पन्हाळगड ते विशालगड पदभ्रमंती
दि.०५ आणि ०६ ,२०२३
पहाटे जाग येऊनसुद्धा कोणीही एकमेकांना उठवले नाही. सर्वांनाच झोप हवी होती. नाईलाजानेच साडेसहा ला उठलो. चहा व "ओघाने" येणारे कार्यक्रम उरकले. नंतर चविष्ट असे उपीट चा नाष्टा करून आवरा आवर केली एव्हाना अनेक ट्रेकिंग क्लबच्या लोकांची गर्दी गावात दिसू लागली गावातली कमी आणि ही बाहेरून आलेली लोकांची गर्दीच जास्त दिसत होती प्रत्येक ग्रुप च्या शिवगर्जनेमुळे सारा आसमंत दुमदुमत होता गावात एक ग्रुप फोटो घेऊन आम्ही मार्गस्थ होण्यास सुरुवात केली . आता घाई करायलाच हवी होती. त्या गर्दीतूनच वाट काढत आता भातशेतांसोबत "हिरवळ" सुद्धा बघत पुढे जाऊ लागलो.
. वाटेवर दगडावर काढलेले ते बाण दिसू लागल्यामुळे किल्ल्यावर आल्यासारखे वाटत होते. झाडे , खडक , जमेल त्या ठिकाणी ट्रेकरच्याच नजरेत भरतील असे काढलेले ते बाण आमचा उत्साह वाढवत होते. आंबेवाडी ही पुढची वाडी होती. पावसाच्या हलक्या सरी जरी अधूनमधून येत असल्या तरी पावसाळी वातावरणामुळे दम चांगला राहत होता आणि डोळ्यांचे पारणे जागोजागी फिटत होते. आंबेवाडी नंतर दोन नकाशात नसलेल्या वाड्या लागल्या: कळकेवाडी आणि रिंगेवाडी! कुठल्यातरी एक वाडीबाहेर मोठ्ठी विहीर लागली. तेथे पुढे जरा वेळ विश्रांती घेतली. जंगलातल्या वाटा कापताना डिस्कवरी वरच्या MAN VS WILD या मालिकेची आठवण होत होती.
जमिनीवर अभावानेच माती दिसत होती. गळलेल्या पानांमुळे सगळी वाट झाकली गेली होती. अशा विरळ मनुष्य वस्तीच्या वाडीत कोणाला काही झाले तर काय करत असतील, त्याला डॉक्टर कडे कसे नेत असतील हा विचार मनात घुंगवत होता. अशातच एका ओढ्या पाशी थांबून बिस्किटांचा व गोड पुऱ्या चा नाश्ता केला. तेथे तुरळक फोटो सेशनसुद्धा झाले.
पाटेवाडीला पोहोचण्यास बराच वेळ लागत होता, मात्र २ वाजत आले तरीहि वाडीची चिन्हे दिसेना. अशातच अजून एक अनपेक्षित वाडी लागली: माळेवाडी. माळेवाडीहून पाटेवाडी २ किलोमीटर चालताना. चक्क डांबरी रस्तापण आहे. त्यावरून जाताना मात्र आता कंटाळा येत होता. अशा वेळी तो चिखलाचा रस्ताच हवाहवासा वाटत होतं पुढे परत चिखलाचा रस्ता लागला वाटेत एका ठिकाणी गुढगाभर चिखलात पाय रुतला ही फजिती एकदा तरी व्हायचीच होती. ती झाली. धनगरवाडा येईपर्यन्त फारसे कोणीच कोणाशी बोलले नाही.
म्हसवड्याचे घनदाट जंगल:. हे पार केल्यानंतर म्हसवडे गाव लागते अशी माहिती होती. जंगलाची वाट थोडी सुकर झाली. "निबीड" हा शब्द ज्याकडे पाहून लिहावा असे हे जंगल आहे. या जंगलात बिबटे, गवे, भेकर, हरणे असे प्राणी आहेत असे आम्हाला तिथे समजले. रात्री या जंगलातून जाण्याची वेळ आली नाही हे नशीबच! सूर्यप्रकाशात झकास दिसत असणारे ते जंगल रात्री नक्कीच भयाण वाटत असणार. जंगलाने आम्हाला अनेक सुंदर दृश्ये दाखवली. अनेक ओढ्यांनी आमचे दुखरे पाय भिजवले.
