सह्याद्रि ट्रेकर्स परिवार आयोजित हम्पी बदामी टूर (भाग-०१)
दि.३ ते ५ फेब्रुवारी 2023
कोण्या वास्तुविशारद ला पहाटे एक कोवळे स्वप्न पडले आणि त्याने अशी जगप्रसिद्ध शिल्पांनी सजलेली सारी नगरीच सजवली. हंपी मधील विठ्ठल मंदिर पाहताना असंच काहीसं वाटत होतं . ग. दि. माडगूळकर ह्यांनी लिहलेला "कानडा राजा पंढरीचा" हा अभंग सारखा मुखी वाहत होता. इथला विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपूरात नेऊन लपवला अशी एक दंतकथा सांगितली जाते म्हणून कानडा राजा पंढरीचा. हजारो मंदिरे असलेल्या हंपी - बदामी मध्ये कुठल्याच देवळात आता पूजा होत नाही हे एक आश्चर्यच आहे. ह्या कथेला असामान्यतेची किनार आहे. या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवांनी स्वत:च या देवळात रहाण्यासाठी ठाम नकार दिला. कारण, हे मंदिर फारच भव्य आणि सुंदर असल्यानं देवांना इथं राहायला संकोच वाटला असता.
हंपी- बदामी हे जगातलं सर्वात मोठं ओपन एअर म्युझियम पहायला जायचं हे एक प्रत्येक फोटोग्राफर च स्वप्न असत बऱ्याच वेळेस ठरलं तेव्हा प्लॅन फक्त कागदावरच होता. पण कालांतराने एक गोष्ट जाणवली ही टूर म्हणजे एकट्या दुकट्या ने करण्यासारखी वाटत नाही म्हणून ग्रुप च घेऊन जायचा हे ठरवलं केवळ पंधरा च दिवस उरले असले तरी हंपी-बदामी बाबत अनभिज्ञच होतो. जेवढं वाचलं होत त्यावरून येथील स्थळांची मनात भेळ होत होती. कुठे आधी जाव कुठे नंतर जाव ह्यात डोक्याचा भुंगा झाला होता. अनेक जाणकारांना आणि आधी जाऊन आलेल्यांना त्रास द्यायला सुरवात केली आणि रंगमंचावरचा पडदा हळू हळू उघडत जावा तसा हा प्लान मोकळा झाला.
माझा हा ब्लॉग प्रवास वर्णन ला जरासा फाटा देत ऐतिहासिक संदर्भावारील असेल कारण प्रवास वर्णन आणि ऐतिहासिक माहिती असे दोन्ही म्हंटल की ब्लॉग हा मोठा होतो.
भाग १ आणि भाग २ आशा ह्या स्वरूपात हा ब्लॉग असेल त्यात भाग १ मध्ये हम्पी च्या विषयी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि भाग २ मध्ये ऐहोळे, पट्टदकल, आणि बदामी या विषयी असेल.
हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज तेथील १५ ते २० किमी परिसरात भग्नावस्थेत असलेल्या विविध वास्तू पाहताना मन उद्विग्न होते.
कर्नाटक राज्यातील बेलारी तालुक्यातील होस्पेट या मुख्य बाजारपेठ असलेल्या गावापासून १३ किमी अंतरावर असलेले हम्पी म्हणजे एकेकाळच्या विजयनगर साम्राज्याची राजधानी. आज हम्पी परिसरात भग्नावस्थेत उभे असलेले महाल, देवदेवतांच्या मूर्ती, विविध दगडी कमानी, स्नानकुंडे, बाजारचा मुख्य रस्ता, बाजूने दुकानांच्या जागा, आसमंतातील टेकडय़ा, माळरान हे सर्व पाहताना मन उद्विग्न होते. यामागचा भव्यदिव्य गौरवशाली इतिहास चलतपटाप्रमाणे आपल्या डोळ्यासमोरून सरकत जातो.
