Wednesday, November 16, 2022

किल्ले लिंगाणा!!!

 _किल्ले लिंगाणा!!!

दि.१३ नोव्हेंबर २०२२

तारीख ९ ऑक्टोबर वेळ सकाळची घड्याळ्यात अदांजे ०८ वाजलेले असताना पावसाची संतत धार  होती. हवेत गारवा भरला होता आणि अशातच माझा फोन वाजला दादा इकडे अजून climate खूप खराब झालय काय करायचं गेले महिनाभर ह्या ट्रेक साठी काय काय केले त्याचा एक पटच डोळ्यासमोरून सरकला. कारण सर्व समीकरणे जुळवून आम्ही दुपारी ट्रेक ला निघणार होतो. तो ट्रेक होता लिंगाणा राजधानी रायगडच्या माथ्यावरून जगदीश्वर कडे आल्यावर काळ नदीच्या खोऱ्यातील एक सुळका कायम लक्ष वेधून घ्यायचा नाव त्याचे  किल्ले लिंगाणा. कधीतरी चढाई करूच अशा इराद्याने रायगडच्या गोड आठवणी आणि लिंगाण्याचे स्वप्न घेवूनच रायगड उतरायचो.  काही वर्षांपूर्वी मी केलेल्या लिंगाणा  ट्रेक चा वाईट आठवणी चा अनुभव असल्याने मी  पावसात जाण्याची  जोखीम पत्करली नाही आणि ट्रेक पुढे घ्यायचा ठरवला. पुढे जेंव्हा ठरलेल्या दिवशी ट्रेक जायचा ठरला . तो दिवस उजेडला लिंगाणा करायचाच त्या दृष्टीने सर्व तयारी आधीच झाली होती. एक भटका ट्रेक करण्यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठीण. या ट्रेकला तशा सतराशे साठ विघ्न, पण साऱ्या अडचणींवर मात करून १३ नोव्हेंबर या तारखेला नेहमी प्रमाणे उशीर होत आम्ही १८ लोकांच्या चमू ने श्रीरामपूर सोडले.

नेहमी फ्रेश मनाने ट्रेकला जाणारा मी पण मलाही आज काहीतरी वेगळीच भीती जाणवत होती.कारण लिंगाणा असा एक ट्रेक आहे जितका तुम्हाला जास्त उशीर होईल तितका उशीर ट्रेक पूर्ण करण्यास होणार होता.कारण मी केलेल्या मागील  ट्रेक ला आमचा शेवटचा माणूस रात्री 2 वाजता पायथ्याला होता.त्यातच भर म्हणून कि काय रात्री पुण्यातल्या ट्राफिक मुळे पुण्यातून बाहेर पडायला तब्बल दोन तास लागले.त्यातच गाडीमध्ये बऱ्याच दिवसांनी सगळे मुल च ट्रेक ला असल्याने धिंगाना आरडाओरड ला तर सीमा नव्हती अशा या परिस्थितीत वेल्हा सोडला तसा चमत्कारीक रस्ताने आपले रंग दाखवायला सुरवात केली. गाडी १७ सिटर असल्याने तीचा बांधा तसा मोठा. त्यात अपेक्षित सिटापेक्षा जास्त मंडळी. गाडीची चाके आपल्या उर्जेप्रमाणे फिरत होती पण चमत्कार हा होता की गाडी पुढे जात नव्हती झाल सगळ्यांना खाली उतरावे लागले. आणि उतार आला की परत गाडीत बसायचो  पुन्हा चढ आला की पुन्हा उतरत होतो …. ड्रायव्हर डाव्या बाजुची दरी पाहून आधीच सावध व्हायचा आणि सगळ्याना खाली उतरायला लावायचा. ड्रायव्हर तर इतका वैतगला होता की याला दुसरा मार्ग नाही का अस सारख विचारत होता पण पर्याय च नव्हता

 अशातच पहाटे ०५ वाजता मोहरी गाव गाठले तिथे आमचे शिलेदार मंडळी आमची वाटच पहात होती आणि क्षणाचा ही विलंब न करता आम्ही आमचे सर्व सामान आवरून ट्रेक ला सुरवात केली.काळोखी रात्र आणि जंगलातून जाणार रस्ता तुडवत आम्ही बोरट्याच्या नाळेच्या तोंडाजवळ पोहचलो.



