Thursday, June 25, 2026

देवभूमी यात्रा

 


​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!*

दिनांक 09 जून ते 19 जून 2026

​‘मनात भक्ती, अंगात शक्ती आणि सोबतीला निसर्गाची अद्भूत जादू!’

​अशाच एका असीम उत्साहाने आम्ही श्रीरामपूरहून निघालो आणि आमचे पहिले पाऊल पडले ते थेट गंगामाईच्या पवित्र कुशीत, म्हणजेच हरिद्वार येथे! रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून दूर, हिमालयाच्या कुशीत हरवून जाण्यासाठी आमची पावले आतूर झाली होती. हरिद्वारच्या सायंकाळच्या गंगा आरतीने मनाला एक वेगळीच शांतता दिली आणि इथूनच आमच्या खऱ्या अर्थाने ९ दिवसांच्या अलौकिक आणि सुखरूप यात्रा सहलीची मंगलमय सुरुवात झाली.

​ १. केदारनाथ: शिवाच्या चरणी लीन...

​हरिद्वारहून आमचा प्रवास सकाळी च चालू झाला आणि सोबतीला वरून राजा चे देखील आगमन सुरु झाले दिवसभर चा तो प्रवास ट्राफिक जाम ची समस्या या सर्व गोष्टी ला तोंड देत रात्री आम्ही गुप्त काशी येथे मुक्कामी आलो आणि भल्या पहाटे केदारनाथ च्या उत्तुंग शिखरावर आमचे पावले  थेट **‘बाबा केदारनाथा’**च्या दर्शनासाठी. उंचच उंच बर्फाच्छादित शिखरे, दऱ्यांमधून खळाळत वाहणारी मंदाकिनी नदी आणि अंगाला झोंबणारा गारवा... हा रस्ता न संपणारा जितका खडतर होता, तितकाच तो मनाला भुरळ घालणारा होता.​“जय बाबा केदार!” या मंत्रोच्चारात कधी आणि कसे केदारनाथ गाठले, हे समजलेच नाही.

​त्या अथांग हिमालयाच्या कुशीत वसलेले, भव्य दिव्य केदारनाथ मंदिर डोळ्यांसमोर आले आणि प्रवासाचा सगळा शीण एका सेकंदात विरघळून गेला. बाबांच्या पिंडीचे दर्शन आणि तो अद्भूत परिसर... जणू पृथ्वीवरच स्वर्ग अवतरल्याचा भास होत होता. तिथे मुक्काम करून सकाळी पुन्हा बाबा चे दर्शन घेऊन आमचा प्रवास चालू झाला तो सारी या गावी सारी गाव म्हणजे जेथून उत्तराखंड च्या जवळपास सर्व ट्रेक ची सुरवात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा तुंगनाथ कडे प्रस्थान 

​ २. तुंगनाथ: जगातील सर्वोच्च शिवमंदिर!

​केदारनाथाच्या आशिर्वादाने ऊर्जेने भरलेल्या आमच्या पावलांनी पुढचा मार्ग धरला तो तुंगनाथकडे. जगातील सर्वात उंचावर असलेले हे शिवमंदिर!

इथला रस्ता म्हणजे निसर्गाचे एक अनोखे रूप होते. जसेजसे आम्ही उंचावर जात होतो, तसतसे ढग आमच्याशी लपाछपी खेळत होते. हवेतील ऑक्सिजन कमी होत होता, पण आमचा उत्साह वाढत होता. तुंगनाथला पोहोचल्यावर निसर्गाचे जे विहंगम दृश्य दिसले, ते शब्दात मांडणे कठीण आहे. जणू आम्ही ढगांच्या वर उभे राहून महादेवाच्या चरणी नतमस्तक होत होतो.

​🛕 ३. बद्रीनाथ: वैकुंठाचा भूलोकीचा अनुभव!

​यानंतर आमची पावले वळाली ती अलकनंदा नदीच्या तीरावर वसलेल्या बद्रीनाथ धामाकडे. नर आणि नारायण पर्वतांच्या मधोमध विराजमान असलेले भगवान बद्रीविशालचे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा आणि भक्तीचा अजोड संगम! बद्रीनाथाच्या मूर्तीचे तेजस्वी रूप डोळ्यात साठवून घेताना मनाला एका अनामिक तृप्तीचा लाभ झाला. तेथून 03 किमी असेलेलं भारताचे पहिले गाव माना जिथे सरस्वती चे उगम स्थान आणि येथून च पांडव स्वर्गात गेल्याची अख्यायिका आहे.९ दिवसांची ही दुर्गम यात्रा कोणत्याही विघ्नाविना, अत्यंत सुखरूप आणि आनंदाने पार पडली, यातच बाबांची मोठी कृपा होती.

​४. ऋषिकेश: रोमहर्षक साहस आणि गंगेचा किनारा

​यात्रा तर पूर्ण झाली होती, पण प्रवासाचा खरा 'थ्रिलर' क्लायमॅक्स अजून बाकी होता! परतीच्या प्रवासात आम्ही विसावलो ते ऋषिकेशमध्ये. इथे भक्ती रसासोबतच आम्ही साहसाचा अंगावर काटा आणणारा थरार अनुभवला.

​रिव्हर राफ्टिंग (River Rafting): गंगेच्या पांढऱ्याशुभ्र, खळाळणाऱ्या लाटांवरून जेव्हा आमची बोट हेलकावे खात पुढे जात होती, तेव्हा हृदयाचे ठोके चुकले होते. 'रॅपिड्स'चा सामना करताना झालेली पानावरील घबराट आणि त्यानंतर मिळालेला आनंद अवर्णनीय होता.

​बंजी जंपिंग (Bungee Jumping): एका उंच कड्यावरून थेट दरीच्या दिशेने स्वतःला झोकून देणे... हा अनुभव म्हणजे भीतीवर मिळवलेला विजय होता! हवेत मुक्तपणे तरंगताना निसर्गाचे विराट रूप डोळ्यांत साठवणे आणि तो थरार... आयुष्यात कधीही न विसरता येणारा क्षण ठरला.

​श्रीरामपूर ते उत्तराखंड... हा केवळ एक प्रवास नव्हता, तर ते निसर्गाचे, भक्तीचे आणि साहसाचे एक अनुपम पर्व होते. हिमालयाच्या कुशीत मिळालेली मानसिक शांतता आणि ऋषिकेशमध्ये मिळालेला थरार, या दोन्ही आठवणी आमच्या मनात आयुष्यभरासाठी सुवर्ण अक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत.

​निसर्गाची ही रूपे, महादेवाचा तो आशिर्वाद आणि सुखरूप पार पडलेली ही अविस्मरणीय सफर... देवभूमी, तुझी आठवण नेहमीच येत राहील! 🙏









Wednesday, January 22, 2025

एक थरारक अनुभव

 



भैरवगड (मोरोशी )

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग

डोंगररांग: माळशेज

जिल्हा : ठाणे

श्रेणी : अत्यंत कठीण 

          " सह्याद्री" हे नावं ऐकल्यावर डोळ्यासमोर उभे ठाकतात प्रचंड बेलाग कडे ,डोंगरवाटा , अफाट असे दुर्गम किल्ले व निसर्गाची कलाकुसर . या सह्याद्रीने त्याच्या पोटात अजाण काळातल्या इतिहासाच्या पाऊलखुणा ,जैवविविधता अजूनही राखून ठेवल्या आहेत . .अशी हि निसर्गसंपत्ती टिकवण्यासाठी मोठमोठे डोंगर ,दऱ्या ,नदीनाले याची शृंखला या सह्यगिरीने उभारली आहे . सह्याद्रीला जवळून ओळखायचे असेल तर त्याच्या अंगा खांद्यावर भटकायला लागतं मित्रा !!!! 

अश्या भन्नाट रानवाटा तुडवण्यासाठी " सह्याद्री पारिवार " या संस्थेने बऱ्याच भटक्यांना गेली चार वर्षात सह्याद्री मध्ये खूप भटकायला भाग पाडलं . त्यात कित्येक साहसी मोहिमा देखील सुरक्षित पार पडल्या.

गेल्या काही वर्षापासून माझी सरत्या वर्षाला निरोप देताना कुणी सोबत असो वा नसो एखाद्या दुर्लक्षित भन्नाट ट्रेक ने वर्षाची सांगता होत असते तशीच सांगता या 31 डिसेंबर ला दुर्गम अशा औंढा किल्यानी झाली तसेच नवीन वर्षाची सुरवात सुद्धा आमच्या परिवाराची सह्याद्री मधील अतिशय खडतर कठीण श्रेणी तील ट्रेक ने होत असते या आधी देखील परिवाराने अलंग मदन कुलंग दोनदा लिंगाणा एकदा सर्व सदस्यांनी सुरक्षित आणि यशस्वी करून दाखवला.परिवाराची या वर्ष्याची भटकंतीची सुरुवात मोरोशी चे भैरवगड ने करायचे हे आधीच ठरवले होते भैरवगड या आधी केलेला असल्या मुळे त्याची दाहकता किती आहे हे माहित होतेच अहो हा किल्ला कुठला ही तर् सरळ अंगावर येईल अशी भली मोठी भिंत.

