Friday, September 16, 2022

सफर एका ऐतिहासिक राजमार्गाची


 चावंड आणि नाणेघाट ट्रेक

दि.११ सप्टेंबर २०२२

आम्हा सह्याद्री च्या भटक्यांना  फक्त भटकायला निम्मित लागते मग ऊन, वारा, पाऊस काहीही असो भटक्यांना त्याची फिकीर नसते कारण ह्या  सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणारे गडकिल्ले आम्हास  सतत खुणावत असतात. त्यात पावसाळ्यातील भटकंती म्हंटल्यावर आमच्या परिवाराची कार्टी तर गुढघ्याला बाशिंग बांधूनच तयार. आमचं तर आता अस झालय न जस लग्नाची तारीख धरली की लगबग  चालू होते तसे आमचे फोन वाजायला लागतात सर मी येणार म्हणून.गेली अनेक वर्षे सह्याद्रि फिरतोय  पण गेली ३-४ वर्षांपासून जो काही सह्याद्री पालथा घातला त्यात आमच्या या ठरलेल्या तारखांच्या मोहीमा आजपर्यंत क्वचित एखादी सोडल्यास कधी चुकल्या नाहीत अन त्या कधी चुकणार हि नाहीत. त्याच कारण लिहीत गेलो तर त्यावर एक वेगळा ब्लॉग नक्कीच होईल. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी ट्रेक चा शेवट अशा ट्रेक ने करायचा ज्याच्या आठवणी चिरंतन मनात कायम राहतील.म्हणूनच काही वर्षांपूर्वी आमच्या ग्रुप ने असच भर पावसात चावंड आणि नाणेघाट केला होता तोच ट्रेक परत करायचा विचार आला . त्यात जीवधन किल्ला अन परिसराशी माझ एक आपुलकी च नात तयार झालय कारण सह्याद्रि प्रतिष्ठान बरोबर काम करताना पायरी मार्ग मोकळा करण्याच्या कामात थोडाफार खारीचा वाटा उचलता आला त्यामुळे तो एक अभिमान मनाशी बाळगून होता.

आमच्या परिवारात काही जणांना तर इतकं व्यसन लागलंय की त्यांचं कायम म्हणणं असत  " कुठंबी चला सर  पण आम्हाला सोडून जाऊ नका".इतकं त्यांचं ट्रेक साठी काही पण अन कधी पण अस झालंय.

    खर तर सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाण आणि याच बुलंद गडदुर्गांनी नटलेला निसर्गरम्य तालुका म्हणजे जुन्नर. जुन्नर तालुक्यात ८ किल्ले, १२ लेणी समूह, अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आता आलं पुढच नियोजन निघायची वेळ, पोटापाण्याचा प्रश्न. अहो शिक्षण घेताना कधी एवढं नियोजन केलं नसल तेवढं नियोजन सह्याद्रीतली  मोहीम करायला लागतय पण सगळ्या मोहिमेत माझ्या  सोबत असलेल्या सहकाऱ्यांमुळे नियोजन कस पद्धतशीर असतय. आणि ११ सप्टेंबर ला रात्री १२.३० वाजता निघायचं  ठरल.अन नेहमी सारख ह्या वेळेस तरी आम्हाला निघायला उशीर होणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेऊन आमचा प्रवास चालू झाला.

सातवाहन काळात प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण हि सातवाहन राजांची राजधानी होती तर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर हि उपराजधानी होती. त्यामुळेच प्राचीन काळापासून जुन्नरचे व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यात प्रामुख्याने शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, नारायणगड, निमगिरी, हरिश्चंद्रगड, सिंदोळा हे किल्ले येतात तर दार्या घाट, माळशेज घाट, नाणेघाट हे प्रमुख प्राचीन घाटमार्ग येतात.नालासुपारा कल्याण, बंदरातून येणार माल हा जुन्नर मधूनच पुढे जाई याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली.

