Monday, December 30, 2019

Hapata Kada and koambad fort trek



हापट्याचा कडा आणि कोंबड गड ट्रेक


बहुप्रतीक्षित असा किल्ले हरिश्चंद्रगड जवळ ट्रेक करायचा हा उद्देश मनात ठेवून काही दिवसांपूर्वी आमचे वकील मित्र तुषार आदिक साहेबांनी विनवणी केली असता  ती लगेच विचाराधीन घेतली आणि लवकरच उरकून टाकू असे खात्री वजा आश्वासन दिले. माझ्या पश्चात त्यांनी बाकीच्या भिडूंना फोन कॉल्स करून जमवाजमव करायला सुरुवात केली अचानक एक दिवस मला त्या ग्रुपमध्ये घेतले सुद्धा!! मी आश्चर्यचकित झालो, एवढ्या जलद आश्वासनाची पूर्तता होतीय याचा एक विलक्षण आनंद झाला. त्याच आनंदात मी माझी नेहमीची झोळी भरून ठेवली, आता प्रतीक्षा होती त्या दिवसाची, एक दिवस अगोदरच आमचा कोल्हापूर चा मित्र मुक्कामी आला होता.मग काय तो दिवस उजेडला गाडीत बसल्यावर एकेक भिडूला घेत आम्ही आमचं मार्गक्रमण सुरु ठेवल, शेवटी पुण्यावरून आमचे तीन मित्र संगमनेर ला आधीच येऊन पोहचले होते. त्यांना सोबत घेऊन  गाडीने वेग धरला रस्त्यातच सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला.तो आनंद घेताना बऱ्याच जणाशी एकमेकांशी ओळख नसल्याने आमच्या वकील मित्राने त्याच्या शैलीने जी सर्वांची ओळख करून दिली ती ओळख म्हणजे  आम्हा सर्वांची मैत्री ही कायम स्वरुपी घट्ट कशी राहील अशा स्वरूपाची होती.आणि आमचा मैत्रीचा प्रवास खऱ्या अर्थाने चालू झाला तो पाचनई गावासाठी. प्रत्येकाचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. यावेळी संपूर्ण नवे चेहरे होते पण त्यातले एकूणच सगळे प्रसन्न, हसतमुख चेहरे पाहून आम्ही नेहमीचे भटके अगदी मनातून आनंदी झालो. हमरस्ता सोडून गाडीने गावाकडचा रस्ता धरला आणि उत्कंठा शिगेला पोहोचली. चार तासांच्या रटाळ प्रवासाने, झुंजूमुंजू व्हायला अगदी थोडासा वेळ शिल्लक असताना गाडी पाचनई येथे पोहोचली.थोडसं “पाचनई” ह्या गावाच्या नावाविषयी...