नवीन वर्षाची सुरवात आपण भैरवगड ने करतोय असा msg जेव्हा ग्रुप वर टाकला त्या नंतर " मनाने "केव्हाच माळशेज भैरवगड च्या जंगलात भटकायला सुरुवात केली . 

सुरवातीला काही मोजकेच आम्ही 28 मंडळी तयार झालो पण जसं जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तसे आमचा एक एक मावला गळत होता. आणि शेवटी 12 धाडसी मावळ्यांना घेऊन आम्ही भैरवगड कडे कूच केली.हजार फुट लांब, काही हजार फूट रुंद, डीद दोन हजार फूट उंच दिसणार एक लोभसवाणा डोंगर!!!! आजूबाजूला सरळसोट कडे, डोकावलं कि चक्करयावी इतकी खोली, सकाळी ११ वाजताही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगराचा शेजार!!त्यच्या एका बाजूला सरालकोट भिंत आणि दुसर्या बाजूला कोरलेली वेडी वाकडी कातळ 

- - - भैरवगड या वर्णनापेक्षाहीं अधिक काहीतरी!!!!!!!

सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे "डाईक"; ही रचना आपल्याला भैरवगडावरती पहायला मिळते. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्टप्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. भैरवगडचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डाईकवर (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंतीवर) बनवलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पहातांना आपण थक्क होऊन जातो.

माळशेज घाटाच्या अलिकडे मुख्य डोंगररांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर भैरवगड किल्ला आहे. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाच्या पायथ्याशी मोरोशी गाव आहे. या गावाच्या मागे भैरवगड किल्ला आहे. किल्ल्याची रचना पहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. पायर्‍या उध्वस्त केलेल्या आहेत. या ठिकाणी दोर लाऊनच वर चढावे लागते.हा साधारणत: १५० फूटाचा भाग (पॅच) पार केल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांच्या एका बाजूला कातळकडा व दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे तसेच पायर्‍यांवर मुरूमाची माती साठलेली असल्यामुळे जपूनच जावे लागते.पायर्‍या संपल्यावर आपण एका छोट्या उंचवट्यावर पोहोचतो. येथे उजव्या बाजूला कड्याला लागून एक सुकलेल टाक आहे. ते पाहून डाव्या बाजूच्या वाटेने वर चढायला लागावे ,वाटेत अजून एक कोरडे पडलेले पाण्याचं टाकं लागत. या टाक्याच्या पुढे वाट निवडूंगाच्या जाळीतून गडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचते. गडमाथा अरूंद असून पूर्व - पश्चिम पसरलेला आहे. गडमाथ्यावर कोणतेही अवशेष नाहीत. गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक ते पूर्वेला हरीश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो.

पहाटे साधारण 3 च्या दरम्यान आम्ही मोरोशीच्या रस्त्याच्या लगतच्या हॉटेल उतरलो. सुनसान रस्ता उगवतीकडे काळोखात अस्पट दिसणारी भैरवगाडाची रांग.पहाटे सकाळी आम्हाला 5 वाजता निघायचे होते त्या मुळे सर्वांनी च थोडीफार वामकुक्षी घेतली पन ट्रेक म्हटलं तर् आपल्याला झोप कुठली जो पर्यंत सुखरूप ट्रेक करून गाडीत बसत नाही तो पर्यंत झोप हि माहित च नाही. सर्व जण आवरता आणि आमचे सुरक्षित तेचे साहित्य पाठीवर लटकावून ट्रेक ल निघायला आम्ही 06 वाजता भैरवगडाच्या दिशेन वाटचाल सुरु केली, गणपती बाप्पा मोरया आणि जय शिवाजी बोलून, भैरवगडच्या खिंडीत पोहचायला किमान 2 तास नुसताच चालायचं होत, चालत चालत थोडे फार फोटो काढले, आणि तसाही फोटो काढून घेतले नाय तर आठवणी कशा राहतील असो, चालता चालता जो भेटेल त्यांच्याशी गप्पा टप्पा मारत नव नवीन मित्र बनवत आम्ही रस्ता काटत होतो , हळू हळू आकाश उजळायला लागल आणि अचानक भयानक असा सुसाट्याच्या वाऱ्याचा तिथे वावर सुरु झाला पुढे जाणे तर् सोडा एका जागेवर सुद्धा तो उभे राहू देत नव्हता म्हणून आम्ही थोडावेळ तिथेच जागेवर बसून घेतले कारण शेजारी भली मोठी दरी तिथे बसल्या बसल्या सगळा परीसर आम्ही बघून घेतला, ती जागा निसंशय सुंदर होती, आमच्या समोरच भैरवगडाची उभी कातळ होती आणि हळूच त्यातून सूर्य बाहेर येण्यासाठी सज्ज होत होता. आजूबाजूला नुसती डोंगर रांग होती, ब्रेक संपला आणि सगळे निघालो.

गडाचा रस्ता काही काही ठिकाणी कठीण होत होता तस तसा तो आम्हाला गडावर नेत होता .एका काहीसा रॉक पॅच वर सुसाटच्या वाऱ्या मुळे अक्षराशः आम्ही हात पाय दोन्ही टेकवत वर चढलो तिथं विश्रांती जास्तीत जास्त ५- ७ min घेऊन परत वर जायला निघालो ते थेट थांबलो ते भैरव गडाच्या भिंतीच्या पायथ्याशीच.

इथून गडाचा माथा पाहताना डोक्यावरील टोपी पडेल असा तो सरळ वर दिसत होता तिथपर्यंत जायला आता आम्ही रोप आणि उध्वस्त पायऱ्यानचा आधार घेत भैरावगाडाचा माथाच गाठला. गडाच्या माथ्यावर अस्ताव्यस्त पसरलेलं निवडूग त्याचे तोचणारे काटे टाळत प्रसंगी रांगत, घसरत चढून सगळे उपद्व्याप करून जेव्हा गडावर पोचलो तेव्हा आमच्या स्वागतासाठी आजूबाजूचा नितांत पसरलेला सुंदर नजारा अफाट पसरलेला पारिसर व्यक्तकरण्या पलीकडे दिसत होता. गडावर बाकी काही नाही, दरवाजा नाही, निवासी बांधकाम नाही, तटबंधी नाही. तिथून आम्ही अर्ध्या तासातच परत फिरलो कारण उन्हान आणि वेळेत पोहचण्याच्या उद्देशाने सगळे पाळायचं बघत होते. मानात विचार आला, आता उतरताना तरं आणखी अवघड प्रकार असणार कारण कडा, कातळ, घळी, खाई सगळ डोळ्या समोर असणार. पायऱ्या वर उतरणाऱ्यांची गर्दी असल्यामुळे थोडे फार बसत उठत आम्ही rappeling चे पॅच पाशी आलो. आमच्या पैकी जवळपास सर्वांनाच rappeling च अनुभव असल्यामुळे पटापट सर्व खिंडीत पोहचलो.तिथे थोडंफार थांबून energy drink घेऊन गड उतार करू लागलो जसं जसे पुढे जात होतो तस तसे हळू हळू भैरवगड मागे पडत होता. आता सर्वांच्या पोटात कावळे कोकायला लागले होते आमच्याकडे non veg प्रेमी जास्त असल्यामुळे सर्वांनी non veg ची फर्माईश केली आता समोर खालच्या दिशेने जाणारी वाट दिसत होती. परिसस्तिती अवघड वैगेरे अजिबात नव्हती.त्यातच रस्त्यात एक अतिशय दुर्दैवी घटना नजरेश पडली माझ्या आज पर्यंत च आयुष्यात कधीच अशी घटना मी बघितली नाही ती म्हणजे एका दुसऱ्या ग्रुप च माणूस बेशुद्ध अवस्थेत दिसला बेशुद्ध कसला अहो त्याचा त्या ठिकाणी पूर्ण श्वास च बंद झालेला होता ग्रुप लीडर किती महत्वाचा असतो हे ते त्या ठिकाणी कळले त्यांचे ग्रुप लीडर म्हणजे अर्ध्या हळकुंडणे पिवळे झालेले नवशिखे ट्रेकर त्यांच्या कडून माहिती घेता कळले त्याला अर्धा तास झाला ते असं पडले त्यांनी त्याला cpr दिला असे सांगण्यात आले आता त्यांनी तो कसा दिला असेल हे सांगणे म्हणजे अवघड च मी त्याचे pulse चेक केले ते कुठेच लागत नव्हते त्यांच्या लीडर कडून तो इसम बेशुद्ध पडण्या अगोदर जे symptoms सांगितले त्या वरून त्याला हार्ट अटॅक आलेला असावा तेव्हड्यात आमच्या मागून आमचा गाईड दीपक विशे आला हा माणूस म्हणजे या भागातील देवदूत या भागातील जेवढे rescue होतात ते या पठ्याकडून च शेवटी आम्ही rope च streture तयार करून खाली घेऊन नेण्याचा निर्णय घेतला तो पर्यंत आम्ही ऍम्ब्युलन्स ल फोन करून पायथ्याला बोलावून घेतली.एव्हाना आमची काही मंडळी हि खाली पोहचली होती आम्ही देखिल त्यांच्या मागून पायथ्याला पोहचलो आणि जेवणाचा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

या ट्रेक मुळे भरपूर काही शिकायला मिळाले.मोरोशीचा भैरवगड हा एक अत्यंत कठीण श्रेणीतील ट्रेक असून यात ट्रेक बरोबर गिर्यारोहण ही करावं लागतं. सहसा कोणीही एका-दोघांनी, गिर्यारोहणाच्या साहित्या शिवाय प्रयत्नही करू नये असाच. पण एखाद्या अनुभवी ग्रुप बरोबर एकदा तरी भेट द्यावी असा सह्याद्रीचा एक रांगडा गडी आहे.

