेळ याबद्दल विचारले. प्रत्येकाचा अंदाज निराळा!  चिखलातून जाताना बूट खूप "खालच्या थराला" जात होते , त्यांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे एक दिव्यच होते. करपेवाडीपर्यंत उजेडाचा वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. प्रत्येक वाडीमध्ये पाणी मुबलक, भातशेते तर असंख्य ! दिवसभरात जेवढे श्वास घेतले असतील तेवढीच भाताची रोपे आम्ही पहिली असतील. 



आपसांत बोलणे आता जरा कमी झाले होते. वाडी काही केल्या येत नव्हती. वाडी येईपर्यन्त अविरत चालणे याशिवाय पर्याय नव्हता. सहा च्या आसपास दूरवर एक घर दिसले. ती वाडी म्हणजे च करपेवाडी जिकडे आमची राहायची सोय होती आणि मनाची चलबिचल क्षणार्धात थांबली.सर्वांनी तेथील एका घरात फ्रेश होऊन मॅट अंथरून पाठ टेकवली चहा आणि खाऊची देवाणघेवाण करून थोडा वेळ गप्पा मारल्या. दमलेल्या शरीराला अन्नापेक्षा विश्रांतीची जास्त  गरज होती. कनकने आणलेली वेदना शामक मलमे बाम या मुळे सार घर त्या वासाने सुहासिक झाले होते.थोड्याच वेळात गावाकडील जेवणावर ताव मारून त्याबद्दल मनोमन कौतुक करून साडेनऊ वाजता आम्ही झोपलो. रात्री सारखे कुणी उठले तर दरवाजा बंद करायला सांगावे लागायचे कारण कुणीही प्राणी आला असता तरी आम्ही त्याचे भोजन झालो असतो कारण उठून पळण्याचे त्राण कुणाच्याच अंगात नव्हते. आजच्या दिवसाची चाल: अंदाजे २२  किलोमीटर !  

(क्रमशः)..



सचिन भांड पाटील

सह्याद्रि परिवार



Friday, July 28, 2023

आडवाटेवरची सुरक्षित पावसाळी भटकंती


 आजकाल सोमवार उजाडतो आणि टीव्ही वर  एक बातमी हमखास झळकते.अमुक ठिकाणी नदीत दोघे तिघे बुडाले, समुद्र किनारी भरती अहोटीचा अंदाज  न आल्याने दोघे तिघे बुडाले.धबधब्यात कड्यावरून घसरून मृत्यु ते अगदी एखाद्या किल्ल्याच्या वाटेवर चढाई करताना दुर्दैवी अंत व्हावा ते अगदी जंगलात हरवणे मग मदत रेस्क्यू वगैरे.

           खऱच परिस्थिती एवढी बदलली आहे . अगदी काही वर्षांपूर्वी लोकांना वर्षा पर्यटनाखाली निसर्गातले पावसाळी चित्र दाखवुन घराबाहेर पडायला उद्युक्त केले जाई. पण आज हे असे बेताल चित्र पाहून घराबाहेर पडावे असे वाटत नाही, यावर कुठेतरी बंधन घालावी असे वाटू लागले आहे.

          ठराविक गटातील लोकांना धांगडधिंगा हवा असतो, निसर्ग वगैरे असे काही नसतं. फक्त रम आणि रमा हेच त्यांचे सुख. फरक एवढा आहे ऐरवी हे बंदिस्तपणे केले जाते आणि पावसाळ्यात खुलेआम. पण खरच निसर्गात जाऊन त्याची विविध रूप पाहून तिथला आस्वाद घेऊन हरवून एका वेगळ्याच धुंदीची अनुभुती घेणे वेगळे, की त्या साठी दारूची बाटली,नंगा नाच आणि मोठ्या आवाजाचा डिजे हवा ?

हि परिस्थिती आत्ताच्या सर्व प्रसिध्द झालेल्या धबधब्यांच्या ठिकाणांची आणि तिथल्या गावाची झाली आहे. तिथल्या ग्रामस्थांचे तर जगणेच मुश्कील झाले आहे, शनिवार रविवार आला कि त्यांच्या अंगावरच काटा येतो. हे झाले सर्वसामान्य अविचारी लोकांबद्दल.

निसर्गात मुक्तपणे पण निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता, इतिहासाचा मागोवा घेत तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, डोळसपणे केलेली भटकंती हि ट्रेकींगची पहिली पायरी, अर्थात हे माझे मत. पण हल्ली पावसाळी ट्रेकींगचे पेव फुटलय, सोशल मिडीयानेही त्यापरीने हातभार लावलाच आहे.ज्या भागात जातोय तिथली कुठलीच माहिती न घेता अमका जातो म्हणून तमका जातो, सोम्या जातो मग गोम्या जातो, हि गेली मग मी जाते अशी हवशे नवशे गवशे यांची यादी वाढतच जाते.खरतर ट्रेक म्हणजे काय हेच यांना समजत नाही. ट्रेक म्हणजे काय, ट्रेक करताना घ्यावयाची खबरदारी, आपण कुणासोबत जातोय ज्या ग्रुप सोबत जातोय तो ग्रुप मान्यता प्राप्त आहे कि नाही त्यांचे ग्रुप लीडर हे प्रशिक्षित आहेत का ही सर्व माहिती घेऊन आपण नियोजन करायला पाहिजे पण हे करतय कोण ?आता यात काही असे म्हणतील आम्ही एवढ्यादिवसाचे ट्रेक करतोय कुठे काय झाल पण वेळ काही कुणाला सांगून येत नाही मग अशा लोकांच्या करामतीमुळे सारे ट्रेकींग नाहक बदनाम होते.