विजयनगर (विजयाची नगरी) हे दक्षिण भारतातील इ.स. १३ ते १५ व्या शतकातील बलाढय़ हिंदू साम्राज्य. राजा कृष्णदेवराय सम्राट असताना इ.स. १५०३ ते १५३० हा या साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. त्याच काळात पोर्तुगीज प्रवासी डॉमीगो प्रेस हे शाही सम्राटाचे पाहुणे म्हणून हम्पीमध्ये राहिलेले. त्यांची रोजनिशी विविध भाषात उपलब्ध असून त्यातील वर्णन सुवर्णाक्षरात कोरून ठेवण्यासारखे आहे. ‘सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेले जगातील सर्वात उत्तम रईस शहर अशी त्याची ख्याती इराक-इराणपर्यंत होती.’ पर्शियन प्रवासी अब्दुल रझाक लिहितो, ‘‘माझ्या नेत्रांनी हम्पी इतके अप्रतिम शहर कुठेही पाहिलेले नाही किंवा त्याच्या तोडीचे दुसऱ्या कोणत्याही शहराचे नाव ऐकलेले नाही. अनेक टेकडय़ांवर वसलेल्या शहराला एकामागोमाग वर्तुळाकार बांधकाम केलेली सात कोटांची तटबंदी, भर बाजारात दिवसाढवळ्या चांदी, सोने, हिरे, माणके, केशर यांचे ढीगचे ढीग विक्रीसाठी. देशी परदेशी व्यापाऱ्यांच्या झुंडी याने बाजार फुलून जात असे. राज्याचा विस्तार थेट ओरिसापासून केरळपर्यंत होता. राजाजवळ सात ते आठ लाख खडे सैन्य होते. चलनात सोन्याची नाणी होती. विजयनगर म्हणजे सुवर्णनगरीच होती. पण इ.स. १५६० नंतर साम्राज्याची शोकांतिका सुरू झाली. इ. स. १५६५ तालीकोट (राक्षसतागडी) येथील बहामनी राज्ये व विजयनगर साम्राज्य यांच्यामधील घनघोर युद्धात विजयनगर राज्याचा दारुण पराभव झाला. शहरातील अनेक प्रासाद, देवळे, पुतळे, आलिशान घरे यांचा अघोरी नाश केला गेला. तलवारी, कुऱ्हाडी, हातोडे व दुसरे जे काही आयुध हाताला मिळेल त्याने अहोरात्र अघोरी कृत्य चालू होते. तीन महिने शहर लुटले जात होते. आगी लावून राजवाडे भस्मसात केले गेले. जे शिल्लक होते ते क्रूरकर्माच्या तोडण्यापलीकडचे होते. आजही त्या शिल्लक राहिलेल्या वास्तू दिमाखात उभ्या आहेत.’
१५ ते २० किमी परिसरात पसरलेल्या या उद्ध्वस्त शहरात आपणास जागोजागी दिसतात अजस्र शिळा. हम्पीचे विरुपाक्ष शिवमंदिर आठव्या शतकापासून १६व्या शतकापर्यंत या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. राज्याचा उदय आणि अस्त याच्या साक्षीने झाला. राज्याचा विध्वंस झाला, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित राहिले हा एक योगायोगच. पंपातीर्थ स्वामीस्थल या नावाने ते प्रसिद्ध आहे. मंदिराचे पूर्वेकडील गोपूर १०५ फूट म्हणजे जवळजवळ दहा मजले उंच आहे. मध्यात विस्तीर्ण आयताकृती प्रांगण. त्यात अनेक गोपुरे आहेत. कृष्णदेवरायांच्या काळात ‘राज्याभिषेक मंडप’ व सर्वात लहान गोपूर बांधले गेले. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढविलेले १०० खांब आहेत. अलंकारांनी मढविलेला नंदी आहे. त्यावर आरूढ गिरिजाशंकराची मूर्ती आहे. राम, कृष्ण, विष्णू व शिव या अवतारांच्या अनेक कथा शिल्प माध्यमातून जिवंत केलेल्या आहेत.

