Sunday, February 12, 2023

एक वैभवशाली साम्राज्य (भाग ०२)

 


हम्पी बदामी टूर २०२२

दिवस तिसरा

ऐहोळे, पट्टदकल, बदामी


दोन दिवसांच्या बऱ्यापैकी पायपीटी नंतर आमचा तिसरा दिवस उजेडला तो सकाळच्या चार च्या गजर ने कारण सकाळी लवकरच आम्ही बदामी ला निघणार होतो.

बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी नावाचे दोन असुर बंधू राहत होते.त्यावरून च या शहराला वतापी हे नाव पडले व कालांतराने बदामी असे संभोदन्यात आले.

साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत. 

अशा या राजवटीमधल्या राजांचे योगदान बघायचे असेल तर बदामी, ऐहोळे आणि पट्टदकल इथे भेट द्यायलाच हवी. लेणी आणि मंदिर स्थापत्याची विविध अंगे, तसेच कमालीच्या सुबक मूर्ती यांचे मोठे भांडार म्हणजे ही तीन ठिकाणे होत. चालुक्यांची राजधानी असलेले बदामी आणि तिथल्या लेणी आणि जवळच असलेली ऐहोळे आणि पट्टदकल ही ठिकाणे म्हणजे चालुक्यांचे वैभव आहे. आज हे वैभव निव्वळ स्थापत्यरुपात आपल्यासमोर उभे असले तरीसुद्धा इथली मंदिरे, त्यावरील मूर्ती आपल्याशी संवाद साधतात. अभ्यासकांना, तज्ञांना अवाक करणारे इथले स्थापत्य सर्वसामान्य पर्यटकाशी सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने बोलते, संवाद साधते.

त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती.

हम्पी वरून साधारणपणे 145 किलोमीटर असलेल्या बदामी च्या अगोदर आपण पोहचतो ते ऐहोळे या गावी त्या नंतर पट्टदकल या गावी

ऐहोळे-

ऐहोळे या गावाविषयी अशी एक दंत कथा सांगितली जाते की भगवान परशुराम यांनी आपले वडील जमदग्नी ऋषी यांचा बदला घेतल्यानंतर परशुरामाने रक्तलांछित वस्त्र मलप्रभेच्या पात्रात धुतले तेव्हा नदीचे पाणी लालभडक झाले. नदीचे पाणी भरण्यासाठी आलेल्या नारीनी हे दृश्य बघितले व ते पाहून त्यांच्या तोंडात आश्‍चर्याने उद्गार आले- ‘ऐ… होळे… ऐ… होळे…’ त्यामुळेच गावाचे नाव ‘ऐहोळे’ असे झाले अशी आख्यायिका सांगितली जाते. ग्रामनामासंदर्भात कितीही कथा, दंतकथा असल्या तरी बदामी चालुक्याच्या राजवटीत ‘ऐहोळे’ येथे अग्रहार आणि विद्याकेंद्र होते. 

ऐहोळे मंदिर समूह म्हणजे भारतीय वास्तुशास्त्राची शाळा समजली जाते. चालुक्य स्थापत्यशैलीचा आद्य आविष्कार, तसेच तिच्या उत्क्रांतीचे सारे टप्पे येथील मंदिरावशेषांमध्ये दिसतात. गेट मधून प्रवेश केल्यावर पहिलेच तुम्हाला आकर्षित करणारे दुर्गादेवी मंदिर दिसते. दुर्गामंदिर आयताकृती असून शिखर शंकूसारखे व मंदिराची एक बाजू अर्धवर्तुळाकृती आहे. दिल्लीतल्या संसद भावनासारखी दिसते. मलप्रभेच्या काठावरती कर्नाटकातील बर्‍याच राज्यकर्त्यांनी आपल्या गौरवाला साजेल अशी मंदिरे उभारली. कला-संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला, तिच्या उन्नतीला चालना दिली, तिला राजाश्रय प्रदान केला. दोन दिवसांपासून नुसतीच मंदिरे पाहत असलो तरी आज या वैभवशाली ठेव्याची प्रचिती प्रत्येक ठिकाणाहून येत होती.