पाचनई हा अपभ्रंश आहे पाच नद्यांचा, या पाच नद्यांना कोणतीही नावे नाहीत, त्या अनामिकच आहेत. गावाच्या उत्तर बाजूस समोरच्या उभ्या असलेल्या आडव्या कड्यावरून आणि त्याच्या समोर असलेल्या गायरान कड्यावरून एकूण ५ नद्यांचा उगम होतो ज्या धबधब्यांच्या स्वरुपात खाली कोसळतात, अर्थातच पावसाळ्यात. त्या पाच नद्या सपाटीवर येवून एकत्र येतात आणि पुढचा प्रवास करतात. त्या पाच नद्यांचे उगमस्थान म्हणजेच पाचनई होय. याच गावाच्या शिवारातून  हरिश्चंद्रगड कडे एक वाट जाते, तीच ती वाट म्हणजे पाचनईची वाट...  समोरच्या लांबसडक काळ्याकभिन्न कातळ कड्याकडे नजर गेलीच,त्या कड्यावरून पावसाळ्यात जे धबधबे वाहतात ते पाहण्या सारखे असते.  आमचा पाचणाई गावातील सहकारी प्रकाश आमची वाट पाहत च होता  त्याला घेऊन लगेचच आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच हप्ट्याच्या कडा कडे निघालो कारण अंधार पडण्यास सुरवात झाली होती.साधारणतः ४ किमी.अंतर कापून झाल्यावर शेवटचा थांबा म्हणजे जेथून     हापट्याचा कडा कडे जाण्यासाठी  २-३ कमी. पायी जावे लागणार होते.तिथे गाडी थांबवून सर्व मुक्कामाचे साहित्य घेऊन आम्ही जंगलातून निघालो जसं जसं पुढे जात होतो तस तसं सह्याद्रीच्या प्रेमात सगळेच पडत होते कारण आमच्या बऱ्याच जनाचा हा पहिलाच आनंद होता.कड्या पर्यंत पोहचण्यास येव्हणा अंधार झाला होता त्या मुळे बऱ्याच जणांना आपण इथे कुठे आलो हे कळतच नव्हते.सर्वांनी आपले सामान उत्रवून प्रकाश ला टेंट लावण्यास मदत केली.त्या नंतर स्वयंपाक तयार होईपर्यंत गप्पांची गाण्याची मैफल चालू झाली. कोण कुठल्या पदावर आहे कोण काय करतो ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन मैत्री हा एकमेव पद घेऊन सर्व जण शेकोटी घेता घेता नाच गाण्यात मनसोक्त रमले होते.आता आमचे जेवण पण तयार झाले होते.सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेऊन परत सर्व जन शेकोटी पाशी येऊन गप्पा मारत बसले.जसं जशी रात्र सरत होती तसं तशी एकेक मंडळी आपापल्या तंबूत जाऊन झोपत होती.सकाळी जाग आली ती आमच्या सुशील नावाच्या मित्राच्या वेग वेगळ्या आवाजानेच .जसं जसे एक एक तंबूच्या बाहेर येत होते तस तसे आपण स्वर्गात आल्यासारखे सगळ्या मित्रांना वाटत होते खरचं धरती वरच सौंदर्य पहायचं असेल तर सह्याद्रीत च कारण आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा पूर्ण अंधार पडला होता.
.                                     आम्ही सगळ्यांनी चुळ भरून चहा घेऊन  कडा पाहण्यास निघालो सुंदर आणि तितकाच काळजाचा ठोका चुकवणारा पाहताना तिथे फोटो घेण्याचा मोह काही कोणाला अवरला नाही .मग काय एक एक पोज देऊन आमचे मॉडेल मित्र तयार.कडा पाहून झाल्यावर गरमा गरम मसाले भात खाऊन सामानाची आवरा अवर करून आम्ही खऱ्या अर्थाने ट्रेक साठी निघालो आमच्या सर्व बॅगा गाडीत ठेऊन कोंबड गड ट्रेक चालू केला पुढे चालून आल्यावर घळाईच्या मार्गाने चढाई चालू झाली काही चढाई चालू झाल्यावर आमच्या पैकी दोन मित्रांनी परत खाली जाण्याचा मार्ग निवडला बहुतेक त्याणला पुढे येणाऱ्या कसोटीची कल्पना आली असावी.इथून पुढे खरी प्रत्येकाची शरीराची कस लागणार होती कारण समोर २-३ रॉक पॅच आणि निसरडी माती होती आमचा गाईड प्रकाश ने सर्वात पुढे आणि मी सर्वात मागे राहून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार होतो पण सर्वांनी एकमेकांना मदत करत खडतर अशी काळया पाषाणातील वाट प्रतिकूल परिस्तीत पूर्ण तर  केली. परंतु चढताना झालेली कसरत पाहता खाली उतरणे तीतकेशे सोपे नव्हते म्हणून आमच्या गाईड प्रकाश ने दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला तो मार्ग तसा सोईचा आणि झाडे जुडपातून जाणारा असल्याने उतरताना  फारशी काही कोणाला कसरत करावी लागली नाही.
सर्व जण खाली आल्यावर मनोमन मानत मला खूप शिव्या दिल्या असतील पण आपण हा गड सर करून सुखरूप आलो याचे त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे खूप  काही सांगण्यासारखे होते.खरं तर कोंबड गडाला तसा काही इतिहास नाही पण एखादा छोटासा आणि लवकर होऊ शकेल म्हणून निवडला गेला.
कारण मी तो दोन वर्षापूर्वी भर पावसात केला होता.आता सर्व जण मनाने आणि शरीराने देखील खूप थकले होते.वाटेतच एका छोट्या नदीवर अतिशय थंड अश्या पाण्यात सर्वांनी दुंबण्यचा आनंद घेऊन आपला थकवा नाहीसा केला.परतीच्या मार्गावर निघण्यापूर्वी प्रकाश च्या घरी जेवणावर ताव मारला आणि सुंदर अश्या अनुभवाची आणि मैत्रीची शिदोरी जी आपल्या आयुष्यात कायम स्वरुपी राहील ती घेऊन पुन्हा प्रत्येक वर्षी किमान एकदा तरी सर्वांनी एकत्र येऊ ही एकमेकांना हमी देऊन परतीच्या मार्गावर निघालो.


  आणि सर्वात शेवटी.....

महाराष्ट्र च्या भूमीत जन्माला यावे आणि किल्ले शिखर पाहू नये, हे होवूच शकत नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदातरी किमान दोन दिवसांचा वेळ काढून किल्ल्यावर जावून एका आगळ्यावेगळ्या नंदनवनात जावून येण्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यावाच, नाहीतर आयुष्य व्यर्थच गेले असे समजा!!

सचिन भांड
श्रीरामपुर

फोटो पाहण्यासाठी खालील लिंकचा वापर करा...

https://drive.google.com/folderview?id=1-Nu69mYSqzx_bUhBmVW9diWiFDyn_L-d


Home
View web version
ABOUT ME
सह्याद्री ट्रेकर ...
View my complete profile
Powered by Blogger.

Friday, November 29, 2019

Kalawantin Durg Prabalgad Trek

🚩🚩कलावंतीण सुळका व प्रबळगड
17 Nov.2019.

प्रबळगड ट्रेक व त्याचा सुळका म्हणजे कलावंतीण एकाच दिवसात दोन ट्रेक म्हणजे आपल्या शरीराची क्षमता याची कसोटीच म्हणावी लागेल ह्या ट्रेक च संपूर्ण वर्णन आमचे मित्र प्रमोद कापसे यांच्या शब्दातून...

सह्याद्री वर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आवडता विषय ...ह्याच सह्याद्री च्या गडकिल्यांमध्ये केलेली भटकंती आणि सह्याद्री च्या दुर्गवैभवाबद्दल थोडेसे लिहण्याचा माझा प्रयत्न...
बऱ्याच दिवस कलावंतीण दुर्ग  ट्रेक  करायच मनात होत प्रबळगड आणि कलावंतीण केव्हा करायची अशी चल बिचल चालू होती आणि त्यात ऑफिस आणि घराच्या जबाबदाऱ्या, प्लान बनत होते. पण आता मात्र दिवाळी नंतर चाहूल लागली.