विजय चौक येथील प्रमुख राज्यकर्त्यांचा चौथरा ५३०० स्क्वे. फूट आहे. त्याला ४० फूट उंच कोरीव कामाची गॅलरी आहे. चौथऱ्यावरच्या पायाचे दगड अजूनही उत्तम स्थितीत आहेत. त्या काळात सर्व बाजूंनी गॅलरीला लाकडी खांबाचा आधार आहे. याला लागून दोन मजली भव्य हॉल ज्याला १०० खांब, दगडी जिने, आहेत. हिरव्या रंगाच्या क्लोराईट दगडाच्या चौथऱ्याला मागून शिरण्यास गोलाकार दगडी जिना आहे. बाजूने चोर खोल्या आहेत. या जागेवरून आपल्या राण्या व दासी या लवाजम्याबरोबर राजा विजयादशमी सोहळा पाहत असे. बाजूच्या भिंतीवर युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे जथे, देखणे घोडे, उंट, नर्तिका, पर्शियन टोप्या घातलेले लांब दाढीवाले परदेशी प्रवासी या सर्वाचे कोरीव कामातील देखावे पाहून आपण थक्क होतो. होळीच्या सणात नर्तिकांच्या हातात रंगाने भरलेल्या पिचकाऱ्या व त्यांच्या चेहऱ्यावरील दिसणारा जोश इतका जिवंत उभा केलेला आहे की जणू आपल्यासमोर खेळ चालू आहे असे वाटते. वाघ, बिबटे, नीलगाई, मगरी यांच्या शिकारीची शिल्पे, व शिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भेदक क्रूर भाव अचूक टिपलेले आहेत.
राजाच्या पदरी असलेले लक्षावधी सैनिक, हजारो सजविलेले अरबी घोडे, हत्ती, संपूर्ण शस्त्रागार या विजय चौकात परदेशी पाहुण्यांसमोर समारंभपूर्वक दाखवले जात असे.
याला लागूनच दोन ते तीन हजार स्क्वे. फूट जागेत २५० फूट खोल पुष्करणी असून त्याला १०० ते १२५ आखीव पायऱ्या आहेत. राजा पवित्र मूर्तीना या कुंडात स्नान घालत असे. या कुंडाला लागून राजवाडय़ाच्या भग्नावशेषाचा भला मोठा ढीग पसरलेला दिसतो.

सासवकेलु गणपती मूर्ती मोहरीच्या दाण्यासारख्या दगडाची बनलेली असून जवळजवळ २० ते २२ फूट उंच आहे. तिच्या चारी बाजूंनी मखराचे खांब आहेत. समोर बसलेला मूषक वेगळ्या दगडाचा आहे. याच मूर्तीच्या पाठी गौरी ची मूर्ती रेखाटलेली आहे. ही मूर्ती १७ फूट अखंड दगडात कोरलेली आहे. तिच्या सर्व बाजूला विविध आकारांचे गुळगुळीत दगड पडलेले आहेत. बहुधा अर्धवट बांधलेल्या मंदिराचे दगड असावेत. या टेकडीवर असलेल्या गणपती मूर्तीच्या खालच्या बाजूस हम्पी बाजाराची जागा असून त्यामध्ये रुंद आखीव रस्ते व दोन्ही बाजूंस दुकानांच्या गाळ्याचे चौथरे आहेत तिथे हिरेमाणके उघडय़ावर विकण्यास असत. तेव्हा परदाओ हे सोन्याचे गोल चलनातले नाणे होते. त्याच्या एका बाजूस दोन प्राण्यांची चित्रे व दुसऱ्या बाजूस राजाची मुद्रा आहे. नाणी पाडणारी टांकसाळ एका भव्य बंदिस्त इमारतीत आहे. आज हा परिसर थडग्यासारखा आहे. एके काळी येथून सोन्याचा धूर शहरावर पसरत होता.
