Wednesday, January 26, 2022

भिगवण पक्षी अभयारण्य आणि धर्मवीर गड स्थळदर्शन

तारीख.-23 जानेवारी 2022
भिगवण पक्षीअरण्य   

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान  असणारं भिगवण गाव आज पक्षी अभ्यासकांसाठी एक पर्वणी म्हणून  उदयास येत आहे ते इतके की अगदी आता ह्या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखील संबोधले जाऊ लागले आहे. भिगवणजवळ असणा-या उजनी धरणाच्या परिसरात शेकडो प्रकारचे परदेशी व स्थानिक पक्षी पाहायला मिळतात. जानेवारी ते एप्रिल या काळात राज्यातला प्रत्येक पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफर ही पंढरीची वारी करतोच करतो.त्यातलाच मी देखील गेले तीन ते चार वर्षांपासून नित्य नियमाने भेट देणारा त्यातूनही भिगवणच मोठ आकर्षण म्हणजे गुलाबी पायांचे नितांत सुंदर असे  फ्लेमिंगो पक्षी. त्यामुळेच ह्या वर्षी ठरवल की श्रीरामपूरकराना देखील  भिगवणला पक्षी बघण्यास घेऊन जायच .भिगवण आणि इथल्या परिसरात दरवर्षी हे परदेशी पक्षी लाखो-हजारो मैलांचे अंतर पार करून येऊन पोहोचतात. जानेवारी ते मार्च हा या पक्ष्यांना भेटण्याचा उत्तम काळ.अशी ही सफर करायच्या उद्देशाने आम्ही सकाळी श्रीरामपूर मधून निघालो भिगवण ला जाताना मराठ्यांच्या वाईट इतिहासाचा साक्षीदार असलेला धर्मवीरगड करायचे हे नियोजन होतेच ह्या गडाच्या इतिहासा संदर्भात मी खाली सविस्तर मांडणी केलीच आहे ती जरूर वाचावी .असा हा प्रवास करत आम्ही धर्मवीर गड करून झाल्यावर एक तासातच कुंभारगावला पोहोचलो. हे भिगवणजवळच  एक लहानस खेडेगाव. इथेच उजनी धरणाच विस्तीर्ण पात्र आहे. म्हणजेच पक्षी निरिक्षकांचं पक्षीतीर्थ!  परदेशातून काही काळासाठी स्थलांतर करून थंडीच्या दिवसात आपल्या इकडे राहाणारे स्थलांतरीत म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स पाहण्याचे उत्तम ठिकाण म्हणून भिगवण ओळखलं जात. आता गेली काही वर्ष तर इथे हौशी पक्षीप्रेमींची मांदियाळीच जमते. अगदी पक्षीप्रेमी नसलेलेही इथपर्यंत धरणाच्या पाण्याकाठी वीकेंड साजरा करायला म्हणून येऊन पोहोचतात. दुपारी तीन वाजता आम्ही पोहचल्यावर भिगवण ला यायच आणि मच्छीचा आस्वाद घ्यायचा नाही अस होऊच शकत नाही आणि आम्ही सर्वांनी  अप्रतिम आशा मच्छी थाळीचा आस्वाद घेऊन साडेचार वाजता पक्षी पाहण्यासाठी बोट राईड चालू केली. इथल्या पक्ष्यांची काहीच माहिती नसेल तर तिथे मार्गदर्शक पुस्तकंही विकायला ठेवलेली आहेत. शिवाय गाईडही जलसफारीत सोबत असतोच.या बोटिंगच्याच माध्यमातून पक्षी पाहाण्याची संधी मिळते. धरणात भरपूर प्रकारचं जलचर खाद्य उपलब्ध असल्याने सर्व प्रमुख पक्ष्यांची इथे जत्राच भरलेली असते. इथे अगदी दोन दिवस काढलेत तरी परिसरातले ७० टक्के पक्षी पाहून होतात. ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित), पेटेंड स्टॉर्क, लिटल कॉर्मोरँट, पर्पल स्वँप हेन, रडी शेल डक (चक्रवाक), नॉर्दन शॉवेलर, एशियन ओपनबिल, युरेशियन स्पूनबिल, ब्राऊन हेडेड गल, सीगल, इग्रेट, पाँड हेरॉन, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, सँडपायपर, ओरिएंटल व्हाईट एबिस, स्मॉल पॅटिनकोल आणि इतर असंख्य प्रकारचे या यादीत नसलेले पक्षी या उजनी धरणाच्या पाण्यात विहार करताना पाहाण म्हणजे पक्षीप्रेमींच्या आयुष्यातील सुर्वणक्षणच असा हा भिगवणजवळचा परिसर,  इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.पक्षी पाहण्यासाठी पहाटे सहा वाजता आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळची नावेतली फेरी चुकवू नका.असा हा अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही संध्याकाळी सात वाजता परतीचा प्रवास चालू केला असा हा आनंद ग्रुप मधील सर्वांनी  पहिल्यांदाच घेतला असल्यामुळे सर्वांचा चेहऱ्यावर जो आनंद होता तो बस मध्ये ओसंडून वाहत होता.
