आता एव्हाना बऱ्यापैकी उजेड पडायला सुरुवात झाली होती.स्वतःचा तोल सावरत खडतर अशी ती नाळ उतरून आम्ही  रायलिंग पठाराच्या बाजूने दोरीच्या साह्याने तो कडा सर केला आणि समोर दिसु लागला तो भला मोठा लिंगाणा सुळका


आणि थोडयाच वेळात आम्ही लिंगणाच्या पायथ्याजवळ पोहचलो आणि सोबत घेतलेल्या नाष्ट्यावर ताव मारून सर्वांना equipment ची माहिती देऊन हर्णेस चढवून आम्ही चढाईला सुरवात केली .आमच्याकडे ट्रेकिंग चा अनुभव खूप होता पण एक दोघे सोडले तर climb च्या बाबतीतील अनुभव कमी होता त्यात काही नवीन मेम्बर यामुळे आम्हास पहिली रेज गुंफे पर्यंत चढून जाण्यास दुपारी ११.०० कधी झाले हे कळलेच नाही. पुढे आधीचा एक ग्रुप असल्याने २५-३० मिनिटामध्ये  आम्ही पुढील चढाई ला सुरवात केली. अतिशय कठीण अशी हि पुढील चढाई होती ती, कारण जस जसे एकेक टप्पा पार करत होतो तसतसे सुळका निमुळता होत होता त्यातच दोन्ही बाजूला महाकाय दरी असे आम्ही प्रत्येक टप्पा पार करत लिंगांना चा माथा गाठला खूप जल्लोष केला, लांबूनच किल्ले रायगड चे दर्शन घेतले पहिल्या चढाई चे ते क्षण कॅमेरा मध्ये फोटो स्वरुपात घेतले आणि परतीचा मार्ग निवडला, तेव्हा दुपारचे ०३ वाजले होते लगेच rappeling करून आम्ही गुफे पर्यंत येई पर्यंत  ०५वाजले होते. आता अंधार पडायच्या आत आपण नाळ चढायची म्हणून सर्वांनी सपसप आपली पावले उचलली पण माझ्यासोबत शेवटी काही वयस्कर मंडळी असल्यामुळे त्यांच्यासोबत थांबणे गरजेचे होते नाळेपर्यत येवोस्तोवर आता बऱ्यापैकी अंधार पडलेला होता अशा या परिस्थिती माझ्या सोबत केशव गगे असल्यामुळे सोबत च्या मंडळींना खडतर नाळ चढवून आम्ही सुटकेचा श्वास सोडला आणि थोडी विश्रांती घेऊन गाव गाठले एव्हाना आमची मंडळी जेवण करून आमची वाटच पहात होती आम्ही देखील जेवण करून गाडीत बसलो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील लिंगाणा सर केल्याचे जे समाधान होते ते स्पष्ट दिसत होते आणि हीच मंडळी सुळका चढताना म्हणायची मस्त रविवार होता घरीच अराम केला असता उगाच हे धाडस करायला आलो पण आता तीच मंडळी एक विलक्षण सुख देणारा अनुभव घेत होती आणि आम्ही श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो.

स्वराज्याची स्वप्ने ह्या दुर्गांच्या संगतीने, साक्षीने साकारलेले, या डवरत्या- फुलत्या दुर्गांनीच आपल्या मायेची पाखर घातली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर या पवित्र गडकोटांनीच या भूमीचे शतकानुशतके गुलामगिरीचे परचक्र परतवले. सह्याद्रीतला प्रत्येक किल्लाने इतिहासात एक सुवर्ण पान लिहिलेले. पण हा  लिंगाणा थोडा दुर्दैवी म्हणावा लागेल. वेगळ्या कार्यासाठी स्वराज्यात याचा वापर व्हायचा. लिंगाणा किल्ला म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळ. सर्वात वाईट शिक्षा काय असेल तर ती लिंगाण्याची शिक्षा. मरण्यासाठी इथे प्रत्येकाला स्वांतत्र्य. इतिहास काळातील संभाजी-गोदावरी प्रसंग चर्रकन मनाला वेदना देवून गेला.