लक्ष्मी नरसिंह-
(उग्र नरसिंह )
हे २२ फूट उंचीचे भव्य शिल्प मूर्तिकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. विष्णूचा अर्धमानवी व अर्धसिंहाचे तोंड असलेला अवतार, सात तोंडी आदिशेषावर स्थानापन्न झालेला तर एका मांडीवर लक्ष्मी बसलेली आहे. मूर्तीची तोडफोड अशी विचित्र झालेली आहे की लक्ष्मीचे फक्त हातच कमरेभोवती दिसतात. मूर्तीच्या आसपास पडलेले महाकाय आकाराचे दगड पाहिल्यावर लक्षात येते की हे संपूर्ण तोडणे किती कठीण होते. आणि म्हणूनच आजही हे शिल्प चांगल्या स्थितीत आहे. मूर्तीसमोर अखंड दगडातील शिवलिंग असून त्याचा तळ सतत पाण्याखाली असतो.
राणी महल
राणी महालाच्या आत शिरल्यावर मध्यात प्रशस्त पायऱ्या असलेला स्नानाचा भव्य हौद आहे. मध्यात कमळाच्या आकाराची कारंजी आहेत. चोहोबाजूंनी तीन मजले असलेल्या गॅलऱ्या आहेत. त्याला लागून राण्यांची दालने आहेत. या जागेत राण्या व दासी स्नानाचा आनंद लुटत.
लोटस महल
राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित राहण्याचा महाल म्हणजे झेनाना तटबंदी. याची जाडी वरवर कमी होत गेलेली. कमानीवरील सर्व कोरीव कामाची बांधणी हिंदू मुस्लीम संस्कृतीचा उत्कृष्ट मिलाफ आहे. १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड अनुभवणे वर्णनातीत आहे. महालाच्या बाजूस दोन उंच टेहळणी बुरूज आहे. त्यातल्या विविध कोनाडय़ांतून चोहोबाजूंच्या प्रदेशावर कडक नजर ठेवता येत असे. महालाची बांधणी अशी केलेली आहे की बाहेरून आतील स्त्रियांच्या हालचाली अजिबात कळत नसत. या जागी पुरुषांना प्रवेश नसे व सुरक्षिततेची जबाबदारी तृतीयपंथी सेवकांची असे. दोन पोर्तुगीज प्रवाशांनी लिहिलेल्या रोजनिशीतील याबाबतचे वर्णन वाचताना आपल्या डोळ्यासमोर सुवर्ण महाल उभा राहतो. त्यामध्ये नृत्यशाळा होती ज्याला १०० खांब व प्रत्येकावर विविध नृत्यमुद्रा कोरलेल्या होत्या. महालात चांदीचे झोपाळे, व छताला सोन्याचा मुलामा, पलंगांना सोन्याच्या दांडय़ा व मोत्याचे जाळीदार नक्षीकाम, हा लिहून ठेवलेला दस्तऐवज विजयनगर इतिहासाचा मानबिंदू आहे.
कमळाच्या आकाराचा लोटस महाल हे अतिशय उत्तम स्थितीत राहिलेले शिल्प आहे. बदामी पिंगट रंगाच्या मुलायम दगडाचे खांब व कमानी मुस्लीम शिल्पकलेसारख्या तर लाकडी खिडक्या जैन पद्धतीने कोरलेल्या आहेत. छताला गोपुराच्या आकाराचे कळस आहेत. या जागी राण्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत.
हत्तींना ठेवण्याकरता हजार ते १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल होता. ज्याला ११ मोठाली दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा असे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी असे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरील भव्य दालनात माहूत व पहारेकरी राहात. राणी महालाइतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते.

विठ्ठल मंदिर हे हम्पीमधील सर्वात भव्य दिव्य शिल्प आहे. जगातील एक महान शिल्प म्हणून याची गणना होते. विठोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत. हे महाराष्ट्र भूमी बाहेर साधारणपणे दिसत नाही. विठोबा हा कृष्णाचा अवतार त्यामुळे पुरातन कालापासून पुजले जाणारे दैवत. इ. स. १५१३ ते १५६४ पर्यंत या मंदिराचा जीर्णोद्धार २३ वेळा झाल्याची नोंद आहे. मुख्य चौथरा अजस्र दगडाचा असून त्यावर मंदिर उभे असून त्याला तीन मुख्य दरवाजे आहेत. देवघरात विठ्ठलमूर्ती आहे. सर्व बाजूंनी लांब व्हरांडे आहेत. त्याच्या प्रत्येक खांबावर कोरीव काम आहे. भिंतीवर रामायण महाभारतातील रंगविलेले प्रसंग आहेत. प्रवेशद्वाराजवळ दगडी हत्ती काही भागात तुटलेला आहे. लागून अतिभव्य कल्याण मंडप आहे, ज्याच्या खांबांची गणती करणे कठीण आहे. प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव शिल्पे आहेत. इथे राजघराण्यातील लग्ने होत असत.