धर्मवीरगड स्थळदर्शन


भिगवण ला जाताना आम्ही धर्मवीरगड ला भेट दिली  ह्या गडाविषयी सांगायच झाल्यास 
महाराजांनी अनेक किल्ले दुरुस्त केले. काही नव्याने बांधले. यांच्याच अंगाखांद्यावर इतिहास लिहिला गेला. म्हणूनच आपल्यासारख्या भटक्यांसाठी ही ठिकाणे म्हणजे संघर्षाची प्रतीकेच म्हटली पाहिजेत. मराठय़ांच्या युद्धाच्या विजयाचे क्षण जसे या गडांनी अनुभवले तसेच काही दु:खद प्रसंगाचा आवेगही यांनी पाहिला. असाच एक दुर्दैवी आणि कठोर प्रसंग एका किल्ल्याने पाहिला. बहादूरगड असे या किल्ल्याचे नाव आणि तो प्रसंग होता स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजेंचा औरंगजेबाने केलेला अनन्वीत छळ!औरंगजेबाने शंभूराजांना संगमेश्वर येथे पकडून याच गडावर आणले. याच ठिकाणी क्रुरकरम्याऔरंग्याने शंभूराजेंचे प्रचंड हाल केले. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली परंतु तरीही शंभूराजेंनी स्वाभिमान सोडला नाही. शिवाजी राजांनी निर्माण केलेले स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेले हे योगदान या बहादूरगडाने अत्यंत जड अंतकरणाने अनुभवले. स्वराज्य धर्माच्या रक्षणासाठी असे योगदान जगात कुठेही आढळणार नाही. राजांच्या याच स्मृती जागविण्यासाठी अनेक शंभूप्रेमी या गडाला ‘धर्मवीरगड’ असेही संबोधतात.बहादूरगड हा भुईकोट प्रकारातील किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पेडगावात भीमा नदीच्या काठावर उभा आहे. गावाच्या नावावरूनच या गडाला ‘पेडगावचा किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याची तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. सध्या या भुईकोटाची अवस्था अत्यंत खराब असून आतील ब-याचशा इमारती पूर्णत: ढासळल्या असून सर्वत्र बाभळीचे रान माजले तटबंदीही ब-याच ठिकाणी पडलेली दिसते. या सर्व पडझडीत एक विशेष गोष्ट दिसते. ती म्हणजे या भकास किल्ल्यात उत्कृष्ट स्थापत्याची सुरेख मंदिरे! इतकी सुंदर आणि उत्कृष्ट मंदिरे अशा भग्न किल्ल्यात पाहणे म्हणजे एक पर्वणीच ठरते. भैरवनाथ, मल्लीकार्जुन, बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे असून या सर्वात लक्ष्मी-नारायण मंदिराची मात्र बात काही औरच आहे.महाराष्ट्रात असलेल्या प्राचीन मंदिरापैकीच एक असणा-या या लक्ष्मीनारायण मंदिराचे कौतुक करायचे झाल्यास एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. हे नितांत सुंदर मंदिर भगवान शंकराच्या बालेश्वर मंदिरासमोरच उभं आहे. सध्या या दोन्ही मंदिरांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने ताबा घेतला आहे. ही निश्चितच सुखावह गोष्ट आहे. या दोन्ही मंदिराजवळच हत्तीच्या दोन मोटी दिसतात.