रविवार म्हटले की ऑफिस ला सुट्टी त्यात आमच्या सारख्या अति उत्साही लोकांना  आराम नकोच ! इतक्या दिवसांपासून ऐकतोय की थरारक,कठीण,नवीन लोकांनी टाळावा असा आणि ज्या ट्रेक ची बऱ्याच दिवसापासुन आतुरतेने वाट बघत होतो त्याच ट्रेक चा आमचे सोबती मावळे सचिन भांड व  सचिन चंदन या  मित्रांनी  कलावंतीण चा प्लॅन  फिक्स केला.

सह्याद्री ट्रेकर्स तर्फे आयोजित दुर्गभ्रमंतीचे यशस्वी नियोजन झाले,सर्व २२ मावळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने किल्लेचढाई केली व सुरक्षित घरी पोहोचले !

या संपुर्ण मोहिमेचे नेतृत्व आमचे मित्र श्रीयुत सचिन भांड सर भीशे सर आणि उमेश शिंदे यांनी केले याचा आम्हाला विशेषतः मला सार्थ अभिमान आहे.

या नियोजनाचा फायदा जसा आम्हाला झाला तसा इतर दुर्गप्रेमींना पण होवो हा उद्देश समोर ठेवून हे सगळं लिहिण्याची धडपड.

मोहिमेचे यश म्हणजे सततच्या दुर्गभ्रमंतीमुळे आमची इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारली,स्वराज संस्थापक व रक्षक अशा महान विभूतीबद्दलचा आदर दुणावला,सह्याद्रीचे विशाल रूप नजरेने पाहण्याचे भाग्य लाभले व शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास झाला.

हा दिसायला जेवढा अवघड आहे  तेवढाच ट्रैकिंग करायला, पण जेव्हा मी पूर्ण केला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला कारण तेथून जसें वाटत होते की आपण आकाशाला च स्पर्श कारतोय की काय, त्या दिवशी एक वेगळा आनंद अनुभवला.
जेवढा यूटूब चैनला बघून अवघड दिसतो परंतु प्रत्यक्षात तो तसा नाही.
 यु ट्युब तसेच गुगलवर "Deadly Fortress" किंवा "जिवघेणा किल्ला" या नावाने कलावंतीण दुर्ग थोडासा काही लोकांनी भीतीदायक आसा वर्णन केला आहे. परंतु आमचे मित्र सचिन भांड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे दोन ही किल्ले सहजपणे सर केले. कातळातील कोरीव पायऱ्या चढताना थरार जाणवतो. तसेच उतरताना थोडीशी भीतीही.. पण सावधपणा बाळगणाऱ्या कुठल्याही ट्रेकर्सला हा दुर्ग अगदी सहजपणे चढता आणि उतरता येऊ शकतो. यांच्या विषयीचा इतिहास व भौगोलिक स्थितीचा अंदाज घ्यायचा असेल तर शेकडो व्हिडिओ आपणास गुगलवर पहायला मिळतील.
ज्याला खोलीची भीती वाटत नाही किंवा मायग्रेनचा त्रास नाही, ज्याच मन कणखर अन् शरीर मजबूत आहे असा कोणत्याही ट्रेकर ७-८ तासात हे दोनही किल्ले पाहू शकतो.

"कलावंतीण दुर्ग" .... नावातील गूढ अजून कायम आहे !!!

'कलावंतीण' .... . महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि ऐतिहासिक नाव. कलावंतीण हा शब्द तसा अनेक अर्थाने लोकप्रिय आहेच परंतु ह्या शब्दामध्ये असलेली अनामिक ओढ, पुरातन काळापासून महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालण्यात यशस्वी ठरली आहे. म्हणूनच ... 'कलावंतीण दुर्ग' आपल्याला अगोदर त्याच्या नावामुळे आकर्षित करतो आणि त्यानंतर त्याच्या अतिधोकादायक आणि थरारक चढणीसाठी. आमचीही भ्रमंतीची आवड आणि तीच अनामिक ओढ आम्हाला कलावंतीण दुर्गावर घेऊन गेली मात्र.... नावातील गूढ मात्र अजून कायम आहे !!!

कलावंतीण वर चढताना आणि उतरतानाही प्रत्येक पायरीवर पाय टाकताना प्राण कंठाशी येऊन आपल्या अगोदर आपल्या जीवनाचा अंदाज घेत असतो. आपले श्वास आपल्याच ताब्यात राहत नाहीत.  एखाद्या शुल्लक खड्यावरून सटकलेला पाय सगळ्या अंगात झिणझिण्या आणतो.... त्या सरळ मेंदूपर्यंत जातात. ..... मात्र ट्रेकर म्हणून जो थरार हवा असतो तो मात्र मनसोक्त लुटता येतो…. आणि मी तो मनमुराद लुटला.

