Wednesday, December 7, 2022

दुर्गराज राजगड अभ्यास मोहीम

 राजगड अभ्यास मोहीम

दि.४ डिसेंबर २०२२





जय शिवराय

राजगड अभ्यास मोहिमेबद्दल लिहिताना या ब्लॉग मध्ये मी माझ्या नेहमीच्या ब्लॉग प्रमाणे प्रवासवर्णन ला फाटा फोडून वाचण्यात आलेला गडाचा इतिहास मांडायचा प्रयत्न करणार आहे त्या मुळे ब्लॉग जरा मोठा होईल तरी वेळात वेळ काढून जरूर वाचावा. 

महाराष्ट्रातील  बहुतांशी  ट्रेकर्सचा  ट्रेकींगचा श्रीगणेशा हा सह्याद्रीमधील गड-दुर्ग येथूनच सुरु होतो! माझीही सुरुवात अशीच झाली! सुरुवातीच्या काळात झपाटल्या सारखे असे इतिहासप्रसिद्ध दुर्ग पाहण्याचा सपाटाच लावला! त्यातच केलेली हि भ्रमंतीची वर्णन मित्रांना सांगणे हा एक आवडीचा छंद बनला होता! असाच कोणीतरी एकदा मला एक  प्रश्न विचारला -"अरे तु एवढा त्या डोंगरी किल्ल्यांवर का जातोस? काय पाहतो तिथे? काय असत अस पाहायला ? त्या तुटक्या इमारती पडल्या तर ?? "ह्या प्रश्नामुळे मी मात्र खरच विचारात पडलो...खरच, का बर आपण हे दुर्ग पाहतो?.... ह्या दुर्गांच प्रयोजन काय?... ह्याच डोंगरावर  दुर्गम जागी इतक बांधकाम का  केल असेल? ..... ह्या सर्वांची व्यवस्था कोण पाहत असेल?.... हे दुर्ग असेच का बांधले असतील?.....  हे दरवाजे, हे बुरुज, ह्या पाण्याच्या टाके इथच का खोदले असतील ? असे अनेक प्रश्न पडू लागले....अन ह्याच विचारात एकदा एक पुस्तक सापडलं त्यात ह्या सर्व कोड्यांचा उलगडा झाला! तो ग्रंथ म्हणजे शिवाजी महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत  ह्यांनी लिहिलेला  " आज्ञापत्र " नावाचा ग्रंथ !               आणि तिथून पुढे खरतर ऐतिहासिक नजरेतून गडकिल्ले फिरायला लागतो इतिहास दुर्ग अभ्यासक यांच्या सानिध्यात येत राहिलो.दुर्ग म्हणजे काय त्यांचे प्रकार किती,घेरा,मेट,माची,बालेकिल्ला म्हणजे काय,बुरुज,जंग्या,फांजी, सोपान मार्ग,सदर, अंबरखाना, ढाल काठी बुरुज,शिल्पे,वीरगळ,शिलालेख असे कधीही कानावर न पडलेले शब्द अभ्यासू लागलो असेच एकदा श्री. राहुल नलावडे यांच्या सानिध्यात आलो आणि त्यांचा राजगड चा अभ्यास पाहून अवाकच झालो आणि माझ्या काही अभ्यास मोहिमेसाठी राजगड अभ्यास मोहिमे करता मार्गदर्शक म्हणून सरांना च  न्यायचे ठरवलं.मागच्या वर्षी अनेक बाल मावळ्यांचा सोबत यशस्वी अशी शिवनेरी अभ्यास मोहीम घेतल्यानंतर या वर्षी खरतर रायगड अभ्यास मोहीम घेयचे नियोजनात होते परंतु म्हणतात ना जसे छ. शिवाजी महाराज समजण्यासाठी साठी तुम्हाला आधी औरंग्या समजून घ्यावा लागतो तसेच रायगड समजण्यासाठी आधी राजगड समजून घेता आलं पाहिजे कारण रायगड जरी स्वराज्याचा कळस असेल तर त्याचा पाया हा राजगड आहे कारण महाराजांनी त्यांच्या हयातील तब्बल पंचवीस वर्षे राजगड वर घालवले स्वराज्याचे चांगले वाईट अनुभव हे राजगड ने अनुभवलेत त्यात पुरंदर चा तह,पन्हाळ्या चा वेढा, शाहिस्तेखान ची फजिती,महाराजांची आग्रा वरून सुटका,त्याच प्रमाणे अफजलखान चा कोथळा बाहेर काढून त्याचे शीर हे राजगडी आणण्यात आले.छ. शिवाजी महाराजांवर आणि मावळ्यावर स्वराज्याचे बाळकडू माँ साहेबांच्या कडून याच किल्ल्यावर मिळाले त्यातच ह्या गडाने छ. संभाजी महाराज यांना कोवळ्या वयात पोरका होताना पाहिले आहे असा हा गड ह्या वर्षी करायचा म्हणून आम्ही योजना आखली.आणि सह्याद्रि परिवारासोबत श्री. राहुल नलावडे याना अभ्यास मोहिमेत सहभागी करून घेण्याचा योग आला. सरांचे मार्गदर्शन करताना एकदम साध्या देशी, साध्या वेशी मनमोकळेपणाने मार्गदर्शन करताना पाहून खर तर नवल वाटल , पण उरही भरून आला. कधी कधी नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी येतं. तो क्षण शब्दात मांडता येणं कठीण आहे. ज्याने शिवचरित्र जाणलं, अंतरी अनुभवलं, या रानावनात गीरीदुर्गात जगले. त्यांच्यासाठी इतिहास म्हणजे केवळ गोष्टी नाहीत, तर राहायचे आणि वागायचे कसे इथपासून ते राज्य कसे चालवायचे इथपर्यंतचे मार्गदर्शन आहे. गड-किल्ल्यांमधून ते होते; परंतु गड आणि किल्ल्यांना भेट देताना क्वचितच त्यांचा इतिहास वाचायला मिळतो. त्यामुळे अन्य राज्यांतून आणि परदेशातून येणाऱ्या इतिहासप्रेमींना एवढेच काय तर आपल्या पैकी हौशी नौशी so called trekers ला आपणच आपला देदीप्यमान इतिहास समजून घेण्यापासून रोखतो, अशी खंत आल्यावाचून राहत नाही,त्यातच  योगायोग म्हणजे ०४ डिसेंबर हा महाराजांची आग्रा वरून सुटकेचा स्मृती दिन सोहळा गडावर असल्याने याची देही याची डोळा नाही त्रिभुवणी असा सोहळा अनुभवता आला.


किल्ल्याची उंची: १३९४ मीटर

किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग

डोंगरांग: पुणे

श्रेणी: मध्यम

गडांचा राजा, राजियांचा गड

बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नद्यांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरूंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती, म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली राजगडला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वांत उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.

शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वकांक्षेची उंची दाखवतो.

राजगड संबधीचे उल्लेख

१) ‘राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून अषा ठिकाणी बसले आहेत की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला’ – जेम्स डग्लस (बुक ऑफ बॉम्बे)

२) साकी मुस्तैदखान त्याच्या मसिरे आलिमगिरे नावाच्या ग्रथांत म्हणतो-’राजगड हा अतिशय उंच, त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या द-याखो-यातून आणि घनघोर अरण्यातून वा-याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.

३) महेमद हाशिम खालीखान याने ’मुन्तखबुललुबाब-ए-महेमदाशाही’ नामक ग्रंथामध्ये म्हणतो, राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करू ? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते त्याचे टोक पाहून छाती दटपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळया प्रकारचे हिंस्र पशु दिवस. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.


इतिहास:-

इतिहासातून अस्पष्ट येणा-या उल्लेखांवरून सातवाहनपूर्व म्हणजेच साधारण २००० वर्षापूर्वीं पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन असावा.

राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप् फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याचवेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरूमदेवाचे गडकरी बिनशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रूद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरूमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बाळाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरूमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बाळाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला.

शिवरायांनी मुरूमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चित आहे.

शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिध्द झालेले एक वृत्त सांगते की,

शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.

सभासद बखर म्हणतो की,

मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुध्दा एक माची म्हणून गणली आहे.

मत्र सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठया झपाटयाने सुरू केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यास ही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी अंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तीचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती हया फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.

सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठयांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मुगलांना माघार घ्यावी लागली.

शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे – ‘सत्तावीस किल्ले’ तांब्रास दिले. निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला’.

शिवाजी महाराज आग्य्राहून निसटून निवडक लोकांनिशी ला राजगडाला सुखरूप् पोहोचले. २४ फेब्रवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिहंगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास याचा राजगडावरून १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरून राजगडाकडे हालविली.

३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले. यानंतर मुगलांनी मराठयांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र अद्याप संभाजी महाराजांना पकडलयाची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठयांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला.

जनेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ‘कानद खो-यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासुन संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत’ असा आदेश दिला होता.