आता  जसा जसा चावंड जवळ येत होता तस तस पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात त्याचा शंकू सारखा दिसणारा आकार, ताशीव कडे, गडाची भव्यता लांबूनच दिसून येत होती. पहाटे ०५:०० च्या सुमारास आम्ही चावंड पायथ्याशी  पोहोचलो तिथे आमचा सह्याद्रि मधील सवंगडी मारुती वाटच पहात होता अजून जराशी काळोखी रात्र असल्याने सर्वांना बस मधेच आराम करावयास सांगितले आणि एक तास आराम करून सर्वजण फ्रेश होऊन तयार झाले. सकाळी ०८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. गड चढताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका गोष्टीच सुख मात्र होत ते म्हणजे कोणतही ओझं घेउन न चढण्याच, नाही तर सगळा सरंजाम सोबत घेऊन गड चढायची सवयच लागलीये आम्हाला. चावंडची चढाई तशी काही अवघड नाही अर्ध्यापर्यंत प्रशस्त सरकारी पायऱ्या केलेल्या आहेत तर पुढच्या भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या मार्गाने तासाभरात गडावर येता येते. जसजसे किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती तसतसे खाली उंचावरून नजर पुरेल त्याठिकाणी निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आविष्कार पहायला मिळत होता तो नजरेत साठवून घेत पुढे चालत होतो .चावंड किल्ला नेमका कोणी बांधला याचे पुरावे सापडत नाहीत. बहामनीचे साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर ज्या प्रमाणे आदिलशाही कुतुबशाही निर्माण झाल्या त्याचप्रमाणे इ .स १४८५ साली मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली व त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाला त्यात चावंडचे नाव आढळते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीला मुघल व आदिलशाह यांच्या पासून वाचवण्यासाठी शहाजी राजांनी केलेल्या तहात चावंड मुघलांच्या ताब्यात गेला. गडाला अनेक नावे आहेत चामुंड, चावुंड, चावंड हि नावे गाडावर असलेल्या चामुंडा देवीच्या नावावरून आली असावीत. पुढे स्वराज्यात मावळ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी गडाचे नाव प्रसन्नगड ठेवले. पुढे पेशवे काळात राजकीय कैदी ठेवण्यासाठी गडाचा वापर होई. पायऱ्या चढून वर आल्यानंतर कातळात कोरलेला गडाचा दरवाजा लागला त्यावर बारीक गणेश शिल्प कोरलेले आहे.

किल्ले चावंड प्रवेशद्वार

आम्हला गडावर असणाऱ्या सलग सात टाक्यांचे म्हणजेच सप्तमातृका यांचे प्रमुख आकर्षण होते. आम्ही लवकर निघाल्यामुळे अजून तरी गडावर कोणीच न्हवतं फक्त आमचाच ग्रुप होता. दरवाज्यातून डाव्या बाजूने पुढे गड फेरीसाठी निघालो तर वाटेत हरिश्चंद्रगडावर आहे तशीच पुष्करणी पाहायला मिळाली त्यातील पाण्याची अवस्था फारच वाईट होती. पुष्कर्णीच्या देवड्यांमध्ये भग्न अवस्थेत पडलेली महादेवाची पिंड, गणेश मूर्ती आढळली. समोरच पडलेली कमान व त्याखाली महादेवाची पिंड आहे तिथेच तुटलेल्याला अवस्थेतला नंदी आहे. गडावर अशे भरपूर अवशेष वाईट अवस्थेत पडून आहेत त्यावर संपूर्ण गवत माजल्याने ते नजरेस पडत नाहीत व थोडा आडवाटेवरला किल्ला असल्याने सहसा इकडं कोणी फिरकत नाही. पण ह्या आडवाटेवरल्या गडांच्या अनवट वाटा तुडवल्याशिवाय त्या गडाचं अन तिथं घडलेल्या इतिहासच महत्त्व कळत नाही. ह्या सगळ्या वास्तू कॅमेऱ्यात कैद करून घेतल्या.

गडावरील अवशेष

गडाच्या मध्यभागी असलेल्या छोट्या टेकडीवर चामुंडा देवीचे मंदिर आहे. चारही बाजुंनी गडाचा माथा पालथा घातला जिथून गडफेरीसाठी सुरुवात केली तिथे येऊन पोहोचलो पण सात टाक्या कधी मागे गेल्या कळलंच नाही.

