आजकाल सोमवार उजाडतो आणि टीव्ही वर एक बातमी हमखास झळकते.अमुक ठिकाणी नदीत दोघे तिघे बुडाले, समुद्र किनारी भरती अहोटीचा अंदाज न आल्याने दोघे तिघे बुडाले.धबधब्यात कड्यावरून घसरून मृत्यु ते अगदी एखाद्या किल्ल्याच्या वाटेवर चढाई करताना दुर्दैवी अंत व्हावा ते अगदी जंगलात हरवणे मग मदत रेस्क्यू वगैरे.
खऱच परिस्थिती एवढी बदलली आहे . अगदी काही वर्षांपूर्वी लोकांना वर्षा पर्यटनाखाली निसर्गातले पावसाळी चित्र दाखवुन घराबाहेर पडायला उद्युक्त केले जाई. पण आज हे असे बेताल चित्र पाहून घराबाहेर पडावे असे वाटत नाही, यावर कुठेतरी बंधन घालावी असे वाटू लागले आहे.
ठराविक गटातील लोकांना धांगडधिंगा हवा असतो, निसर्ग वगैरे असे काही नसतं. फक्त रम आणि रमा हेच त्यांचे सुख. फरक एवढा आहे ऐरवी हे बंदिस्तपणे केले जाते आणि पावसाळ्यात खुलेआम. पण खरच निसर्गात जाऊन त्याची विविध रूप पाहून तिथला आस्वाद घेऊन हरवून एका वेगळ्याच धुंदीची अनुभुती घेणे वेगळे, की त्या साठी दारूची बाटली,नंगा नाच आणि मोठ्या आवाजाचा डिजे हवा ?
हि परिस्थिती आत्ताच्या सर्व प्रसिध्द झालेल्या धबधब्यांच्या ठिकाणांची आणि तिथल्या गावाची झाली आहे. तिथल्या ग्रामस्थांचे तर जगणेच मुश्कील झाले आहे, शनिवार रविवार आला कि त्यांच्या अंगावरच काटा येतो. हे झाले सर्वसामान्य अविचारी लोकांबद्दल.
निसर्गात मुक्तपणे पण निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता, इतिहासाचा मागोवा घेत तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, डोळसपणे केलेली भटकंती हि ट्रेकींगची पहिली पायरी, अर्थात हे माझे मत. पण हल्ली पावसाळी ट्रेकींगचे पेव फुटलय, सोशल मिडीयानेही त्यापरीने हातभार लावलाच आहे.ज्या भागात जातोय तिथली कुठलीच माहिती न घेता अमका जातो म्हणून तमका जातो, सोम्या जातो मग गोम्या जातो, हि गेली मग मी जाते अशी हवशे नवशे गवशे यांची यादी वाढतच जाते.खरतर ट्रेक म्हणजे काय हेच यांना समजत नाही. ट्रेक म्हणजे काय, ट्रेक करताना घ्यावयाची खबरदारी, आपण कुणासोबत जातोय ज्या ग्रुप सोबत जातोय तो ग्रुप मान्यता प्राप्त आहे कि नाही त्यांचे ग्रुप लीडर हे प्रशिक्षित आहेत का ही सर्व माहिती घेऊन आपण नियोजन करायला पाहिजे पण हे करतय कोण ?आता यात काही असे म्हणतील आम्ही एवढ्यादिवसाचे ट्रेक करतोय कुठे काय झाल पण वेळ काही कुणाला सांगून येत नाही मग अशा लोकांच्या करामतीमुळे सारे ट्रेकींग नाहक बदनाम होते.
आणि रेस्क्यू ची पुरेपूर माहिती नसल्याने रेस्क्यू टीम ला पाचारण करावे लागते पण ती टीम पोहचे पर्यत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेल असते .
कधी काळी दुर्दैवाने निसर्गात अशी वेळ कुणावरही येऊ शकते. पण तरी सुध्दा थोड्या अनुभवाअंती, नियोजनबध्द अभ्यासाने तसेच त्या वेळे ची परिस्थिती सदसदविवेकबुध्दीने हाताळून बरेसचे अपघात टाळता येऊ शकतात. पण या बाबतीत खोलवर विचारच कुणी करत नाही आणि बदनाम मात्र निसर्ग होतो हिच खरी शोकांतिका आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या पावसाळ्यात होणारी सह्याद्रि मधील गर्दीचा विचार करता आम्हा भटक्यांना असे ठिकाण नकोसे वाटतात आणि आम्ही आशा जागेचा शोधात असतो तिथे माणसांची नाही तर निसर्गाची गर्दी असेल.