पुढे ११ नोव्हेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून दयावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरूज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करून तयावर तोफा चढविल्या व बुरूजावर तोफां चढविल्या व बुरूजावर तोफांचा भडीमार करू लागले. तरबियतखान आणि हममीबुद्यीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हाती येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ’नाबशहागड’ असे ठेवले.

२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुंच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूंनी सुवेळा माचीस ३०० रूपये व संजीवनी माचीस १०० रूपये अशी व्यवस्था लावून दिली.

पेशवे काळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वारंवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीत राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते- राजवाडे खंड १२.

यांनतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत – खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुध्दा असत.


गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

पद्मावती तलाव:

गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठया प्रमाणात साचला आहे.

रामेश्वराचे मंदिर:

पद्मावती देवीच्या मंदिरासमोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा:

रामेश्वर मंदिरापासून पाय-यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडयाचे काही अवशेष दिसतात. या राजवाडयामध्ये एक तलाव आहे. या शिवाय राजवाडयापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारूकोठार आहे.

सदर:

ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू. रामेश्वर मंदिरापासून पाय-यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडयाचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

पाली दरवाजा:

पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पा-या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भजरपूर उंचीचे आणि रूंदीचे आहे, यातून हत्ती सुध्दा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरूजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्टय म्हणेज दरवाजाच्या वर आणि बुरूजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोटांना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ’फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवडया आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

गुंजवणे दरवाजा:

गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन पवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहे. गुंजवणे दरवाजाच्या दुस-या प्रवेशद्वाराला वैशिश्टपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवपूर्वकालात बांधलेले असावे.

पद्मावती माची:

राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. या पैंकी सर्वात प्रशस्त माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारूगोळयाची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.

पद्मावती मंदिर:

सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. शिवरायांनी किल्ले मुरूंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले याचा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूत्र्या दिसतात. मुख्य पुजेची मुर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित केलेली आहे तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर पहारेक-यांच्या देवडया आहेत. फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणानां राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबाईंची समाधी आहे.

संजीवनी माची:

सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरूवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुध्दा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरूज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उतरेकडे वळून तटालागत थोडेे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूंज लागतात. या तिन्ही बुरूजावर शिवकालात प्रचंड मोठया तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंडयांची व्यवस्था केलेली आहे. या भुयारातुन बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडयांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुध्दा येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमोर ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरूजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पाय-यांच्या दिंडया आहेत. तसेच नाळेतून वर येण्याासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढय बुरूज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

आळु दरवाजा:

संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे.

सुवेळा माची: मुरूंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुध्दा ३टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.

माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणा-या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारूती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चैथरे येसाजी कंक, तानाजी मालुसरे व शिळीमकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्प्यावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्वरी बुरूजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीचा खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरूज आहेत. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि खडकात 3 मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा ’हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुध्दा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

काळेश्वरी बुरूज आणि परिसर:

सुवेळा माचीच्या दुस-या टप्प्याकडे जाणा-या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.

या रामेश्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्वरी बुरूज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.

बालेकिल्ला:

राजगडाचा सर्वांत उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणार रस्ता कठीण आणि अरूंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळयाच्या समोरच उत्तरबुरूज आहे येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरूजाच्या खालून एक पायवाट बाले किल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरूजावरून वर येते त्या बुरूजाला उत्तर बुरूज असे म्हणतात. येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर बुरूजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चैथरे, वाडयांचे अवशेष आढळतात.

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधरण २ दिवस लागतात. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, सिहंगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

गडावर जाण्याचा वाटा

गडावर जाण्याचा वाटा

१. गुप्तदरवाज्याने राजगड: पुणे – राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापापासुन एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. यांच्या सहाय्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते

२. पाली दरवाज्याने राजगड: पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरून कानद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा. ही वाट पाय-यांची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास 3 तास लागतात.

३. गुंजवणे दरवाज्याने राजगड: पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे. या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.

४. अळु दरवाज्याने राजगड: भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो. शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.

५. गुपतदरवाजामार्गे सुवेळामाची: गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.

संदर्भ:-

गडांचा राजा राजगड -  प्र.के.घाणेकर

दुर्गराज राजगड       - राहुल नलावडे

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार


.

Wednesday, November 16, 2022

किल्ले लिंगाणा!!!

 _किल्ले लिंगाणा!!!

दि.१३ नोव्हेंबर २०२२

तारीख ९ ऑक्टोबर वेळ सकाळची घड्याळ्यात अदांजे ०८ वाजलेले असताना पावसाची संतत धार  होती. हवेत गारवा भरला होता आणि अशातच माझा फोन वाजला दादा इकडे अजून climate खूप खराब झालय काय करायचं गेले महिनाभर ह्या ट्रेक साठी काय काय केले त्याचा एक पटच डोळ्यासमोरून सरकला. कारण सर्व समीकरणे जुळवून आम्ही दुपारी ट्रेक ला निघणार होतो. तो ट्रेक होता लिंगाणा राजधानी रायगडच्या माथ्यावरून जगदीश्वर कडे आल्यावर काळ नदीच्या खोऱ्यातील एक सुळका कायम लक्ष वेधून घ्यायचा नाव त्याचे  किल्ले लिंगाणा. कधीतरी चढाई करूच अशा इराद्याने रायगडच्या गोड आठवणी आणि लिंगाण्याचे स्वप्न घेवूनच रायगड उतरायचो.  काही वर्षांपूर्वी मी केलेल्या लिंगाणा  ट्रेक चा वाईट आठवणी चा अनुभव असल्याने मी  पावसात जाण्याची  जोखीम पत्करली नाही आणि ट्रेक पुढे घ्यायचा ठरवला. पुढे जेंव्हा ठरलेल्या दिवशी ट्रेक जायचा ठरला . तो दिवस उजेडला लिंगाणा करायचाच त्या दृष्टीने सर्व तयारी आधीच झाली होती. एक भटका ट्रेक करण्यासाठीच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या थराला जाईल हे सांगणे कठीण. या ट्रेकला तशा सतराशे साठ विघ्न, पण साऱ्या अडचणींवर मात करून १३ नोव्हेंबर या तारखेला नेहमी प्रमाणे उशीर होत आम्ही १८ लोकांच्या चमू ने श्रीरामपूर सोडले.

नेहमी फ्रेश मनाने ट्रेकला जाणारा मी पण मलाही आज काहीतरी वेगळीच भीती जाणवत होती.कारण लिंगाणा असा एक ट्रेक आहे जितका तुम्हाला जास्त उशीर होईल तितका उशीर ट्रेक पूर्ण करण्यास होणार होता.कारण मी केलेल्या मागील  ट्रेक ला आमचा शेवटचा माणूस रात्री 2 वाजता पायथ्याला होता.त्यातच भर म्हणून कि काय रात्री पुण्यातल्या ट्राफिक मुळे पुण्यातून बाहेर पडायला तब्बल दोन तास लागले.त्यातच गाडीमध्ये बऱ्याच दिवसांनी सगळे मुल च ट्रेक ला असल्याने धिंगाना आरडाओरड ला तर सीमा नव्हती अशा या परिस्थितीत वेल्हा सोडला तसा चमत्कारीक रस्ताने आपले रंग दाखवायला सुरवात केली. गाडी १७ सिटर असल्याने तीचा बांधा तसा मोठा. त्यात अपेक्षित सिटापेक्षा जास्त मंडळी. गाडीची चाके आपल्या उर्जेप्रमाणे फिरत होती पण चमत्कार हा होता की गाडी पुढे जात नव्हती झाल सगळ्यांना खाली उतरावे लागले. आणि उतार आला की परत गाडीत बसायचो  पुन्हा चढ आला की पुन्हा उतरत होतो …. ड्रायव्हर डाव्या बाजुची दरी पाहून आधीच सावध व्हायचा आणि सगळ्याना खाली उतरायला लावायचा. ड्रायव्हर तर इतका वैतगला होता की याला दुसरा मार्ग नाही का अस सारख विचारत होता पण पर्याय च नव्हता

 अशातच पहाटे ०५ वाजता मोहरी गाव गाठले तिथे आमचे शिलेदार मंडळी आमची वाटच पहात होती आणि क्षणाचा ही विलंब न करता आम्ही आमचे सर्व सामान आवरून ट्रेक ला सुरवात केली.काळोखी रात्र आणि जंगलातून जाणार रस्ता तुडवत आम्ही बोरट्याच्या नाळेच्या तोंडाजवळ पोहचलो.