आणि रेस्क्यू ची पुरेपूर माहिती नसल्याने रेस्क्यू टीम ला पाचारण करावे लागते पण ती टीम पोहचे पर्यत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेल असते .

कधी काळी दुर्दैवाने निसर्गात अशी वेळ कुणावरही येऊ शकते. पण तरी सुध्दा थोड्या अनुभवाअंती, नियोजनबध्द अभ्यासाने तसेच त्या वेळे ची परिस्थिती सदसदविवेकबुध्दीने हाताळून बरेसचे अपघात टाळता येऊ शकतात. पण या बाबतीत खोलवर विचारच कुणी करत नाही आणि बदनाम मात्र निसर्ग होतो हिच खरी शोकांतिका आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या पावसाळ्यात होणारी सह्याद्रि मधील गर्दीचा विचार करता आम्हा भटक्यांना असे ठिकाण नकोसे वाटतात आणि आम्ही आशा जागेचा शोधात असतो तिथे माणसांची नाही तर निसर्गाची गर्दी असेल.

ह्या पावसाळ्यात अशाच ठिकाणी भेट द्यायची हे मनोमन ठरवलेच होते आणि समोर आल की आठ वर्षांपूर्वी रतनगड ते हरिश्चंद्र गड हा ट्रेक करत असताना कामशेत गावा जवळ आम्ही आलो तेव्हा आमच्या वाटाड्या मित्राने कुमशेत च्या कलकी धबधब्याची ओळख करून दिली तो पर्यत ह्या धबधब्याविषयी गावातील लोकांच्या व्यतिरिक्त फारसे कुणाला माहिती नव्हते.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. 

        मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं कुमशेत हे 800 लोकवस्तीचे गाव राजूर पासून अवघे अंदाजे 35 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून आजोबा डोंगर, शिरपुंजे चा डोंगर दरीच्या कुशीत वसलेलं अतिदुर्गम गाव.गावाकडे येताना असंख्य धबधब्यांची गुंफण च लागते त्यात भर पडते ती मनमोहक अशा देवराई ने देवराई म्हणजे देवासाठी उभारलेले जंगल त्यामुळे इथं वृक्षतोड होत नाही .

कुमशेत गावातून थोडीफार पायपीट केल्यानंतर गावाचे दैवत म्हणजे धारेराव देवस्थान धारेराव अस्वले हे येथील गावातील इंग्रजांच्या विरुद्ध कडवे लढणारे क्रांतिकारक अजूनही त्यांचे इथे अस्तित्व आहे असे गावकरी मानतात तेथूनच पुढे सुंदर असा कुमशेत चा कोकणकडा दिसतो तो कडा ठाणे जिल्ह्यात मोडतो.इथे आल्यावर भिरभिरणारा वारा मनात धडकी भरवतो. पावसाळ्यात येथे असंख्य रिव्हर्स फॉल मोत्यांची उधळण आपल्या अंगावर करतात. धारेराव मंदिर जरी नगर जिल्ह्यात असले तरी कोकणकडा मात्र ठाणे जिल्ह्यात येतो. येथेच खूप उंच लोखंडी मनोरा वन खात्यातर्फे उभारला आहे. येथून सभोवतालचे विहंगम दृश्य दिसते. येथून धुके नसल्यास अगदी माळशेज घाटातील वाहतूक दिसते. खूप वेळा या भागांमध्ये  धुके पडते आणि धुके पडले की निसर्ग नजरेत साठवता येत नाही. कधीतरी येणारे धुके, सप्तरंगाची उधळण करणारे इंद्रधनुष्य, ओढ्याचे खळाळणारे पाणी, मधूनच पडणारे उन, आणि अचानक येणार्‍या श्रावण सरी शरीराबरोबर मनालाही ओलंचिंब करून टाकतात. 

कुमशेत वरून परतीच्या मार्गाने जेव्हा आपण लागतो तेव्हा आपल्याला कलकी धबधब्याचे दर्शन दिसते आता वनविभागाने तिथे लोखंडी ग्रील टाकल्याने सुरक्षित असा हा धबधबा झाला आहे.जोराचा पाऊस नसल्यास तिथे खाली उतरून कलकीचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही.

अशी ही आडवाटेवर कुमशेत ची भटकंती नुकतीच सह्याद्रि परिवाराने संपूर्ण सुरक्षितता बाळगून पूर्ण केली या भटकंती चा सारांश सांगायचे झाल्यास वाटेच्या दोन्ही बाजूला गर्द हिरव्या झाडीची झालर, कोण्या अनामिक पक्ष्याची रानशीळ, छोट्या मोठ्या खेकड्यांची पळापळ,गर्द हिरव्या रानात छाती दडपून टाकणारे गाव, मंदधुंद वातावरण, हवेच्या झोताने डुलणारी गवताची पाती, मधेच डोकावणारी धुक्याची चादर, झाडांच्या पानावर टपटप पडणारे पावसाचे थेंब, छोट्या मोठ्या धबधब्यांचे खळखळाटी संगीत, ढगांचा आणि वाऱ्याचा पाठशिवणीचा ऐन भरात आलेला खेळ. हा सह्याद्रितील पाऊस आणि पावसातली भटकंती ह्यामध्ये असे अनुभव पदरात पडल्यावर मनाला मिळणाऱ्या गारव्यासह  डोंगरयात्रा सार्थकी लागल्याचे समाधान पुढे आजन्म टिकून राहील.

