सह्याद्रि ट्रेकर्स आयोजित,
रतनगड ट्रेक
17 oct.2021
रतनगड च्या इतिहासात डोकावल्यास हा गड कोणी आणि कधी बांधला हे निश्चित जरी नाही सांगता आला तरी पूर्वी हा गड निजामशाही च्या ताब्यात होता पुढे 1630 साली माहुलीचा तहात हा गड मोघलांच्या ताब्यात गेला नंतर 1660 साली महाराजांनी मोरोपंतांच्या मदतीने हा गड स्वराज्यात आणला 1664 साली जेव्हा महाराजांनी सुरतेची लूट केली तेव्हा काही काळ महाराज गडावर विश्रांतीस होते असा देखील उल्लेख आढळतो तद्नंतर 1680 साली मोघलांनी हा गड ताब्यात घेतला आणि 1720 साली शाहू महाराजांनी परत मराठी साम्राज्यात गड परत आणला पुढे पेशव्यांनी राजुर हा प्रांत तयार करून त्याचे मुख्यालय रतनगड तयार केले.परंतु नंतर 1820 मध्ये इंग्रजांनी गड ताब्यात घेऊन गडावरील संपत्ती जप्त करून गड सुरूंग लावून उद्धवस्त केला.
असा हा रतनगड ट्रेक करण्याची कल्पना तब्बल चार वर्षा नंतर मनात आली अन ती कल्पना मी आमचे ट्रेक सहकारी चंदन सर आणि उमेश यांच्याजवळ व्यक्त केली आणि क्षणाचाही विलंब न करता आमचे नियोजन चालू झाले.सुरवातीला मर्यादित क्षमतेने ट्रेक करण्याचा विचार होता परंतु इच्छुकांची संख्या पुढे वाढतच गेली आणि तो दिवस उजेडला पण आम्हा भटक्यांना बऱ्याच वेळेस अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यातून ही आम्ही योग्य मार्ग हा काढतोच आणि ह्या वेळेस जे संकट आले ते जरा विचित्रच होते म्हणजे आम्ही रात्री साडेबारा वाजता निघणार होतो परंतु अचानक आमच्या गाडीचा खोळंबा झाला आणि तेथून पुढे चालू झाली आमची खरी परीक्षा तिकडून गाडी मालकाने पंधरा मिनटं करता करता तीन वाजवले तरी गाडीचा काही पत्ता नव्हता एव्हाना आमच्या सदस्यांची जी चल बिचल चालू होती ती पाहून आमचा देखील अंगाचा भडका उडत होता साहजिकच आहे म्हणा आमच्या विश्वासावर ही मंडळी जेव्हा येते तेव्हा अशा काही गोष्टी झाल्या तर मनाला कुठे तरी ही रुक रुक वाटतेच.शेवटी त्या गाडी मालकाला दुसरी गाडी सांगून आमचा प्रवास तब्बल साडेतीन तास उशिरा चालू झाला खरा परंतु सर्वांच्याच मनात एक हुरहूर लागून होती ती ही की आता उशीर झाल्यामुळे पुढे ट्रेक होतो की नाही अगदी काहींनी दुसरा पर्याय देखील सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मला माझ्या अनुभवाच्या जोरावर एक विश्वास होता की कितीही उशीर झाला तरी हा ट्रेक पूर्ण होऊ शकतो.अशा ह्या विचारांच्या गर्दीत आम्ही सकाळी नऊ वाजता आमच्या गाईड च्या घरी पोहचलो .तिथे चहा नास्ता आवरासावर करत सोबत वाटाड्या घेऊन आम्ही रतनवाडी कडे निघालो सुरवातीला आमचं नियोजन हे रतनवाडी कडून आरोहण करून त्रिंबक दरवाजाने गडउतार करायचं अस होत पण वेळे अभावी आम्ही नियोजनात बदल करून रतनवाडी कडूनच चढाई करून उतराई करायचे ठरवले. अन् पाऊले चालू लागली रतनगडच्या दिशेने.