आता एव्हाना बऱ्यापैकी उजेड पडायला सुरुवात झाली होती.स्वतःचा तोल सावरत खडतर अशी ती नाळ उतरून आम्ही  रायलिंग पठाराच्या बाजूने दोरीच्या साह्याने तो कडा सर केला आणि समोर दिसु लागला तो भला मोठा लिंगाणा सुळका


आणि थोडयाच वेळात आम्ही लिंगणाच्या पायथ्याजवळ पोहचलो आणि सोबत घेतलेल्या नाष्ट्यावर ताव मारून सर्वांना equipment ची माहिती देऊन हर्णेस चढवून आम्ही चढाईला सुरवात केली .आमच्याकडे ट्रेकिंग चा अनुभव खूप होता पण एक दोघे सोडले तर climb च्या बाबतीतील अनुभव कमी होता त्यात काही नवीन मेम्बर यामुळे आम्हास पहिली रेज गुंफे पर्यंत चढून जाण्यास दुपारी ११.०० कधी झाले हे कळलेच नाही. पुढे आधीचा एक ग्रुप असल्याने २५-३० मिनिटामध्ये  आम्ही पुढील चढाई ला सुरवात केली. अतिशय कठीण अशी हि पुढील चढाई होती ती, कारण जस जसे एकेक टप्पा पार करत होतो तसतसे सुळका निमुळता होत होता त्यातच दोन्ही बाजूला महाकाय दरी असे आम्ही प्रत्येक टप्पा पार करत लिंगांना चा माथा गाठला खूप जल्लोष केला, लांबूनच किल्ले रायगड चे दर्शन घेतले पहिल्या चढाई चे ते क्षण कॅमेरा मध्ये फोटो स्वरुपात घेतले आणि परतीचा मार्ग निवडला, तेव्हा दुपारचे ०३ वाजले होते लगेच rappeling करून आम्ही गुफे पर्यंत येई पर्यंत  ०५वाजले होते. आता अंधार पडायच्या आत आपण नाळ चढायची म्हणून सर्वांनी सपसप आपली पावले उचलली पण माझ्यासोबत शेवटी काही वयस्कर मंडळी असल्यामुळे त्यांच्यासोबत थांबणे गरजेचे होते नाळेपर्यत येवोस्तोवर आता बऱ्यापैकी अंधार पडलेला होता अशा या परिस्थिती माझ्या सोबत केशव गगे असल्यामुळे सोबत च्या मंडळींना खडतर नाळ चढवून आम्ही सुटकेचा श्वास सोडला आणि थोडी विश्रांती घेऊन गाव गाठले एव्हाना आमची मंडळी जेवण करून आमची वाटच पहात होती आम्ही देखील जेवण करून गाडीत बसलो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील लिंगाणा सर केल्याचे जे समाधान होते ते स्पष्ट दिसत होते आणि हीच मंडळी सुळका चढताना म्हणायची मस्त रविवार होता घरीच अराम केला असता उगाच हे धाडस करायला आलो पण आता तीच मंडळी एक विलक्षण सुख देणारा अनुभव घेत होती आणि आम्ही श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो.

स्वराज्याची स्वप्ने ह्या दुर्गांच्या संगतीने, साक्षीने साकारलेले, या डवरत्या- फुलत्या दुर्गांनीच आपल्या मायेची पाखर घातली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर या पवित्र गडकोटांनीच या भूमीचे शतकानुशतके गुलामगिरीचे परचक्र परतवले. सह्याद्रीतला प्रत्येक किल्लाने इतिहासात एक सुवर्ण पान लिहिलेले. पण हा  लिंगाणा थोडा दुर्दैवी म्हणावा लागेल. वेगळ्या कार्यासाठी स्वराज्यात याचा वापर व्हायचा. लिंगाणा किल्ला म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळ. सर्वात वाईट शिक्षा काय असेल तर ती लिंगाण्याची शिक्षा. मरण्यासाठी इथे प्रत्येकाला स्वांतत्र्य. इतिहास काळातील संभाजी-गोदावरी प्रसंग चर्रकन मनाला वेदना देवून गेला.

लिंगाणा माथा गाठणे हे तस पाहिलं तर भल्याभल्यांचं स्वप्नच असते.आमच्या जवळपास सर्वच शिलेदारांनी हे स्वप्न सत्यात उतरवल  बलाढ्य आकार आणि थरार आठवणीतल्या साठवणीमधून कधीच न मिटनारा. एक ओळ मनात रुचली की

       “जिंदगी एक सफर है सुहाना … यहां कल क्या हो किसने जाना।”

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार





Wednesday, November 2, 2022

माझी खान्देश दुर्गवारी भाग १.

 दि.३०/१०/२०२२

कधी कधी अचानक ठरवलेली मोहिम पण खुप काही मिळवुन देते  सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात. मनात ठरवलेल नियोजन तंतोतंत अंमलात येते. सरतेशेवटी गोड आठवणी आणि चांगला सुखद अनुभव देऊन जाते.

असेच काही माझ्या  बाबतीत घडले. भाऊबीज साठी आलेली बहीण गेल्या एक वर्षांपासून धुळे येथे बदली होऊन आल्यामुळे तिला सोडायला रविवारी ड्रायव्हर ला पाठवणार होतो पण शनिवारी सकाळी अचानक मनात आले,सह्याद्रि भरपूर पालथा घातला त्या मानाने बागलाण ,खान्देश प्रांत नेहमीच मला भेटण्यासाठी आजही खुणावत आहे.त्यातच गेले काही दिवसांपासून कुठे भटकायला न गेल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या भाषेत बोअर होत होत त्यातच  या रविवारी एखादा चांगला ट्रेक करूया म्हणून लगेच आमच्या बहिणाबाई ला सांगितले.मीच येतो तुला सोडवायला आज रात्री निघुया. आणि माझा'खान्देश दुर्गवारी चा प्लॅन आखला. सुरवात कुठल्या किल्ल्यापासून करायची कारण एका दिवसात जेवढे किल्ले सर करता येतील तेव्हडे करायचे होते

आणि सुरवात "लळींग, सोनगीर,, डेरमाळ ,आणि गाळणा करायचे ठरवले.

 लगेचच प्लानवर शिक्कामोर्तब करून टाकले आणि रात्री  आठ वाजता आम्ही निघालो, आत्ता पर्यंत बरेच ट्रेक करून झाले  आहेत सहसा मला असे कधी होत नाही पण या वेळेस मात्र मी भलताच एक्साईट झालो होतो.कारण सह्याद्रि च्या बाहेर ट्रेक करण्यासाठी बऱ्याच दिवसांनी निघालो होतो. आम्ही रात्री बारा वाजता तिच्या घरी पोहोचलो एव्हाना बऱ्यापैकी थकलो असल्याने लगेच झोप लागली गेली

सकाळी सहा वाजता गजर वाजला, उठून तयारी करून सात वाजता  छोट्या भाचा ला सोबत  घेऊन लालिंग किल्ल्याला निघालो. आता सुरू झाली होती माझी 'खान्देश दुर्गवारी'.

तीस ते चाळीस मिनिटात लळिंग गावी पोहचलो.धुळे वरून निघाल्यानंतर  महामार्गाच्या उजव्या हाथाला, माथ्यावर तटबंदी धारण केलेला लळिंग किल्ला दिसला.

त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.






किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग पाहून झाल्यावर जेवण वैगरे करून सोनगीर किल्ला पाहण्यासाठी निघालो धुळ्यापासून साधारण २०कि.मी अंतरावर असणा-या गडपायथ्याला सोनगीर गाव लागते;तिथे पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.गावातून किल्ल्याकडे जाणा-या पायवाटेने काही मिनिटातच आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची एकसलग तटबंदी व त्यामध्ये असणारे वैविध्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात.सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने अधिक आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची बरीचशी पडझड झाली असून त्यातील प्रवेशद्वार मात्र सुरक्षित उभे आहे .येथून आत प्रवेश केल्यावर सुंदर नक्षीकामयाअसलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत पडते .ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पाय-यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते.सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्याकारणाने येथे नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत.

गडमाथ्यावर पोहोचताच आपणास जी तटबंदी दिसते तिथे मोठे दगड न वापरता अनेक लहान दगडांचा एकमेकांवर रचून वापर केला आहे.

आपण ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणा-या पायवाटेने दक्षिण बाजूला असणा-या बुरूजाच्या माथ्यावर जायचे .या बाजूस तट तसंच बुरूज वगळता इतर कोणतेही दुर्गअवशेषर शिल्लक नाहीत.त्यामुळे येथून माघारी फिरून आपण गडाच्या उत्तर टोकाकडे जायचे.या वाटेवर आपणास इतिहासकाळात तेल साठविण्यासाठी वापरले जाणारे एक दगडी रांजण निदर्शनास पडत.गडावर बऱ्यापैकी आता पडझड झाल्यामुळे फारसे अवशेष पहावयास नाही मिळत.इ. स.१३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती .पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने सोनगीरवर हल्ला चढवून हा किल्ला जिंकून घेतला.पुढे म्हणजे इ.स. १६०१ मध्ये खानदेशामधील फारूकी घराण्याचे राज्यसंपुष्टात आले.त्याकाळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता.त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले .त्यामुळे अकबर बादशाहने त्यास सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले.१७५२ पर्यंत हा किल्ला मोगलांच्याच ताब्यात होता,पण त्याच वर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला .त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नाराशंकराकडे दिला .१८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला. 





