Thursday, September 1, 2022

दूधसागर एक फेसाळते सौंदर्य

     


दूधसागर ट्रेक 

27& 28 ऑगस्ट 2022

    एक काळ असा होता की गोवा म्हंटल की कधीही तयार असायचो अन आता कोणी म्हंटल का काहीतरी कारणे देऊन टाळायचा प्रयत्न करतो कारण जेव्हा पासून सह्याद्रि फिरतोय तेव्हा पासून तिथले नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! आता नकोसा वाटतो कारण मनात एक विचार येतो  तेवढ्या दिवसात तर माझा एखादा मस्त  range trek पूर्ण होऊ शकेल पण याच गोव्याची आम्हा भटक्यांसाठी  एक बाजू अशी आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. आणि गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. म्हणूनच काही वर्षांपूर्वी माझ्या जुन्या ग्रुप सोबत जाण्याचा योग आला होता पण रस्त्यातच एक वाईट बातमी कानावर आली तिथे एक दुर्घटना घडल्यामुळे दूधसागर धबधबा काही दिवसासाठी बंद करण्यात आलेला आहे त्या मुळे जरा हिरमोड झाला होता खरा पण तिथल्या गाईड ने आम्हाला दुसरा पर्याय दिला तिथूनच जवळ असलेला तांबडी सुर्ला धबधबा पाहण्याचा आणि लागलीच आम्ही तो पर्याय निवडला कारण एवढ्या लांब येऊन खाली हात परत जाणे हे मनाला पटणारे नव्हते आणि तेव्हा पासूनच हा ट्रेक माझ्या buket list  वर होताच पण दरवर्षी काही न काही विघ्न येऊन मुहूर्त काय लागत नव्हता पण  यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना priority वर हा ट्रेक टाकला . आणि वेळेचं गणित जुळून येतय असं दिसताच ही संकल्पना माझे सहकारी चंदन सर आणि उमेश यांच्यासमोर मांडली आणि दोन महिने आधी ट्रेक बुक करून टाकला.

सह्याद्रि परिवाराचा हा महाराष्ट्रा बाहेर आणि रेल्वे ने पहिलाच ट्रेक असल्याने त्याचा संपूर्ण अभ्यास माझ्या जुन्या सहकारी मित्रांच्याकडून करून घेतला ट्रेक ला दोन महिने असल्याने मध्ये एक अंधारबन चा एक अविस्मरणीय ट्रेक केला.

दूधसागर ट्रेक हा माझा महत्वकांक्षी ट्रेक असल्यामुळे पुढे काही घरून विघ्न येऊ नये म्हणून एरवी महिन्यातून तीन  रविवारी तरी बाहेर हिंडणार घरात बसलेलो होतो तेव्हा आम्हा हिंडफिऱ्या लोकांना कायम पडणारे टोमणे म्हणजे आज  चक्क घरी जायच नाही का कुठे असे एक न एक टोमणे गुमान ऐकत बसावं लागत असे.असो मजेचा भाग वेगळा.


आणि तो दिवस उजेडला ठरलेल्या वेळेप्रमाणे श्रीरामपूर स्टेशनवर  इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण एक च्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १६ तास घेते! पण थेट कुलेम स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ५० जणांचा ग्रुप होता. एव्हाना आमची ट्रेन एक एक स्टेशन पार करत असताना  गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, काही खेळ आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुलेम  स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ५० जणांचा ग्रुप, यामुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले!अन तसेही प्रवासात माझे न झोपेच वावडच म्हणा म्हणून पुस्तक चाळावयास घेतले काही तासाभरानंतर जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! मग परत खाली उतरून पाय मोकळे करून यायचे असा क्रम चालू झाला जस जसे कुलेम स्टेशन येत होते तसतसे 5-5 मिनिटाला गाडी थांबत होती कारण रात्री जंगलात उतरण्यास बंदी असल्याने काही दूधसागर ला येणारी मंडळी तिथे उतरली असल्यामुळे  रात्री पासूनच जी मंडळी पोलिसांनी अडवून ठेवलेली  होती  त्यांना गाडीत बसवत होती त्या मुळे रात्रीच्या काळोख्या अंधारात कुठले स्टेशन आले ते समजायला मार्ग नव्हता त्यातच गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास आम्ही कुलेम स्टेशनवर उतरलो.तिथे आमचा गाईड वाटच पहात होता त्याच्या गाडीत आमच्या ब्यागा टाकून  आम्ही लगेचच चहाची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. तो पर्यत सर्वांना ट्रेक च्या सूचना देऊन आम्ही सहा वाजता आमचा ट्रेक चालू केला . तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं.पण परत आम्हाला साडेचार ची ट्रेन पकडायची होती म्हणून मनात ती धाकधूक हाती 