या मोहिमेत सहभागी झालेले श्रीकांत, अभिमन्यु जी ,निर्मळ सर, भूषण, साजेब,मखेजा, सागर, केशव,गुलाटी जी, बत्रा जी,शिवाजी सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन🙏


*सचिन भांड*

*सह्याद्री ट्रेकर्स परिवार, श्रीरामपूर*

Wednesday, August 7, 2024

भन्नाट पावसाळी सफर

 भन्नाट पावसाळी सफर



पेब किल्ला उर्फ विकटगड ट्रेक

दि.04 ऑगस्ट 2024

निसर्गात जायचे तर निसर्गाशी एकरूप होऊन,तेव्हा तिथल्या हिरवाईचा खरा अर्थ उमगतो.आपल्या दैनंदिन जीवनात तर रोजच गाड्यांचे आणि गाण्यांचे आवाज ऐकायला मिळतात,

निसर्गातले विविध आवाज तर ऐकुन बघा! तिथली पाने, फुले,गवत, दव नी आकाशात हरवून तर बघा... हाच विचार घेऊन दर्दी भटके गर्दीपासून दूर एकांतातल्या निसर्गरम्य ठिकाणांना भेट देऊन आपले निवांत क्षण सत्कारणी लावताना दिसतात.

आम्ही मात्र ठिकाणच असे निवडले की,जिथे वर्षभर रंगीबेरंगी पर्यटकांचा राबता असतो...ते म्हणजे  माथेरान चे कुशीतील.किल्ले 'पेब' उर्फ 'विकटगड' 

खरेतर हा ट्रेक काही वर्षांपूर्वी च दोनही मार्गाने मी पूर्ण केलेला होता. मागील महिन्यात अचानक माझा सह्याद्री मित्र रोशन शी या ट्रेक विषयी बोलताना या आठवणी जाग्या झाल्या, आणि तसेही मला बऱ्याच दिवसांचे पावसाळी भटकंती चे वेध हे लागलेले च होते पण जुलै मध्ये पंढरपूर सायकल वारी असल्या कारणाने  मला ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार होती.म्हणून एक दिवसाचा ट्रेक ही तेवढाच हटके हवा, म्हणून मग ‘पेब’ किल्ला च करायचा ठरवले आणि त्याचे संपूर्ण नियोजन अखून आमचे  ट्रेक मित्र चंदन सर यांच्या शी चर्चा करून तयारी चालू केली.आणि बघता बघता आमच्या सह्याद्री वेड्यांची संख्या कधी चाळीशी पार झाली कळेलच नाही या वरून आपण निवडलेला ट्रेक हा भन्नाट च होणार याचे थोडक्यात संकेत मिळाले.

आजवर अनेकांनी माथेरान गाठले ते सहल म्हणूनच! यंदा आमचा मनसुबा काही साधासरळ नव्हता. पायथ्याच्या नेरळ गावातून माथेरान ची toy train चा route गाठायचा. इथला पाऊस थंडी लोकप्रिय आहेच, इथले अनेक झरे ओलांडायचे. अनेक ओहळींची खळखळ ऐकायची,जमेल तितक्या धबधब्यांमध्ये भिजायचे. एकीकडे लोक पावसाळी पर्यटनाला जातात,आपण पावसाळी भटकंती अशा आडवाटेने साजरी करायची...

'पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्र्यांप्रमाणे आपलेही पर्यटन कलंकीत, तकलादू असू नये' याची ट्रेकर मंडळी कसोशिने काळजी घेत असतात. खरे तर त्यांना पाऊसच काय,कुठल्याही ऋतुत डोंगर, जंगल, गड-किल्ल्यांच्या सफरींचा आनंद घेता येतो, मग ते भाजून काढणारे उन असो की, गारठवून टाकणारी थंडी, की पाऊस. अर्थात पावसाळ्यात डोंगरकडे निसरडे बनतात, अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरून वाहतात, तेव्हा ट्रेकर्सच्या पावसाळी मोहिमी जरा मोजून मापूनच होतात आम्हीही तेच केले.पेब किल्यावर जाणारी पावसाळ्यातील अतिशय निसरडी वाट म्हणजे आनंदवाडी गावातून पण त्या वाटेवरून न जाता मी माथेरान च्या मार्गाने  पावसाळी भटकंती मोहिम अखली होती. तसं डोंगररांगांचे निरलस निसर्ग सौंदर्य साठविण्यासाठी अनेकांची पावले येथे वळतात, परंतू पर्यटकांचे मोठे ओझे सहन करणाऱ्या माथेरानची आडवाटेची चढाई म्हणजे एक वेगळा अनूभव नक्कीच ठरणार होती.


शनिवार ०३ ऑगस्ट:

रात्री १०-००च्या सुमारास थत्ते मैदात येथे आमचा ५० सह्याद्री भटक्यांचा  चमु नेरळ चे दिशेने निघाला. सगळीकडे पाऊस च पाऊस पण आमच्या नगरी भागातील नेहमी प्रमाणे पावसाचा आरंभ कुर्मगतीचाच. आकाशात ढग तर आहेत, पण ते पावसाचे नाहीतच माळशेज येईपर्यंत वेगवेगळ्या बाकांच्या गप्पा टप्पांचे पावसांच्या अलगत सरींच्या सोबत वेगवेगळे विषय रंगात येऊ लागले होते.त्यात च भर म्हणजे आपल्याकडे गेल्या काही पिढ्यांनी पाऊस आणि चहा हे नातं जपलं आहे, तेव्हा

आम्हालाही ते थोडच चुकतं?आता हि ट्रेकर मंडळी भारी चुझी असतात, चहा कसाही चालेल, ठिकाण हक्काचं हवं. आणि आळेफाटा पार करताच  काही वेळातच आम्हाला आमच्या गप्पा थांबवाव्या लागल्या. त्या थांबवाव्याच लागणार होत्या. अहो! आम्ही महाराष्ट्राचे पावसाळ्यातील भयानक समजला जाणार घाट म्हणजे माळशेज घाटात दाखल होत होतो. इथे पाऊस तुमच्या स्वागताला नेहमीच तयार असतो आणि त्याला जोड म्हणजे इथले ढग नी धुके येथे भेटतातच. धुक्याचे तर माळशेज वर अलोट प्रेम, तेव्हा इथल्या धुक्यातून समोर काहीच दिसत नसताना वरून पावसाळी धबधब्यांचे लोट सहन करत आमच्या भल्या मोठ्या गाडीने आणि सर्वात महत्वाचे ड्रायव्हर चे त्या धुक्यातून मार्ग काढन्याच्या कले  मुळे आम्ही सुखरूप तो घाट पूर्ण केला आता नेरळ पर्यंत तो आपल्याला जन्मोजन्मीचे भिजवून सोडणार', अशा रम्य कल्पना रंगवत आमच्या गाडीने रविवार सकाळी ०६ वाजता नेरळ गाठले.


रविवार ०४ ऑगस्ट

सकाळी ०६ वाजता आम्ही नेरळ ल पोहचलो आणि  नेहमीच आम्हा भटक्यांना हवाहवासा वाटणाऱ्या पावसाने आमचे जोरदार स्वागत गेले मनात विचार आला हा जर दिवसभर असाच बरसत राहिला आणि पूर्ण धुक्यानी गडावर जर चादर पांघरलेली असेल तर एका मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार होते परंतु त्याने नाराज न करता थोड्याच वेळात उसंत घेतली आणि आम्ही गरमागरम उपमा,इडली,मिसळपाव याचा आस्वाद घेऊन लोकल  टॅक्सी ने माथेरान चां रस्ता धरला आणि आम्ही NM 134 दस्तुरी नाका इथे पोहचलो इथून च आमचा ट्रेक चालू होणार होता 

इथे आल्यावर नक्कीच जाणवते की रम्य... सुंदर...शांत: काही झाडावर हिरवे मखमली शेवाळ, तर काहींवर पाने, वेली, फांद्यासकट परजिवी झाडे उगवलेली...एकमेकांच्या आधाराने बहरलेले हे जिवन माणसाला काही बोध देऊ शकते का? 'माझ्या जागेत याने अतिक्रमण केले आणि त्याच्या जागेत मी घुसखोरी केली', असे दैनंदिन जिवनात माणसामाणसातले वाद विकोपाला जातात तेव्हा, परस्पर सहकार्याने केवढे शांततामय नी सुंदर जगता येऊ शकते, यांच्याकडून हा धडा घेता आला तर?या विचारांचे चक्र डोक्यात चालता चालता निसर्गाचे अमिट रूप डोळ्यात साठवत त्या toy ट्रेन चे मार्गावर चालताना पुनः एकदा दूधसागर ट्रेक ची आठवण झाली.पूर्ण रस्त्यावर विलोभनीय धबधब्यांच्या साखळी न्याहरत आम्ही उजव्या हाताला असलेल्या  कमानी  पाशी आलो  इथून पुढे खर तर आमच्या ट्रेक चा कस लागणार होता  पुढे खाली उतरत डाव्या हाताला पाषाणात कोरलेली ५२ फूट मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत होती या मूर्तीचे वैशष्ट्य म्हणजे इथलेच एक गणेश भक्त राजाराम खडे यांच्या संकलपणेतून हि मूर्ती साकार झाली आहे.गणपतीचे दर्शन घेऊन मी लगेच पुढे गेलो कारण पुढचा टप्पा हा पूर्णपणे निसरडा आणि एका बाजूला भली मोठी दरी होती त्या मुळे पूर्व अनुभवानुसार इथे रोप लावा लागणार होता म्हणून तो सोबत च ठेवला तसेही कुठला ट्रेक असूद्या कुठल्याही आपत्ती ल तोंड देण्यासाठी लागणारे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व साहित्य माझ्या पाठीवरील पोटलित समाविष्ट असतेच.