हा किल्ला पाहून झाल्यानंतर मी माझा मोर्चा थाळनेर कडे वळवला सोनगीर पासून साधारण ३५ कि.मी.असणाऱ्या तापी नदी च्या किनाऱ्यावर असलेल्या थाळनेर गावापासून १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. आज दुदैवाने किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.

किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.

१) जमादार वाडा :- गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक ‘‘जमादार वाडा’’ म्हणतात. या गढीत आजमितीला अनेक कुटुंब रहातात. वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दारा खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. घरातील साध्या खुंट्या, कोनाडे यांच्यावरचे नक्षीकाम गढी बांधणार्‍यांच्या रसिकतेची कल्पना देते. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते आस्थेने गढी दाखवतात, पण त्याच्या इतिहासाबद्दल व पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल ते अनभिज्ञ आहेत. गढीच्या प्रवेशद्वाराशेजारी रामसिंग व गुमान सिंग ही नावे लिहीलेली दिसतात.

२) १० कबरी:- थाळनेरवर राज्य करणार्‍या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे, १) मलिक राजा २) मलिक नसिर ३) मिरान अदील शहा ४) मिरान मुबारक खान

थाळनेर हा किल्ला  मलिक फारुकी च्या काळात खानदेश प्रांताची राजधानी होती.दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्याकडून मलिकवर खान याने थाळनेर व करवंद या परगण्यांची जहागिरी मिळविली. त्याने थाळनेर ताब्यात घेवून फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करुन 1370 मध्ये थाळनेर येथे त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधला. एका बाजूने तापी नदी, तर दुसऱ्या बाजून तटबंदी आणि बुरुज बांधून किल्ला भक्कम करण्यात आला होता. 1600 मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशाह फारुकी याचा पराभव करीत थाळनेरवर ताबा मिळविला. मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निंबाळकर, होळकर घराण्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले आहे. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लॉप याने मराठ्यांचा पराभव करुन तो 1818 मध्ये इंग्रजी राजवटीच्या अंमलाखाली आणला.






आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागल्याने माझ्या प्लॅन मधला चौथा किल्ला गाळण न करताच थांबलो .  लवकरच दुसऱ्या भागात खान्देश चे राहिलेले किल्ले करण्याचा निश्चय करून परतीचा मार्गे लागलो.

या सर्व प्रवासात निश्चितच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सह्याद्रि च्या मनाने या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नसली. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तेअस्तित्वाशी झुंजत उभे आहेत.

इतिहास संदर्भ :- ट्रेकक्षितिज

सचिन भांड

Wednesday, October 19, 2022

दिवाळी आणि किल्ले बांधणी

 

डोंगरांनो का उभे? सांगाल का काही मला?

तीनशे वर्षांचिया जो मागला तो मामला

कुणी फिरस्ता हिंडता वनी,

वदला ऐशी आर्जववाणी ।

ऐकून त्याची आर्त याचना,

आली येथल्या जडा चेतना।।

मला विचारा मीच सांगतो,

आधी या माझ्याकडे, सरसावत एकेक पुढे,

हात उभारूनि घुमू लागले, डोंगर किल्ले बुरूज कडे ।।

कवी यशवंत यांनी सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावर उभ्या असलेल्या गडकोटांबद्दल लिहून ठेवलेले हे सुंदर काव्य. गडकोटांमध्ये रमणाऱ्यांना ते अनेकदा आत्मगानच वाटते. या काव्याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे दिवाळी आलीय आणि दिवाळी म्हटले की आपल्या सर्वांना आता ओढ लागते ती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची! दिवाळी म्हटले की, जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच अंगणातील किल्लाही आठवतो. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला! 

खर तर लहान असताना मी  कधी ही किल्ला बनवला नाही कारण आपल्या भागात पुणे मुंबईच्या मानाने ही प्रथा फारशी परिचित नव्हती त्यातच त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज समजले ते फक्त शाळेतली पुस्तकांच्या पुरतेच पण पुण्यात असताना आमच्या ग्रुप ने जेंव्हा किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली तेंव्हा खर तर कळले की किल्ले दिवाळी मध्येच का बनवतात. तेंव्हा खर तर त्या लहान मुलांचा अगदी त्या सिमेंट च्या जंगलात देखील ज्या पद्धतीने ती मूल त्या मातीत  रममाण होत होती आपला इतिहास जपत होती ते पाहून आपण ते बालपण जगण्यापासून किती वंचित राहिलो हे जाणवले आणि एकीकडे आपल्याकडे सगळी मुबलकता असून देखील या संस्कृती पासून बऱ्यापैकी आपली मुल ही अपरिचितच आहे.खर तर या किल्ले बनवण्यासाठी लागणाऱ्या माती पासूनच आपला इतिहास ही लहान मुले शिकायला लागतात आणि त्याच मुळे कदाचित आज ही आपण बघतो आपले ट्रेकिंग क्षेत्र असो अथवा इतिहास अभ्यासक असो ते ही या शहरी भागातून बघावयास मिळते असे मला वाटते.

म्हणूनच जेंव्हा पासून आपल्या गावी आलो आणि आपला हा परिवार उभा राहिला तेंव्हा पासूनच ही संकल्पना मनात घर करून उभी होती . ही संकल्पना मागील वर्षी माझ्या सहकाऱ्यांच्या समोर मांडली कारण अशा प्रकारची स्पर्धा भरवणारे सह्याद्रि ट्रेकर्स हा आपला पहिलाच श्रीरामपूर मधील ग्रुप होता आणि बघता बघता पहिल्याच वर्षी श्रीरामपूर च्या या छोट्या मावळ्यांचा इतका उत्साह होता की पहिल्या च वर्षी पन्नाशी च्या आसपास छोट्या मावळयानी सहभाग नोंदवून आपला हा वैभवशाली इतिहास अनुभवला.

आता हे किल्ले का बनवायचे आणि दिवाळीतच का बनवायचे हे देखील जाऊन घेणे तितकेच महत्त्वाचे .

 शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या सहाय्याने स्वराज्य उभे केले आणि तमाम महाराष्ट्राला दिवाळी साजरी करता येऊ लागली कारण तो पर्यंत कायम पारतंत्र्यात राहिलेले आपले पूर्वज कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ त्यातच अमानुष अत्याचार त्या मुळे कुठली दिवाळी न कुठला दसरा पण  महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केले तेंव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी सण हा साजरा होऊ लागला .त्यातच आपल्या महाराष्ट्रातील किल्ले, गड यांना अगदी पूर्वीच्या काळापासून अनन्यसाधारण महत्व आहे. आपले किल्ले हे पूर्वजांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा हि त्याच्याशीच निगडित आहे. आपल्या लहानग्यांना ह्याच इतिहासाची आणि पराक्रमाची माहिती व्हावी तसेच त्यांना त्याची गोडी लागावी हा एक उद्देश दिसून येतो.म्हणूनच कदाचित हा  सण साजरा करताना महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची आठवण म्हणुन दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा चालू झाली असावी.

असो, या निमित्ताने का होईना लोक किल्ल्यांची आठवण ठेवायला लागले आणि आपल्या लहानग्या सोबत आपणही इतिहास ह्या किल्ल्यांचा रूपाने का होईना अनुभवू लागले हे काय कमी आहे का .

Friday, September 16, 2022

सफर एका ऐतिहासिक राजमार्गाची


 चावंड आणि नाणेघाट ट्रेक

दि.११ सप्टेंबर २०२२

आम्हा सह्याद्री च्या भटक्यांना  फक्त भटकायला निम्मित लागते मग ऊन, वारा, पाऊस काहीही असो भटक्यांना त्याची फिकीर नसते कारण ह्या  सह्याद्रीचा मुकुटमणी शोभणारे गडकिल्ले आम्हास  सतत खुणावत असतात. त्यात पावसाळ्यातील भटकंती म्हंटल्यावर आमच्या परिवाराची कार्टी तर गुढघ्याला बाशिंग बांधूनच तयार. आमचं तर आता अस झालय न जस लग्नाची तारीख धरली की लगबग  चालू होते तसे आमचे फोन वाजायला लागतात सर मी येणार म्हणून.गेली अनेक वर्षे सह्याद्रि फिरतोय  पण गेली ३-४ वर्षांपासून जो काही सह्याद्री पालथा घातला त्यात आमच्या या ठरलेल्या तारखांच्या मोहीमा आजपर्यंत क्वचित एखादी सोडल्यास कधी चुकल्या नाहीत अन त्या कधी चुकणार हि नाहीत. त्याच कारण लिहीत गेलो तर त्यावर एक वेगळा ब्लॉग नक्कीच होईल. त्यामुळेच दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळी ट्रेक चा शेवट अशा ट्रेक ने करायचा ज्याच्या आठवणी चिरंतन मनात कायम राहतील.म्हणूनच काही वर्षांपूर्वी आमच्या ग्रुप ने असच भर पावसात चावंड आणि नाणेघाट केला होता तोच ट्रेक परत करायचा विचार आला . त्यात जीवधन किल्ला अन परिसराशी माझ एक आपुलकी च नात तयार झालय कारण सह्याद्रि प्रतिष्ठान बरोबर काम करताना पायरी मार्ग मोकळा करण्याच्या कामात थोडाफार खारीचा वाटा उचलता आला त्यामुळे तो एक अभिमान मनाशी बाळगून होता.