लिंगाणा माथा गाठणे हे तस पाहिलं तर भल्याभल्यांचं स्वप्नच असते.आमच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी हे स्वप्न सत्यात उतरवल  बलाढ्य आकार आणि थरार आठवणीतल्या साठवणीमधून कधीच न मिटनारा. एक ओळ मनात रुचली की

       “जिंदगी एक सफर है सुहाना … यहां कल क्या हो किसने जाना।”

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार





Wednesday, November 2, 2022

माझी खान्देश दुर्गवारी भाग १.

 दि.३०/१०/२०२२

कधी कधी अचानक ठरवलेली मोहिम पण खुप काही मिळवुन देते  सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात. मनात ठरवलेल नियोजन तंतोतंत अंमलात येते. सरतेशेवटी गोड आठवणी आणि चांगला सुखद अनुभव देऊन जाते.

असेच काही माझ्या  बाबतीत घडले. भाऊबीज साठी आलेली बहीण गेल्या एक वर्षांपासून धुळे येथे बदली होऊन आल्यामुळे तिला सोडायला रविवारी ड्रायव्हर ला पाठवणार होतो पण शनिवारी सकाळी अचानक मनात आले,सह्याद्रि भरपूर पालथा घातला त्या मानाने बागलाण ,खान्देश प्रांत नेहमीच मला भेटण्यासाठी आजही खुणावत आहे.त्यातच गेले काही दिवसांपासून कुठे भटकायला न गेल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या भाषेत बोअर होत होत त्यातच  या रविवारी एखादा चांगला ट्रेक करूया म्हणून लगेच आमच्या बहिणाबाई ला सांगितले.मीच येतो तुला सोडवायला आज रात्री निघुया. आणि माझा'खान्देश दुर्गवारी चा प्लॅन आखला. सुरवात कुठल्या किल्ल्यापासून करायची कारण एका दिवसात जेवढे किल्ले सर करता येतील तेव्हडे करायचे होते

आणि सुरवात "लळींग, सोनगीर,, डेरमाळ ,आणि गाळणा करायचे ठरवले.

 लगेचच प्लानवर शिक्कामोर्तब करून टाकले आणि रात्री  आठ वाजता आम्ही निघालो, आत्ता पर्यंत बरेच ट्रेक करून झाले  आहेत सहसा मला असे कधी होत नाही पण या वेळेस मात्र मी भलताच एक्साईट झालो होतो.कारण सह्याद्रि च्या बाहेर ट्रेक करण्यासाठी बऱ्याच दिवसांनी निघालो होतो. आम्ही रात्री बारा वाजता तिच्या घरी पोहोचलो एव्हाना बऱ्यापैकी थकलो असल्याने लगेच झोप लागली गेली

सकाळी सहा वाजता गजर वाजला, उठून तयारी करून सात वाजता  छोट्या भाचा ला सोबत  घेऊन लालिंग किल्ल्याला निघालो. आता सुरू झाली होती माझी 'खान्देश दुर्गवारी'.

तीस ते चाळीस मिनिटात लळिंग गावी पोहचलो.धुळे वरून निघाल्यानंतर  महामार्गाच्या उजव्या हाथाला, माथ्यावर तटबंदी धारण केलेला लळिंग किल्ला दिसला.

त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.






किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग पाहून झाल्यावर जेवण वैगरे करून सोनगीर किल्ला पाहण्यासाठी निघालो धुळ्यापासून साधारण २०कि.मी अंतरावर असणा-या गडपायथ्याला सोनगीर गाव लागते;तिथे पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.गावातून किल्ल्याकडे जाणा-या पायवाटेने काही मिनिटातच आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची एकसलग तटबंदी व त्यामध्ये असणारे वैविध्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात.सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने अधिक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची बरीचशी पडझड झाली असून त्यातील प्रवेशद्वार मात्र सुरक्षित उभे आहे .येथून आत प्रवेश केल्यावर सुंदर नक्षीकामयाअसलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत पडते .ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पाय-यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते.सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्याकारणाने येथे नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत.