मुंबई पुणे महामार्गावरून (NH4) जाताना डाव्या बाजूला आपणास एक डोंगररंग दिसते. या डोंगर रांगेत अनेक किल्ले आपल्याला खुणावत असतात पण किल्ल्यांच्या या रांगेत  "प्रबळगड" आणि "कलावंतीण सुळका" हे दोन जोड किल्ले आपले खास लक्ष वेधून घेणारे आहेत. प्रबळगड त्याच्या नावाप्रमाणेच प्रबळ आहे. तसेच गडाचा पसारा देखील विस्तीर्ण आहे. कलावंतीणचे मात्र तसे नाही. इतिहासात कलावंतीण दुर्ग नावाने नोंद असणारा हा बुरुज समुद्र सपाटीपासून दोन हजार तीनशे फुट उंचीचा आहे. दगडात खोदलेल्या टाक्यांवरून कलावंतीण बुरुज सातवाहन कालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्लेख यादव काळात आढळतो. शिवरायांनी इ.स १६५७ मध्ये हा किल्ला घेतला होता. पुढे पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना देण्यात येणाऱ्या २३ किल्ल्या मध्ये याचाही समावेश होता. त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे.

      कलावंतीण या नावाचा अर्थ "नर्तिका" होतो. मूळ अर्थ कला सदर करणारी पण सर्रास पणे नर्तिका साठी वापरला जातो. त्यामुळे असे समजले जाते कि, इथे एका नर्तिकेचे वास्तव्य होते ज्यामुळे यास "कलावंतीण" हे नाव पडले. तर काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो कि, कलावंतीण नावाच्या राणी साठी हा किल्ला बांधला होता. अशा आख्यायिका आपणांस ऐकायला मिळतात.

      पनवेल मधून १५ किमी अंतरावर माथेरान डोंगर रांगेत प्रबळगड व कलावंतीण वसलेले आहेत. जुन्या मुंबई पुणे मार्गावर पनवेल हून ७-८ किमी गेलो कि शेडुंग फाटा लागतो. या फाट्यावरून डावीकडे वळण घेतले कि त्याच रस्त्याने पुढे यावे. शहारले प्रदूषित अन खेड्यातल्या शुद्ध वातावरणातला विलक्षण फरक इथे  जाणवतो. १० - १५ मिनिटांच्या प्रवासानंतर लोणीवली वाडी ला जाणारा डावीकडे अन ठाकूर वाडीकडे जाणारा उजवीकडील मार्ग लागेल. आपण उजवीकडील रस्त्याने यावे. इथून १० मिनिटांच्या अंतरावर डावीकडे दुचाकी वाहन पार्किंग साठी एका झाडाखाली जागा आहे अन उजवीकडील वाट प्रबळ माची वर जाते.

     पुढील प्रवास आपण तीन टप्प्यांमध्ये करणे सोप्पे राहते. पहिला टप्पा पार्किंग पासून ते  प्रबळ माचीचा. प्रबळ माचीला जाणारा रस्ता खडीचा अन थोडा चढणाचा आहे. सपाटीचा मार्ग फारच थोडा आहे. एके ठिकाणी एका वर एक असे धोंड रचलेले आढळतात तिथे उभे राहून आपण आजूबाजूचा परिसर पाहू शकतो. बऱ्यापैकी इथे फोटोग्राफी ची इच्छा होतेच. त्यामुळे काहीसा वेळ इथे जातो.
काहीसे अंतर चालून येता उजव्या हाताला दगडात कोरलेल्या मारुती राया अन गणेश मूर्तीचे दर्शन घडते.
  दर्शन घेऊन पुढे आलो कि एक पठार लागेल  ते म्हणजे प्रबळ माची  इथून कलावंतीण सुळका अन प्रबळगड अंगावर येत आहेत असेच काहीसे चित्र भासते. तितकेच ते डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते.
माचीवर शे-दोनशे लोकांची वस्ती आहे. इथली माणसे फारच मन मिळाऊ! पर्यटकांच्या सोयीसाठी या माचीवर राहण्याची अन जेवणाची सोय आहे. वस्तीतून गडाकडे जाण्यास पायवाट आहे, त्यामुळे चुकामुक होत नाही. काही वेळच्या विश्रांतीनंतर रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या माची वरील घरातून भरून घेऊन आपण दुसऱ्या टप्प्यासाठी सुरवात केली.

    त्या पायवाटेने वस्ती मागे सोडून आलो कि उजवीकडील वाट प्रबळ गडासाठी तर डावीकडील वाट कलावंतीणसाठी जाते. डावीकडील वाट पकडावी. हि वाट पहिल्या टप्प्याच्या वाटेहून थोडीशी खडतर अन पावसाळ्यात निसरडी आहे. घसरत, आपटत, काही ठिकाणी एकमेकांच्या सहाय्याने २० मिनिटांमध्ये आपण कलावंतीण व प्रबळ गड च्या meet point ला (खिंडीत) पोहोचतो. इथून कलावंतीण चा सुळका, कातळात खोदलेल्या पायऱ्या फारच आकर्षित करत असतात. पाठीमागे वळून पाहता प्रबळगडचा विस्तार दिसतो तसेच त्याच्या प्रबळतेची प्रचीती आल्याविना राहत नाही.