आमच्या परिवारात काही जणांना तर इतकं व्यसन लागलंय की त्यांचं कायम म्हणणं असत  " कुठंबी चला सर  पण आम्हाला सोडून जाऊ नका".इतकं त्यांचं ट्रेक साठी काही पण अन कधी पण अस झालंय.

    खर तर सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाण आणि याच बुलंद गडदुर्गांनी नटलेला निसर्गरम्य तालुका म्हणजे जुन्नर. जुन्नर तालुक्यात ८ किल्ले, १२ लेणी समूह, अनेक प्राचीन मंदिरे आहेत. आता आलं पुढच नियोजन निघायची वेळ, पोटापाण्याचा प्रश्न. अहो शिक्षण घेताना कधी एवढं नियोजन केलं नसल तेवढं नियोजन सह्याद्रीतली  मोहीम करायला लागतय पण सगळ्या मोहिमेत माझ्या  सोबत असलेल्या सहकाऱ्यांमुळे नियोजन कस पद्धतशीर असतय. आणि ११ सप्टेंबर ला रात्री १२.३० वाजता निघायचं  ठरल.अन नेहमी सारख ह्या वेळेस तरी आम्हाला निघायला उशीर होणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेऊन आमचा प्रवास चालू झाला.

सातवाहन काळात प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण हि सातवाहन राजांची राजधानी होती तर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर हि उपराजधानी होती. त्यामुळेच प्राचीन काळापासून जुन्नरचे व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यात प्रामुख्याने शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, नारायणगड, निमगिरी, हरिश्चंद्रगड, सिंदोळा हे किल्ले येतात तर दार्या घाट, माळशेज घाट, नाणेघाट हे प्रमुख प्राचीन घाटमार्ग येतात.नालासुपारा कल्याण, बंदरातून येणार माल हा जुन्नर मधूनच पुढे जाई याच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली गेली.

आता  जसा जसा चावंड जवळ येत होता तस तस पहाटेच्या कोवळ्या प्रकाशात त्याचा शंकू सारखा दिसणारा आकार, ताशीव कडे, गडाची भव्यता लांबूनच दिसून येत होती. पहाटे ०५:०० च्या सुमारास आम्ही चावंड पायथ्याशी  पोहोचलो तिथे आमचा सह्याद्रि मधील सवंगडी मारुती वाटच पहात होता अजून जराशी काळोखी रात्र असल्याने सर्वांना बस मधेच आराम करावयास सांगितले आणि एक तास आराम करून सर्वजण फ्रेश होऊन तयार झाले. सकाळी ०८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. गड चढताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एका गोष्टीच सुख मात्र होत ते म्हणजे कोणतही ओझं घेउन न चढण्याच, नाही तर सगळा सरंजाम सोबत घेऊन गड चढायची सवयच लागलीये आम्हाला. चावंडची चढाई तशी काही अवघड नाही अर्ध्यापर्यंत प्रशस्त सरकारी पायऱ्या केलेल्या आहेत तर पुढच्या भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत या मार्गाने तासाभरात गडावर येता येते. जसजसे किल्ल्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती तसतसे खाली उंचावरून नजर पुरेल त्याठिकाणी निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आविष्कार पहायला मिळत होता तो नजरेत साठवून घेत पुढे चालत होतो .चावंड किल्ला नेमका कोणी बांधला याचे पुरावे सापडत नाहीत. बहामनीचे साम्राज्याचे तुकडे झाल्यानंतर ज्या प्रमाणे आदिलशाही कुतुबशाही निर्माण झाल्या त्याचप्रमाणे इ .स १४८५ साली मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली व त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाला त्यात चावंडचे नाव आढळते. इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीला मुघल व आदिलशाह यांच्या पासून वाचवण्यासाठी शहाजी राजांनी केलेल्या तहात चावंड मुघलांच्या ताब्यात गेला. गडाला अनेक नावे आहेत चामुंड, चावुंड, चावंड हि नावे गाडावर असलेल्या चामुंडा देवीच्या नावावरून आली असावीत. पुढे स्वराज्यात मावळ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर महाराजांनी गडाचे नाव प्रसन्नगड ठेवले. पुढे पेशवे काळात राजकीय कैदी ठेवण्यासाठी गडाचा वापर होई. पायऱ्या चढून वर आल्यानंतर कातळात कोरलेला गडाचा दरवाजा लागला त्यावर बारीक गणेश शिल्प कोरलेले आहे.

किल्ले चावंड प्रवेशद्वार

आम्हला गडावर असणाऱ्या सलग सात टाक्यांचे म्हणजेच सप्तमातृका यांचे प्रमुख आकर्षण होते. आम्ही लवकर निघाल्यामुळे अजून तरी गडावर कोणीच न्हवतं फक्त आमचाच ग्रुप होता. दरवाज्यातून डाव्या बाजूने पुढे गड फेरीसाठी निघालो तर वाटेत हरिश्चंद्रगडावर आहे तशीच पुष्करणी पाहायला मिळाली त्यातील पाण्याची अवस्था फारच वाईट होती. पुष्कर्णीच्या देवड्यांमध्ये भग्न अवस्थेत पडलेली महादेवाची पिंड, गणेश मूर्ती आढळली. समोरच पडलेली कमान व त्याखाली महादेवाची पिंड आहे तिथेच तुटलेल्याला अवस्थेतला नंदी आहे. गडावर अशे भरपूर अवशेष वाईट अवस्थेत पडून आहेत त्यावर संपूर्ण गवत माजल्याने ते नजरेस पडत नाहीत व थोडा आडवाटेवरला किल्ला असल्याने सहसा इकडं कोणी फिरकत नाही. पण ह्या आडवाटेवरल्या गडांच्या अनवट वाटा तुडवल्याशिवाय त्या गडाचं अन तिथं घडलेल्या इतिहासच महत्त्व कळत नाही. ह्या सगळ्या वास्तू कॅमेऱ्यात कैद करून घेतल्या.

गडावरील अवशेष

गडाच्या मध्यभागी असलेल्या छोट्या टेकडीवर चामुंडा देवीचे मंदिर आहे. चारही बाजुंनी गडाचा माथा पालथा घातला जिथून गडफेरीसाठी सुरुवात केली तिथे येऊन पोहोचलो पण सात टाक्या कधी मागे गेल्या कळलंच नाही.

सप्तमातृका 

    प पुढे वाट टेकडीवर असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराकडे वळवली. चामुंडा देवी प्रामुख्याने राजस्थान, बिहार या प्रदेशात आढळते. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. मंदिरात देवीची शेंदूर लावलेली प्राचीन मूर्ती आहे. आजूबाजूला मंदिराचे जुने अवशेष आहेत आताचे नवीन मंदिर हे गावकऱ्यांनी बांधलेले आहे. गडावरून माणिकडोह धरणाचा सुंदर नजर दिसतो. गड बघून झाल्यानंतर परतीच्या मार्गाला लागलो. आता आमहाला खुणावत होता तो सातवाहनकालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग नाणेघाट. गाडीत बसल्यावर शांत कुठं कोण बसतंय, मग एकमेकांची खेचत गाडी नाणेघाटाच्या दिशेनं दिमटीवली. वाटेत अंजनवाळे गावा जवळ एकाच डोंगर रांगेवर असलेली लहान मोठे सुळके दिसतात. हा डोंगर म्हणजे व्हराडी डोंगर गावकऱ्यांकडून या डोंगरात वऱ्हाड लुप्त झाल्याची कथा सांगितली जाते म्हणूनच त्याला वऱ्हाडी डोंगर म्हणतात.