यावर अजूनही पाणी वाहून नेण्यासाठीच्या पाईपची तोंडे दिसतात. या मोटींच्या पलीकडेच औरंगजेबाचा वास्तव्य असलेला इमारतींचा परिसर आपल्याला दिसतो. भली मोठी कमान, मोकळे पटांगण, नंतर दगडी चौथरा व याच्याच मागे दोन मजली वाडा दिसतो. हा वाडा ब-यापैकी शाबूत आहे. संपूर्ण चुन्याचा गिलावा केलेल्या या इमारतीतून भीमा नदीचे पात्र खूपच सुंदर दिसते.जेव्हा शंभूराजे आणि कवी कलश यांना पेडगावात आणले, तेव्हा या दोघांची औरंगजेबाशी भेट याच ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. अत्यंत हालहाल करून शंभूराजेंची कुप्रसिद्ध धिंड काढून रक्ताने माखलेल्या शंभूराजेंना बघून औरंगजेबाच्या आनंदाला पारावार उरला नाही, तेव्हा मंचकावरून उठून त्याने जमिनीवरच नमाज पढला. औरंगजेबाचे हे कृत्य पाहून कवी कलशाने शीघ्र कविता केली. ती कविता अशी होती
,‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’
या कवितेचा अर्थ असा होता की, ‘‘रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते, त्याप्रमाणे संभाजी महाराजांस औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.’’या अशा गंभीर प्रसंगातही कवी कलशाने कविता सादर करून संभाजी राजांचा कणखर व बाणेदारपणा औरंगजेबासमोर दाखविला. या भेटीनंतर औरंगजेबाने शंभूराजेंना आणि कलश यांना तुळापूरला हलवले. या सा-या घटना येथे आठवल्या की अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो. शत्रूच्या तावडीत सापडलेल्या व साक्षात मृत्यूसमोर असतानाही शंभूराजेंचा जाज्वल्य स्वाभिमान, अविचलपणा, संयमीपणा या बहादूरगडाच्या मातीने पाहिला.असो अशा दु:खद आठवणीत बुडालेल्या या गडाच स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात मोलाच आहे. परंतु सध्या गडाची अवस्था तोळामासाचीच आहे. गडाचं प्रवेशद्वार, मंदिर, वाडा अशा काही इमारती सोडल्या तर हा भुईकोट अखेरचीच घटका मोजत उभा आहे. पण तरीही आजही आपण या गडावर आलो की शंभूराजांच्या प्रसंगाची आठवण येऊन मन अगदी गहीवरून येते.शंभूराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या योगदानाचा हा गड साक्षीदार राहिला होता. देशाच्या रक्षणासाठी मराव कस हे या गडाने पाहिल होत. आजही येथल्या मातीला हात लावला तर कदाचित तुम्हा-आम्हाला ती भावना जाणवेल देखील!आपण कित्येक गड-किल्ले पालथे घालत असतो, पण या गडाची मात्र बातच वेगळी आहे. शंभूराजांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची काळी किनार आपल्या मनाला भावुक करीत असते. त्यामुळेच गड पाहून परतताना पावले जड झालेली जाणवत असतात.🙏🙏

सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपू

Tuesday, January 4, 2022

अलंग मदन कुलंग ट्रेक 2022


 AMK ट्रेकAMK ट्रेक (अलंग मदन कूलंग)