  इथे सुरु होतो कलावंतीणचा तिसरा टप्पा. आतापर्यंत आपण ज्या वाटेने आलो त्याच्यापेक्षा हि वाट बऱ्यापैकी वेगळी आहे. १० ते १५ मिनिटांच्या चढाई नंतर आपण कलावंतीणच्या माथ्यावर पोहचू पण ती चढाई करताना खूपच काळजी घेणे गरजेचे आहे. डोंगरात खोदलेल्या १ फुट ते दीड फुट उंचीच्या पायऱ्या चढताना आपल्याला इतिहास काळात जाणे न झाले तरच नवल म्हणावे. हे चढण धोकादायक नाही परंतु एक अत्यंत रोमांचकारक असे ठरते.माथ्यावर पोहचलो कि याला चहुबाजूंनी नजर फिरवावी तेव्हा कलावंतीण हा एक पहारेकरी होता याची खात्री पटते. कारण, याच्या माथ्यावरून उजवीकडे अग्नेयला माथेरानचे पठार दिसते,  तर ईशाळगड(इर्शाल/विशाल) प्रबळच्या मागे लपलेला(जो प्रबळ गडाहून दिसतो), पुर्वेला चंदेरी, विकटगड(पेब चा किल्ला)  तर ईशान्येला कल्याणची खाडी, हाजी मलंग यांचे दर्शन घडते. दूर पश्चिमेला पण नजरेच्या टप्प्यात दिसणारा कर्नाळाच्या सुळका आणि उत्तरे कडे पनवेल ते खारघरचा हे सर्व काही आपल्याला या सुळक्यावरून पाहता येते. आकाश स्वच्छ असेल तर बऱ्यापैकी भाग नजरेस पडतो. यावरून आपण केवळ अंदाज बांधू शकतो कि कलावंतीण बुरुजाचा इतिहास काळात एक टेहळणी बुरुज म्हणून किती महत्वाचा वाटा असेल.

सुळक्या मध्ये आरपार अशी एक गुहा आहे. पाण्याची टाकी सुद्धा आहेत. त्या ठिकाणी  जाण्यासाठी rappelling चे साहित्य असणे गरजेचे आहे. हे सर्व पाहून झाल्यानंतर आलेल्या मार्गाने पुन्हा खाली उतरायला घ्यायचे. प्रबळ आणि कलावंतीण च्या meet point ला आलो कि इथून थोडी वाट वाकडी करून खाली जाणारी वाट उजव्या हाताला ठेवून प्रबळगडला समांतर कडे कडेने ३-४ मिनिट चालत गेलो कि डाव्या हाताला एक ३ फुटाची गुहा आहे. आत मध्ये किर्र अंधार त्यामुळे विजेरी( torch ) असेल तर जाणे योग्य. ३०-३५ पाऊल डावे उजवे करत गेलो कि अंदाजे १० x ६ च्या आस पास व ४ फुट उंचीची खोली लागते. या गुहेचा नक्की वापर कशासाठी होत असेल हे सांगणे कठीण आहे. पण जर आतल्या बाजूने पहिले तर खोली बंद करता यावी यासाठी तिथे दगडाला खाच पडलेली आढळते. जिथे कदाचित दरवाजा लावला जात असावा. गुहा पाहून बाहेर आलो कि डावीकडील वाट प्रबळ गडाकडे जाते आणि उजवीकडील वाट पकडून meet point ला येउन पुन्हा परतीचा प्रवास सुरु.  आरपार असलेली गुहा अन पाण्याचे टाके सोडले तर साधारण ५ तासांमध्ये आपण कलावंतीण पाहून पुन्हा पायथ्याला पोहचू शकतो. जर पहाटे सुरुवात केली तर एकाच दिवसात कलावंतीण आणि प्रबळगड एका अविस्मरणीय अनुभवासहित पाहून होतो.

आपणही आपल्या दुर्गभ्रमंती चा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका, कारण त्यामुळे पुढे येणाऱ्या लोकांना याचा फायदा नक्कीच होतो.

प्रबळगडचा कलावंतीणीचा सुळका याच्या मध्ये इंग्रजी "व्ही" आकाराची खाच आहे. माथेरानच्या "सनसेट पाँईंट"वरून दिसणारा सूर्यास्त याच प्रबळगडाच्या खाचेत होतो. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडाचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करण्याचा विचार केला होता. मात्र पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे तो विचार मागे पडला.

साधारणत: २३०० फुट उंची असणार्‍या कलावंतीण दुर्गचा अर्धा मार्ग अगदी सोपा, नंतर खरी कसोटी होती.
वरती बघितले तर वाटायचं की सांभाळूनच आणि डोकं शांत ठेवूनच पुढची चढाई करावी लागेल कारण आजू बाजूस दरी.अखेर आम्ही गडाच्या मुख्य टोक गाठण्यासाठी त्याच्या पायथ्याशी येऊन थबकलो. या टोकावर जाण्यासाठी आम्हाला काहीश्या अवघड मार्गाने म्हणजे “कमी ग्रीपच्या उंच दगडांवरुन” वर चढत जावे लागले. या ठिकाणी दोरखंडाचाही मदतीने वर जाता येते. केवळ २०-२५ फुट असा शेवटचा टप्पा चढाई करताना दम काढतो हे नक्की !

पण ही चढाई आणि हा ट्रेक तेवढा कठीण नाही जेवढं लांबून दिसतो आणि ऐकण्यात येत. इतक्या चढाई नंतर अखेर आम्ही गडाच्या मुख्य माथ्यावर पोहोचलो असलेल्या पप्रबळगडाचे पूर्ण रुप जवळून पाहता येते फोटोग्राफर्ससाठी ही जागा म्हणजे पर्वणीच जणू !