त्यातही पावसाळ्यात या भागातील चंदेरी, पेब, कलावंतिण, प्रबळगड आदी परिसर भटकंतीकरिता नेहमीच आव्हानात्कक. त्यातही डोंगरात चालण्याचा अनूभव, योग्य नेतृत्वाचा अभाव असेल तर मोठी आपत्ती ओढवू शकते.आणि अनुभव किती मोलाचा असतो यालाच अधोरेखित करणारी घटना आमच्या बाबतीत देखील झाली त्या निसरड्या वाटेवरून आमच्याच सौ.पाय घासरून पडल्या केवळ दैव बलवत्तर म्हणून रोप ल तिने घट्ट धरून ठेवल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि केवळ डोळ्याजवळील जखमेवर ते निभावले परंतु आता पुढचा सगळा ट्रेक तिच्या सोबत थांबावे लागणार होते त्या मुळे बाकीच्यांच्या कडे लक्ष देता नाही आले परंतु आमचे सहकारी चंदनसर ,श्रीकांत,उमेश,महावीर,ऋषी,सचिन,कृष्णा,पूजा या सर्वांनी परिस्थितीची जाणीव ठेवून सर्वांचा ट्रेक सुखरूप पूर्ण करून घेतला.पुढील तीनही शिड्या चढून आम्ही सर्व प्रती गिरनार समजल्या जाणाऱ्या उंच टेकडीवरील महादेव मंदिर पाशी पोहचलो. वातावरण आता बऱ्यापैकी स्वच्छ झाले होते त्या मुळे तिथून  गाढेस्वर तलाव,उल्हास नदी तसेच कलावंतीण,प्रबळगड,चंदेरी किल्ले स्पष्ट दिसत होते या किल्ल्याला पूर्वी सात बुरुज होते त्याचे आता फक्त थोडेच अवशेष शिल्लक आहे या किल्ल्याचा इतिहास बघता गडाच्या पायथ्याला असलेल्या पेबी देवी वरून किल्ल्याला पेब नाव पडले असावे तसेच ह्या किल्ल्याचा उपयोग धान्यसाठा ठेवण्यासाठी आणि इथून दिसणाऱ्या वरील किल्यावर नजर ठेवण्यासाठी केलेला असावा असा इतिहास कार सांगतात तसेच  कल्याण बंदरावरून महाराजांनी जो खजिना लुटून आणला होता तो इथेच ठेवण्यात आला असावा असा देखील उल्लेख आढळतो.

गडावर सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि एक छानसा ग्रूप फोटो काढला आमच्या मधील छोटा रुद्र च्या गारद नंतर गड उतार करण्यास सुरवात केली खाली पायथ्याला नेरळ गावी पोहचल्यावर सर्वांनी रुचकर अशा जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही सायंकाळी ०६ वाजता या सुंदर आठवणी सोबत घेऊन परतीच्या प्रवसला लागलो.














गेल्या दहा-पंधरा वर्षात महाराष्ट्रात पावसाळी पर्यटनाचे पेव फुटले आहे, तशा गर्दीची बाधा नसलेल्या वाटेवरची ही भटकंती मनोमन सुखावणारी ठरली. अन्यथा सह्याद्रीत अनेक धबधबे आणि डोंगरकडे लोकांच्या गर्दीने फुलू लागलेत. त्याठिकाणी काय बघायला मिळते, हुल्लडबाजी, नाचगाणे, प्रसंगी दारूकाम, प्लास्टिकचा कचरा. अशा गडबडबाज पर्यटकांच्या आवाजांमुळे निसर्गाची शांतता कुठेच शिल्लक राहत नाही. इतका गडबड गांधळ बघुन कुणाला अशा निसर्गात रमायला आवडेल? माथेरानच्या या कुशीत माथेरान च्या रस्त्यावर थोडाकाळ हाही अनूभव आला, पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे याचे खरा निसर्गी प्रेमी असलेल्या भटक्यांना नेहमीच  पावलोपावली जाणवते.

सचिन भांड पाटील

सह्याद्री ट्रेकर्स परिवार


Wednesday, October 4, 2023

गणपती गडद वॉटरफॉल रॅपलिंग ट्रेक

 गणपती गडद ट्रेक

दि.०१ ऑक्टोबर २०२३

गणपती गडद 



   ह्या पावसाळी भटकंती चे माझे नियोजन हे आधीच पक्के होते त्या दृष्टीने असे काही ठिकाण निवडले होते जे या सोशल मीडिया आणि पावसाळी गर्दी पासून दूर असेल जिथे फक्त न फक्त निसर्ग अन आपण असू अशाच ठिकाणी भेट देयची त्या दृष्टीने च आत्तापर्यंत चे ह्या पावसाळी भटकंती चे आमचे नियोजन हे अगदी उत्तम रीत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित पार पाडले.यातील  काही  ठिकाणे तर अशी होती ती अगदी या सोशल मीडिया पासून दुर्लक्षित त्या मुळेच कदाचित जेव्हा आम्ही हे ट्रेक करून यायचो तेव्हा लोक विचारायचे कुठे आहे हा spot त्याचा प्रत्यय प्रत्येकाला आलाच असेल.त्या मधील च आमचा पुढचा ट्रेक adventure मध्ये मोडणारा होता शितकडा waterfall rappling चा हा ट्रेक रेग्युलर ट्रेक सारखा नसल्यामुळे काही कारणास्तव तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे मी ते ठिकाण बदलुन.पुढचा adventure ट्रेक निवडला तो म्हणजे गणपती गडद waterfall rappeling चा.

आता हे गडद म्हणजे नेमकी काय तर डोंगरात कोरलेली लेणी अथवा गुहा. गणपती गडदला जायचं झाल्यास प्रवास मोठा आहे पण हा ट्रेक वसूल आहे. गणपती गडदचा प्रवास म्हणजे  आळेफाटा माळशेज,आणि ह्या घाटावर आणि नाणेघाट वर नजर ठेवण्यासाठी असलेला मोरोशी चा भैरवगड आणि मग गणपती गडद हे गाव म्हणजे पायथ्याशी असलेलं सोनावळे. सोनावळे गावात प्रवेश केल्यावरच डाव्या हाताला डोंगरात कोरलेली लेणी दिसते तेच गणपती गडद.

तसेच या गावाला खेटून च पळु हे गाव लागते गावाबद्दल असे सांगितले जाते. या गावात मोरे आडनावाची माणस मोठ्या प्रमाणात राहातात. हे सर्व जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांचे वंशज आहेत. शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला करुन चंद्रराव मोरेचा पराभव केला. त्यावेळी तिथुन पळुन आलेले मोर्‍यांचे लोक त्याकाळच्या मुघल साम्राज्यातील सोनावळे गावात स्थायिक झाले. त्यामुळे या गावाला पळु  (पळुन आलेल्या मोर्‍यांमुळे "पळु") असे नाव पडले असावे.

        संपूर्ण रात्रीचा प्रवास करून सकाळी पाच वाजताच्या सुमारास आम्ही सोनावले गावात पोहोचलो निसर्गाच्या सानिध्यात फ्रेश होऊन चहा नास्ता चा आस्वाद घेतला आता इथून पुढे दीड तासांचा ट्रेक करून गुहेपासून आम्ही rappeling सुरवात करणार होतो तत्पूर्वी ग्रुप मधील जवळपास सर्वच सदस्य हे पहिल्यांदाच rappeling चा अनुभव घेणार होते त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची ओळख करून rappeling कशा पद्धतीने करायचे याचे थोडक्यात मार्गदर्शन करून सरळ वर चढायला  सुरुवात केली.पाऊस नसल्याने हवेत  प्रचंड दमट पणा होता त्यामुळे हालत होणार हे नक्कीच होतं खरं तर गणपती गडद करायचं झाल्यास पाऊस हा असायलाच हवा. चोहोबाजूंनी बाजुंनी फेसाळते धबधबे तेंव्हाचं निसर्गसौंदर्य काही औरच असतं. पण असो आम्ही सुमारे 07 च्या सुमारास चालायला सुरुवात केली गावात गावकऱ्यांची भात शेती चा सुगंध हा चोहोबाजूंनी दरवळत च होता .

