हरिहर गड
दि.06 मार्च 2022
छंद जिवाला लावी पिसे... तसचं काहीस झालय माझ , प्रत्येक ट्रेक हा जिवाला करी वेडेपिसे..... ट्रेक म्हणजे माझ्यासाठी एक श्वास आहे. सच ही हैं 'इन पहाड़ों की हवांओं में इक नशा सा हैं'.. ..और वो बढता ही जा रहा हैं। एक दोन आठवडे सरले की याची ओढ उफाळून वर येतेच येते आणि सुरु होतात पुढच्या ट्रेक चे प्लान. इच्छा तर असते प्रत्येक आठवड्याला ट्रेक करण्याची पण नेहमी जमेलच असे नाही. निसर्गाशी एकरुप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकिंग, आपण निसर्गाशी बिनधास्त एकरुप व्हायचं. सह्याद्रीतील डोंगर दऱ्यात फिरतांना माझ्या डोळ्यात भरतात ते प्रचंड मोठे काळे पाषाण .काय एक एक रॉक असतात राव , तुम्ही म्हणाल काय वेड लागलय का ह्या माणसाला... पण खरच वेडच लावल आहे ह्या सह्याद्रीतील काळ्या भिन्न पाषाणांनी त्यांच्यातला वेग वेगळेपणा सतत मला भारावून टाकतो. तो म्हणजे, बेलाग सुळक्या मधील 'रुबाब', आणि प्रचंड कातळातील दिमाखदारपणा तर खुप भावतो. विविध कातळ, काळकभिन्न रंगाचे, मोहक आकारांचे असे अंगावर येणारे बेलाग सुळके तर ताठ मान आणि नजर उंचावल्या शिवाय आपण त्यांना पाहुही शकत नाही. म्हणून जरा जास्तच आवडतात.कोणत्याही गडकिल्यावर जा असे हे मोठ मोठे पाषाण आपल्या स्वागतासाठी तयारच असतात. कधी कधी तर या पाषाणात पायर्या खोदून गडावर जाण्याचा मार्ग बनवलेले दिसतात. सह्याद्रीच्या कातळावर प्रेम करणार्या माझ्या पूर्वजांनी जिथे जिथे चढाई अत्यंत कठीण आहे आशा अवघड ठिकाणी सुध्दा पायर्या कोरून गडावर जाण्याचा मार्ग बनवला आहे त्यांच्या या स्थापत्य कलेसाठी त्यांना मानाचा मुजरा. अश्याच भक्कम कातळात 70 ते 80 डिग्रीत कोरलेल्या खड्या पायर्यामुळे प्रसिद्ध असलेला आणि कायम ट्रेकर लोकांचा आकर्षणाचा बिंदू ठरलेला हरिहर गड. ऐतिहासिक व अतिप्राचीन असा स्वतःच्या रांगड्या रुपाने कोणालाही त्याच्या प्रेमात पाडणारा गड. म्हणूनच काही गड किल्ले कायमच परत परत खुणावत असतात त्यातीलच एक गड म्हणजे हरिहर गड वासोटा ट्रेक नंतर ह्या वर्षीचा शेवट हरिहर ट्रेक करून करावा ही एक मनोमन इच्छा होतीच आणि त्याप्रमाणे नियोजन चालू झाले.
नाशिकच्या पश्चिमेस त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत अनेक गडकिल्ले येतात, त्यातील हरिहर हा प्रमुख किल्ला आहे. त्र्यंबक रांगेचे दोन भाग पडतात एका भागात बसगड, उतवड फणीचा डोंगर, त्र्यंबकगड व हरिहर हे गड येतात आणि दुसर्या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही येथील प्रमुख नदी आहे. हरिहरगड समुद्रसपाटीपासून 1120 मीटर म्हणजेच 3400 फुट उंच आहे.
हरिहरगड च्या इतिहासात डोकावल्यास हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे जाऊन मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.त्या नंतर हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात. खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
असा हा ट्रेक करण्यासाठी दि.06 मार्च रविवारी रात्री 01वाजता आमची 40 जणांची बस नारळ फोडून नाशिक कडे रवाना झाली. हरिहरची ओढ इतकी की अगदी थोडासा डुलका वगळता कोणाला फारशी झोपही लागली नाही. आम्ही नाशिक वरुन त्र्यंबकेश्वर मार्गे पहाटे साडेपाच वाजता हर्षेवाडी येथे पोहचलो. गडाच्या पायथ्याशी असलेले हे गांव. हरिहर च्या ओढीने पाच तास प्रवास करुन देखील प्रवासाचा ताण अजिबात जाणवला नाही. बसमधून उतरल्या बरोबर सकाळचा थंडगार वारा अंगावर घेत. लगेच एका तासात सर्वजण फ्रेश झाले. गावातील सोमनाथ याच्याशी आधीच संपर्क करून ठेवल्याने त्याने चहा नाष्टा ची पूर्ण तयारी करूनच ठेवलेली असल्याने नाष्ट्यानंतर गरमागरम वाफाळत्या चहाचा आस्वाद घेऊन पुढे निघालो.