गडमाथ्यावर पोहोचताच आपणास जी तटबंदी दिसते तिथे मोठे दगड न वापरता अनेक लहान दगडांचा एकमेकांवर रचून वापर केला आहे.

आपण ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणा-या पायवाटेने दक्षिण बाजूला असणा-या बुरूजाच्या माथ्यावर जायचे .या बाजूस तट तसंच बुरूज वगळता इतर कोणतेही दुर्गअवशेषर शिल्लक नाहीत.त्यामुळे येथून माघारी फिरून आपण गडाच्या उत्तर टोकाकडे जायचे.या वाटेवर आपणास इतिहासकाळात तेल साठविण्यासाठी वापरले जाणारे एक दगडी रांजण निदर्शनास पडत.गडावर बऱ्यापैकी आता पडझड झाल्यामुळे फारसे अवशेष पहावयास नाही मिळत.इ. स.१३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती .पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने सोनगीरवर हल्ला चढवून हा किल्ला जिंकून घेतला.पुढे म्हणजे इ.स. १६०१ मध्ये खानदेशामधील फारूकी घराण्याचे राज्यसंपुष्टात आले.त्याकाळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता.त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले .त्यामुळे अकबर बादशाहने त्यास सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले.१७५२ पर्यंत हा किल्ला मोगलांच्याच ताब्यात होता,पण त्याच वर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला .त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नाराशंकराकडे दिला .१८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. 





हा किल्ला पाहून झाल्यानंतर मी माझा मोर्चा थाळनेर कडे वळवला सोनगीर पासून साधारण ३५ कि.मी.असणाऱ्या तापी नदी च्या किनाऱ्यावर असलेल्या थाळनेर गावापासून १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. आज दुदैवाने किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.

किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.

१) जमादार वाडा :- गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक ‘‘जमादार वाडा’’ म्हणतात. या गढीत आजमितीला अनेक कुटुंब रहातात. वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दारा खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. घरातील साध्या खुंट्या, कोनाडे यांच्यावरचे नक्षीकाम गढी बांधणार्‍यांच्या रसिकतेची कल्पना देते. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते आस्थेने गढी दाखवतात, पण त्याच्या इतिहासाबद्दल व पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल ते अनभिज्ञ आहेत. गढीच्या प्रवेशद्वाराशेजारी रामसिंग व गुमान सिंग ही नावे लिहीलेली दिसतात.

२) १० कबरी:- थाळनेरवर राज्य करणार्‍या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे, १) मलिक राजा २) मलिक नसिर ३) मिरान अदील शहा ४) मिरान मुबारक खान

थाळनेर हा किल्ला  मलिक फारुकी च्या काळात खानदेश प्रांताची राजधानी होती.दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्याकडून मलिकवर खान याने थाळनेर व करवंद या परगण्यांची जहागिरी मिळविली. त्याने थाळनेर ताब्यात घेवून फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करुन 1370 मध्ये थाळनेर येथे त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधला. एका बाजूने तापी नदी, तर दुसऱ्या बाजून तटबंदी आणि बुरुज बांधून किल्ला भक्कम करण्यात आला होता. 1600 मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशाह फारुकी याचा पराभव करीत थाळनेरवर ताबा मिळविला. मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निंबाळकर, होळकर घराण्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले आहे. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लॉप याने मराठ्यांचा पराभव करुन तो 1818 मध्ये इंग्रजी राजवटीच्या अंमलाखाली आणला.






आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागल्याने माझ्या प्लॅन मधला चौथा किल्ला गाळण न करताच थांबलो .  लवकरच दुसऱ्या भागात खान्देश चे राहिलेले किल्ले करण्याचा निश्चय करून परतीचा मार्गे लागलो.

या सर्व प्रवासात निश्चितच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सह्याद्रि च्या मनाने या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नसली. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तेअस्तित्वाशी झुंजत उभे आहेत.

इतिहास संदर्भ :- ट्रेकक्षितिज

सचिन भांड

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...