काहीसा कठीण वर्गात गणल्या जाणार्‍या कलावंतीण किल्ल्यावर आपण चढाई केल्याचा आनंद काही वेगळाच होता.

 या रविवार चा हा एक थ्रिलिंग असणारा आणि सुखद असा अनुभव होता.

माझ्या बरोबर आलेले आमचे मित्र दिया चे पप्पा (श्रीयुत मोहन कोकाटे) सहकारी मित्र राम देशमुख आणि रोहन खाडे हे सगळे चाकण मधून गेलो होतो.

ह्या ट्रेक मध्ये आम्ही सगळ्यांनी जे काही miss केले असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त सचिन चंदन.....

ह्या ट्रेक मध्ये माझ्याकडून एक चूक घडली ती अशी की मी फक्त कलावंतीण चा च ट्रेक पूर्ण केला. प्रबळगड चा नाही.
त्याबद्दल आमच्या मावळ्यांची मी माफी मागतो आणि पुढे परत अशी चूक करणार नाही अशी ग्वाही देतो.

आणि हो आजून एक महत्वाचे राहिलेच की आमचे सहकारी मावळे श्रीयुत सचिन भांड साहेबांची फोटोग्राफी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही.

त्यांच्या मुळे च मला आता नविन साऊथ इंडियन हिरो ची पदवी मिळाली 😁😁 त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद..😊🙏😊

प्रमोद संपतराव कापसे
(लिहण्याचा प्रयत्न केलाय पचवून घ्या😬)

Bhorgiri Bhimashankar Trek

सह्याद्री Trekers-:

12/13 oct.2019.

 भोरगिरी ते भीमाशंकर


पाऊस….. निसर्गाने दिलेलं एक सुंदर असं वरदान. पावसाळा सुरु झाला की सगळा परिसर नवचैतन्याने भरून जातो. जणू सगळीकडे निसर्गाने हिरवा गालीचाच पसरलेला आहे. पावसात निसर्गातला जवळ जवळ प्रत्येक घटक बहरतो आणि फुलतो. आपसूकच मग धुक्यात हरवलेली घाटवाट, डोंगर, गड-किल्ले इत्यादी ठिकाणी भटक्यांची पावले वळायला लागतात.



पावसाळ्यात सह्य़ाद्रीत फिरायला जी मजा आहे ती कशातच नाही असं मला वाटतं. पावसाळ्यातलं धुकं, सर्वत्र दिसणारी हिरवळ मन मोहून टाकते. हे दृश्य पाहून ह्यापेक्षा सुंदर काहीच नाही असं वाटायला लागतं. काही ट्रेक हे असेच परतीच्या पावसात करण्यासाठी आपण राखून ठेवलेले असतात.  पावसाळी भटकंतीचा पुरेपूर आनंद देणारा तसाच एक ट्रेक म्हणजे ‘भोभी’ (BhoBhi) भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक मागील ट्रेक झाल्यानंतर लगेच १२- १३ ऑक्टोबर करायचा ठरवला आणि योगायोग म्हणजे व्या ट्रेक दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आली आणि मग काय क्यंपिंग चा आनंद घेण्यासाठी दुग्दशर्करा योगच चालून आला आणि लगेच अर्ध्या तासातच ३० ट्रेकर आणि विशेष म्हणजे ३ चिमुकले Trekkers  तयार झाले.
आणि तो दिवस उजाडला १२ तारखेला संध्याकाळी ४ वाजता आम्ही २५ Trekers घेऊन भोरगिरी कडे निघालो आणि आळेफाटा येथून आमचे कामार गाव चे ६ मित्र आम्हास जॉईन झाले.पुढे घोडेगाव येथील प्राचीन महादेव मंदिरात रात्रीचे जेवण करून पुढील प्रवास करण्यास निघालो

भोरगिरी ते भीमाशंकर या ट्रेकची सुरवात अर्थातच भोरगिरी या गावापासून होते. पुणे जिल्ह्य़ाच्या उत्तर भागात असणाऱ्या खेड (राजगुरूनगर) तालुक्याच्या एका टोकाला अत्यंत टुमदार, छोटंसं आणि निवांत गाव वसलेलं आहे ते म्हणजे भोरगिरी.  भीमा नदीचा उगम सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील भीमाशंकर अभयारण्यामधे होतो. पुढे भीमा नदी भोरगिरी जवळून वाहत जाते. चास मार्गे जाताना वाटेत भीमा नदीवरील बांधलेले आणि पावसाळ्यात तुडुंब पाण्याने भरलेले चासकमान धरण पाहण्यासारखे आहे.

भोरगिरी गावात येताच डांबरी रस्ता संपतो. गावाच्या सुरवातीलाच पुरातन असे कोटेश्वराचे मंदिर आहे. आणि तेथेच आमची मुक्कामाची सोय होती.रात्री ११ वाजता तिथे पोहचल्यावर लगेच कोजागिरी ची तयारी चालू झाली.कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. सर्व्ह नवीन ट्रेकर नी देखील चूल लावण्या पासून दूध सर्वांना वाटण्या पर्यंत खूप मदत केली. भोभी ट्रेक सुरु करण्याआधी प्रत्येक भटक्यानी थोडा वेळ काढून हे कोटेश्वराचे प्राचीन मंदिर नक्की पहावे. आता त्याजागी नविन सिमेंटचे मंदिर उभारलं आहे. आजकाल सगळ्याच जुन्या मंदिरांना जीर्णोद्धाराचा नवीन साज चढत आहे. सिमेंट, मार्बल आणि ऑइलपेंटच्या रंगांचे थर चढवून मंदिरे चकाचक होत असली तरी त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या अनेक जुन्या पुरातन वास्तू, शिलालेख तसेच भिंतींवर असणारे कोरीवकाम नाहीसे होत आहे. भोरगिरी गावात असणारे कोटेश्वराचे प्राचीन मंदिर देखील याला अपवाद नाही. पण पुरातन मंदिराचे अनेक अवशेष व काही मूर्त्या या मंदिराच्या परिसरात आजुबाजूला विखुरलेल्या पाहायला मिळतात. त्यावरुन या मंदिराच्या पूर्वी असणाऱ्या भव्यतेची कल्पना करता येते.