      सह्याद्रीचा कोणताही डोंगर बघितला कि मनात अनेक विचार चालू होतात. त्याचा आकार, त्याची रचना, त्याला काही इतिहास आहे का? त्याचावर काही बांधकाम असेल का? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यावर जायची वाट कुठून असेल. हे असं सगळ माझ्या डोक्यात घुटमळत असत. जस जस घाटघर जवळ येत होत तसं तस एक हलकीशी धुक्यांची चादर अंगावर येत पुढे येणाऱ्या स्वर्ग सुखाची चाहूल देत होती. नाणेघाटाला पोहचताच वाटेत असलेला भला मोठा दगडी रांजण आपल स्वागत करून आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात घेऊन जातो. नाणेघाट म्हणजे सातवाहन कालीन महाराष्ट्राचा राष्ट्रीय महामार्ग. नाणेघाटचे बांधकाम सातवाहन काळात इ.स.पू. पहिल्या शतकात हे खोदकाम झाले. नालासोपारा कल्याण बंदरातून येणारा माल जुन्नर हूनच पुढे पैठणला जाई त्यावेळी कोकण व जुन्नरला जोडणारा नाणेघाट हा प्रमुख मार्ग होता.  सातवाहन हे इ.स.पू. २३० ते इ.स. २२० या कालखंडात दख्खनच्या पठारावर राज्य केलेले राजघराणे होते यांचे राज्य वर्तमान महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांत पसरले होते. आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. इ.स.पू.च्या पहिल्या शतकात मौर्य नंतर भारताच्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश मानला जातो. नाणेघाट रचना हि डोंगर खोदून केलेली आहे. इथं अनेक गुहा आहेत या प्रत्येक गुहे समोर पाण्याचं टाकं पहायला मिळत. इथं असलेल्या दगडी रांजणाचा वापर जकातीचे पैसे टाकण्यासाठी केला जात असे. व्यापाऱ्यांनी घाटाचा वापर केल्याबद्द्दल रांजणात पैसे टाकले जात हा दगडी रांजण म्हणजे त्यावेळचा टोल नाकाच. गणेश मूर्ती, कातळावर कोरलेले हनुमान शिल्प, दगडी रांजण, गुहेत भिंतींवर कोरलेले शिलालेख, या शिलालेखा बाबत सांगायचं झाल्यास हा शिलालेख ब्राम्ही भाषेत सातवाहन काळातील साम्रादनि नागणिका हिच्या काळात लिहिलेला वाचण्यास येतो या शिलालेखात सातवाहन राजांनी जे काही पराक्रम, दानधर्म केले आहेत त्या विषयी चा उल्लेख आढळतो असाच शिलालेख आपल्याला नाशिक जवळील पांडवलेणी इथे देखील आढळतो कातळात कोरलेल्या पायऱ्या स्थापत्य शास्त्राची सारी अदभूत किमया इथं अनुभवायला मिळते.

असा हा राजमार्ग बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा नानाच्या अंगठया कडे वळवला खरा पण वर आल्यावर दाटधुक्या मुळे कड्याच्या समोरील दृश्य काहीच दिसत नव्हते आणि बऱ्याच वेळेस पावसाळी ट्रेक ला आम्हाला हुलकावणी देणारा पाऊस या वेळी आमच्या स्वागतास सज्जच होता असा ह्या पावसाचा आणि खळखळनाऱ्या झऱ्यांचा तर काहींनी मनमुराद आस्वाद लुटला त्यात सर्वात म्हणजे आमची जेष्ठ मंडळी अन बाल गोपाळ त्यांचा चेहऱ्यावर चा आनंद पाहून त्यांना कुठलीही घाही न करता त्यांना त्यांचा आनंद घेऊ दिला.आणि सर्वांना सुखरूप खाली आणून आम्ही रिव्हर्स वॉटर फॉल कडे मार्गस्थ झालो.

जस जसे आम्ही धबधब्या जवळ येत होतो तस तसे अधून मधून  धुक्याच्या चादरीतून वानरलिंगी सुळका हळूच डोके वर काढत होता.वानरलिंगी सुळका म्हणजे सातशे-आठशे फूट उंचीचा जीवधन किल्ल्यापासून वेगळा झालेला अजस्त्र अभेद्य बेलाग खडा सुळका. जेंव्हा जेंव्हा जीवधन ला येतो तेव्हा तेव्हा इच्छा होत असते एकदा का होईना हा सुळका सर करायचा पण अजून तरी तो योग् आला नाही पण यावर्षी तरी तो सर करायचाच हा निश्चय करून आम्ही फ़ॉल कडे वळालो.

पावसाळी ट्रेक ला जायच म्हटल कि पावसाच्या सरी अन धबधबा असेल तर अजून मनमोहक वाटत. आणि त्यात जर नाणेघाट ला आलात अन  उलट्या पाण्याचा धबधबा न पाहताच गेला तर तुम्ही ह्या ट्रेक च्या सर्वात अविस्मरणीय क्षणाला मुकलात म्हणून समजा.

येथील खासियत म्हणजे उलट्या पाण्याचा धबधबा.अगदी पावसाच्या सरी कोसळाव्या त्याप्रमाणे डोंगर दऱ्यातील पाणी या ठिकाणी वाहत येते आणि कड्यावरून खाली कोसळण्या ऐवजी उलटे वरती येते. परंतु वातावरणात कुठल्याही प्रकारची हवा नसल्याने आम्हाला  काही तो अनुभव घेता आला नाही. परंतु वरुण राजाने हलक्याश्या सरी आमच्या अंगावर शिंपडून ती इच्छा देखील पूर्ण केली  क्षणभर तिथून दिसणारा जीवधन ,वानरलिंगी सुळका त्यात अधून मधून येणारे दाट धुक्यांचे लोळ ते चित्र डोळ्यात साठवून ठेवावे असे होते.असे हे अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवून आम्ही चिंतामण कडे जेवणासाठी निघालो आता एव्हाना लवकरात लवकर पोटातल्या भट्टीत लागलेली आग विझवायची होती त्या मुळे सर्वांनी च आपली पावले वाढवली अन तिथे सर्वांनी मनमुराद जेवणाचा आस्वाद घेऊन परतीचा प्रवासाला लागलो

निसर्गाने नटलेल्या व तितकाच इतिहास संपन्न असलेल्या ह्या एक दिवसाच्या मोहिमेत भटकंतीत भरपूर काही जगायला मिळालं  सिमेंटच्या जंगलापासून दूर जिवलगांसोबत सह्याद्रीच्या सानिध्यात इतिहास उलगडणाऱ्या आड वाटा जगायला मिळाल्या. 


सर्वांचे पुनःश्च धन्यवाद

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स,परिवार 🚩

Thursday, September 1, 2022

दूधसागर एक फेसाळते सौंदर्य

     


दूधसागर ट्रेक 

27& 28 ऑगस्ट 2022

    एक काळ असा होता की गोवा म्हंटल की कधीही तयार असायचो अन आता कोणी म्हंटल का काहीतरी कारणे देऊन टाळायचा प्रयत्न करतो कारण जेव्हा पासून सह्याद्रि फिरतोय तेव्हा पासून तिथले नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! आता नकोसा वाटतो कारण मनात एक विचार येतो  तेवढ्या दिवसात तर माझा एखादा मस्त  range trek पूर्ण होऊ शकेल पण याच गोव्याची आम्हा भटक्यांसाठी  एक बाजू अशी आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. आणि गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. म्हणूनच काही वर्षांपूर्वी माझ्या जुन्या ग्रुप सोबत जाण्याचा योग आला होता पण रस्त्यातच एक वाईट बातमी कानावर आली तिथे एक दुर्घटना घडल्यामुळे दूधसागर धबधबा काही दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे त्या मुळे जरा हिरमोड झाला होता खरा पण तिथल्या गाईड ने आम्हाला दुसरा पर्याय दिला तिथूनच जवळ असलेला तांबडी सुर्ला धबधबा पाहण्याचा आणि लागलीच आम्ही तो पर्याय निवडला कारण एवढ्या लांब येऊन खाली हात परत जाणे हे मनाला पटणारे नव्हते आणि तेव्हा पासूनच हा ट्रेक माझ्या buket list  वर होताच पण दरवर्षी काही न काही विघ्न येऊन मुहूर्त काय लागत नव्हता पण  यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना priority वर हा ट्रेक टाकला . आणि वेळेचं गणित जुळून येतय असं दिसताच ही संकल्पना माझे सहकारी चंदन सर आणि उमेश यांच्यासमोर मांडली आणि दोन महिने आधी ट्रेक बुक करून टाकला.

सह्याद्रि परिवाराचा हा महाराष्ट्रा बाहेर आणि रेल्वे ने पहिलाच ट्रेक असल्याने त्याचा संपूर्ण अभ्यास माझ्या जुन्या सहकारी मित्रांच्याकडून करून घेतला ट्रेक ला दोन महिने असल्याने मध्ये एक अंधारबन चा एक अविस्मरणीय ट्रेक केला.

दूधसागर ट्रेक हा माझा महत्वकांक्षी ट्रेक असल्यामुळे पुढे काही घरून विघ्न येऊ नये म्हणून एरवी महिन्यातून तीन  रविवारी तरी बाहेर हिंडणार घरात बसलेलो होतो तेव्हा आम्हा हिंडफिऱ्या लोकांना कायम पडणारे टोमणे म्हणजे आज  चक्क घरी जायच नाही का कुठे असे एक न एक टोमणे गुमान ऐकत बसावं लागत असे.असो मजेचा भाग वेगळा.