1& 2 जानेवारी 2022

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईच्या   रांगेतील साधारणतः  समुद्र सपाटी पासून ४८००फूट.उंच असणारे हे त्रिकुट अजूनही इतिहासातील काही पाने शोधण्याचा प्रतीक्षेत आहे.कधीकाळी वैभवसंपन्न अशा राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले आहेत.गडाचा संपूर्ण इतिहास तस पाहिलं तर आजतागायत कोणाला सांगता येत नसेल तरी   छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्याने कुलंग किल्ला सन १६७२ साली जिंकून घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात. फत्तेलश्कर, , शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, पण इतर तीन तोफांचे काय झाले ते माहीत नाही.शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे.  हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत . किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. मराठी सत्तेचा आत्मा हा गड किल्ले आहे हे ब्रिटिशांनी चांगलेच हेरले होते म्हणूनच  पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी हे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले होते. हरलेले किल्ले मराठी साम्राज्य पुन्हा मिळवते हे ब्रिटिशांना  माहित होते . त्यामुळे गडावर जाणाऱ्या वाटा बिकट करणे , गडावरील पाण्याच्या टाक्यामधील स्रोत विझवणे असे प्रकार ब्रिटिश सत्तेने केले. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था करून ठेवली. अश्या कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग - मदन-कुलंग प्रसिद्ध असण्याचे कारण हे आहे की पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने आपल्या सुरक्षेसाठी वापरावी लागतात.  आपण जेव्हा यु ट्यूब वर AMK ट्रेक चे व्हिडिओ बघतो तेव्हा नक्कीच धडकी भरते . अलंगवर ३० आणि  ७० फुटाचा रॉक पॅच  आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच  आहे . या सोबत गर्द झाडीच्या जंगलातील वाट चुकवणारे रस्ते ही  येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या  बऱ्यापैकी धोकादायक आहेत. एवढंच काय तर अतिशय निसरडी वाट देखील तुमचा अंत पहात असते अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने ,संयमाने आवडीने हा ट्रेक केला तर तुम्ही नक्कीच अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन जाल ह्यात शंका नाही.प्रत्येक ट्रेकर चे एक स्वप्न असते आपण आयुष्यात एकदातरी अलंग मदन कूलांग हे  तीनही कील्यांचे त्रिकुट करावे.आणि जो पर्यंत आपण हे किल्ले सर नाही करू शकत तो पर्यंत आपण मी सह्याद्री फिरलोय अस नाही म्हणू शकत.आपण बऱ्याच ट्रेकर च्या तोंडून ऐकतो माझा AMK झालाय ह्या वाक्यात गर्व जरी असला त्याचा आनंद काय असतो तो ट्रेक पुर्ण झाल्यावरच कळतो.कित्येक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चार वर्ष पूर्वी मला तो माझ्या जुन्या ट्रेक मित्रा सोबत करण्याचा योग आला होता त्यातच आता आमचे ग्रुप मधील सदस्य बऱ्याच दिवसापासून मागे लागले होते AMK ट्रेक करण्यासाठी योगायोगाने नवीन वर्ष पण चालू  होत होते त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत एक अविस्मरणीय ट्रेक नेच चालू करायचे हा एक दृढ निश्चय करून तयारीला लागलो.