काही वेळातच दाट जंगलाच्या कुशीत विसावलेला अन् आपल्या अस्तित्त्वाचं निशान दाखवण्यासाठी उठावलेला रतनगड आव्हान देऊ पाहात होता. काही वेळातच खळखळणाऱ्या प्रवरेच्या नदीपात्राला ओलांडून झाडांचा सहवास सुरू झाला.. रहदारीची पायवाट.. आपलीशी वाटणारी ! जुनी-जाणती झाडं ओलावा धरून बसलेली. पुढे दमछाक करणारी चढाई . दीड दोन तासात एका चौफुलीवर विश्रांतीसाठी थांबलो.ती चौफुली म्हणजे पूर्वीच्या काळी प्रत्येक गडाच्या मध्यानवर जिथे सपाटीकरण असते त्या जागेला मेट म्हणतात मेट म्हणचे तो एक गडाचा आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास चेक पॉईंट असायचा तिथून एक पायवाट कात्राबाई खिंडीकडे म्हणजे हरिश्चंद्रगडाकडे जाते अन एक रतनगडकडे. अन् तेथून पुढे तासाभराची जंगल चढाई करत आम्ही शिडी मार्गापर्यंत आलो. सावध पवित्रा घेत पहिल्या गणेश दरवाजापर्यंत आलो. माथ्यावर भैरोबाची मूर्ती कोरलेली आहे. तर डाव्या कातळावर गणेशाची मुर्ती. पुढे पायऱ्या चढत डावीकडच्या हनुमान दरवाजासमोर येऊन पोहोचलो. दरवाजातनं किल्यावर जाण्याचा मार्ग आहे. आम्ही तिकडे न जाता उजवीकडे गुहेकडे मोर्चा वळवला. पहिल्या लहानशा गुहेत रत्नादेवीची तांदळा प्रकारची सुरेख मूर्ती आहे अशी देखील आख्यायिका सांगण्यात येते की कळसुबाई ,कात्राबाई,आणि रत्नाबाई ह्या तीन बहिणी जिथे जिथे वास्तव्यात होत्या त्या वरून ह्या गडांची नावे पडली असावीत. पुढे मोठ्या गुहेत राहाण्यासाठी उत्तम सोय होऊ शकते. बाजूलाच थोड्या अंतरावर पिण्यायोग्य पाण्याचं टाक आहे. पुढे हनुमान दरवाज्यातनं माथ्यावर आलो. अन् काय आश्चर्य पिवळ्या जांभळ्या रानफुलांनी संपूर्ण गडमाथा बऱ्यापैकी सजला होता. त्यात उजवीकडे राणीचा हुडा बुरुज आकर्षित करणारा. बुरुजाच्या बाजूलाच स्वच्छ पाण्याचं टाक आहे. बुरुजावरून चौफेरचं विहंगम दृश्य न्याहाळत गडाच्या उत्तर-पूर्व बाजूकडे निघालो. थोड्याच वेळात काठावर आलो. चिलखती शैलीचा कातळ कोरीव बुरुज अन् तिथून दक्षिणेला आव्हान देणारा कात्राबाईचा आवाका फारचं भन्नाट दिसत होता. नुकताच पावसाळा संपल्यामुळे हिरवाईचा गालीचा कात्राच्या सौंदर्यात भर टाकत होता. सोबतीला लगट करणारे शुभ्र ढगांचे खट्याळ पुंजके मन वेडावून टाकत होते. पूर्वेचे रंग न्याहाळत आम्ही पश्चिमेकडे कूच केली. माजलेलं रानगवत कापत पश्चिम दिशेला आलो. खालच्या टप्प्यात कोकण दरवाजा अन् बाजूला तुडुंब भरलेली ६ कातळ टाकी किल्ल्याचं महत्त्व अधोरेखित करीत होती. फोटोग्राफीचा आनंद घेत उत्तरेकडे निघालो. पिवळ्या- निळ्या रानफुलांनी जणू गालिचा अंथरलेला अन् त्यातून जाणारी वाट काय सुख देत होती. तिरकस चाल ठेवत काही मंडळी नेढ्यात पोहोचले आणि काही त्रिंबक दरवाजा कडे. चारही बाजूंचं सृष्टिसौंदर्य बघून गलबलून गेल्यासारखं झालं. काय नजराणा पेश केला होता. निशब्द ! शांतता आणि सोबतीला अंगाला स्पर्शून जाणारा वारा.. समोर कात्राबाईच्या गगनचुंबी पहाडाला आपल्या कवेत घेणारे ढगांचे मायाजाल अवाक करत होते. भंडारदरा डॅमचं स्थिर जलसंचय शाश्वत जीवनातचं सूत्र सांगत होतं तर उत्तरेला अलंग, मदन, कुलंग, कळसूबाई शिखर, रांगड्या सह्याद्रीच्या दराराचं प्रतिनिधित्व करत होती. त्र्यंबक दरवाजा म्हणजे अप्रतिम बांधकाम शैलीचा भरभक्कम दरवाजा नुकताच सह्याद्रि प्रतिष्ठान ने सुंदर नक्षीकाम केलेला दरवाजा बसावलेला आहे खरच सह्याद्रि प्रतिष्ठानच्या कामाला मनाचा मुजरा तेथिल कातळकोरीव पायरी मार्ग म्हणजे रतनगडच्या खुट्ट्याला वळसा मारून साम्रद वा रतनवाडीकडे जाणारा.तो पाहून आम्ही परतीला निघालो.कारण अंधार पडायच्या आत आम्हाला पायथ्याला पोहोचायचं होत जसजसे आम्ही पायथ्या पर्यंत पोहचत होतो तस तशी प्रकाशाची जागा आता आमच्या टॉर्च ने घेतली होती असा हा नाइट ट्रेक चा देखील आनंद घेत आम्ही रतनवाडी गावात पोहचलो. अन सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो पाहून तर आमचा देखील आनंद गगनात मावत नव्हता.
पुढे आमच्या गाईड च्या घरी सर्वांनी जेवणावर ताव मारून दिवसभरातलं रतनगडाचं अलौकिक सृष्टी सौंदर्याच्या आठवणींची कायमस्वरूपाची शिदोरी घेऊन प्रस्थान केलं.
सचिन भांड.
सह्याद्रि ट्रेकर्स🚩
श्रीरामपूर
No comments:
Post a Comment