यानंतर सर्वांना ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व त्या पाळण्याचे आदेश ही दिले.त्यानंतर आमच्या ग्रुप ला अभिमान वाटावा असा आमच्या ग्रुप सदस्या डॉ. मृण्मयी यांची नुकतच जनरल सर्जरी साठी नंबर लागल्याने ग्रुप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्या नंतर 8 वाजता ट्रेक सुरू झाला.
सकाळच्या पहारी दहा बारा घरं असलेलं गांव किती सुरेख दिसत होत. घराघरातून पेटलेल्या चुलीतून निघणारा धूर ,गोठयातील गाई गुरं, इकडे तिकडे पळणार्या कोंबड्या, पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर तीन तीन भरलेले हांडे घेऊन जाणारी महिला सकाळचे हे गावातील दृश्य तर अलोभणीय होते त्यातचअजुबाजुला वाळलेल्या गवतात सकाळच्या कोवळ्या उन्हात आमच्या सारख्याना फोटोग्राफीची मजा काही औरच.
आता बर्यापैकी चढण चढण्यास सुरवात झाली. अलीकडे ट्रेकर्सनी किल्यावर जाणाऱ्या बर्याच वाटा शोधल्यामुळे तशी ही मळलेली वाट फारशी दिसली नाही. या वाटेवर मधे मधे लिंबूपाणी विकणारे लोक बसलेले आहेत त्यामुळे लिंबूपाणी पिऊन फ्रेश होऊनआपण पुढे जाऊ शकतो.
ट्रेक कोणताही असो वाट कशीही असो अजुबाजुचं सौंदर्य न्याहळत ते मी आपल्या कॅमेर्यात कैद करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वच ट्रेक मध्ये अगदी शेवटच्या माणसाला गडावर नेण्याची माझी जबाबदारी असल्याने मला मधे मधे थांबुन अजुबाजुचं सौंदर्य न्याहाळत फोटोग्राफीची मजा घेता येते. त्यातच काहीजण फोटोसाठी लुडबुड करणारे असतातच सर माझा असा घ्या तसा घ्या अर्थातच मला माझ्या फोटोपेक्षा दुसऱ्यांचेफोटो काढायला आवडतातच म्हणा.त्यातच ट्रेक छोटा असल्याने मनसोक्त फोटोसेशन केले.
खरतर गड माथ्यावर पोहचल्यावर जो आनंद मिळतो त्याही पेक्षा तिथवर पोहचण्यासाठी केलेला घाटवाटांचा प्रवास तासनतास तुडवलेल्या पायवाटा, दमवणाऱ्या अडवाटांची पायपीट कैक पटीने आनंद आणि समाधान देऊन जात असते.दोन तासाच्या पायपीटी नंतर आता आमच्या समोर तो भव्य हरिहर उभा ठाकला. ज्याच्यासाठी इथवर आलो भव्यदिव्य पाषाणाचा खडा डोंगर आणि पाहता क्षणी धडकी भरेल अशा खड्या पायऱ्या,तरीही ओढ कायमच. जसे दिर्घप्रतिक्षेनंतर दोन मित्र एकमेकांना भेटण्यास आतुर असतात तसेच हरिहर आणि आमच्यात झाल होत. सगळेजण खुपच उत्सुक होते. आता खर थ्रील सुरू झाले...'याच साठी केला होता इथवर येण्याचा अट्टाहास ' सर्वच मेम्बर्स एकमेकांना मदत करत कसलीही घाई गडबड न करता त्या खड्या पायर्या चढू लागले.तरीही 70 ते 80 डिग्रीत कोरलेल्या असल्याने प्रत्येक पाऊल आडवे टाकत चढावे लागते, प्रत्येकी दोन पायरीत अंतर जरी जास्त असले तरी पायर्यांच्या दोन्ही बाजूला खोबण्या आहेत त्यामुळे हाताने खोबणीला घट्ट पकडून सावकाश एक एक पायरी चढता येते. सह्याद्रीतल्या काळ्याभिन्न पाषाणावर प्रेम करणाऱ्या माझ्या पूर्वजांचे स्मरण करून या सरळसोट शंभर पायऱ्या पार केल्या. इथूनच शेंदूर लावलेल्या कमानीतून किल्यावर प्रवेश करता येतो. तसेच पुढे डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी कपार लागते. या कमानीतून समोरची कपार व तिच्या पलीकडील डोंगर अप्रतिम नजारा डोळ्यात भरतो वाह! या कपारीला वळसा घालून जाताना डाव्या हाताला एक नेढे दिसते
पुढे इथेही पाषाणात बाजूने कोरलेले दोन जिने पार केल्यानंतर, दोन भव्य पाषाणाच्या मधुन एक जिना वर जातो व पुढे एका पाषाणाच्या आतुन बाहेर निघतो, इथे कोथाळीगड ची आठवण होते.