तसेच येथील दुसरे महत्वाचे मंदिर म्हणजे लाडखान मंदिर नाव जरी विचित्र वाटत असले तरी असे सांगितले जाते लाडखान नावाचा कोणे राजपूत बराच काळ इथे वास्तव्यास होता म्हणून या विष्णु च्या मंदिरास लाडखान मंदिर असे म्हंटले जाते.



ऐहोळे बघून झाल्यावर आम्ही आमचा तांडा ऐहोळे पासून केवळ 12 किलोमीटर असलेल्या पट्टदकल कडे वळवला ऐहोळे प्रमाणेच पट्टदकल चा मंदिर समूह म्हणजे अदभूत च


पट्टडकल

               पट्टडकल हे ठिकाण म्हणजे एकाच ठिकाणी असलेल्या अनेक मंदिरांचा समूह.  पट्टडकलच्या आवारात असलेली मंदिरांची नाव खालीलप्रमाणे

१ ) काडसिद्धेश्वर मंदिर

२) जांबूलिंग मंदिर

३) गलगनाथ मंदिर

४) संगमेश्वर मंदिर

५) विरुपक्ष मंदिर

६) मल्लिकार्जुन मंदिर

७) काशीविश्वेश्वर मंदिर














१) काडसिद्धेश्वर मंदिर

       कडसिद्धेश्वर मंदिर हे पट्टडकल मधील गलगनाथ मंदिराशेजारी असलेलं एक मंदिर आहे. कडसिद्धेश्वर नामक एक संन्यासी इथे राहत असल्याकारणाने ह्या मंदिरास "काडसिद्धेश्वर मंदिर" म्हणून संबोधले जाते. झालेल्या पडझडीमुळे ह्या मंदिराचं शिखर हे तुटलेल्या अवस्थेत आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस शिव हरिहर आणि अर्ध नारेश्वर च शिल्प चित्रित करण्यात आलं आहे.





काडसिद्धेश्वर मंदिर

२) जांबूलिंग मंदिर

         जांबूलिंग मंदिर हे नागर शैलीत बनवलं गेलेलं मंदिर आहे. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर असलेले नटराजाचं अप्रतिम शिल्प.


जांबूलिंग मंदिर

३) गलगनाथ मंदिर

       आठव्या शतकात बांधलेलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे हे मंदिरसुद्धा नागरशैलीत बांधलं गेलं आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रदीक्षिणेस प्रशस्त जागा आहे प्रवेशद्वारावर नटराजाचं अनोखा शिल्प आहे.


गलगनाथ मंदिर

४) संगमेश्वर मंदिर

       संगमेश्वर मंदिर हे आठव्या शतकाच्या आसपास बांधलं गेलेलं एक शिवमंदिर आहे. हे मंदिर बांधण्यासाठी चालुक्य राजा विजयादित्य ह्याने प्रचंड मेहनत घेतली म्हणून ह्या मंदिरास विजयेश्वर मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.


विरुपाक्ष मंदिर

         विरुपाक्ष मंदिर हे इ. स. ७४० मध्ये द्रविड शैलीत स्थापन केलेलं असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराची स्थापना लोकमहादेवी नामक राणीने आपल्या पतीच्या कांची विजयाच्या आठवणीत बांधले आहे म्हणून ह्यास लोकेश्वर मंदिर म्हणून संबोधतात. मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात काळ्या दगडात कोरलेली एक भव्य नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या दरवाज्यापाशी दोन्ही बाजूस द्वारपालाची शिल्प आहेत व आजूबाजूस शृंगारिक जोडप्यांची शिल्प रेखीत करण्यात आली आहेत.


विरुपाक्ष मंदिर

६) मल्लिकार्जुन मंदिर

         मल्लिकार्जुन मंदिर हे विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ आहे. हे एक शिवमंदिर आहे शंकराला त्रैलोकेश्वर सुद्धा म्हंटलं जातं. हे मंदिर विक्रमादित्य च्या महाराणी त्रैलोक महाराणी ने आपल्या पतीच्या विजयाला स्मरून निर्माण केलं होतं.