आणि 1 आणि 2 जानेवारी ही तारीख पक्की केली.परंतु माझे सहकारी उमेश सर आणि चंदन सर याना काही कारणास्तव येता येणार नव्हते त्या मुळे मनात थोडी धाकधूक होतीच करण संपूर्ण जबाबदारी ही साहजिकच  एकट्यावर पडणार होती अ ग्रुप मधील बऱ्याच सदस्यांना AMK ट्रेक किती कठीण आहे हे माहीत नसल्यामुळे तो करण्याअगोदर त्यांची एक zoom meeting घेऊन ह्या ट्रेक विषयी बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला.जस जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तशी सगळ्याची उतकंठा शिगेला पोहोचली होती  आणि तो दिवस ऊजाडला 31 डिसेंबर च्या रात्री आमचा प्रवास सुरु झाला आणि सकाळी चार वाजता आंबेवाडी गावी म्हणजेच AMK चे पायथ्या  ला असलेलं गाव.सकाळी चहा नाश्ता आणि दुपारचे जेवणाची शिदोरी घेऊन  आम्ही सर्व अठरा ट्रेकर अलंग किल्याचा दिशेने निघालो साधारणतः २ तास दाट जंगलातून प्रवास करताना रस्त्यात एक शीळा दिसते त्यावर देवी ची आणि त्रिशूळ च्या आकारात ची मूर्ती कोरलेली आहे.तिथे नारळ फोडून ट्रेक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी देवीला साकड घालून चालते झालो थोडे पुढे आल्यावर कातळात कोरलेल्या काही ठिकाणी पायऱ्या लागल्यावर थोड निश्चिंत झाल्यासारखे वाटले.कारण जंगलातील चढण सुरवातीला चांगलीच दमछाक करणारी होती पायऱ्या चढुन आल्यावर एक छोठी गुहा लागते.आमचा मुक्काम मदन गडावर  असल्यामुळे परत ह्या गुहे पाशी यावे लागणार होते म्हणून बॅगा आम्ही गुहेत ठेऊन अलंग  कडे प्रस्थान केले.  आणि लगेचच एक २५ फुटाचा खडक लागला तो  देखील सर्वांनी दोरीच्या साह्याने पार केला तो पूर्ण करतो ना करतो तोच भला मोठा ७० फुटाचा काळया पाषाणा मधील खडक आ वासून जसे आमची वाट रोखत होता बहुदा ह्या ठिकाणी पायऱ्या आणि दरवाजा असावा त्या सुरुंग लाऊन ब्रिटिशांनी उध्वस्त केल्याच्या खुणा आजही तिथे पाहायला मिळतात.आता ७० फुठी पॅच. चढण्यात शरीराची आणि मनाची कसोटी लागणार होती.आमच्या पैकी बऱ्याच जणांना बिले देऊन मोरे काकांनी वर चढण्यात मदत केली.तिथे छोटीशी गुहा आहे तिथे थोडा आराम करून परत अरुंद पायऱ्याने माथ्यावर पोहचलो. त्या ठिकाणी पूर्वीच्या राजवाड्याचे अवशेष अजूनही पहावयास मिळतात . तिथेच प्रसिद्ध असे १२ पाण्याचे टाके आहे ते पाणी पिण्यास अतिशय सुरेख आहे.आता परत खाली उतरायला तो भला मोठा पॅच रपलिंग करून उतरायचा होता रेपलींग चा तसा ग्रुप मधील बऱ्याच सदस्यांना थोडाफार अनुभव असल्या मुळे सर्व पटकन खाली उतरले. क्लाइंबिंग पेक्षा रपलिंग चा आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता खाली गुहेत आल्यावर सर्वांनीच सोबत आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेऊन लगेचच आम्ही मदनगड कडे कूच केली . अलंग ला वळसा घालून अलंग आणि मदन च्या खिंडीत येऊन पोहचलो तिथून दिसणारा मदन अगदी नावा प्रमाणे रांगडा दिसतो मदन चढताना अगदी एकच माणूस जाऊ शकेल येवढाच रस्ता एकीकडे अंगावर आलेला काळा पाषाण आणि एकीकडे खाली पाहिले तर प्रचंड मोठी दरी अशातच थोड पुढं आल्यावर खूपच अरुंद अंगावर येणाऱ्या पायऱ्या म्हणजे पूर्वीच्या स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमुना च म्हणावे लागेल खरचं त्या अभियंता चे