दि.३०/१०/२०२२
कधी कधी अचानक ठरवलेली मोहिम पण खुप काही मिळवुन देते सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडतात. मनात ठरवलेल नियोजन तंतोतंत अंमलात येते. सरतेशेवटी गोड आठवणी आणि चांगला सुखद अनुभव देऊन जाते.
असेच काही माझ्या बाबतीत घडले. भाऊबीज साठी आलेली बहीण गेल्या एक वर्षांपासून धुळे येथे बदली होऊन आल्यामुळे तिला सोडायला रविवारी ड्रायव्हर ला पाठवणार होतो पण शनिवारी सकाळी अचानक मनात आले,सह्याद्रि भरपूर पालथा घातला त्या मानाने बागलाण ,खान्देश प्रांत नेहमीच मला भेटण्यासाठी आजही खुणावत आहे.त्यातच गेले काही दिवसांपासून कुठे भटकायला न गेल्यामुळे बऱ्यापैकी आपल्या भाषेत बोअर होत होत त्यातच या रविवारी एखादा चांगला ट्रेक करूया म्हणून लगेच आमच्या बहिणाबाई ला सांगितले.मीच येतो तुला सोडवायला आज रात्री निघुया. आणि माझा'खान्देश दुर्गवारी चा प्लॅन आखला. सुरवात कुठल्या किल्ल्यापासून करायची कारण एका दिवसात जेवढे किल्ले सर करता येतील तेव्हडे करायचे होते
आणि सुरवात "लळींग, सोनगीर,, डेरमाळ ,आणि गाळणा करायचे ठरवले.
लगेचच प्लानवर शिक्कामोर्तब करून टाकले आणि रात्री आठ वाजता आम्ही निघालो, आत्ता पर्यंत बरेच ट्रेक करून झाले आहेत सहसा मला असे कधी होत नाही पण या वेळेस मात्र मी भलताच एक्साईट झालो होतो.कारण सह्याद्रि च्या बाहेर ट्रेक करण्यासाठी बऱ्याच दिवसांनी निघालो होतो. आम्ही रात्री बारा वाजता तिच्या घरी पोहोचलो एव्हाना बऱ्यापैकी थकलो असल्याने लगेच झोप लागली गेली
सकाळी सहा वाजता गजर वाजला, उठून तयारी करून सात वाजता छोट्या भाचा ला सोबत घेऊन लालिंग किल्ल्याला निघालो. आता सुरू झाली होती माझी 'खान्देश दुर्गवारी'.
तीस ते चाळीस मिनिटात लळिंग गावी पोहचलो.धुळे वरून निघाल्यानंतर महामार्गाच्या उजव्या हाथाला, माथ्यावर तटबंदी धारण केलेला लळिंग किल्ला दिसला.
त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 593 मीटर आहे. किल्ल्याच्या अवशेषांची पडझड झाली आहे. 13 व्या शतकात फारुकी राजवटीत हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर मोगल, निजाम, मराठे आणि इंग्रजांनी किल्ल्यावर राज्य केले. दुर्गस्थापत्यात मोगल शैलीचा वापर केलेला दिसून येतो. किल्ल्यावर पाण्याचे टाके, धान्य कोठार आहेत. पायथ्यापासून जवळच असलेला लहानसा घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
किल्ल्याच्या पायथ्याशी लळिंग गाव आहे. गावातूनच किल्ल्याकडे जाणारी पायवाट जाते. लळिंग पाहून झाल्यावर जेवण वैगरे करून सोनगीर किल्ला पाहण्यासाठी निघालो धुळ्यापासून साधारण २०कि.मी अंतरावर असणा-या गडपायथ्याला सोनगीर गाव लागते;तिथे पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.गावातून किल्ल्याकडे जाणा-या पायवाटेने काही मिनिटातच आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची एकसलग तटबंदी व त्यामध्ये असणारे वैविध्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात.सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने अधिक आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची बरीचशी पडझड झाली असून त्यातील प्रवेशद्वार मात्र सुरक्षित उभे आहे .येथून आत प्रवेश केल्यावर सुंदर नक्षीकामयाअसलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत पडते .ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पाय-यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते.सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्याकारणाने येथे नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत.
गडमाथ्यावर पोहोचताच आपणास जी तटबंदी दिसते तिथे मोठे दगड न वापरता अनेक लहान दगडांचा एकमेकांवर रचून वापर केला आहे.
आपण ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणा-या पायवाटेने दक्षिण बाजूला असणा-या बुरूजाच्या माथ्यावर जायचे .या बाजूस तट तसंच बुरूज वगळता इतर कोणतेही दुर्गअवशेषर शिल्लक नाहीत.त्यामुळे येथून माघारी फिरून आपण गडाच्या उत्तर टोकाकडे जायचे.या वाटेवर आपणास इतिहासकाळात तेल साठविण्यासाठी वापरले जाणारे एक दगडी रांजण निदर्शनास पडत.गडावर बऱ्यापैकी आता पडझड झाल्यामुळे फारसे अवशेष पहावयास नाही मिळत.इ. स.१३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती .पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने सोनगीरवर हल्ला चढवून हा किल्ला जिंकून घेतला.पुढे म्हणजे इ.स. १६०१ मध्ये खानदेशामधील फारूकी घराण्याचे राज्यसंपुष्टात आले.त्याकाळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता.त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले .त्यामुळे अकबर बादशाहने त्यास सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले.१७५२ पर्यंत हा किल्ला मोगलांच्याच ताब्यात होता,पण त्याच वर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला .त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नाराशंकराकडे दिला .१८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला.