म्हसवडे गाव ओलांडताना मलकापूर-अणुस्कुरा महामार्ग लागतो. त्या फाट्याला पोचेपर्यंत माझ्या बाबत एक घटना घडली ओढ्यावर बांधलेल्या बंधाऱ्यावर पाण्यात उडी मारताना एका दगडावर पाय घसरला आणि तळपायाच्या घोट्यापाशी काहितरी इजा होणार असे जाणवले पाण्यातून बाहेर आल्यावर त्याची प्रचीती आलीच आणि आता उर्वरित राहिलेला ०८ किलोमीटर चा टप्पा पार करणे म्हणजे माझ्यासमोर दिव्य परीक्षाच होती त्यातच त्या जंगलात आमच्यातील काहींना जळू चा अनुभव देखील आलाच पुढे कसेबसे ०४ किलोमीटर अंतर पार केल्यावर महामार्ग लागला
आता इथून पुढे पायाच्या दुखापतीमुळे मला चालणे शक्य नव्हते म्हणून बाकी सदश्यांना पुढे जाण्यास सांगितले पांढरेपाणी येईपर्यन्त डोळ्यांत पाणी येणेच फक्त बाकी होते.त्यात कुठेच मोबाइल ला range नसल्यामुळे रस्त्यात एका ग्रुप च्या महिला रस्ता भरकटल्याने रस्त्यातच थांबलेल्या होत्या त्यांना सोबत घेऊन पांढरपनी येथे पोहोंचलो तिथे त्यांचा ग्रुप त्यांची वाटच पहात होता तिथेच आमचे अमरावती चे सदस्य देखील होतेच त्यांना पण पुढे जाण्यास सांगितले कारण इथून पुढे मी लिफ्ट घेऊन जाणार होतो त्यातच एका ग्रुप ची गाडी तिथे आली त्यांच्या बरोबर मी माझा प्रवास चालू केला आणि थोड्याच वेळात आमची पण गाडी येताना दिसली आणि मी अमच्यागाडीत बसून पावनखिंड येथे पोहचलो एव्हाना आमचे सर्व सदस्य पावनखिंडीत पोहोचलेच होते.
सध्या जी पावनखिंड म्हणून दाखवतात, तो आहे एक ओढा. या ओढ्याचे पुढे एका फेसाळत्या धबधब्यात रुपांतर होते. आम्ही धबधब्याच्या शेजारील शिडीने खिंडीत उतरलो. आम्हाला समांतर कोसळत असलेले पाणी मधेच खट्याळपणे आमच्या अंगावर शिंतोडे उडवत होते. खिंडीतून वाहत जाणाऱ्या पाण्याचे दृश्य अवर्णनीय होते.
आता सर्वच जण ज्या पावनखिंडीच दर्शन घेतात तीच खरी पावनखिंड आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण ही खिंड म्हणजे एका बाजूला पूर्णपणे बंद आहे त्यातच माझी ही शंका आमच्यासोबत असलेल्या दुसरा गाईड कृष्णा ने दूर केली ही खिंड म्हणजे पावनखिंड नाहीच ह्या खिंडीचे पहिल्यांदा भालजी पेंढारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक चित्रपट काढला होता त्यांना हे लोकेशन चांगले वाटले म्हणून त्या चित्रपटाचं चित्रीकरण त्यांनी इथे केले याबत चे स्पष्टीकरण खुद्द पेंढारकर यांनी या आधीच केलेले आहे वास्तविक या जागेचा उल्लेख कुठेच आढळत नाही कृष्णाने सांगितल्या प्रमाणे आणि वाचनात देखील आल्याने खरी खिंड ही फरसबंदी च्या वाटेवर आहे तिकडे फारसे कुणी जात नाही हे ऐकल्यावर फरसबंदी ची वाट पुन्हा परत येऊन करायचीच म्हणून मनोमन श्रद्धा ठेवून त्या भूमीचे दर्शन घेऊन आम्ही पावनखिंड गावात आलो सगळ्यांनी रुचकर अशा मसुर आणि पनीर च्या भाजी चा आस्वाद घेतला आता बऱ्यापैकी अंधार झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी सर्वांनाच कामे असल्याने विशाळगड न करता आम्ही आमचे ऊत्तम प्रकारे नियोजन करणाऱ्या संकेत आणि कृष्णा चा निरोप घेऊन श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो
श्रीरामपूर मध्ये गाडी पोचली तेव्हा पहाटेचे ०५ वाजले होते सहनशक्तीची कसोटी पाहणारा ट्रेक अखेर पूर्ण केला होता,याची आगळेच समाधान मनात होते. मसाई पठाराची हिरवाई डोळ्यांना कायम निववत राहो आणि पावनखिंडीचे ते साहसी पाणी मनाला कायम पवित्र ठेवो अशीच काहीशी भावना (कदाचित यापेक्षा सोप्या शब्दांत मांडलेली) सगळ्यांच्या मनात होती... दोन दिवस आम्ही निसर्गासोबत जगलो होतो..खूप काही शिकलो होतो.
हि मोहीम म्हणजे 350 वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी सुखरुप पोहोचले;पण हि वाट किती अवघड, खडतर होती याची जाणीव आम्हाला भर दिवसा, क्षणाक्षणाला पावलोपावली होत होती. त्यावेळी उर अभिमानाने भरून येत होता. अंगावर शहारे येत होते. स्वतः च्या प्राणाची आहुती देणारे शिवा काशीद, जीवात जीव असे पर्यंत लढवणारे बाजी प्रभू,फुलाजी,त्यांना साथ देणारे रायजी बांदल आणि त्यांचे 300 ते 350 बांदल मावळे आणि इतर यांचा पराक्रम ऐकून, वाचून होतो. त्याची प्रचिती याची देही याची डोळा अनुभवून कृतार्थ झालो. (समाप्त)
टीप:- वरील लेखात वाड्यांची नावे जशी आठवली तशी घेण्यात आलेली आहे त्यामुळे अनावधानाने ती कदाचित मागेपुढे होऊ शकतात
सचिन भांड पाटील
सह्याद्रि परिवार,श्रीरामपूर
sahyadritrekers.blogspot.com




No comments:
Post a Comment