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंज याने हे कोटेश्वराचे मंदिर बांधले असे म्हणतात. झंज राजाने त्याच्या आयुष्यात एक महान अथवा उत्कृष्ट म्हणता येईल असे काम केले ते म्हणजे गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील हे एक प्राचीन शिवालय आहे.
 सकाळी ६ वाजता उठून आम्ही तिथेच पोहे करण्यासाठी तयारी चालू केली.पोहे खाऊन झाल्यावर
कोटेश्वराचे दर्शन झाल्यानंतर मंदिरापासून फक्त २०० मीटर पुढे असणाऱ्या भोरगिरी गावाकडे आम्ही आमचा मोर्च्या वळवला गावाजवळ येताच उजव्या बाजूला अनेक मोठमोठ्या डोंगरांच्या सानिध्यात एक पिटूकला आणि गोलाकार डोंगर त्याच्या अर्ध्या उंचीवर खोदलेल्या लेण्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो. हाच तो भंवरगिरी ऊर्फ भोरगिरीचा किल्ला. किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून जरी ६८६ मीटर इतकी असली तरी पायथ्यापासून तो फक्त दीडशे मीटर उठवला आहे. त्यामुळे भोरीगिरी गावाच्या पाठीमागे उभा असलेला हा किल्ला सर करायला जास्तीत जास्त अर्धा तास तर किल्ला पाहून खाली येण्यास एक तासाचा कालावधी लागला. भोरगिरी-भीमाशंकर ट्रेक करणाऱ्या मित्रांनी भोरगिरीचा हा छोटासा किल्ला भीमाशंकर मंदिराच्या मार्गाला लागण्याआधीच बघून घ्यावा.

 भोरीगिरी गावात आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून  आपल्या मुख्य ध्येयाकडे ते म्हणजे भीमाशंकरकडे निघालो.

भोरगिरी गावातून भीमाशंकर फक्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. तीन तासांचा सोपा ट्रेक पण हा प्रवास मात्र शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. सह्याद्रीतील ही एक आगळीवेगळी वाट ज्यामध्ये काही ठिकाणी चढण काही ठिकाणी उतरण आणि वाटेवर आहे ते भीमाशंकरचं घनदाट अभयारण्य. मान्सून नंतर विविध फुलांनी नटलेली डोंगर रांगेतून रस्ता छान वळत वळत भीमाशंकरच्या जंगलात जातो. हि वाट आहे मात्र खूप मस्त. कधी भीमा नदीच्या पात्रातून मोठमोठ्या दगड धोंड्यांनी भरलेली, कधी दाट जंगलातून जाणारी तर कधी अगदी बैलगाडी जाईल एवढी अरुंद पाउलवाट. तरी
भोरगिरी गावातून भिमा नदीचा प्रवाह डाव्या बाजुला ठेउन मळलेल्या पायवाटेने आपला प्रवास भीमाशंकरकडे सुरु होतो. गर्द झाडीतून वाटचाल करत एक छोटा डोंगर चढून आपण दोन डोंगरांच्या घळीत येतो. येथून पुन्हा पुढच्या डोंगरावर जाण्यासाठी प्रशस्थ पाय-यांची वाट सुरु होते. दुसरा डोंगर चढल्यावर आपण भोरगिरी भिमाशंकर या कच्च्या रस्त्यावर येतो. येथून मात्र पठार सुरु होते. या प्रवासात भीमाशंकरच्या जंगलात आढळणारे शेकरू हमखास दिसतात फक्त जंगलात फिरताना तुम्ही शांत राहायला हवे आणि तुमची नजर शोधक हवी. भीमाशंकर म्हणजे तर महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी असणाऱ्या शेकरू (इंडियन जायंट स्क्विरल) या मोठ्या खारींचे माहेरघर. सदाहरित, निम सदाहरित जंगलात शेकरूचे वास्तव्य असते. उंच झाडावरच शेकरू घर बांधते व अगदी माकडासारखे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत ते आपला प्रवास करते. आकाराने खारुताईपेक्षा बऱ्यापैकी मोठे असले तरी शेकरू प्रचंड लाजाळू प्राणी आहे. अश्या या सर्वांगसुंदर शेकरूसाठी तरी भीमाशंकरसारखी सदाहरित जंगले वाचवणे खूप गरजेचे आहे.
गावातून निघाल्यापासून तासाभरात आम्ही मोठय़ा पठारावर येतो. आता मात्र भिमा नदीचा एक मोठा प्रवाह आपला मार्ग अडवतो. हा प्रवाह उथळ असला तरी पावसाळ्यात येथे पाण्याला जोर असतो. अशावेळी रोप बरोबर बाळगावा.पण पाण्याचा प्रवाह हा अगदीच थोडा असल्यामुळे  हा प्रवाह सहजच अाेलांडला. साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर वाटेला दोन पायवाटा फ़ुटतात. सरळ जाणारी मोठी कच्ची पायवाट थेट भिमाशंकरला जाते तर वाटेच्या डाव्याबाजुला असलेला भिमा नदीला मिळणारा प्रवाह ओलांडून एक छोटी अस्पष्ट पायवाट दाट जंगलात घुसते. हि छोटी पायवाट थेट गुप्त भिमाशंकरला घेऊन जाते. त्यामुळे वेळ वाचवण्याच्या दृष्टीने भीमाशंकरकडे जाताना या वाटेने जावे े गुप्त भिमाशंकर मार्गे जाणारी पायवाट घेण्यामागचे दुसरे कारण म्हणजे या वाटेवर लागणारे एक सुंदर बांधीव टाके किंवा पुष्करणी. नितळ पाण्याने काठोकाठ भरलेली पुष्करणी.