पुन्हा भेटूया लवकरच अशा दुर्लक्षित आडवाटेवर सुरक्षित पावसाळी भटकंती करण्यासाठी.

सचिन भांड 

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,

श्रीरामपूर






Monday, February 20, 2023

सह्याद्रि परिवार, शिवजयंती उत्सव २०२३


 महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा जन्मदिन....जवळपास पावणेचारशे वर्षांपूर्वी सह्यपर्वतावर एक निश्चयाचा महामेरू अवतरला, तो युगपुरूष हातातली भवानी तलवार उपसत उच्चारता झाला, "ये राज्य व्हावें, ही तो श्रींची इच्छा !" शिवरायांचे नाव घेतल्याखेरीज आमचा दिवसही जात नाही. मग शिवजयंती,तिची तारीख- वार-तिथी तर औपचारिकता ठरते.


  शिवजयंती साजरी करायची म्हणजे आज आम्ही महाराजांच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पुतळ्याला हार वाहतो. मोठमोठ्याने घोषणा देतो. याहीपुढे जाऊन कोणी उत्साही लोक हातात भगवे घेऊन गावभर फिरत राहतील. डिजे लावून नाचणाऱ्यांच्या विकृतीवर मात्र त्वरीत उपचार होणं गरजेचे आहे.; पण मला प्रश्न असा पडतो, की शिवचरित्राची पोच खरंच आज किती भारतीयांना आहे ?

खरं तर माझा प्रश्नच चुकला ! भारतीय म्हणण्याआधी फक्त महाराष्ट्राचा विचार करायला हवा. ज्या युगपुरूषाची नोंद तत्कालिन जागतिक राजकारणात घेण्यात आली, आज भारतभर त्याची धड ओळखही नाही. आपला इतिहास आपल्यालाच माहीत नाही यापेक्षा दुसरे आपल्या कर्मदरिद्रीपणाचे कुठले लक्षण सांगणार? हे एवढं या ठिकाणी सांगावेसे वाटते याला कारण म्हणजे काल परवा असच एका शाळे मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग आला तिथे मुलांना काही  महाराजां च्या विषय अगदी सोपे प्रश्न विचारले पण त्यांची उत्तरे ऐकून तर अगदी अवाक च झालो पण त्यात त्या निरागस मुलांची काही चूक नाही म्हणा  याला एकमेव  कारन म्हणजे दिवसेंदिवस इतिहास च्या पुस्तकातून एक एक पान कमी होत जाण अहो इतकच काय पण आपला इतिहास जो काही समजतो तो या गड किल्यांच्या मधून च पण आज काल ह्या मुलांना शाळा घेऊन जाते ती so called picnic स्पॉट ला अहो पण तिथे तुम्ही तुमची फॅमिली पण घेऊन जाऊ शकता ना एक काळ असा होता की सहल म्हंटल की ती फक्त गड किल्ले वर असायची इतकेच काय लहान मुले तर सोडाच पण जेव्हा आम्ही असे गड किल्यावर जातो तिथल्या प्रत्येक वास्तू ला तिथल्या शैलीला एक विशिष्ट प्रकारचे नाव असतात ती वास्तू तिथेच का अशीच का त्या मागची अनेक कारण असतात हे आपण जाणून घेतो का म्हणून च खर तर या शिवजयंती ला हे सर्व विस्तृत पणे मला आपणा समोर मांडायचे होते पण वेळेअभावी ते मांडता नाही आले कारण अस  वाटायला नको आपण नुसतेच किल्ले सर करतो फोटो काढतो अन झाला आमचा गड पूर्ण असो परत कधीतरी तो योग् येईलच पण ती कमी आपल्या दोन छोट्या शिवकण्न्या यांनी महाराजांचे विचार आणि ते विचार आज आपण किती अमलात आणतो हे सांगताना खर तर अंगावर अक्षरशः शहारे येत होते.त्यात च योगायोगाने माझ्या आयुष्यात दोन व्यक्ती अशा आहेत त्यातील पहिली म्हणजे माझ्या जडणघडणी मध्ये जीचे अमूल्य स्थान आहे त्या आमच्या मातोश्री आणि दुसरे म्हणजे महाराज आज त्यांच्याच जयंती निमित्त मातोश्री ची आपल्या परिवाराची भेट व्हावी या सारखा माझ्यासाठी दुर्मिळ योग् कुठला नसावा तिच्या बद्दल किती ही लिहिले तरी कमीच आहे तिचा अध्यात्मिक अभ्यास किती आहे तिच्या वाणीतून आपणा समोर आलाच असेल. त्यातच महाडिक कुटुंबांचे आदरातिथ्य म्हणजे आपल्या घरात पण कुणी करणार नाही इतके ते करतात.