सप्तमातृका 

    प पुढे वाट टेकडीवर असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराकडे वळवली. चामुंडा देवी प्रामुख्याने राजस्थान, बिहार या प्रदेशात आढळते. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. मंदिरात देवीची शेंदूर लावलेली प्राचीन मूर्ती आहे. आजूबाजूला मंदिराचे जुने अवशेष आहेत आताचे नवीन मंदिर हे गावकऱ्यांनी बांधलेले आहे. गडावरून माणिकडोह धरणाचा सुंदर नजर दिसतो. गड बघून झाल्यानंतर परतीच्या मार्गाला लागलो. आता आमहाला खुणावत होता तो सातवाहनकालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग नाणेघाट. गाडीत बसल्यावर शांत कुठं कोण बसतंय, मग एकमेकांची खेचत गाडी नाणेघाटाच्या दिशेनं दिमटीवली. वाटेत अंजनवाळे गावा जवळ एकाच डोंगर रांगेवर असलेली लहान मोठे सुळके दिसतात. हा डोंगर म्हणजे व्हराडी डोंगर गावकऱ्यांकडून या डोंगरात वऱ्हाड लुप्त झाल्याची कथा सांगितली जाते म्हणूनच त्याला वऱ्हाडी डोंगर म्हणतात.

      सह्याद्रीचा कोणताही डोंगर बघितला कि मनात अनेक विचार चालू होतात. त्याचा आकार, त्याची रचना, त्याला काही इतिहास आहे का? त्याचावर काही बांधकाम असेल का? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यावर जायची वाट कुठून असेल. हे असं सगळ माझ्या डोक्यात घुटमळत असत. जस जस घाटघर जवळ येत होत तसं तस एक हलकीशी धुक्यांची चादर अंगावर येत पुढे येणाऱ्या स्वर्ग सुखाची चाहूल देत होती. नाणेघाटाला पोहचताच वाटेत असलेला भला मोठा दगडी रांजण आपल स्वागत करून आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात घेऊन जातो. नाणेघाट म्हणजे सातवाहन कालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग. नाणेघाटचे बांधकाम सातवाहन काळात इ.स.पू. पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. नालासोपारा कल्याण बंदरातून येणारा माल जुन्नर हूनच पुढे पैठणला जाई त्यावेळी कोकण व जुन्नरला जोडणारा नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता.  सातवाहन हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात मौर्य नंतर भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. नाणेघाट रचना हि डोंगर खोदून केलेली आहे. इथं अनेक गुहा आहेत या प्रत्येक गुहे समोर पाण्याचं टाकं पहायला मिळत. इथं असलेल्या दगडी रांजणाचा वापर जकातीचे पैसे टाकण्यासाठी केला जात असे. व्यापाऱ्यांनी घाटाचा वापर केल्याबद्द्दल रांजणात पैसे टाकले जात हा दगडी रांजण म्हणजे त्यावेळचा टोल नाकाच. गणेश मूर्ती, कातळावर कोरलेले हनुमान शिल्प, दगडी रांजण, गुहेत भिंतींवर कोरलेले शिलालेख, या शिलालेखा बाबत सांगायचं झाल्यास हा शिलालेख ब्राम्ही भाषेत सातवाहन काळातील साम्रादनि नागणिका हिच्या काळात लिहिलेला वाचण्यास येतो या शिलालेखात सातवाहन राजांनी जे काही पराक्रम, दानधर्म केले आहेत त्या विषयी चा उल्लेख आढळतो असाच शिलालेख आपल्याला नाशिक जवळील पांडवलेणी इथे देखील आढळतो कातळात कोरलेल्या पायऱ्या स्थापत्य शास्त्राची सारी अदभूत किमया इथं अनुभवायला मिळते.