आणि तो दिवस उजेडला ठरलेल्या वेळेप्रमाणे श्रीरामपूर स्टेशनवर  इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण एक च्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १६ तास घेते! पण थेट कुलेम स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ५० जणांचा ग्रुप होता. एव्हाना आमची ट्रेन एक एक स्टेशन पार करत असताना  गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, काही खेळ आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुलेम  स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ५० जणांचा ग्रुप, यामुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले!अन तसेही प्रवासात माझे न झोपेच वावडच म्हणा म्हणून पुस्तक चाळावयास घेतले काही तासाभरानंतर जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! मग परत खाली उतरून पाय मोकळे करून यायचे असा क्रम चालू झाला जस जसे कुलेम स्टेशन येत होते तसतसे 5-5 मिनिटाला गाडी थांबत होती कारण रात्री जंगलात उतरण्यास बंदी असल्याने काही दूधसागर ला येणारी मंडळी तिथे उतरली असल्यामुळे  रात्री पासूनच जी मंडळी पोलिसांनी अडवून ठेवलेली  होती  त्यांना गाडीत बसवत होती त्या मुळे रात्रीच्या काळोख्या अंधारात कुठले स्टेशन आले ते समजायला मार्ग नव्हता त्यातच गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास आम्ही कुलेम स्टेशनवर उतरलो.तिथे आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्या गाडीत आमच्या ब्यागा टाकून  आम्ही लगेचच चहाची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. तो पर्यत सर्वांना ट्रेक च्या सूचना देऊन आम्ही सहा वाजता आमचा ट्रेक चालू केला . तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं.पण परत आम्हाला साडेचार ची ट्रेन पकडायची होती म्हणून मनात ती धाकधूक हाती 

आणि आमचा तांडा मार्गस्थ झाला. सप्टेंबर  महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तांबड्या मातीतील रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. गावातील उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले.तासाभराच्या जंगल पदभ्रमंती नंतर आता आमचा ट्रेक हा रेल्वेच्या पटरी ने चालू झाला एरवी सह्याद्रि चे डोंगर दर्या तुडवानरे आमचे पाय पहिल्यांदाच पटरीच्या मार्गाने रस्ता काटत  होते तो मार्ग इतका अविस्मरणीय होता की नागमोडी तो रेल्वे ट्रेक त्याचा सोबतीला दोन्ही बाजूने घनदाट अरण्य त्या मुळे तिथे फोटो घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार पटरिचा साधारण सहा सात किमी च अंतर पार केल्यानंतर इतक्यात दूधसागर चा’  फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूने रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाच एक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. आजूबाजूला असणारे एक विशिष्ट प्रकारच्या झाडांची मांडणी पाहताना. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातुणच चालू लागलो ! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. फोटो मुळे आता उशीर होयला लागला होता पाहिजे त्या वेळात अंतर कटत नव्हते म्हणून मुकाट्याने कॅमेरा बंद केला त्यातच गेली दोन दिवस तब्येत ठीक नसल्याने एरवी हवा हवा सा असणारा उत्साह शेवट पर्यत अजिबातच जाणवला नाही त्यामुळे उशिर होऊ नये म्हणून काही मंडळी च्या वर पहिल्यांदाच  ट्रेक ला  चिडचिड देखील झाली

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता दमट उष्म्यात बदलला होता. तशी चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती.आता एव्हाना नास्ता साठी थोडीफार भूक वाट पाहतच होती न जंगलातच एका घरी सर्वांनी मनसोक्त नास्ता चा आनंद लुटून क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा त्या जंगल वाटेने मार्गस्थ झालो .अन रस्त्यात एक नाला लागला एरवी फक्त काही social मीडियावर पाहिलेला तो झुलता पूल पाहून तर सर्वांचेच मन तृप्त झाले आणि तो सर्वांच्या तोंडावर दिसणारा आनंद पाहून मला देखील त्यांचे हे भाव माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरला नाही तेथून पुढे आल्यावर  थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. डावीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला.थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो  काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो


ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे असा निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. सर्व जण ते क्षण धबधब्यासमोर उभे राहून समोरच्याच्या कॅमेरात कैद करत होते. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे मी कॅमेरा काढला देखील पण धबधब्याच्या तुषाराने lence वर सारखे दव तयार होते त्या मुळे हवे तसे फोटो घेता नाही आले  मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.आता वातावरणात बर्या पैकी दमट पणा निर्माण झालेला होता त्या मुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर थकवा आता जाणवू लागला बरीचशी मंडळी पुढे निघून गेल्या मुळे मी नेहमी प्रमाणे मागे थांबलो असल्यामुळे मागे असलेल्यांना धीर देत सर्वांनीच ट्रेक पूर्ण केला आता एव्हाना सर्वांच्या पोटात कावळे हे कोकत होते त्या मुळे सर्वांनीच अतिशय रुचकर अशा जेवणावर ताव मारून स्टेशन गाठले.

काही गोड काही कटू आठवणीत आता ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण सह्याद्रि परिवाराचे महाराष्ट्र बाहेरील  पहिलाच ट्रेक पूर्ण केल्याचे एक आत्मिक समाधान मनात होते. ह्या ट्रेक दरम्यान देखील सर्व सर्व सदस्या च्या मदतीने परिवाराचा हा ट्रेक देखील अगदी सुखरूप पूर्ण झाला त्या बद्दल सर्व सदस्यनचे मनःपूर्वक धन्यवाद


सचिन भांड पाटील

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार

                   






Wednesday, July 27, 2022

अंधारबन एक स्वर्ग

 पावसात मस्त भिजायचे, हिरवेगार डोंगर पालथे घालायचे, धबधब्याखाली चिंब व्हायचे आणि भिजून झाल्यावर टपरीवर गरमागरम  भजी आणि चहा आहाहा....! 

असे अनेक अनुभव सर्वांनाच अनुभवायचे असतात. खर तर हे सगळ अनुभवण्यासाठी सगळे जण अगदी आसुसलेले असतात. आणि हे सगळे अनुभव पावसाळी ट्रेक शिवाय कसे येणार. अशा वेळी खरी धांदल उडते ती आम्हा ट्रेकर्सची गड किल्ले करु की धबधबे पाहू की जंगलात जाऊ, असे एक ना अनेक!


आजकाल आठवड्याच्या प्रत्येक रविवारी पावसाच्या ट्रेक आणि सहलीला जाण्याची क्रेझ आणि त्यात भर त्या सेल्फीकाठी घेऊन फोटो काढण्याची क्रेझ खूप जास्त वाढली असल्याने घाटाच्या प्रत्येक वळणावर माणसांची आणि वाहनांची धोकादायक तुफान गर्दी आढळते. जर असेच निसर्गाचा ऱ्हास करणारे लोंढे च्या लोंढे इकडे घाटमाथ्यावर वाहू लागले तर निसर्गाचा ऱ्हास लवकरच होईल याची भीती वाटते.

“निसर्गात फिरा परंतु तिथले नुकसान नका करू”  “संवर्धन करायला जमत नाही तर निदान संहार तरीकरु नका .”  हा एक नियम पाळला तरी आपणच आपली जैवविविधता सुरक्षित ठेवून आरोग्य सुरक्षित ठेऊ शकू.

सध्या दररोज च्या बातमीपत्रांमध्ये आपण वाचतो आहोतच की बरेच लोक दारू पिऊन सहलीला जातात तर जातात आणि गडकिल्ल्यांवरदेखील जातात कचरा करतात, असभ्य वर्तन करताना दिसतात, निसर्गाला  हानी पोहोचवतात शिवाय अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे इतरांच्या चुकीमुळे सगळेच ट्रेकर्स उगाचच बदनाम झाले आहेत.  मागील काही आठवड्यात  ताम्हिणी घाटामधील मधील देवकुंड धबधबा येथील  झालेल्या अपघातामुळे आणि भरपूर पावसाचे प्रमाण वाढल्या मुळे बऱ्याच गडकिल्ल्यावर आणि पर्यटनस्थळी जाण्यास बंदी आणली होती. पावसाचा जोर घाटामध्ये खूप जास्त असतो.त्या मुळे योग्य नियोजन आणि प्रसंगावधान जाणून घेतलेले निर्णय आणि योग्य मार्गदर्शनाखाली च पावसाळी ट्रेक केलेले योग्य.

असाच एक ट्रेक पावसाळ्यात एकदा तरी आवर्जून करावा तो म्हणजे ताम्हणी घाटातील पिंपरी गावातून सुरू होणार अंधारबन ट्रेक हा ट्रेक मागील वर्षीच करायचं नियोजन होत पण करोनाच्या विळख्या मुळे तो करता आला नाही.