 मराठ्यांचे हे स्वराज्य ही केवळ शिवरायांची वैयक्तिक महत्वकांक्षा नव्हती; ते स्वराज्य होते, रयतेचे राज्य होते. धर्मवेड्या औरंगजेबाकडे ही समज नव्हती. शिवरायांनी माणसं जोडून स्वराज्याचे शिलेदार घडवले; कपटी औरंगजेब स्वतःपासून माणसं तोडत राहिला आणि मोगल सत्तेच्या नाशास कारणीभूत ठरला. शिवशाहीची हीच पोच महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांमध्ये राहिली नाही आणि आपण आपले स्वराज्य गमावून बसलो.म्हणूनच आपण हे गड किल्ले फिरत च राहू अशीच आपल्यासारखी  माणसे जोडत राहू  पण त्याच बरोबर असे कार्यक्रम घेऊन आज आपली छोटी मुले रुद्रा,ओम,वेदांत आज पुढे येऊन काहितरी बोलू लागलीत ही एक आपल्यासाठी अभिमानाची बाब आहेच असेच नवीन पिढी साठी नक्कीच आपले हे प्रयत्न प्रेरणादायी घडावे इतकीच अपेक्षा.

पुनःस्च एकदा आपण सर्व जण आवर्जून ह्या शिवजयंती उत्सवात हजर राहिलात त्या बद्दल सह्याद्रि परिवाराच्या वतीने आभार मानतो.


सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार



Sunday, February 12, 2023

एक वैभवशाली साम्राज्य (भाग ०२)

 


हम्पी बदामी टूर २०२२

दिवस तिसरा

ऐहोळे, पट्टदकल, बदामी


दोन दिवसांच्या बऱ्यापैकी पायपीटी नंतर आमचा तिसरा दिवस उजेडला तो सकाळच्या चार च्या गजर ने कारण सकाळी लवकरच आम्ही बदामी ला निघणार होतो.

बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी नावाचे दोन असुर बंधू राहत होते.त्यावरून च या शहराला वतापी हे नाव पडले व कालांतराने बदामी असे संभोदन्यात आले.

साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत. 

अशा या राजवटीमधल्या राजांचे योगदान बघायचे असेल तर बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल इथे भेट द्यायलाच हवी. लेणी आणि मंदिर स्थापत्याची विविध अंगे, तसेच कमालीच्या सुबक मूर्ती यांचे मोठे भांडार म्हणजे ही तीन ठिकाणे होत. चालुक्यांची राजधानी असलेले बदामी आणि तिथल्या लेणी आणि जवळच असलेली ऐहोळे आणि पट्टदकल ही ठिकाणे म्हणजे चालुक्यांचे वैभव आहे. आज हे वैभव निव्वळ स्थापत्यरुपात आपल्यासमोर उभे असले तरीसुद्धा इथली मंदिरे, त्यावरील मूर्ती आपल्याशी संवाद साधतात. अभ्यासकांना, तज्ञांना अवाक करणारे इथले स्थापत्य सर्वसामान्य पर्यटकाशी सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने बोलते, संवाद साधते.

त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती.

हम्पी वरून साधारणपणे 145 किलोमीटर असलेल्या बदामी च्या अगोदर आपण पोहचतो ते ऐहोळे या गावी त्या नंतर पट्टदकल या गावी

ऐहोळे-

ऐहोळे या गावाविषयी अशी एक दंत कथा सांगितली जाते की भगवान परशुराम यांनी आपले वडील जमदग्नी ऋषी यांचा बदला घेतल्यानंतर परशुरामाने रक्तलांछित वस्त्र मलप्रभेच्या पात्रात धुतले तेव्हा नदीचे पाणी लालभडक झाले. नदीचे पाणी भरण्यासाठी आलेल्या नारीनी हे दृश्य बघितले व ते पाहून त्यांच्या तोंडात आश्‍चर्याने उद्गार आले- ‘ऐ… होळे… ऐ… होळे…’ त्यामुळेच गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामनामासंदर्भात कितीही कथा, दंतकथा असल्या तरी बदामी चालुक्याच्या राजवटीत ‘ऐहोळे’ येथे अग्रहार आणि विद्याकेंद्र होते. 

ऐहोळे मंदिर समूह म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राची शाळा समजली जाते. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात. गेट मधून प्रवेश केल्यावर पहिलेच तुम्हाला आकर्षित करणारे दुर्गादेवी मंदिर दिसते. दुर्गामंदिर आयताकृती असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुळाकृती आहे. दिल्लीतल्या संसद भावनासारखी दिसते. मलप्रभेच्या काठावरती कर्नाटकातील बर्‍याच राज्यकर्त्यांनी आपल्या गौरवाला साजेल अशी मंदिरे उभारली. कला-संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला, तिच्या उन्नतीला चालना दिली, तिला राजाश्रय प्रदान केला. दोन दिवसांपासून नुसतीच मंदिरे पाहत असलो तरी आज या वैभवशाली ठेव्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणाहून येत होती.



तसेच येथील दुसरे महत्वाचे मंदिर म्हणजे लाडखान मंदिर नाव जरी विचित्र वाटत असले तरी असे सांगितले जाते लाडखान नावाचा कोणे राजपूत बराच काळ इथे वास्तव्यास होता म्हणून या विष्णु च्या मंदिरास लाडखान मंदिर असे म्हंटले जाते.