      पुढेच एक ओढा वाहत होता तिथेच जवळ काही विरगळी शेवटच्या घटका मोजत असताना दिसल्या वीरगळ म्हणजेच विरपुरुषांच्या प्रति उभारण्यात आलेला स्तंभ त्या स्तंभावर त्या विरपुरुषा चे तीन ते चार चौकटीत युद्ध प्रसंग कोरलेले असतात त्याला च वीरगळ म्हणतात तेथील  ओढा पार करुन आम्ही आमच्या वाटेला लागलो गप्पा मारत मारत आम्ही पुढे जात होतो जसंजसे पुढे जात होतं तसंतसं आम्हाला आमचं ध्येय जवळ दिसत होतं पण वाट लांबची होती कारण आत्ताशी पाऊलवाट होती. अजून चढाईला वेळ होता. पण एवढ्या गरमीमध्येसुद्धा एकच गोष्ट चांगली होती की ह्या जंगलात बघायला खूप काही मिळाले. छोटे छोटे कीटक नवीन नवीन फुलं पक्षी पाहत आम्ही आमचा प्रवास चालूच ठेवला होता.

  आता मात्र चढाईला सुरुवात झाली होती. सुमारे अर्धा तासाचीच असणारी चढाई दमट वातावरणामुळे जास्तच वाटत होती म्हणून आरामात वर चढत आता आम्ही थेट गणपती गडद च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. बाजूलाच तुषार रुपी धबधबा पडतच होता तेथून थेट गडदीत प्रवेश केला गडदीतुन समोरचा निसर्ग स्पष्ट दिसत होता समोर तीन तलाव उजव्या बाजूला नाणेघाट.

        समोरचा  निसर्ग शांतपणे अनुभवून आम्ही गडदीतल्या गणपतीचं दर्शन घेतलं. गर्दी नसल्यामुळे गडदीमध्ये बऱ्यापैकी शांतता होती.आता इथून पुढे आम्ही सर्व ज्याची वाट पाहत होतो तो rappeling चा थरार अनुभवण्यासाठी साठी सज्ज होतो.एक एक करून सर्वांनी हर्णेस हेल्मेट परिधान करून उतरायला सुरुवात केली सुरवातीला थोडे घाबरल्या सारखे वाटते पण एकदा की rappel करून खाली आलो की पुन्हा पुन्हा rappeling कारावेसे वाटते हाच फरक आहे rappeling आणि rock climbing चा हं rock climbing मध्ये पूर्ण पणे तुमच्या शरीराचा कस लागतो.

आयुष्यात आपण पण काहीतरी थ्रिल अनुभवलं याचा सुखद अनुभव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

तो सुखद अनुभव गाठीशी बांधून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली जस जसे आम्ही खाली उतरत होतो तस तसे  मागे वळून बघितल्यावर गणपती गडदचे खरे सौंदर्य नजरेस पडत होते.त्याकडे ५ मिनिटं एक टक लावून बघून पुन्हा आपली वाट धरली आणि थेट गावात जाऊन थांबलो. 

एव्हाना ०४ वाजले होते आणि पोटात कावळे कोकायला सुरवात झालीच हाती गावात उतरून रुचकर अशा शाखाहरी आणि मांसाहार चा आस्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो.

     आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा एक technical event होता म्हणून सोबतीला आमची सह्याद्रि मधील भागिनी साह्य गिरी adventure ची कुसुम विशे हिच्या मदतीने हा event सुखरूप पार पडला कुसुम बद्दल सांगायचे झाल्यास ती एक cirtified रॉक क्लायम्बर तर आहेच आणि रेस्क्युअर शिवाय स्वतःच घर    सांभाळून गेली कित्येक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच  पावसात पाण्यात,पुरात अडकलेल्या माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील वाचवणारे, किंबहुना जीवदान देणारे देवदूतच आहेत ते. रात्री-बेरात्री, वेळी-अवेळी दऱ्याखोऱ्यात अडकलेले रस्ता चुकलेले ट्रेकर्स पर्यटक यांना तर ते मदत करतातच परंतु दरीत पडलेले मृतदेह, काही वेळेस कुजलेले मृतदेह मेडिकेटेड करून,स्वच्छ करून कित्येक  हजार फुटांवरून वर आणणे आणि पोलिसांच्या मदतीने ते ताब्यात देणे असे कठीण आणि निस्वार्थी कार्य ते करत आहे.कोणत्याही मोबदल्याशिवय हे कार्य करत आहेत त्यांच्या या महान कार्याला माझा आणि माझ्या टीमचा सलाम.  हॅट्स ऑफ कुसुम आणि दीपक विशे.

सचिन भांड पाटिल

सह्याद्रि परिवार श्रीरामपूर











Friday, August 11, 2023

बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशालगड मोहीम (भाग-०२)

 

पन्हाळगड ते विशालगड पदभ्रमंती

दि.०५ आणि ०६ ,२०२३

भाग :- ०२



  पहाटे जाग येऊनसुद्धा कोणीही एकमेकांना उठवले नाही. सर्वांनाच झोप हवी होती. नाईलाजानेच साडेसहा ला उठलो. चहा व "ओघाने"  येणारे कार्यक्रम उरकले. नंतर चविष्ट असे उपीट  चा नाष्टा करून आवरा आवर केली एव्हाना अनेक ट्रेकिंग क्लबच्या लोकांची गर्दी गावात दिसू लागली गावातली कमी आणि ही बाहेरून आलेली लोकांची गर्दीच जास्त दिसत होती प्रत्येक ग्रुप च्या शिवगर्जनेमुळे सारा आसमंत दुमदुमत होता  गावात एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मार्गस्थ होण्यास सुरुवात केली . आता घाई करायलाच हवी होती.  त्या गर्दीतूनच वाट काढत आता भातशेतांसोबत "हिरवळ" सुद्धा बघत पुढे जाऊ लागलो.



. वाटेवर दगडावर काढलेले ते बाण दिसू लागल्यामुळे किल्ल्यावर आल्यासारखे वाटत होते.  झाडे , खडक , जमेल त्या ठिकाणी ट्रेकरच्याच  नजरेत भरतील असे काढलेले ते बाण आमचा उत्साह वाढवत होते. आंबेवाडी ही पुढची वाडी होती. पावसाच्या हलक्या सरी जरी अधूनमधून येत असल्या तरी पावसाळी वातावरणामुळे दम चांगला राहत होता आणि डोळ्यांचे पारणे जागोजागी फिटत होते. आंबेवाडी नंतर दोन नकाशात नसलेल्या वाड्या लागल्या:  कळकेवाडी  आणि रिंगेवाडी! कुठल्यातरी एक वाडीबाहेर मोठ्ठी विहीर लागली. तेथे पुढे जरा वेळ विश्रांती घेतली. जंगलातल्या वाटा कापताना डिस्कवरी वरच्या MAN VS WILD या मालिकेची आठवण होत होती.

जमिनीवर अभावानेच माती दिसत होती. गळलेल्या पानांमुळे सगळी वाट झाकली गेली होती. अशा विरळ मनुष्य वस्तीच्या वाडीत कोणाला काही  झाले तर काय करत असतील, त्याला डॉक्टर कडे कसे नेत असतील हा विचार मनात घुंगवत होता. अशातच  एका ओढ्या पाशी थांबून बिस्किटांचा व गोड पुऱ्या चा नाश्ता केला. तेथे तुरळक फोटो सेशनसुद्धा झाले.

पाटेवाडीला पोहोचण्यास बराच वेळ लागत होता, मात्र २ वाजत आले तरीहि वाडीची चिन्हे दिसेना. अशातच अजून एक अनपेक्षित वाडी लागली: माळेवाडी. माळेवाडीहून पाटेवाडी २ किलोमीटर चालताना. चक्क डांबरी रस्तापण आहे. त्यावरून जाताना मात्र आता कंटाळा येत होता. अशा वेळी तो चिखलाचा रस्ताच हवाहवासा वाटत होतं पुढे परत चिखलाचा रस्ता लागला वाटेत एका ठिकाणी गुढगाभर चिखलात पाय रुतला ही फजिती एकदा तरी व्हायचीच होती. ती झाली. धनगरवाडा येईपर्यन्त फारसे कोणीच कोणाशी बोलले नाही. 

म्हसवड्याचे घनदाट जंगल:.  हे पार केल्यानंतर म्हसवडे गाव लागते अशी माहिती होती. जंगलाची वाट थोडी सुकर झाली. "निबीड" हा शब्द ज्याकडे पाहून लिहावा असे हे जंगल आहे. या जंगलात बिबटे, गवे, भेकर, हरणे असे प्राणी आहेत असे आम्हाला तिथे समजले. रात्री या जंगलातून जाण्याची वेळ आली नाही हे नशीबच! सूर्यप्रकाशात झकास दिसत असणारे ते जंगल रात्री नक्कीच भयाण वाटत असणार. जंगलाने आम्हाला अनेक सुंदर दृश्ये दाखवली. अनेक ओढ्यांनी आमचे दुखरे पाय भिजवले.