असा हा राजमार्ग बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा नानाच्या अंगठया कडे वळवला खरा पण वर आल्यावर दाटधुक्या मुळे कड्याच्या समोरील दृश्य काहीच दिसत नव्हते आणि बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक ला आम्हाला हुलकावणी देणारा पाऊस या वेळी आमच्या स्वागतास सज्जच होता असा ह्या पावसाचा आणि खळखळनाऱ्या झऱ्यांचा तर काहींनी मनमुराद आस्वाद लुटला त्यात सर्वात म्हणजे आमची जेष्ठ मंडळी अन बाल गोपाळ त्यांचा चेहऱ्यावर चा आनंद पाहून त्यांना कुठलीही घाही न करता त्यांना त्यांचा आनंद घेऊ दिला.आणि सर्वांना सुखरूप खाली आणून आम्ही रिव्हर्स वॉटर फॉल कडे मार्गस्थ झालो.

जस जसे आम्ही धबधब्या जवळ येत होतो तस तसे अधून मधून  धुक्याच्या चादरीतून वानरलिंगी सुळका हळूच डोके वर काढत होता.वानरलिंगी सुळका म्हणजे सातशे-आठशे फूट उंचीचा जीवधन किल्ल्यापासून वेगळा झालेला अजस्त्र अभेद्य बेलाग खडा सुळका. जेंव्हा जेंव्हा जीवधन ला येतो तेव्हा तेव्हा इच्छा होत असते एकदा का होईना हा सुळका सर करायचा पण अजून तरी तो योग् आला नाही पण यावर्षी तरी तो सर करायचाच हा निश्चय करून आम्ही फ़ॉल कडे वळालो.

पावसाळी ट्रेक ला जायच म्हटल कि पावसाच्या सरी अन धबधबा असेल तर अजून मनमोहक वाटत. आणि त्यात जर नाणेघाट ला आलात अन  उलट्या पाण्याचा धबधबा न पाहताच गेला तर तुम्ही ह्या ट्रेक च्या सर्वात अविस्मरणीय क्षणाला मुकलात म्हणून समजा.

येथील खासियत म्हणजे उलट्या पाण्याचा धबधबा.अगदी पावसाच्या सरी कोसळाव्या त्याप्रमाणे डोंगर दऱ्यातील पाणी या ठिकाणी वाहत येते आणि कड्यावरून खाली कोसळण्या ऐवजी उलटे वरती येते. परंतु वातावरणात कुठल्याही प्रकारची हवा नसल्याने आम्हाला  काही तो अनुभव घेता आला नाही. परंतु वरुण राजाने हलक्याश्या सरी आमच्या अंगावर शिंपडून ती इच्छा देखील पूर्ण केली  क्षणभर तिथून दिसणारा जीवधन ,वानरलिंगी सुळका त्यात अधून मधून येणारे दाट धुक्यांचे लोळ ते चित्र डोळ्यात साठवून ठेवावे असे होते.असे हे अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवून आम्ही चिंतामण कडे जेवणासाठी निघालो आता एव्हाना लवकरात लवकर पोटातल्या भट्टीत लागलेली आग विझवायची होती त्या मुळे सर्वांनी च आपली पावले वाढवली अन तिथे सर्वांनी मनमुराद जेवणाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवासाला लागलो

निसर्गाने नटलेल्या व तितकाच इतिहास संपन्न असलेल्या ह्या एक दिवसाच्या मोहिमेत भटकंतीत भरपूर काही जगायला मिळालं  सिमेंटच्या जंगलापासून दूर जिवलगांसोबत सह्याद्रीच्या सानिध्यात इतिहास उलगडणाऱ्या आड वाटा जगायला मिळाल्या. 