ऐहोळे बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा ऐहोळे पासून केवळ 12 किलोमीटर असलेल्या पट्टदकल कडे वळवला ऐहोळे प्रमाणेच पट्टदकल चा मंदिर समूह म्हणजे अदभूत च


पट्टडकल

               पट्टडकल हे ठिकाण म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांचा समूह.  पट्टडकलच्या आवारात असलेली मंदिरांची नाव खालीलप्रमाणे

१ ) काडसिद्धेश्वर मंदिर

२) जांबूलिंग मंदिर

३) गलगनाथ मंदिर

४) संगमेश्वर मंदिर

५) विरुपक्ष मंदिर

६) मल्लिकार्जुन मंदिर

७) काशीविश्वेश्वर मंदिर














१) काडसिद्धेश्वर मंदिर

       कडसिद्धेश्वर मंदिर हे पट्टडकल मधील गलगनाथ मंदिराशेजारी असलेलं एक मंदिर आहे. कडसिद्धेश्वर नामक एक संन्यासी इथे राहत असल्याकारणाने ह्या मंदिरास "काडसिद्धेश्वर मंदिर" म्हणून संबोधले जाते. झालेल्या पडझडीमुळे ह्या मंदिराचं शिखर हे तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस शिव हरिहर आणि अर्ध नारेश्वर च शिल्प चित्रित करण्यात आलं आहे.





काडसिद्धेश्वर मंदिर

२) जांबूलिंग मंदिर

         जांबूलिंग मंदिर हे नागर शैलीत बनवलं गेलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेले नटराजाचं अप्रतिम शिल्प.


जांबूलिंग मंदिर

३) गलगनाथ मंदिर

       आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे हे मंदिरसुद्धा नागरशैलीत बांधलं गेलं आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रदीक्षिणेस प्रशस्त जागा आहे प्रवेशद्वारावर नटराजाचं अनोखा शिल्प आहे.


गलगनाथ मंदिर

४) संगमेश्वर मंदिर

       संगमेश्वर मंदिर हे आठव्या शतकाच्या आसपास बांधलं गेलेलं एक शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी चालुक्य राजा विजयादित्य ह्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणून ह्या मंदिरास विजयेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.


विरुपाक्ष मंदिर

         विरुपाक्ष मंदिर हे इ. स. ७४० मध्ये द्रविड शैलीत स्थापन केलेलं असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराची स्थापना लोकमहादेवी नामक राणीने आपल्या पतीच्या कांची विजयाच्या आठवणीत बांधले आहे म्हणून ह्यास लोकेश्वर मंदिर म्हणून संबोधतात. मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात काळ्या दगडात कोरलेली एक भव्य नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाज्यापाशी दोन्ही बाजूस द्वारपालाची शिल्प आहेत व आजूबाजूस शृंगारिक जोडप्यांची शिल्प रेखीत करण्यात आली आहेत.


विरुपाक्ष मंदिर

६) मल्लिकार्जुन मंदिर

         मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे एक शिवमंदिर आहे शंकराला त्रैलोकेश्वर सुद्धा म्हंटलं जातं. हे मंदिर विक्रमादित्य च्या महाराणी त्रैलोक महाराणी ने आपल्या पतीच्या विजयाला स्मरून निर्माण केलं होतं.


मल्लिकार्जुन मंदिर

७) काशीविश्वेश्वर मंदिर

            काशीविश्वेश्वर मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूस असलेले मंदिर. ह्याची बाहेरील बाजूस असलेली सजावट अप्रतिम आहे. उत्तरी शैलीतल्या असलेल्या मंदिराच्या कळसावर शिव नृत्य करीत असल्याचे शिल्प आहे बाहेरील बाजूस शिव पार्वती अर्धनारेश्वर ह्यांची शिल्पं आहेत.


पट्टदकल आणि ऐहोळे येथील ऐतिहासिक मंदिरे पाहून आम्ही आता काही वेळात च बदामी इथे पोहचलो आता एव्हाना बऱ्यापैकी पोटात कावळे कोकत च होते आणि विश्वास बसणार नाही इतके रुचकर जेवणाचा आनंद घेऊन आम्ही बदामी च्या लेण्या बघावयास निघालो.







या गावाचा परिसर मोठमोठ्या शिलाखंडांनी युक्त असा असून त्यापैकी गावापासून जवळच असलेल्या अगस्ति तलावाशेजारील मोठया टेकडीवर पाषाणात ही लेणी कोरलेली आहेत . भारतीय पुरातत्व विभागाकडून देखभाल केली जात असलेल्या या लेण्यांच्या सभोवतालचा भाग अगस्ती तलाव व भूतनाथ मंदिर समूह यांनी व्यापलेला आहे .या लेण्यांकडे काही पाय-या चढून जावे लागते . एका अखंड डोंगरात खोदकाम करून ही लेणी तयार करण्यात आली आहेत . या लेण्यांमधील लेणी क्रमांक 1 मध्ये शिव व इतर हिंदु देव देवता लेणी क्रमांक 2 व 3 मध्ये  विष्णु व विष्णुचे विविध अवतार तसेच  रामायण काळातील  प्रसंग व यक्ष किन्नर,नर्तकी असे  दाक्षिणात्य पध्दव्तीच्या मुर्ती खांबावर , दर्शनी भिंतीवर तसेच खांबाला आधार देणा-या तुळया व छत यावर कोरलेल्या आहेत . लेणी क्रमांक 4 मध्ये जैन शिल्पे आहेत .जवळपास दीड हजार वर्ष झाली या कोरीव शिल्पांना ! पण आजही सुस्थितीत आहेत .  महिषासूर मर्दिनी व शिव पार्वती शिल्पे सुबक व सुंदर आहेत. हा मंदिर समूह सुंदर देवालये व स्वच्छ परिसर यामुळे विलोभनीय वाटतो .आता बऱ्यापैकी अंधार पडवयास सुरवात झालीच होती आणि आमची ही अशी  सुंदर तीन दिवसांची हम्पी बदामी ट्रिप पूर्ण करून आम्ही मार्गस्थ झालो खर तर हम्पी बदामी चा मनापासून जर अभ्यास करावयाचा झाल्यास तुम्हाला आठ दिवस सुद्धा कमी पडतील यात मात्र तीळ मात्र शंका नाही.असो माझ्या ह्या दोन्ही भागातील ब्लॉग मध्ये माझ्या नेहमीच्या ब्लॉग प्रणाने प्रवासवर्णनाला प्राधान्य न देता ऐतिहासिक स्थळाची माहिती देण्यावर मी जास्त भर दिला नाहीतर नुसतेच एखाद्या पिकनिक सारखी ही टूर झाली असती.