 म्हसवडे गाव ओलांडताना मलकापूर-अणुस्कुरा महामार्ग लागतो. त्या फाट्याला पोचेपर्यंत माझ्या बाबत एक घटना घडली ओढ्यावर बांधलेल्या बंधाऱ्यावर पाण्यात उडी मारताना एका दगडावर पाय घसरला आणि तळपायाच्या घोट्यापाशी काहितरी इजा होणार असे जाणवले  पाण्यातून बाहेर आल्यावर त्याची प्रचीती आलीच आणि आता उर्वरित राहिलेला ०८ किलोमीटर चा टप्पा पार करणे म्हणजे माझ्यासमोर दिव्य परीक्षाच  होती त्यातच त्या जंगलात आमच्यातील काहींना जळू चा अनुभव देखील आलाच पुढे कसेबसे ०४ किलोमीटर अंतर पार केल्यावर महामार्ग लागला 

आता इथून पुढे पायाच्या दुखापतीमुळे  मला चालणे शक्य नव्हते म्हणून बाकी सदश्यांना पुढे जाण्यास सांगितले पांढरेपाणी येईपर्यन्त डोळ्यांत पाणी येणेच फक्त बाकी होते.त्यात कुठेच मोबाइल ला range नसल्यामुळे रस्त्यात एका ग्रुप च्या महिला रस्ता भरकटल्याने रस्त्यातच थांबलेल्या होत्या त्यांना  सोबत घेऊन पांढरपनी येथे पोहोंचलो तिथे त्यांचा ग्रुप त्यांची वाटच पहात होता तिथेच आमचे अमरावती चे सदस्य देखील  होतेच त्यांना पण पुढे जाण्यास सांगितले कारण इथून पुढे मी लिफ्ट घेऊन जाणार होतो त्यातच एका ग्रुप ची गाडी तिथे आली त्यांच्या बरोबर मी माझा प्रवास चालू केला आणि थोड्याच वेळात आमची पण  गाडी येताना दिसली आणि मी अमच्यागाडीत बसून पावनखिंड येथे पोहचलो एव्हाना आमचे सर्व सदस्य पावनखिंडीत  पोहोचलेच होते.

सध्या जी पावनखिंड म्हणून दाखवतात, तो आहे एक ओढा. या ओढ्याचे पुढे एका फेसाळत्या धबधब्यात रुपांतर होते. आम्ही धबधब्याच्या शेजारील शिडीने खिंडीत उतरलो. आम्हाला समांतर कोसळत असलेले पाणी मधेच खट्याळपणे आमच्या अंगावर शिंतोडे उडवत होते.  खिंडीतून वाहत जाणाऱ्या पाण्याचे दृश्य अवर्णनीय होते.


आता सर्वच जण ज्या पावनखिंडीच दर्शन घेतात तीच खरी पावनखिंड आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण ही खिंड म्हणजे एका बाजूला पूर्णपणे बंद आहे त्यातच माझी ही शंका आमच्यासोबत असलेल्या दुसरा गाईड कृष्णा ने दूर केली ही खिंड म्हणजे पावनखिंड नाहीच ह्या खिंडीचे पहिल्यांदा भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक चित्रपट काढला होता त्यांना हे लोकेशन चांगले वाटले म्हणून त्या चित्रपटाचं चित्रीकरण त्यांनी इथे केले याबत चे स्पष्टीकरण खुद्द पेंढारकर यांनी या आधीच केलेले आहे वास्तविक या जागेचा उल्लेख कुठेच आढळत नाही कृष्णाने सांगितल्या प्रमाणे आणि वाचनात देखील आल्याने खरी खिंड ही फरसबंदी च्या वाटेवर आहे तिकडे फारसे कुणी जात नाही हे ऐकल्यावर फरसबंदी ची वाट पुन्हा परत येऊन करायचीच म्हणून मनोमन श्रद्धा ठेवून त्या भूमीचे दर्शन घेऊन आम्ही पावनखिंड गावात आलो सगळ्यांनी रुचकर अशा मसुर आणि पनीर च्या भाजी चा आस्वाद घेतला  आता बऱ्यापैकी अंधार झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनाच कामे  असल्याने विशाळगड न करता आम्ही आमचे ऊत्तम प्रकारे नियोजन करणाऱ्या संकेत आणि कृष्णा चा निरोप घेऊन श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो

श्रीरामपूर मध्ये गाडी पोचली तेव्हा पहाटेचे ०५ वाजले होते सहनशक्तीची कसोटी पाहणारा ट्रेक अखेर पूर्ण केला होता,याची आगळेच समाधान मनात होते. मसाई पठाराची हिरवाई  डोळ्यांना कायम निववत राहो आणि पावनखिंडीचे ते साहसी पाणी मनाला कायम पवित्र ठेवो अशीच काहीशी भावना (कदाचित यापेक्षा सोप्या शब्दांत मांडलेली) सगळ्यांच्या मनात होती... दोन दिवस आम्ही निसर्गासोबत जगलो होतो..खूप काही शिकलो  होतो. 

हि मोहीम म्हणजे 350 वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सुखरुप पोहोचले;पण हि वाट किती अवघड, खडतर होती याची जाणीव आम्हाला भर दिवसा, क्षणाक्षणाला पावलोपावली होत होती. त्यावेळी उर अभिमानाने भरून येत होता. अंगावर शहारे येत होते. स्वतः च्या प्राणाची आहुती देणारे शिवा काशीद, जीवात जीव असे पर्यंत लढवणारे बाजी प्रभू,फुलाजी,त्यांना साथ देणारे रायजी बांदल आणि त्यांचे  300 ते 350 बांदल मावळे आणि इतर  यांचा पराक्रम ऐकून, वाचून होतो. त्याची प्रचिती याची देही याची डोळा अनुभवून कृतार्थ झालो. (समाप्त)

टीप:- वरील लेखात वाड्यांची नावे जशी आठवली तशी घेण्यात आलेली आहे त्यामुळे अनावधानाने ती कदाचित मागेपुढे होऊ शकतात

सचिन भांड पाटील

सह्याद्रि परिवार,श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot.com




Thursday, August 10, 2023

बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम (भाग ०१)

 


बहुप्रतिक्षित पन्हाळगड ते विशाळगड पदभ्रमंती मोहीम

दि.०५ आणि ०६ ऑगस्ट २०२३

भाग :-०१


काही निवडक आवडता ट्रेक झाल्यावर त्या ट्रेक चा वृतांत हा हवाच आणि या ट्रेकला तर हवाच ना ! खरं सांगायचं झालं तर गो.नी.दांडेकर, प्र.के.घाणेकर सारख्या इतिहास तज्ञ मंडळींनी बरेचशे लिखाण केलेल्या असल्यामुळे आणि सिनेमाद्वारे पावनखिंडीचा इतिहास आपल्या समोर आलेला असल्यामुळे मला खास करून या ट्रेक विषयी काहीही  लिहिणे म्हणजे मोठेच धाडस वाटत आहे, मात्र प्रत्येक ट्रेकरची जशी चाल वेगळी तशी प्रत्येकाची लेखनशैली सुद्धा वेगळी ! आणि याशिवाय या आवडत्या ट्रेक विषयी"मी ट्रेकला जावून आलो  फोटो काढले नाही आणि  वर्णन लिहिले नाही", तर, तो ट्रेक कसा पूर्ण झाला म्हणणार.म्हणून या ट्रेक चा इतिहासात फारसे न डोकवता पन्हाळगडावरून  शिवाजी महाराजांची पालखी धरून सलग २० तास धावणाऱ्या त्या अज्ञात भोईंना  श्रद्धांजली अर्पण करून या वर्णनाला सुरुवात करणे योग्य होईल.

भयानक धाडसी आणि जिवावर बेतू शकतील असे आखलेले बेत नंतर कसे कुतूहलाचा आणि संशोधनाचा विषय बनतात , याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक ! शिवरायांचे असामान्य धैर्य, बाजीप्रभूंचे अतुलनीय शौर्य, मर्द मराठ्या मावळ्यांची असीम स्वामीनिष्ठा, या सर्वांची साक्ष देऊ शकणारे जंगल, नद्या , ओढे म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! मसाईचे हिरवेकंच पठार, पुन्हा पुन्हा मन ओढ घेईल असे पांढरे शुभ्र ओढे आणि रौद्रसुंदर पावनखिंड म्हणजे "पन्हाळगड ते विशाळगड" हा ट्रेक! (वर्णन संपलेले नाहीये)

आत्ता कुठे वर्णन सुरु होतंय..

वरील सर्व गोष्टी ऐकून वाचून आधी २२ आणि २३ जुलै चा बेत आखला पण प्रचंड गर्दी आणि पाऊस या मुळे मी ही मोहीम ५ आणि ६ ऑगस्ट ला घेण्याचे ठरवले आणि पन्हाळा येथील संकेत बरोबर चर्चा करून  या ट्रेकची आखणी केली. 



               ०४ तारखेला रात्री ०७ वाजता निघायचे  ठरले होते. पण नेमकी  मेडिकल वर आज गर्दी उसळली होती सर्व जण "वेळेवर" जमून जाण्याचा ट्रेक करणे हे माझे एक स्वप्न आहे. बहुधा ते कधी प्रत्यक्षात येईल काय माहित.  असो.  रात्री ०८  वाजता आमचा श्रीरामपूर मधून प्रवास चालू झाला  ह्या ट्रेक ला महिला सदस्य नसल्यामुळे  बस मध्ये कल्ला तर होणारच  नेहमीचा दंगा आणि हास्याचे सातमजली फवारे चा आनंद घेत प्रवास पार पडला. प्रवास आणि झोप हे जरा आमच्या बाबतीत म्हणाल तर ३६ चा आकडा असल्या सारखे  त्यामुळे  नेहमीप्रमाणे रात्रभर जागूनच काढावी लागली


दिवस पहिला : ०५ ऑगस्ट : 

पन्हाळा आणि हिरवीगार मसाईची चादर

सकाळी ०७ वाजता आम्ही पन्हाळगड ला पोचलो. पावसाळा आणि निसर्ग याविषयी वाचलेली सर्व वर्णने आठवावीत अशी दृश्ये आम्हाला साद घालत होती जणू म्हणत होती : "०२ दिवस मला डोळ्यांत भरून घ्या, मनात साठवून घ्या, माझ्याबरोबर जरा निकोप बना." 