पुष्करणी पाहून तिथूनच पुढे जंगलात घुसणाऱ्या पाउलवाटेला लागलो. येथून साधारण १५ मिनिटे वर चढत गेल्यावर आम्ही भिमाशंकरहुन गुप्त भिमाशंकरला जाणार्‍या वाटेवर पोहोचलो. भोरगिरी ते भीमाशंकरच्या वाटेवर पहिल्या आणि या शेवटच्या टप्प्यात गर्द वनराई आहे. उंचच उंच झाडांमुळे तयार झालेला हा घनदाट जंगलाचा पट्टा जरा गूढच वाटतो. इतकी गर्द झाडी असलेलं जंगल जिथे दिवसासुद्धा सूर्यकिरण पोहोचू शकत नाहीत. ऐन वर्षा ऋतूत आलात तर येथे असंख्य रानफुले आणि भूछत्रे फुललेली असतात.
जंगलातून बाहेर पडताच समोर खळाळत वाहणारा एक मोठा प्रवाह दिसतो. हा प्रवाह म्हणजेच भीमा नदी. भीमाशंकर येथे मुख्य मंदिराच्या थोडे अलीकडे एका कुंडात प्रकट झालेली भीमा नदी पुढे लुप्त होते आणि पुन्हा भीमाशंकर मंदिराजवळ प्रकटते. मंदिरापासून पुन्हा खळाळत वाहात जाते आणि दाट जंगलातील तब्बल दोन किमीचे अंतर कापून एका धबधब्याचे रूप घेते. हाच तो प्रवाह. हा धबधबा जेथे पडतो तेथे एक नैसर्गिक पिंड तयार झाले तेच हे गुप्त भीमाशंकर. या प्रवाहात ५ मिनिटे खाली उतरुन गेल्यावर  गुप्त भीमाशंकरजवळ पोहोचलो.
ीमेचा मोठा प्रवाह. ह्याच प्रवाहाचा धबधबा होऊन गुप्त भिमाशंकर येथे पिंडीवर पाणी पडते


गुप्त भीमाशंकर

गुप्त भिमाशंकर पाहुन पुढे मळलेल्या पाउलवाटेने भिमाशंकर मंदिराकडे निघालो. येथून साधारण अर्ध्या तासात आम्ही भीमाशंकर मंदिरापर्यंत पोहचलो.जसजसे भीमाशंकर मंदिराकडे जात होतो तस तसे. या मार्गावर आपल्याला अचानक माणसांची वर्दळ वाढलेली जाणवते आणि भीमाशंकराचे मंदिर आता जवळच आले आहे याची पावती मिळते. आत्तापर्यंतच्या पायी प्रवासात  नजरेला पाहायला मिळालेलं स्वच्छ जंगल अचानक लेज, कुरकुरे, बिस्कीट यांच्या रॅपर्सनी भरून गेलेले दिसते. आत्तापर्यंत प्रवाहांना असणारा फेसाळ, दुधी रंग अचानक बदलून आपल्या अवतीभवती असणारा प्लॅस्टिकचा कचरा, फुलं, मैलामिश्रित घाण बरोबर घेऊन वाहताना दिसायला लागतो. अन् आपण ओळखायचं की, भीमाशंकर आता अगदी हाकेच्या अंतरावर आलंय. आतापर्यंत निसर्गसंपन्न असलेली ही पायवाट आता मात्र अचानकच नकोशी वाटायला लागते.
 आम्ही मात्र त्या गर्दीत न शिरता लांबूनच शिवाचं दर्शन घेतलं आणि परतीच्या वाटेवर तिथेच दुपारचे जेवण करून निघा.लो


या ट्रेकसाठी शक्यतो श्रावण महिना टाळावा कारण भीमाशंकर हे प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असल्यामुळे श्रावण महिन्यात येथे अतोनात गर्दी असते. 
 भोभी हा सह्याद्रीमधला एक नितांत सुंदर ट्रेक. पण हा ट्रेक करत असताना भीमाशंकर अभयारण्यातील निसर्ग, जंगल आणि वन्यप्राणी यांना आपल्या मानवी हस्तक्षेपाचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकाने अवश्य घ्यावी
शब्दसंकलन -
सचिन भांड
🚩सह्याद्री Trekers🚩
श्रीरामपूर.

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...