आणि आमचा तांडा मार्गस्थ झाला. सप्टेंबर  महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तांबड्या मातीतील रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. गावातील उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले.तासाभराच्या जंगल पदभ्रमंती नंतर आता आमचा ट्रेक हा रेल्वेच्या पटरी ने चालू झाला एरवी सह्याद्रि चे डोंगर दर्या तुडवानरे आमचे पाय पहिल्यांदाच पटरीच्या मार्गाने रस्ता काटत  होते तो मार्ग इतका अविस्मरणीय होता की नागमोडी तो रेल्वे ट्रेक त्याचा सोबतीला दोन्ही बाजूने घनदाट अरण्य त्या मुळे तिथे फोटो घेण्याचा मोह कोणाला नाही आवरणार पटरिचा साधारण सहा सात किमी च अंतर पार केल्यानंतर इतक्यात दूधसागर चा’  फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूने रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाच एक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. आजूबाजूला असणारे एक विशिष्ट प्रकारच्या झाडांची मांडणी पाहताना. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातुणच चालू लागलो ! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. फोटो मुळे आता उशीर होयला लागला होता पाहिजे त्या वेळात अंतर कटत नव्हते म्हणून मुकाट्याने कॅमेरा बंद केला त्यातच गेली दोन दिवस तब्येत ठीक नसल्याने एरवी हवा हवा सा असणारा उत्साह शेवट पर्यत अजिबातच जाणवला नाही त्यामुळे उशिर होऊ नये म्हणून काही मंडळी च्या वर पहिल्यांदाच  ट्रेक ला  चिडचिड देखील झाली

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता दमट उष्म्यात बदलला होता. तशी चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती.आता एव्हाना नास्ता साठी थोडीफार भूक वाट पाहतच होती न जंगलातच एका घरी सर्वांनी मनसोक्त नास्ता चा आनंद लुटून क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा त्या जंगल वाटेने मार्गस्थ झालो .अन रस्त्यात एक नाला लागला एरवी फक्त काही social मीडियावर पाहिलेला तो झुलता पूल पाहून तर सर्वांचेच मन तृप्त झाले आणि तो सर्वांच्या तोंडावर दिसणारा आनंद पाहून मला देखील त्यांचे हे भाव माझ्या कॅमेरात टिपण्याचा मोह आवरला नाही तेथून पुढे आल्यावर  थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. डावीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला.थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो  काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो


ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे असा निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. सर्व जण ते क्षण धबधब्यासमोर उभे राहून समोरच्याच्या कॅमेरात कैद करत होते. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे मी कॅमेरा काढला देखील पण धबधब्याच्या तुषाराने lence वर सारखे दव तयार होते त्या मुळे हवे तसे फोटो घेता नाही आले  मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.आता वातावरणात बर्या पैकी दमट पणा निर्माण झालेला होता त्या मुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर थकवा आता जाणवू लागला बरीचशी मंडळी पुढे निघून गेल्या मुळे मी नेहमी प्रमाणे मागे थांबलो असल्यामुळे मागे असलेल्यांना धीर देत सर्वांनीच ट्रेक पूर्ण केला आता एव्हाना सर्वांच्या पोटात कावळे हे कोकत होते त्या मुळे सर्वांनीच अतिशय रुचकर अशा जेवणावर ताव मारून स्टेशन गाठले.

काही गोड काही कटू आठवणीत आता ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण सह्याद्रि परिवाराचे महाराष्ट्र बाहेरील  पहिलाच ट्रेक पूर्ण केल्याचे एक आत्मिक समाधान मनात होते. ह्या ट्रेक दरम्यान देखील सर्व सर्व सदस्या च्या मदतीने परिवाराचा हा ट्रेक देखील अगदी सुखरूप पूर्ण झाला त्या बद्दल सर्व सदस्यनचे मनःपूर्वक धन्यवाद


सचिन भांड पाटील

सह्याद्रि ट्रेकर्स, परिवार

                   






No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...