मल्लिकार्जुन मंदिर

७) काशीविश्वेश्वर मंदिर

            काशीविश्वेश्वर मंदिर हे मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूस असलेले मंदिर. ह्याची बाहेरील बाजूस असलेली सजावट अप्रतिम आहे. उत्तरी शैलीतल्या असलेल्या मंदिराच्या कळसावर शिव नृत्य करीत असल्याचे शिल्प आहे बाहेरील बाजूस शिव पार्वती अर्धनारेश्वर ह्यांची शिल्पं आहेत.


पट्टदकल आणि ऐहोळे येथील ऐतिहासिक मंदिरे पाहून आम्ही आता काही वेळात च बदामी इथे पोहचलो आता एव्हाना बऱ्यापैकी पोटात कावळे कोकत च होते आणि विश्वास बसणार नाही इतके रुचकर जेवणाचा आनंद घेऊन आम्ही बदामी च्या लेण्या बघावयास निघालो.







या गावाचा परिसर मोठमोठ्या शिलाखंडांनी युक्त असा असून त्यापैकी गावापासून जवळच असलेल्या अगस्ति तलावाशेजारील मोठया टेकडीवर पाषाणात ही लेणी कोरलेली आहेत . भारतीय पुरातत्व विभागाकडून देखभाल केली जात असलेल्या या लेण्यांच्या सभोवतालचा भाग अगस्ती तलाव व भूतनाथ मंदिर समूह यांनी व्यापलेला आहे .या लेण्यांकडे काही पाय-या चढून जावे लागते . एका अखंड डोंगरात खोदकाम करून ही लेणी तयार करण्यात आली आहेत . या लेण्यांमधील लेणी क्रमांक 1 मध्ये शिव व इतर हिंदु देव देवता लेणी क्रमांक 2 व 3 मध्ये  विष्णु व विष्णुचे विविध अवतार तसेच  रामायण काळातील  प्रसंग व यक्ष किन्नर,नर्तकी असे  दाक्षिणात्य पध्दव्तीच्या मुर्ती खांबावर , दर्शनी भिंतीवर तसेच खांबाला आधार देणा-या तुळया व छत यावर कोरलेल्या आहेत . लेणी क्रमांक 4 मध्ये जैन शिल्पे आहेत .जवळपास दीड हजार वर्ष झाली या कोरीव शिल्पांना ! पण आजही सुस्थितीत आहेत .  महिषासूर मर्दिनी व शिव पार्वती शिल्पे सुबक व सुंदर आहेत. हा मंदिर समूह सुंदर देवालये व स्वच्छ परिसर यामुळे विलोभनीय वाटतो .आता बऱ्यापैकी अंधार पडवयास सुरवात झालीच होती आणि आमची ही अशी  सुंदर तीन दिवसांची हम्पी बदामी ट्रिप पूर्ण करून आम्ही मार्गस्थ झालो खर तर हम्पी बदामी चा मनापासून जर अभ्यास करावयाचा झाल्यास तुम्हाला आठ दिवस सुद्धा कमी पडतील यात मात्र तीळ मात्र शंका नाही.असो माझ्या ह्या दोन्ही भागातील ब्लॉग मध्ये माझ्या नेहमीच्या ब्लॉग प्रणाने प्रवासवर्णनाला प्राधान्य न देता ऐतिहासिक स्थळाची माहिती देण्यावर मी जास्त भर दिला नाहीतर नुसतेच एखाद्या पिकनिक सारखी ही टूर झाली असती.

वरील सर्व संदर्भ हे मी आशुतोष बापट यांच्या सफर हम्पी-बदामी या पुस्तकाच्या आधारे आणि तिथे पुरातत्व विभागाने लावलेल्या माहितीच्या आधारे  घेतलेला आहे.


धन्यवाद🙏🏻

सचिन भांड 

सह्याद्रि ट्रेकर्स परिवार, श्रीरामपूर

sahyadritrekers.blogspot. com

No comments:

Post a Comment

देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...