हा किल्ला पाहून झाल्यानंतर मी माझा मोर्चा थाळनेर कडे वळवला सोनगीर पासून साधारण ३५ कि.मी.असणाऱ्या तापी नदी च्या किनाऱ्यावर असलेल्या थाळनेर गावापासून १०० मीटर उंच टेकडीवर थाळनेरचा किल्ला वसलेला आहे. आज दुदैवाने किल्ल्याची पाताळेश्वर मंदीराच्या बाजूची ६० फूट उंच भाजलेल्या विटांमध्ये बांधलेली भिंत व २ बुरुज उभे आहेत. बाकी सर्व बाजूच्या भिंती व बुरुज नष्ट झालेले आहेत. किल्ल्यावर दोन छोट्या देवळ्या आहेत. एकात सप्तशृंगी देवीची अलिकडची मुर्ती आहे व दुसरे देऊळ रिकामे आहे.
किल्ल्यात फारसे काही बघण्यासारखे नसले तरी गावात दोन ठिकाणे पहाण्यासारखी आहेत.
१) जमादार वाडा :- गावातून पाताळेश्वर शंकर मंदीराकडे जाताना एक गढी आपले लक्ष वेधून घेते. त्याला स्थानिक लोक ‘‘जमादार वाडा’’ म्हणतात. या गढीत आजमितीला अनेक कुटुंब रहातात. वाड्याच्या ४ टोकांना विटांनी बांधलेले १२ फुटी बुरुज आहेत. प्रवेशद्वार २० फुट उंच असून त्यावर अणकुचीदार खिळे बसविलेले आहेत. वाड्याचे प्रवेशद्वार, त्यावरील सज्जा लाकडी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. वाड्याच्या आतील भागातील घरांच्या दारा खिडक्यावरही सुंदर नक्षीकाम आहे. घरातील साध्या खुंट्या, कोनाडे यांच्यावरचे नक्षीकाम गढी बांधणार्यांच्या रसिकतेची कल्पना देते. गढीला तळघर व त्यात उतरण्यासाठी जिना आहे. या दोन मजली गढीत सध्या अनेक कुटुंबे रहातात ते आस्थेने गढी दाखवतात, पण त्याच्या इतिहासाबद्दल व पूर्वजांच्या कर्तृत्वाबद्दल ते अनभिज्ञ आहेत. गढीच्या प्रवेशद्वाराशेजारी रामसिंग व गुमान सिंग ही नावे लिहीलेली दिसतात.
२) १० कबरी:- थाळनेरवर राज्य करणार्या फारुकी घराण्यातील राजांच्या व महत्त्वाच्या व्यक्तींच्या कबरी थाळनेर गावात आहेत. त्यातील एक मोठी कबर अष्टकोनी असून त्यावर अरेबिक भाषेतील शिलालेख आहे. बाकीच्या कबरी साधारण एकाच मापाच्या आहेत. त्या कबरीपैकी चार ज्ञात राजांच्या कबरी पुढीलप्रमाणे, १) मलिक राजा २) मलिक नसिर ३) मिरान अदील शहा ४) मिरान मुबारक खान
थाळनेर हा किल्ला मलिक फारुकी च्या काळात खानदेश प्रांताची राजधानी होती.दिल्लीचा सुलतान फिरोजशाह तुघलक याच्याकडून मलिकवर खान याने थाळनेर व करवंद या परगण्यांची जहागिरी मिळविली. त्याने थाळनेर ताब्यात घेवून फारुकी घराण्याची सत्ता स्थापन करुन 1370 मध्ये थाळनेर येथे त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधला. एका बाजूने तापी नदी, तर दुसऱ्या बाजून तटबंदी आणि बुरुज बांधून किल्ला भक्कम करण्यात आला होता. 1600 मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशाह फारुकी याचा पराभव करीत थाळनेरवर ताबा मिळविला. मराठ्यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर निंबाळकर, होळकर घराण्यांनीही या किल्ल्यावर राज्य केले आहे. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लॉप याने मराठ्यांचा पराभव करुन तो 1818 मध्ये इंग्रजी राजवटीच्या अंमलाखाली आणला.
आता बऱ्यापैकी अंधार पडायला लागल्याने माझ्या प्लॅन मधला चौथा किल्ला गाळण न करताच थांबलो . लवकरच दुसऱ्या भागात खान्देश चे राहिलेले किल्ले करण्याचा निश्चय करून परतीचा मार्गे लागलो.
या सर्व प्रवासात निश्चितच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सह्याद्रि च्या मनाने या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नसली. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तेअस्तित्वाशी झुंजत उभे आहेत.
इतिहास संदर्भ :- ट्रेकक्षितिज
सचिन भांड














No comments:
Post a Comment