वरील सर्व संदर्भ हे मी आशुतोष बापट यांच्या सफर हम्पी-बदामी या पुस्तकाच्या आधारे आणि तिथे पुरातत्व विभागाने लावलेल्या माहितीच्या आधारे  घेतलेला आहे.


धन्यवाद🙏🏻

सचिन भांड 

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार, श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot. com

Friday, February 10, 2023

एक वैभवशाली साम्राज्य (भाग -०१)

 


सह्याद्रि ट्रेकर्स परिवार आयोजित हम्पी बदामी टूर (भाग-०१)

दि.३ ते ५ फेब्रुवारी 2023

कोण्या वास्तुविशारद ला पहाटे एक कोवळे स्वप्न पडले आणि त्याने अशी जगप्रसिद्ध शिल्पांनी सजलेली सारी नगरीच सजवली. हंपी मधील विठ्ठल मंदिर पाहताना असंच काहीसं वाटत होतं . ग. दि. माडगूळकर ह्यांनी लिहलेला "कानडा राजा पंढरीचा" हा अभंग सारखा मुखी वाहत होता. इथला विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपूरात नेऊन लपवला अशी एक दंतकथा सांगितली जाते म्हणून कानडा राजा पंढरीचा. हजारो मंदिरे असलेल्या हंपी - बदामी मध्ये कुठल्याच देवळात आता पूजा होत नाही हे एक आश्चर्यच आहे. ह्या कथेला असामान्यतेची किनार आहे. या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवांनी स्वत:च या देवळात रहाण्यासाठी ठाम नकार दिला. कारण, हे मंदिर फारच भव्य आणि सुंदर असल्यानं देवांना इथं राहायला संकोच वाटला असता.

            हंपी- बदामी हे जगातलं सर्वात मोठं ओपन एअर म्युझियम पहायला जायचं हे एक प्रत्येक फोटोग्राफर च स्वप्न असत बऱ्याच वेळेस ठरलं तेव्हा प्लॅन फक्त कागदावरच होता. पण कालांतराने एक गोष्ट जाणवली ही टूर म्हणजे एकट्या दुकट्या ने करण्यासारखी वाटत नाही म्हणून ग्रुप च घेऊन जायचा हे ठरवलं केवळ पंधरा च दिवस उरले असले तरी हंपी-बदामी बाबत अनभिज्ञच होतो. जेवढं वाचलं होत त्यावरून येथील स्थळांची मनात भेळ होत होती. कुठे आधी जाव कुठे नंतर जाव ह्यात डोक्याचा भुंगा झाला होता. अनेक जाणकारांना आणि आधी जाऊन आलेल्यांना त्रास द्यायला सुरवात केली आणि रंगमंचावरचा पडदा हळू हळू उघडत जावा तसा हा प्लान मोकळा झाला.

माझा हा ब्लॉग प्रवास वर्णन ला जरासा फाटा देत ऐतिहासिक संदर्भावारील असेल कारण प्रवास वर्णन आणि ऐतिहासिक माहिती असे दोन्ही म्हंटल की ब्लॉग हा मोठा होतो.


भाग १ आणि भाग २ आशा ह्या स्वरूपात हा ब्लॉग असेल त्यात भाग १ मध्ये हम्पी च्या विषयी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि भाग २ मध्ये ऐहोळे, पट्टदकल, आणि बदामी या विषयी असेल.

हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज तेथील १५ ते २० किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना मन उद्विग्न होते.

कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावापासून १३ किमी अंतरावर असलेले हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज हम्पी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास चलतपटाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातो.

विजयनगर (विजयाची नगरी) हे दक्षिण भारतातील इ.स. १३ ते १५ व्या शतकातील बलाढय़ हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना इ.स. १५०३ ते १५३० हा या साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्याच काळात पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस हे शाही सम्राटाचे पाहुणे म्हणून हम्पीमध्ये राहिलेले. त्यांची रोजनिशी विविध भाषात उपलब्ध असून त्यातील वर्णन सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे. ‘सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम रईस शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती.’ पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही. अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने बाजार फुलून जात असे. राज्याचा विस्तार थेट ओरिसापासून केरळपर्यंत होता. राजाजवळ सात ते आठ लाख खडे सैन्य होते. चलनात सोन्याची नाणी होती. विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती. पण इ.स. १५६० नंतर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इ. स. १५६५ तालीकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा अघोरी नाश केला गेला. तलवारी, कुऱ्हाडी, हातोडे व दुसरे जे काही आयुध हाताला मिळेल त्याने अहोरात्र अघोरी कृत्य चालू होते. तीन महिने शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते ते क्रूरकर्माच्या तोडण्यापलीकडचे होते. आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.’