सर्वांचे पुनःश्च धन्यवाद

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स,परिवार 🚩

Thursday, September 1, 2022

दूधसागर एक फेसाळते सौंदर्य

     


दूधसागर ट्रेक 

27& 28 ऑगस्ट 2022

    एक काळ असा होता की गोवा म्हंटल की कधीही तयार असायचो अन आता कोणी म्हंटल का काहीतरी कारणे देऊन टाळायचा प्रयत्न करतो कारण जेव्हा पासून सह्याद्रि फिरतोय तेव्हा पासून तिथले नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! आता नकोसा वाटतो कारण मनात एक विचार येतो  तेवढ्या दिवसात तर माझा एखादा मस्त  range trek पूर्ण होऊ शकेल पण याच गोव्याची आम्हा भटक्यांसाठी  एक बाजू अशी आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. आणि गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. म्हणूनच काही वर्षांपूर्वी माझ्या जुन्या ग्रुप सोबत जाण्याचा योग आला होता पण रस्त्यातच एक वाईट बातमी कानावर आली तिथे एक दुर्घटना घडल्यामुळे दूधसागर धबधबा काही दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे त्या मुळे जरा हिरमोड झाला होता खरा पण तिथल्या गाईड ने आम्हाला दुसरा पर्याय दिला तिथूनच जवळ असलेला तांबडी सुर्ला धबधबा पाहण्याचा आणि लागलीच आम्ही तो पर्याय निवडला कारण एवढ्या लांब येऊन खाली हात परत जाणे हे मनाला पटणारे नव्हते आणि तेव्हा पासूनच हा ट्रेक माझ्या buket list  वर होताच पण दरवर्षी काही न काही विघ्न येऊन मुहूर्त काय लागत नव्हता पण  यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना priority वर हा ट्रेक टाकला . आणि वेळेचं गणित जुळून येतय असं दिसताच ही संकल्पना माझे सहकारी चंदन सर आणि उमेश यांच्यासमोर मांडली आणि दोन महिने आधी ट्रेक बुक करून टाकला.

सह्याद्रि परिवाराचा हा महाराष्ट्रा बाहेर आणि रेल्वे ने पहिलाच ट्रेक असल्याने त्याचा संपूर्ण अभ्यास माझ्या जुन्या सहकारी मित्रांच्याकडून करून घेतला ट्रेक ला दोन महिने असल्याने मध्ये एक अंधारबन चा एक अविस्मरणीय ट्रेक केला.

दूधसागर ट्रेक हा माझा महत्वकांक्षी ट्रेक असल्यामुळे पुढे काही घरून विघ्न येऊ नये म्हणून एरवी महिन्यातून तीन  रविवारी तरी बाहेर हिंडणार घरात बसलेलो होतो तेव्हा आम्हा हिंडफिऱ्या लोकांना कायम पडणारे टोमणे म्हणजे आज  चक्क घरी जायच नाही का कुठे असे एक न एक टोमणे गुमान ऐकत बसावं लागत असे.असो मजेचा भाग वेगळा.


आणि तो दिवस उजेडला ठरलेल्या वेळेप्रमाणे श्रीरामपूर स्टेशनवर  इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण एक च्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १६ तास घेते! पण थेट कुलेम स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ५० जणांचा ग्रुप होता. एव्हाना आमची ट्रेन एक एक स्टेशन पार करत असताना  गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, काही खेळ आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुलेम  स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ५० जणांचा ग्रुप, यामुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले!अन तसेही प्रवासात माझे न झोपेच वावडच म्हणा म्हणून पुस्तक चाळावयास घेतले काही तासाभरानंतर जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! मग परत खाली उतरून पाय मोकळे करून यायचे असा क्रम चालू झाला जस जसे कुलेम स्टेशन येत होते तसतसे 5-5 मिनिटाला गाडी थांबत होती कारण रात्री जंगलात उतरण्यास बंदी असल्याने काही दूधसागर ला येणारी मंडळी तिथे उतरली असल्यामुळे  रात्री पासूनच जी मंडळी पोलिसांनी अडवून ठेवलेली  होती  त्यांना गाडीत बसवत होती त्या मुळे रात्रीच्या काळोख्या अंधारात कुठले स्टेशन आले ते समजायला मार्ग नव्हता त्यातच गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास आम्ही कुलेम स्टेशनवर उतरलो.तिथे आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्या गाडीत आमच्या ब्यागा टाकून  आम्ही लगेचच चहाची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. तो पर्यत सर्वांना ट्रेक च्या सूचना देऊन आम्ही सहा वाजता आमचा ट्रेक चालू केला . तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं.पण परत आम्हाला साडेचार ची ट्रेन पकडायची होती म्हणून मनात ती धाकधूक हाती 