ह्या पावसाळ्यात अशाच ठिकाणी भेट द्यायची हे मनोमन ठरवलेच होते आणि समोर आल की आठ वर्षांपूर्वी रतनगड ते हरिश्चंद्र गड हा ट्रेक करत असताना कामशेत गावा जवळ आम्ही आलो तेव्हा आमच्या वाटाड्या मित्राने कुमशेत च्या कलकी धबधब्याची ओळख करून दिली तो पर्यत ह्या धबधब्याविषयी गावातील लोकांच्या व्यतिरिक्त फारसे कुणाला माहिती नव्हते.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात.
मात्र पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं कुमशेत हे 800 लोकवस्तीचे गाव राजूर पासून अवघे अंदाजे 35 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून आजोबा डोंगर, शिरपुंजे चा डोंगर दरीच्या कुशीत वसलेलं अतिदुर्गम गाव.गावाकडे येताना असंख्य धबधब्यांची गुंफण च लागते त्यात भर पडते ती मनमोहक अशा देवराई ने देवराई म्हणजे देवासाठी उभारलेले जंगल त्यामुळे इथं वृक्षतोड होत नाही .
कुमशेत गावातून थोडीफार पायपीट केल्यानंतर गावाचे दैवत म्हणजे धारेराव देवस्थान धारेराव अस्वले हे येथील गावातील इंग्रजांच्या विरुद्ध कडवे लढणारे क्रांतिकारक अजूनही त्यांचे इथे अस्तित्व आहे असे गावकरी मानतात तेथूनच पुढे सुंदर असा कुमशेत चा कोकणकडा दिसतो तो कडा ठाणे जिल्ह्यात मोडतो.इथे आल्यावर भिरभिरणारा वारा मनात धडकी भरवतो. पावसाळ्यात येथे असंख्य रिव्हर्स फॉल मोत्यांची उधळण आपल्या अंगावर करतात. धारेराव मंदिर जरी नगर जिल्ह्यात असले तरी कोकणकडा मात्र ठाणे जिल्ह्यात येतो. येथेच खूप उंच लोखंडी मनोरा वन खात्यातर्फे उभारला आहे. येथून सभोवतालचे विहंगम दृश्य दिसते. येथून धुके नसल्यास अगदी माळशेज घाटातील वाहतूक दिसते. खूप वेळा या भागांमध्ये धुके पडते आणि धुके पडले की निसर्ग नजरेत साठवता येत नाही. कधीतरी येणारे धुके, सप्तरंगाची उधळण करणारे इंद्रधनुष्य, ओढ्याचे खळाळणारे पाणी, मधूनच पडणारे उन, आणि अचानक येणार्या श्रावण सरी शरीराबरोबर मनालाही ओलंचिंब करून टाकतात.
कुमशेत वरून परतीच्या मार्गाने जेव्हा आपण लागतो तेव्हा आपल्याला कलकी धबधब्याचे दर्शन दिसते आता वनविभागाने तिथे लोखंडी ग्रील टाकल्याने सुरक्षित असा हा धबधबा झाला आहे.जोराचा पाऊस नसल्यास तिथे खाली उतरून कलकीचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही.
अशी ही आडवाटेवर कुमशेत ची भटकंती नुकतीच सह्याद्रि परिवाराने संपूर्ण सुरक्षितता बाळगून पूर्ण केली या भटकंती चा सारांश सांगायचे झाल्यास वाटेच्या दोन्ही बाजूला गर्द हिरव्या झाडीची झालर, कोण्या अनामिक पक्ष्याची रानशीळ, छोट्या मोठ्या खेकड्यांची पळापळ,गर्द हिरव्या रानात छाती दडपून टाकणारे गाव, मंदधुंद वातावरण, हवेच्या झोताने डुलणारी गवताची पाती, मधेच डोकावणारी धुक्याची चादर, झाडांच्या पानावर टपटप पडणारे पावसाचे थेंब, छोट्या मोठ्या धबधब्यांचे खळखळाटी संगीत, ढगांचा आणि वाऱ्याचा पाठशिवणीचा ऐन भरात आलेला खेळ. हा सह्याद्रितील पाऊस आणि पावसातली भटकंती ह्यामध्ये असे अनुभव पदरात पडल्यावर मनाला मिळणाऱ्या गारव्यासह डोंगरयात्रा सार्थकी लागल्याचे समाधान पुढे आजन्म टिकून राहील.
पुन्हा भेटूया लवकरच अशा दुर्लक्षित आडवाटेवर सुरक्षित पावसाळी भटकंती करण्यासाठी.
सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,
श्रीरामपूर