       पन्हाळा किल्ल्याला महाभारतापासून इतिहास आहे. पराशर मुनींचे येथे वास्तव्य होते. तसेच पूर्वी नाग लोक येथे राहत असत. यावरून या जागेला "पन्नगालय" (नागांचे घर) असे नाव पडले. पुढे इ.स. १११२ साली शिलाहार राजा भोजने या ठिकाणी किल्ला बांधला व त्याला  "पन्हाळा" हे नाव दिले. त्यापुढे यादव राजा सिंधन , आदिलशाह यांनी या किल्ल्यावर राज्य केले आणि १६५९ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. किल्ला संपूर्ण पाहावयाचा म्हटले तर अख्खा दिवस सुद्धा कमी पडेल, इतकी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. पण उशीर झाल्यामुळे जास्त ठिकाणे  न पाहता बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले तसाही आमचा ट्रेक पन्हाळगड "आणि" विशाळगड असा नसून पन्हाळगड "ते" विशाळगड असा पदभ्रमंती चा होता. 

चहा आणि नास्ता करून आमच्या सोबत असलेल्या पन्हाळा येथील संकेत ने थोडक्यात ह्या पदभ्रमंती चा इतिहास आमच्या समोर मांडला आणि पन्हाळगड च्या बागेला प्रदक्षिणा घालून.राजदिंडी चा मार्ग धरला, जेथून आम्हाला गड उतरावयाचा होता.जेथून राजे सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निसटले होते.  आता आम्हाला अनेक वाड्या पार करायच्या होत्या. त्यातील पहिली होती: "तुरुकवाडी". जेमतेम अर्ध्या तासात या वाडीवर पोचलो.येथून एक डांबरी रस्ता म्हाळुंगे या गावी जातो, मात्र आम्हाला मसाई पठारावर जायचे असल्याने डोंगरातील वाट धरून त्या वाटेने पुढे कूच केले.  हा रस्ता बराच चढणीचा होता.ओढ्याचे गार पाणी चेहऱ्यावर मारून पुढे निघालो. म्हाळुंगे गावाचे धनगर वाटेत दिसत होते. चढणीची वाट आता एकदाची संपली आणि कोकणातल्या एखाद्या आडगावी फिरत असताना जसा अचानक समुद्र समोर दिसून वेडे व्हावे, तसे आमचे झाले.




मसाई पठार 


 समोर साक्षात हिरवा समुद्र पसरला होता. अथांग हिरवा.. नजर जाईल तिथपर्यंत हिरवा... क्षितिजापर्यंत हिरवाच !!! मसाईचे जादुई पठार याचि देही याचि डोळा पहिले. डोळे भरून पहिले. "धरतीने हिरवा शालू पांघरणे" हा वाक्प्रचार इथे आल्यावरच बनला असेल अशी खात्री झाली. भारताला जर कधी ऑलिम्पिक स्पर्धा भरवायला मिळाल्या, तर सर्व खेळांची मैदाने सामावून सुद्धा उरेल, इतके विस्तीर्ण हे पठार आहे. येथे फोटो-सेशन झाले हे सांगणे न लगे.पठारावर चारचाकी, दुचाकी गाड्या घेऊन येणाऱ्या लोकांना बंदी आहे; त्यामुळे चराऊ गवत कमी होते आणि येणारी माणसे कचरासुद्धा करतात हे अगदी रास्त आहे. पठारावरून मार्ग कापायला सुरुवात केली.

वाटेत एक मंदीर लागले, मात्र ते मसाईचे नव्हते. "देखल्या देवा दंडवत (तो मात्र मनापासून)" करून पुढे निघालो. मसाईचे मंदीर अपेक्षेपेक्षा लांब होते. तेथे पोचेपर्यंत अनेकदा पावसाची रिपरिप लागली. श्रावण अगदी क्षणात ऊन आणि क्षणात पाऊस ही त्याची ओळख जपत होता. मंदिरात देवीचे दर्शन घेऊन सोबत आणलेल्या चपाती भाजी वर उभ्या उभ्या थोडाफार ताव मारून पुढील रस्ता समजावून घेऊन  तसे निघालो. वाट चुकवण्यापुरते धुके आम्हाला तसे आम्हला आडवे आले नाही .

त्यानंतर विनाथांबा कुंभारवाडी कडे कूच केली रस्त्यात लहान लहान मुलांनी आम्हाला "दादा , गोळ्या द्या" असे विनवून हेलावून सोडले. गोळ्यांचा मुबलक साठा असल्याने त्यांच्या हातावर गोळ्या ठेवून आम्ही कुंभारवाडीकडे प्रस्थान केले.वाटेत लहान मुले चहा चहा ची किटली घेऊन उभी होतीच मग काय सह्याद्रि आणि चहा ही तर माझी कमकुवत बाजू त्यामुळे सह्याद्रि मध्ये चहा ना घेताच पुढे कसे जाणार  आता बराच कच्चा  रस्ता सुरु झाला होता. चिखल आणि पाणी यांनीच जणू रस्ता बांधला होता. कुंभारवाडी वाडीवरून खोतवाडी कडे जाताना डांबरी रस्ता लागला या रस्त्याने जाताना डावीकडे कुंवार खिंड दिसते. 



कुंवारखिंड (खडकमाळ आळी :-)) 

एकावर एक असे पांढऱ्या खडकांचे थर रचलेले असे ते उंच खांब मोठे सुंदर दिसत होते. खोतवाडी येण्यास बराच वेळ गेला. तिथे आमची गाडी आलेली होती ती या साठी की कुणाला काही त्रास झाला तर त्यांना गाडीने मुक्कामाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तेथेसुद्धा तेथील लहान मुलांना गोळ्यांची वाटणी झाली.वाटेत रस्त्याच्या बाजूला भात लावणी चालू होती मग आम्हला भातलावणी करतानाच फोटो काढण्याचा मोह आवरलं नाही आणि ती सुद्धा हौस करून घेतली भाताची खचरे चिखलाचा रस्ता तुडवत करपेवाडी इथे आमचा मुक्काम ठरला होता. वाटेत अनेक गावकऱ्यांना आम्ही वाट आणि लागणारा वेळ याबद्दल विचारले. प्रत्येकाचा अंदाज निराळा!  चिखलातून जाताना बूट खूप "खालच्या थराला" जात होते , त्यांना बरोबर घेऊन जाणे म्हणजे एक दिव्यच होते. करपेवाडीपर्यंत उजेडाचा वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. प्रत्येक वाडीमध्ये पाणी मुबलक, भातशेते तर असंख्य ! दिवसभरात जेवढे श्वास घेतले असतील तेवढीच भाताची रोपे आम्ही पहिली असतील. 



आपसांत बोलणे आता जरा कमी झाले होते. वाडी काही केल्या येत नव्हती. वाडी येईपर्यन्त अविरत चालणे याशिवाय पर्याय नव्हता. सहा च्या आसपास दूरवर एक घर दिसले. ती वाडी म्हणजे च करपेवाडी जिकडे आमची राहायची सोय होती आणि मनाची चलबिचल क्षणार्धात थांबली.सर्वांनी तेथील एका घरात फ्रेश होऊन मॅट अंथरून पाठ टेकवली चहा आणि खाऊची देवाणघेवाण करून थोडा वेळ गप्पा मारल्या. दमलेल्या शरीराला अन्नापेक्षा विश्रांतीची जास्त  गरज होती. कनकने आणलेली वेदना शामक मलमे बाम या मुळे सार घर त्या वासाने सुहासिक झाले होते.थोड्याच वेळात गावाकडील जेवणावर ताव मारून त्याबद्दल मनोमन कौतुक करून साडेनऊ वाजता आम्ही झोपलो. रात्री सारखे कुणी उठले तर दरवाजा बंद करायला सांगावे लागायचे कारण कुणीही प्राणी आला असता तरी आम्ही त्याचे भोजन झालो असतो कारण उठून पळण्याचे त्राण कुणाच्याच अंगात नव्हते. आजच्या दिवसाची चाल: अंदाजे २२  किलोमीटर !  

(क्रमशः)..



सचिन भांड पाटील

सह्याद्रि परिवार



Friday, July 28, 2023

आडवाटेवरची सुरक्षित पावसाळी भटकंती


 आजकाल सोमवार उजाडतो आणि टीव्ही वर  एक बातमी हमखास झळकते.अमुक ठिकाणी नदीत दोघे तिघे बुडाले, समुद्र किनारी भरती अहोटीचा अंदाज  न आल्याने दोघे तिघे बुडाले.धबधब्यात कड्यावरून घसरून मृत्यु ते अगदी एखाद्या किल्ल्याच्या वाटेवर चढाई करताना दुर्दैवी अंत व्हावा ते अगदी जंगलात हरवणे मग मदत रेस्क्यू वगैरे.