आणि आमचा तांडा मार्गस्थ झाला. सप्टेंबर  महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तांबड्या मातीतील रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. गावातील उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले.तासाभराच्या जंगल पदभ्रमंती नंतर आता आमचा ट्रेक हा रेल्वेच्या पटरी ने चालू झाला एरवी सह्याद्रि चे डोंगर दर्या तुडवानरे आमचे पाय पहिल्यांदाच पटरीच्या मार्गाने रस्ता काटत  होते तो मार्ग इतका अविस्मरणीय होता की नागमोडी तो रेल्वे ट्रेक त्याचा सोबतीला दोन्ही बाजूने घनदाट अरण्य त्या मुळे तिथे फोटो घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार पटरिचा साधारण सहा सात किमी च अंतर पार केल्यानंतर इतक्यात दूधसागर चा’  फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूने रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाच एक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. आजूबाजूला असणारे एक विशिष्ट प्रकारच्या झाडांची मांडणी पाहताना. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातुणच चालू लागलो ! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. फोटो मुळे आता उशीर होयला लागला होता पाहिजे त्या वेळात अंतर कटत नव्हते म्हणून मुकाट्याने कॅमेरा बंद केला त्यातच गेली दोन दिवस तब्येत ठीक नसल्याने एरवी हवा हवा सा असणारा उत्साह शेवट पर्यत अजिबातच जाणवला नाही त्यामुळे उशिर होऊ नये म्हणून काही मंडळी च्या वर पहिल्यांदाच  ट्रेक ला  चिडचिड देखील झाली

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता दमट उष्म्यात बदलला होता. तशी चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती.आता एव्हाना नास्ता साठी थोडीफार भूक वाट पाहतच होती न जंगलातच एका घरी सर्वांनी मनसोक्त नास्ता चा आनंद लुटून क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा त्या जंगल वाटेने मार्गस्थ झालो .अन रस्त्यात एक नाला लागला एरवी फक्त काही social मीडियावर पाहिलेला तो झुलता पूल पाहून तर सर्वांचेच मन तृप्त झाले आणि तो सर्वांच्या तोंडावर दिसणारा आनंद पाहून मला देखील त्यांचे हे भाव माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरला नाही तेथून पुढे आल्यावर  थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. डावीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला.थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो  काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो


ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे असा निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. सर्व जण ते क्षण धबधब्यासमोर उभे राहून समोरच्याच्या कॅमेरात कैद करत होते. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे मी कॅमेरा काढला देखील पण धबधब्याच्या तुषाराने lence वर सारखे दव तयार होते त्या मुळे हवे तसे फोटो घेता नाही आले  मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.आता वातावरणात बर्या पैकी दमट पणा निर्माण झालेला होता त्या मुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर थकवा आता जाणवू लागला बरीचशी मंडळी पुढे निघून गेल्या मुळे मी नेहमी प्रमाणे मागे थांबलो असल्यामुळे मागे असलेल्यांना धीर देत सर्वांनीच ट्रेक पूर्ण केला आता एव्हाना सर्वांच्या पोटात कावळे हे कोकत होते त्या मुळे सर्वांनीच अतिशय रुचकर अशा जेवणावर ताव मारून स्टेशन गाठले.

काही गोड काही कटू आठवणीत आता ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण सह्याद्रि परिवाराचे महाराष्ट्र बाहेरील  पहिलाच ट्रेक पूर्ण केल्याचे एक आत्मिक समाधान मनात होते. ह्या ट्रेक दरम्यान देखील सर्व सर्व सदस्या च्या मदतीने परिवाराचा हा ट्रेक देखील अगदी सुखरूप पूर्ण झाला त्या बद्दल सर्व सदस्यनचे मनःपूर्वक धन्यवाद


सचिन भांड पाटील

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार

                   






देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...