१५ ते २० किमी परिसरात पसरलेल्या या उद्ध्वस्त शहरात आपणास जागोजागी दिसतात अजस्र शिळा. हम्पीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. पंपातीर्थ स्वामीस्थल या नावाने ते प्रसिद्ध आहे. मंदिराचे पूर्वेकडील गोपूर १०५ फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. मध्यात विस्तीर्ण आयताकृती प्रांगण. त्यात अनेक गोपुरे आहेत. कृष्णदेवरायांच्या काळात ‘राज्याभिषेक मंडप’ व सर्वात लहान गोपूर बांधले गेले. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढविलेले १०० खांब आहेत. अलंकारांनी मढविलेला नंदी आहे. त्यावर आरूढ गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, कृष्ण, विष्णू व शिव या अवतारांच्या अनेक कथा शिल्प माध्यमातून जिवंत केलेल्या आहेत.



विजय चौक येथील प्रमुख राज्यकर्त्यांचा चौथरा ५३०० स्क्वे. फूट आहे. त्याला ४० फूट उंच कोरीव कामाची गॅलरी आहे. चौथऱ्यावरच्या पायाचे दगड अजूनही उत्तम स्थितीत आहेत. त्या काळात सर्व बाजूंनी गॅलरीला लाकडी खांबाचा आधार आहे. याला लागून दोन मजली भव्य हॉल ज्याला १०० खांब, दगडी जिने, आहेत. हिरव्या रंगाच्या क्लोराईट दगडाच्या चौथऱ्याला मागून शिरण्यास गोलाकार दगडी जिना आहे. बाजूने चोर खोल्या आहेत. या जागेवरून आपल्या राण्या व दासी या लवाजम्याबरोबर राजा विजयादशमी सोहळा पाहत असे. बाजूच्या भिंतीवर युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे जथे, देखणे घोडे, उंट, नर्तिका, पर्शियन टोप्या घातलेले लांब दाढीवाले परदेशी प्रवासी या सर्वाचे कोरीव कामातील देखावे पाहून आपण थक्क होतो. होळीच्या सणात नर्तिकांच्या हातात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्या व त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा जोश इतका जिवंत उभा केलेला आहे की जणू आपल्यासमोर खेळ चालू आहे असे वाटते. वाघ, बिबटे, नीलगाई, मगरी यांच्या शिकारीची शिल्पे, व शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भेदक क्रूर भाव अचूक टिपलेले आहेत.

राजाच्या पदरी असलेले लक्षावधी सैनिक, हजारो सजविलेले अरबी घोडे, हत्ती, संपूर्ण शस्त्रागार या विजय चौकात परदेशी पाहुण्यांसमोर समारंभपूर्वक दाखवले जात असे.



याला लागूनच दोन ते तीन हजार स्क्वे. फूट जागेत २५० फूट खोल पुष्करणी असून त्याला १०० ते १२५ आखीव पायऱ्या आहेत. राजा पवित्र मूर्तीना या कुंडात स्नान घालत असे. या कुंडाला लागून राजवाडय़ाच्या भग्नावशेषाचा भला मोठा ढीग पसरलेला दिसतो.


सासवकेलु गणपती मूर्ती मोहरीच्या दाण्यासारख्या दगडाची बनलेली असून जवळजवळ २० ते २२ फूट उंच आहे. तिच्या चारी बाजूंनी मखराचे खांब आहेत. समोर बसलेला मूषक वेगळ्या दगडाचा आहे. याच मूर्तीच्या पाठी गौरी ची मूर्ती रेखाटलेली आहे. ही मूर्ती १७ फूट अखंड दगडात कोरलेली आहे. तिच्या सर्व बाजूला विविध आकारांचे गुळगुळीत दगड पडलेले आहेत. बहुधा अर्धवट बांधलेल्या मंदिराचे दगड असावेत. या टेकडीवर असलेल्या गणपती मूर्तीच्या खालच्या बाजूस हम्पी बाजाराची जागा असून त्यामध्ये रुंद आखीव रस्ते व दोन्ही बाजूंस दुकानांच्या गाळ्याचे चौथरे आहेत तिथे हिरेमाणके उघडय़ावर विकण्यास असत. तेव्हा परदाओ हे सोन्याचे गोल चलनातले नाणे होते. त्याच्या एका बाजूस दोन प्राण्यांची चित्रे व दुसऱ्या बाजूस राजाची मुद्रा आहे. नाणी पाडणारी टांकसाळ एका भव्य बंदिस्त इमारतीत आहे. आज हा परिसर थडग्यासारखा आहे. एके काळी येथून सोन्याचा धूर शहरावर पसरत होता. 



लक्ष्मी नरसिंह-

 (उग्र नरसिंह ) 

हे २२ फूट उंचीचे भव्य शिल्प मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. विष्णूचा अर्धमानवी व अर्धसिंहाचे तोंड असलेला अवतार, सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेला तर एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीची तोडफोड अशी विचित्र झालेली आहे की लक्ष्मीचे फक्त हातच कमरेभोवती दिसतात. मूर्तीच्या आसपास पडलेले महाकाय आकाराचे दगड पाहिल्यावर लक्षात येते की हे संपूर्ण तोडणे किती कठीण होते. आणि म्हणूनच आजही हे शिल्प चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीसमोर अखंड दगडातील शिवलिंग असून त्याचा तळ सतत पाण्याखाली असतो.