           खऱच परिस्थिती एवढी बदलली आहे . अगदी काही वर्षांपूर्वी लोकांना वर्षा पर्यटनाखाली निसर्गातले पावसाळी चित्र दाखवुन घराबाहेर पडायला उद्युक्त केले जाई. पण आज हे असे बेताल चित्र पाहून घराबाहेर पडावे असे वाटत नाही, यावर कुठेतरी बंधन घालावी असे वाटू लागले आहे.

          ठराविक गटातील लोकांना धांगडधिंगा हवा असतो, निसर्ग वगैरे असे काही नसतं. फक्त रम आणि रमा हेच त्यांचे सुख. फरक एवढा आहे ऐरवी हे बंदिस्तपणे केले जाते आणि पावसाळ्यात खुलेआम. पण खरच निसर्गात जाऊन त्याची विविध रूप पाहून तिथला आस्वाद घेऊन हरवून एका वेगळ्याच धुंदीची अनुभुती घेणे वेगळे, की त्या साठी दारूची बाटली,नंगा नाच आणि मोठ्या आवाजाचा डिजे हवा ?

हि परिस्थिती आत्ताच्या सर्व प्रसिध्द झालेल्या धबधब्यांच्या ठिकाणांची आणि तिथल्या गावाची झाली आहे. तिथल्या ग्रामस्थांचे तर जगणेच मुश्कील झाले आहे, शनिवार रविवार आला कि त्यांच्या अंगावरच काटा येतो. हे झाले सर्वसामान्य अविचारी लोकांबद्दल.

निसर्गात मुक्तपणे पण निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता, इतिहासाचा मागोवा घेत तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून, डोळसपणे केलेली भटकंती हि ट्रेकींगची पहिली पायरी, अर्थात हे माझे मत. पण हल्ली पावसाळी ट्रेकींगचे पेव फुटलय, सोशल मिडीयानेही त्यापरीने हातभार लावलाच आहे.ज्या भागात जातोय तिथली कुठलीच माहिती न घेता अमका जातो म्हणून तमका जातो, सोम्या जातो मग गोम्या जातो, हि गेली मग मी जाते अशी हवशे नवशे गवशे यांची यादी वाढतच जाते.खरतर ट्रेक म्हणजे काय हेच यांना समजत नाही. ट्रेक म्हणजे काय, ट्रेक करताना घ्यावयाची खबरदारी, आपण कुणासोबत जातोय ज्या ग्रुप सोबत जातोय तो ग्रुप मान्यता प्राप्त आहे कि नाही त्यांचे ग्रुप लीडर हे प्रशिक्षित आहेत का ही सर्व माहिती घेऊन आपण नियोजन करायला पाहिजे पण हे करतय कोण ?आता यात काही असे म्हणतील आम्ही एवढ्यादिवसाचे ट्रेक करतोय कुठे काय झाल पण वेळ काही कुणाला सांगून येत नाही मग अशा लोकांच्या करामतीमुळे सारे ट्रेकींग नाहक बदनाम होते.

आणि रेस्क्यू ची पुरेपूर माहिती नसल्याने रेस्क्यू टीम ला पाचारण करावे लागते पण ती टीम पोहचे पर्यत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलेल असते .

कधी काळी दुर्दैवाने निसर्गात अशी वेळ कुणावरही येऊ शकते. पण तरी सुध्दा थोड्या अनुभवाअंती, नियोजनबध्द अभ्यासाने तसेच त्या वेळे ची परिस्थिती सदसदविवेकबुध्दीने हाताळून बरेसचे अपघात टाळता येऊ शकतात. पण या बाबतीत खोलवर विचारच कुणी करत नाही आणि बदनाम मात्र निसर्ग होतो हिच खरी शोकांतिका आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करता सध्या पावसाळ्यात होणारी सह्याद्रि मधील गर्दीचा विचार करता आम्हा भटक्यांना असे ठिकाण नकोसे वाटतात आणि आम्ही आशा जागेचा शोधात असतो तिथे माणसांची नाही तर निसर्गाची गर्दी असेल.

ह्या पावसाळ्यात अशाच ठिकाणी भेट द्यायची हे मनोमन ठरवलेच होते आणि समोर आल की आठ वर्षांपूर्वी रतनगड ते हरिश्चंद्र गड हा ट्रेक करत असताना कामशेत गावा जवळ आम्ही आलो तेव्हा आमच्या वाटाड्या मित्राने कुमशेत च्या कलकी धबधब्याची ओळख करून दिली तो पर्यत ह्या धबधब्याविषयी गावातील लोकांच्या व्यतिरिक्त फारसे कुणाला माहिती नव्हते.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुका म्हणजे निसर्ग सौदर्याचे माहेरघर. भंडारदरा धरण, रंधा फॉल, रतनगड, कळसुबाई शिखर, हरीचंद्र गड, सांदण दरी  हे पर्यटन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटनाचे माहेरघर म्हणून जनतेला माहीत आहे.पावसाळ्यात हजारो पर्यटक सुट्टीच्या दिवशी येथे भेट देतात. 

        मात्र  पर्यटकांच्या नजरेतून सुटलेलं व निसर्ग सोंदर्याने भरलेलं कुमशेत हे 800 लोकवस्तीचे गाव राजूर पासून अवघे अंदाजे 35 कि. मी. अंतरावरील अनेक मोठमोठे डोंगर पार करून आजोबा डोंगर, शिरपुंजे चा डोंगर दरीच्या कुशीत वसलेलं अतिदुर्गम गाव.गावाकडे येताना असंख्य धबधब्यांची गुंफण च लागते त्यात भर पडते ती मनमोहक अशा देवराई ने देवराई म्हणजे देवासाठी उभारलेले जंगल त्यामुळे इथं वृक्षतोड होत नाही .

कुमशेत गावातून थोडीफार पायपीट केल्यानंतर गावाचे दैवत म्हणजे धारेराव देवस्थान धारेराव अस्वले हे येथील गावातील इंग्रजांच्या विरुद्ध कडवे लढणारे क्रांतिकारक अजूनही त्यांचे इथे अस्तित्व आहे असे गावकरी मानतात तेथूनच पुढे सुंदर असा कुमशेत चा कोकणकडा दिसतो तो कडा ठाणे जिल्ह्यात मोडतो.इथे आल्यावर भिरभिरणारा वारा मनात धडकी भरवतो. पावसाळ्यात येथे असंख्य रिव्हर्स फॉल मोत्यांची उधळण आपल्या अंगावर करतात. धारेराव मंदिर जरी नगर जिल्ह्यात असले तरी कोकणकडा मात्र ठाणे जिल्ह्यात येतो. येथेच खूप उंच लोखंडी मनोरा वन खात्यातर्फे उभारला आहे. येथून सभोवतालचे विहंगम दृश्य दिसते. येथून धुके नसल्यास अगदी माळशेज घाटातील वाहतूक दिसते. खूप वेळा या भागांमध्ये  धुके पडते आणि धुके पडले की निसर्ग नजरेत साठवता येत नाही. कधीतरी येणारे धुके, सप्तरंगाची उधळण करणारे इंद्रधनुष्य, ओढ्याचे खळाळणारे पाणी, मधूनच पडणारे उन, आणि अचानक येणार्‍या श्रावण सरी शरीराबरोबर मनालाही ओलंचिंब करून टाकतात. 

कुमशेत वरून परतीच्या मार्गाने जेव्हा आपण लागतो तेव्हा आपल्याला कलकी धबधब्याचे दर्शन दिसते आता वनविभागाने तिथे लोखंडी ग्रील टाकल्याने सुरक्षित असा हा धबधबा झाला आहे.जोराचा पाऊस नसल्यास तिथे खाली उतरून कलकीचे सौंदर्य डोळ्यात मावत नाही.

अशी ही आडवाटेवर कुमशेत ची भटकंती नुकतीच सह्याद्रि परिवाराने संपूर्ण सुरक्षितता बाळगून पूर्ण केली या भटकंती चा सारांश सांगायचे झाल्यास वाटेच्या दोन्ही बाजूला गर्द हिरव्या झाडीची झालर, कोण्या अनामिक पक्ष्याची रानशीळ, छोट्या मोठ्या खेकड्यांची पळापळ,गर्द हिरव्या रानात छाती दडपून टाकणारे गाव, मंदधुंद वातावरण, हवेच्या झोताने डुलणारी गवताची पाती, मधेच डोकावणारी धुक्याची चादर, झाडांच्या पानावर टपटप पडणारे पावसाचे थेंब, छोट्या मोठ्या धबधब्यांचे खळखळाटी संगीत, ढगांचा आणि वाऱ्याचा पाठशिवणीचा ऐन भरात आलेला खेळ. हा सह्याद्रितील पाऊस आणि पावसातली भटकंती ह्यामध्ये असे अनुभव पदरात पडल्यावर मनाला मिळणाऱ्या गारव्यासह  डोंगरयात्रा सार्थकी लागल्याचे समाधान पुढे आजन्म टिकून राहील.

पुन्हा भेटूया लवकरच अशा दुर्लक्षित आडवाटेवर सुरक्षित पावसाळी भटकंती करण्यासाठी.

सचिन भांड 

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,

श्रीरामपूर






देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...