अजून दोन जिने पार केल्यानंतर समोर डोम दिसतो हेच ते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. इथून उजव्या बाजुने थोडे वर चढत गेले की पठार लागते. तसे हे पठार निमुळते आहे व मधेच उंचवटा आहे. या उंचवट्यावरुन पुढे गेल्यावर, डाव्या बाजूला खाली एक तलाव आहे व त्याच्या बाजूला हनुमान व शंकराचे मंदिर आहे. आम्हाला पायथ्यापासून दिसणारी हरिहरची आयताकृती कातळीभिंत व बाजूची दरी आता स्पष्ट दिसत होती.
या दरीच्या बाजूने पुढे गेल्यावर समोर हरिहरच शिखर दिसु लागत.हे शिखर फारच निमुळतं असल्याने सर्वांना अत्यंत काळजीपूर्वक वर चढून जावे लागते. शिखरावर 10 ते 15 च लोक उभे राहु शकतील इतकीच जागा आहे. त्यात वाऱ्याचा जोर असल्याने तोल जाऊ शकतो म्हणून कडेला जाऊ नये, सेल्फी अजिबात काढू नये. अशा ठिकाणी फक्त निसर्ग सौंदर्य न्याहाळाव डोळ्यात साठवून घ्याव आणि लगेच उतराव . शिखरावर जमेल तेवढ्यांचा ग्रुप फोटो घेऊन आम्ही एक एक जण उतरु लागलो.
इथून उजव्या बाजूला थोडे उताराला गेले की खुपच निमुळतं पठार आहे. इथे वाटेत पाण्याची पाच टाकी आहेत. एक दगडी कोठी आहे. इथून ब्रह्मगिरी अतिशय सुंदर दिसतो. समोरील एक बाजूच्या सर्वच डोंगररांग व दुसऱ्या बाजूला खाली वैतरणाचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. इथून परतताना एका टाक्यातील पाण्याने तोंड धुतले, चार तास चालून थकलेला जीव या थंड पाण्याने एकदम फ्रेश झाला.
आता गड उतरण्यास सुरूवात केली. म्हंटलेच आहे ना "चढण्यात शान आहे पण उतरणे अनिवार्य आहे". चढण्याचा थ्रील अनुभवल्या नंतर, खरी कसोटी लागते ती उतरण्याची. उतरताना पूर्णपणे स्वतःवर नियंत्रण ठेऊन सावकाश एक एक पायरी उतरावी लागते.
जिथे जसे जमेल तसे बॅलन्स सांभाळत प्रत्येकजण उतरत होते. काही ठिकाणी पायऱ्यांमधील अंतर जास्त असल्याने बसत बसत उतरावे लागते. उतरताना बाजूची दरी आता चांगलीच दिसू लागली होती. काहींचे भितीने पाय थरथरत होते पण एकदा का मनाने ठरवल आणि दुसरा पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा भिती निघून जाते. उतरताना प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून उतरावे. कारण तोल गेला दुसर्याला धक्का लागला तर सरसकट सगळे खाली जाण्याची शक्यता असते म्हणून शांतपणे उतरणे गरजेचे असते. अशा 80 डिग्रीत कोरलेल्या खड्या पायऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरीने उतरल्या, अशाप्रकारे हरिहर च्या पायऱ्यांचा हवाहवासा रोमांचकारी थरार सगळ्यानी अनुभवला.
आता सात तासाच्या ट्रेक नंतर प्रचंड भूक लागलेली खाली उतरून सोमनाथ च्या घरात अतिशय रुचकर अशा व्हेज/नॉनव्हेज भोजनाचा आनंद घेतला त्याला जोड म्हणून व्हेज नॉनव्हेज च्या वादविवाद चा चर्चेचा तडका होताच.त्या नंतर थोडासा अराम करून सध्या सह्याद्रि मध्ये ज्या दुर्घटना घडताय त्या का होताय या बाबत थोडेसे मार्गदर्शन केले आणि सोमनाथ च्या भावाच्या हातचा गरमा गरम चहा चा आस्वाद घेऊन हरिहरला पायथ्यापासून निरोप देत पाच वाजता आमची बस निघाली.आणि काही क्षणातच सर्वजण दुपारची दमछाक झाल्याने झोपी गेले पुढे नाशिक शहर सोडल्या नंतर चहा प्रेमीचे energy ड्रिंक घेतल्यानंतर जो काही उत्साह अंगात संचार ला होता तो बस मध्ये गाण्याच्या भेंड्या karoke music डान्स या मुळे सर्व थकवा हा केव्हाच निघून गेला .
असा हा थ्रिल असणारा हरिहर ट्रेक प्रत्येकाने एकदा अनुभवायला काय हरकत आहे.
सचीन भांड
सह्याद्री ट्रेकर्स
श्रीरामपूर