कौतुक कराव तेवढं कमीच असा या पायऱ्या जीव मुठीत धरूनच पार कराव्या लागत होत्या कारण एका बाजूला भला मोठा काळा पाषाण आणि एका बाजूला भली मोठी दरी  पायऱ्या पार केल्यानंतर आता आमच्या प्रवासाला ब्रेक लागला कारण आमच्या अगोदर एक मोठा ग्रुप होता करण पुढे भला मोठा ४० फुटाचा खडक आणि दुसऱ्या साइडला भली मोठी दरी होती त्यामुळे तिथे एकेकट्याने च रोप च्या साहाय्याने चढाई करायची असल्याने वेळ लागत होता त्यामुळं एव्हाना अंधार पडत होता जस जसा रस्ता मोकळा होत होता तस तशी प्रकाशाची जागा आमच्या टॉर्च ने घेतली  तो खडक आम्ही दोरीच्या साह्याने रात्रीच्या काळ्याभोर अंधारात  पार करून गडावर पोहचलो आणि लगेचच आम्ही गुहेत तंबू ठोकून थोडा आराम केला त्या नंतर लगेच आमच्या सोबत आलेल्या आनंदा ने गरमा गरम भात आणि शेवभाजी खाऊ घातली .जेवण वैगरे करून लगेचच आम्ही तंबूत कधी झोपी गेलो कळलेच नाही सर्व दमलेले असल्याने एव्हाना प्रत्येक तंबूतून घोरण्याचा आवाजाची जणू स्पर्धाच चालू होती सकाळी लवकर उठून सर्वांनीच सूर्योदय चा आनंद घेतला मदन वरून दिसणारा अलंग चा अफाट पसारा भंडारदरा धरणाचा जलाशय कळसूबाई शिखर रतनगड आणि कुलग चा कातळ कडा चे सौंदर्य तर अविस्मरणीय दिसत होते.मदन गडचा परिसर तसा थोडाच आहे पाण्याचे टाके आणि गुहा सोडली तर तसे फारसे काही नाही कदाचित पूर्वी ह्या गडाचा उपयोग हा कैद्यांसाठी बंधिखाना असावा. नंतर सह्याद्रि मधील आमचा कायमचा नास्ता म्हणजे चहा पोहे चा आस्वाद घेऊन आता आम्ही कूलंग कडे प्रस्थान करणार होतो तसा कूलंग ला जाणारा रस्ता सोपा पण ३ तास अलंग मदन आणि कूलंग ला वळसा घालून जावे लागणार होते मदन आणि कूळंग च्या घळाई मध्ये आल्यावर उतारावर प्रचंड अशी मातीची घासरण होती ती कशी बशी आम्ही पार करून  थोडी पायपीट करून कूलंग च्या पायऱ्या जवळआलो ह्या पायऱ्या तशा सोईच्या होत्या त्यामुळे कुलंग चढताना फारशी कसरत नाही करावी लागली.मदन गडाच्या मानाने अलंग सारखाच कुलंग चा पसारा देखील अफाट कुलंग करून आम्ही लगेचच आम्ही इकडूनच आंबेवाडी मध्ये उतरणार होतो हा रस्ता तसा खूपच निसरडा आणि जंगलातील असल्यामुळे इथे चुकण्याची दाट शक्यता असते.आम्ही आंबेवाडी पोहचे पर्यंत सायंकाळचे 6 वाजले .तिथून मागे वळून पाहिल्यावर भला मोठा दिसणारा AMK पाहून तर  सर्वांच्या चेहऱ्यावर आपण Amk सुखरूप केल्याचा आनंद गगनात मावत नव्हता .वाडीत आल्यावर लगेच आमच्या मोरे काकांनी बनवलेला सुरेख चिकन चा आस्वाद घेऊन आणि ह्या दोन दिवसांच्या अविस्मरणीय सर्व आठवणी घेऊन मार्गस्थ झालो.ह्या ट्रेक च वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला कायम ज्यांच्या पासून प्रेरणा मिळते असे साठी पार केलेले कोहली बंधूनी देखील अतिशय तरुणांना देखील लाजवेल असा उत्तम रित्या पार केला त्या बद्दल त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असा हा ट्रेक सर्वांनीच एकमेकांना मदत करत जी साथ देऊन सुखरूप पूर्ण केला  त्या बद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद 🙏🙏🚩

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स, श्रीरामपूर






























































देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...