राणी महल

राणी महालाच्या आत शिरल्यावर मध्यात प्रशस्त पायऱ्या असलेला स्नानाचा भव्य हौद आहे. मध्यात कमळाच्या आकाराची कारंजी आहेत. चोहोबाजूंनी तीन मजले असलेल्या गॅलऱ्या आहेत. त्याला लागून राण्यांची दालने आहेत. या जागेत राण्या व दासी स्नानाचा आनंद लुटत.


लोटस महल

राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित राहण्याचा  महाल म्हणजे झेनाना तटबंदी. याची जाडी वरवर कमी होत गेलेली. कमानीवरील सर्व कोरीव कामाची बांधणी हिंदू मुस्लीम संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड अनुभवणे वर्णनातीत आहे. महालाच्या बाजूस दोन उंच टेहळणी बुरूज आहे. त्यातल्या विविध कोनाडय़ांतून चोहोबाजूंच्या प्रदेशावर कडक नजर ठेवता येत असे. महालाची बांधणी अशी केलेली आहे की बाहेरून आतील स्त्रियांच्या हालचाली अजिबात कळत नसत. या जागी पुरुषांना प्रवेश नसे व सुरक्षिततेची जबाबदारी तृतीयपंथी सेवकांची असे. दोन पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या रोजनिशीतील याबाबतचे वर्णन वाचताना आपल्या डोळ्यासमोर सुवर्ण महाल उभा राहतो. त्यामध्ये नृत्यशाळा होती ज्याला १०० खांब व प्रत्येकावर विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या होत्या. महालात चांदीचे झोपाळे, व छताला सोन्याचा मुलामा, पलंगांना सोन्याच्या दांडय़ा व मोत्याचे जाळीदार नक्षीकाम, हा लिहून ठेवलेला दस्तऐवज विजयनगर इतिहासाचा मानबिंदू आहे.

कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. या जागी राण्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत.


हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरील भव्य दालनात माहूत व पहारेकरी राहात. राणी महालाइतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते.


विठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. विठोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत. हे महाराष्ट्र भूमी बाहेर साधारणपणे दिसत नाही. विठोबा हा कृष्णाचा अवतार त्यामुळे पुरातन कालापासून पुजले जाणारे दैवत. इ. स. १५१३ ते १५६४ पर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार २३ वेळा झाल्याची नोंद आहे. मुख्य चौथरा अजस्र दगडाचा असून त्यावर मंदिर उभे असून त्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. देवघरात विठ्ठलमूर्ती आहे. सर्व बाजूंनी लांब व्हरांडे आहेत. त्याच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. भिंतीवर रामायण महाभारतातील रंगविलेले प्रसंग आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडी हत्ती काही भागात तुटलेला आहे. लागून अतिभव्य कल्याण मंडप आहे, ज्याच्या खांबांची गणती करणे कठीण आहे. प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव शिल्पे आहेत. इथे राजघराण्यातील लग्ने होत असत.

मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे. मंदिराच्या मागील बाजूस अनेक मोडलेल्या खांबांचा व तुटलेल्या मूर्तीचा भला मोठा ढिगारा असून त्यामधून कमलापुरा गावाकडे जाणारा जुना दगडी बझार रस्ता आहे.




हेमकुटा टेकडीवर जैन पद्धतीच्या मंदिरांचा समूह असून कळसाचा आकार पिरॅमिडसारखा आहे. त्यात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जैन साधूंचे नग्न अवस्थेतील पुतळे, हत्ती, सिंह व विविध प्राण्यांचे केलेले कोरीव काम संमिश्र संस्कृतीचे दर्शन दिसते.येथून सूर्यास्त पाहण्याचा नजारा म्हणजे केवळ अवर्णनीय.



असे विजयनगर साम्राज्य व त्याचे भग्नावशेष याचे उत्खनन १८५६ मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी प्रथम केले. त्या वेळच्या कामाचे त्यांनी काढलेले फोटो आजही पाहण्यास मिळतात. पण पुढील १०० वर्षे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाले. यानंतर पुढे १९७६ सालात भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हम्पी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. अनेक तज्ज्ञ व विजयनगर साम्राज्याचे अभ्यासक यांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले. ४० ते ५० किमी परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू होते. काही वास्तू उत्तम स्थितीत होत्या, तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी केली गेली. या भव्य कामाचे रंगीत फोटो कमलापुरा म्युझियममध्ये पाहता येतात. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथे अनेक परदेशी व देशातील अभ्यासक भेट देतात,  त्यावरून बराच इतिहास कळण्यास मोलाची मदत झाली. राजा उत्तम कवी आणि साहित्याचा जाणकार होता. त्याचे संस्कृत ग्रंथ उपलब्ध नाहीत पण तेलगु भाषेतील त्याने लिहिलेले प्रसिद्ध काव्य अमुक्थम्ल्लदा विष्णूचीत्थामू हे आजही प्रचलित आहे.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,श्रीरामपूर


https://drive.google.com/drive/folders/1_Z68ZXUWPsr8JIQyliUFwAtYguBNKXXX



देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...