मंदिर आवारात ३० ते ३५ फूट उंचीचा अतिभव्य कोरीव काम केलेला दगडी रथ असून तो प्रथमदर्शनी एकसंध दगडातून कोरलेला आहे असे वाटते, पण तो अनेक दगडांनी इतका व्यवस्थित सांधलेला आहे की ते सांधे बारकाईने पाहिल्याशिवाय दिसत नाहीत. रथाची अजस्र दगडी चाके व त्यावरील वर्णनातीत कोरीव नक्षीकाम, मधील आरीचा दांडा, रथाच्या दोन बाजूंस दगडी हत्ती. मध्यात दगडाची पण लाकडाचा भास होणारी शिडी आहे. एकेकाळी हा रथ फिरवीत असत. हम्पीचे हे एक महान शिल्प आहे. मंदिराच्या मागील बाजूस अनेक मोडलेल्या खांबांचा व तुटलेल्या मूर्तीचा भला मोठा ढिगारा असून त्यामधून कमलापुरा गावाकडे जाणारा जुना दगडी बझार रस्ता आहे.
हेमकुटा टेकडीवर जैन पद्धतीच्या मंदिरांचा समूह असून कळसाचा आकार पिरॅमिडसारखा आहे. त्यात हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जैन साधूंचे नग्न अवस्थेतील पुतळे, हत्ती, सिंह व विविध प्राण्यांचे केलेले कोरीव काम संमिश्र संस्कृतीचे दर्शन दिसते.येथून सूर्यास्त पाहण्याचा नजारा म्हणजे केवळ अवर्णनीय.


असे विजयनगर साम्राज्य व त्याचे भग्नावशेष याचे उत्खनन १८५६ मध्ये ब्रिटिश अभ्यासक ग्रॅहम ग्रीनलॉ यांनी प्रथम केले. त्या वेळच्या कामाचे त्यांनी काढलेले फोटो आजही पाहण्यास मिळतात. पण पुढील १०० वर्षे या सर्व कामाकडे दुर्लक्ष झाले. यानंतर पुढे १९७६ सालात भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे हम्पी राष्ट्रीय प्रकल्प आखला गेला. अनेक तज्ज्ञ व विजयनगर साम्राज्याचे अभ्यासक यांच्या मदतीने युद्ध पातळीवर काम सुरू झाले. ४० ते ५० किमी परिसरात एकाच वेळी उत्खनन चालू होते. काही वास्तू उत्तम स्थितीत होत्या, तर काहींची आधुनिक पद्धतीने डागडुजी केली गेली. या भव्य कामाचे रंगीत फोटो कमलापुरा म्युझियममध्ये पाहता येतात. १९८८ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा असलेले ऐतिहासिक साम्राज्य म्हणून मान्यता दिली व तेंव्हापासून हम्पी हे जगात एक महत्त्वाचे वारसा स्थान म्हणून नोंदले गेलेले आहे. इथे अनेक परदेशी व देशातील अभ्यासक भेट देतात, त्यावरून बराच इतिहास कळण्यास मोलाची मदत झाली. राजा उत्तम कवी आणि साहित्याचा जाणकार होता. त्याचे संस्कृत ग्रंथ उपलब्ध नाहीत पण तेलगु भाषेतील त्याने लिहिलेले प्रसिद्ध काव्य अमुक्थम्ल्लदा विष्णूचीत्थामू हे आजही प्रचलित आहे.
सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,श्रीरामपूर
https://drive.google.com/drive/folders/1_Z68ZXUWPsr8JIQyliUFwAtYguBNKXXX