तशी अंधारबन ची भुरळ मला जी पडली ती पंधरा वर्षांपूर्वी आम्ही माझे पुण्यातील काही घाटवाटा फिरणारी मित्रमंडळी कुंडलिका साठी निघालो तेव्हा गावात आल्यावर  अंधारबन विषयी कळल त्या वेळेस अंधारबन ट्रेक फारसा कोणाला माहितीही नव्हता आणि आज जी मळलेली वाट दिसते ती देखील फारशी दिसत नव्हती अशा ह्या गर्द काळोख्या जंगलात फक्त आम्ही आणि आम्हीच होतो असा हा कायम स्मरणात राहणारा ट्रेक कधीही विसरू शकत नाही.

आणि आता तोच ट्रेक परत एकदा करायचा म्हणून नियोजन चालू केले.आणि ट्रेक चा तो दिवस उजेडला.

शनिवारी रात्री 11 वाजता आम्ही अंधारबनकडे जाण्यासाठी ची वाट धरली आणि आमची सकाळ उजेडली ती ताम्हणी घाटाच्या विहंगम दृश्याने ती इतकी की लगेच शहाजी पाटलांच्या डायलॉग चा लागलीच आठवण झाली काय ती झाडे काय ते डोंगर असा सुरेल ताम्हणी घाटातील प्रवास करून आम्ही पिंपरी गावात पोहचलो



 तिथे पोहचल्यावर आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्याकडे फ्रेश होऊन गरमागरम पोहे आणि चहा चा आस्वाद घेऊन आम्ही सर्वांशी ओळख करून आणि काही सूचना देऊन ट्रेक चालू केला सुरवातीला भात खाचरांची वाट तुडवत आम्ही अंधारबन ची वाट धरली आणि सामोर एक मनमोहक नजारा नजरेस पडला धुक्यात गुरफटलेले डोंगर आणि ओसंडून वाहणारा पाझर तलाव पुढील भटकंती ची उत्कंठा वाढवत होता. तलाव ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि चालू झालं अंधारबन चं दाट जंगल! हे  जंगल ओलांडताना वाटेत अनेक धबधबे लागत होते. कित्येक फूट उंचीवरून कोसळणारे हे धबधबे, कड्याच्या टोकावरून पार करायचा अनुभव खूपच रोमांचकारी होता!



 हे सर्व धबधबे ओलांडत आजूबाजूची दृश्य कॅमेऱ्यात टिपत आम्ही पुढे निघालो. दोन सव्वा-दोन तास चालल्यावर जेव्हा आम्ही जंगलातून बाहेर पडलो तेव्हा एक मोठं हिरवंगार पठार लागलं, जणू हिरवळीचा गालिचाच अंथरल्या सारखं! हिरव्या रंगाच्या सुद्धा इतक्या विविध छटा असतात हे जंगलात फिरल्यावरच कळत . पठारावरून समोर एक नजर टाकली तेव्हा समोर कुंडलिका नदी आणि उंचावरून कोसळत तिच्या पात्रात येउन मिळणारे धबधबे असं विहंगम दृश्य दिसत होतं.अंधारबनातल्या असंख्य ओहोळांची बनते कुंडलिका नदी. या नदीवर भिरा गावाजवळ एक छोटेसे धरण बांधले आहे. त्याचाच जलाशय घाटमाथ्यावरून दिसत होता.


 डोंगरकड्यांवरून सर्व बाजूंनी धबधबे दरीत उतरत होते. आसपासची हिरवीगार वनश्री दरीतल्या बेभान वाऱ्यावर सळसळत होती. त्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही काही वेळ स्थिरावलो. दोन-चार फोटो काढून होतायत तेवढ्यात धुक्याचे लोट दरीत उतरू लागले. बघता बघता सारी दरी धुक्याने भरून गेली. दरीतला जलाशय तर दूरच राहिला, काही मीटर अंतरावरचा माणूस दिसणेही अवघड होऊ लागले. धुकं अजून दाट झालं तर पुढची वाट सापडणं मुश्कील होईल म्हणून आम्ही चालण्याचा वेग वाढवला. दरीच्या काठाने जाणारी वाट आता रानात शिरली. दाट झाडीतून वाट काढत आम्ही पुढे सरकू लागलो. तेवढ्यात एक खळाळता ओढा मार्गात आला. त्याच्या वरच्या अंगाला एक लहानसा धबधबा तयार झाला होता. गर्द हिरव्या झाडीत वाहणारा तो धबधबा पाहून भिजण्याचा मोह कुणाला आवरेल? आपसूकच सगळ्यांची पावलं तिथे वळली. भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही पुढे निघालो.




घनदाट अरण्यातून जाणारी पायवाट यापुढची वाट घनदाट अरण्यातून जात होती. वाटेत पाण्याचे लहानसहान ओहोळ आडवे येत होते. लाल मातीच्या लिबलिबीत चिखलातून पचक-पचक आवाज करत आम्ही पुढे चाललो होतो. आधीच ढगांनी अडवलेला सूर्यप्रकाश या अरण्यातल्या दाट पर्णसंभारापुढे हार मानून अंग चोरून बसला होता. गडद धुकं रानात ठिय्या देऊन बसलं होतं. एकंदरीतच सारे वातावरण एखाद्या भयपटात शोभेल असे वाटत होते. या अरण्याला अंधारबन का म्हणत असावेत याची पुरेपूर प्रचीती येथे येत होती त्या मुळेच  तिथे परतीच्या वाटेने येताना एक horrer क्लिप बनवायची माझ्या डोक्यात कल्पना अली आणि सोबत असलेल्या मित्रांच्या सोबत सुंदर अशी ती hoorer क्लिप बनून पूर्ण केली.

तिथून पुढे गेल्यावर बोकड्याचा नाला लागला तो पाहून लगेचच कल्पना आली अंधारबन मध्ये जे अपघात होतात ते याच ठिकाणी कारण पाण्याचा वाढता प्रवाह आणि खाली लगेच दरी  म्हणून लगेच पुढे जाऊन एक दोघांना सोबत घेऊन सर्वना तो नाला रोप चा आधार घेत पार करून घेतला आता या ठिकाणी एक अनुभव आला इथे गर्दी असल्याने काही दुसऱ्या ग्रुप मधील सदस्य खालच्या वाटेने तो ओढा कुठलीही सुरक्षितता न बाळगता क्रॉस करत होती तेव्हा त्यांच्या लीडर ला थोडे उपदेशाचे डोस पाजून त्या सर्वांना वरतून येण्यास सांगितले या असा बेफिकीर लोकांच्या मुळेच आज ट्रेकिंग क्षेत्र बदनाम होत आहे.

हळूहळू नाल्याचा प्रवाह वाढत असल्याचे पाहून आम्ही लगेचच तिथून आल्या त्या वाटेने परतीच्या प्रवासाला लागलो. 

आकाशात दाटलेले कृष्णमेघ आणि मागे उभा ठाकलेला सह्यकडा मोठ्या कौतुकाने आम्हा पामरांची ट्रेक संपविण्याची लगबग बघत होते. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण येतो की त्यात आपण भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन जातो. अंगात कितीही थकवा असला, निसर्गाने कितीही रौद्र रूप धारण केलेले असले, तरी ती रानावनातली रग्गड वाट संपूच नये असे वाटत राहते. आपल्या मनात उपजतच असलेली निसर्गाबद्दलची अनिवार ओढ कदाचित उफाळून वर येत असावी. ट्रेकिंग सारख्या तंगडतोड साहसी प्रकाराकडे खेचून नेणारी हीच ओढ असेल काय?

मार्गात आलेला ओढा संपू नये वाटणारी ती वाट अखेरीस पिंपरी गावात येऊन संपली. पावसानेही एव्हाना आपली खेळी आटोपती घेतली होतीच आता एव्हाना सगळ्यांच्या पोटातील कावळे हे ओरडायला लागलेच होते सगळ्यांनी सुरेख अशा जेवणाचा आस्वाद घेत हा अविस्मरणीय अनुभव डोळ्यात साचवत अंधारबन चा निरोप घेतला.


शेवटी आवर्जून सांगावेसे वाटते देवकुंड व अंधारबन परिसरात भटकंती करण्यापूर्वी किंबहुना पावसाळ्यातील सर्वच ट्रेक करताना अधिक सतर्क होणे गरजेचे आहे. शिवाय परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व गिर्यारोहण संस्थांनीही सुरक्षिततेचे सगळे निकष आवश्यक सुरक्षित साधनांच्या साह्याने कटाक्षाने पाळायला हवेत, ज्या ठिकाणी धोका संभवतो अशा ठिकाणांपासून त्यांनी माघार घेऊन ग्रुपच्या सुरक्षिततेचा विचार प्रामुख्याने करायला हवा.. शिवाय इतर ठिकाणी भटकंती करताना ओढे-नाले ओलांडताना सुरक्षिततेची संपुर्ण खात्री करावी. परिस्थिती विपरीत असेल तर वेळीच माघार घ्यावी. निसर्गाचा आदर हाच करा भटकंतीचा खरा मूलमंत्र आहे.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार,श्रीरामपूर

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...