Thursday, June 23, 2022

कळसुबाई ट्रेक 2022

 जय महाराष्ट्र मंडळी !        

      महाराष्ट्र दोन गोष्टीसाठी खूप जग प्रसिद्ध आहे एक म्हणजे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या डोंगर दऱ्यामधील सर्वोच्चउंच शिखर कळसुबाई पावसाळा सुरू झाला आणि या वेड्या मनाला वेध लागले ते ट्रेकिंगचे आणि मित्रांसोबत भटकंती करण्याचे. इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही गिर्यारोहक नवीन वर्षाच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकिंगचा श्री गणेशा  करायचं ठरवल. तो सह्याद्रि मधील सर्वोच्च शिखर सर करण्याचं आणि ते पण नुकतेच आम्हा भटक्यासाठी सुरू झालेल्या आणि निसर्गाने नटलेल्या रस्त्याने म्हणजेच पांजरे मार्गे करण्याच 

.सर्व नियोजनानुसार 18 जूनच्या रात्री 12 वाजता  कळसूबाईच्या दिशेने डोंगर चढून अद्भुत नजाऱ्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो सुरवातीला फक्त 45 च सदस्य घ्यायचे हाच एकमेव विचार होता. कारण पावसाळी दिवस त्यात निसरडी वाट पण मित्र मंडळी च्या आग्रहास्तव 45 चे 80 कधी झाले ते अगदी गाडी मध्ये बसे पर्यत कळलेच नाही . कळसुबाई ब्लॉग सुरु करण्या आधी थोडी कळसुबाई बद्दल माहिती करून घेऊ. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे.तसेच दुसरा जो मार्ग आहे तो नुकताच प्रकाशझोतात आलेला पांजरे मार्गे ह्या रस्ताने जायचे झाल्यास एखाद्या ग्रुप सोबत च जावे शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची असंख्य  अख्याइका सांगितली जाते त्यातील एक प्रचलित म्हणजे, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पती बद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असत. कालांतराने मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले होते. आणि आठवण म्हणून शिखरावर छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाई ला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे.हा ट्रेक आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी केलाय तो बारी मार्गे ह्या मार्गे ट्रेक करणे म्हणजे तितकासा अवघड नाही फक्त खडी चढाई असल्याने दमछाक होणारा तर नक्कीच अन दुसरा म्हणजे खडी चढाई जरी नसलेला पण आपण सर्वोच्च शिखर सर केलंय याचा आनंद देणारा आहे हे निश्चितच जेंव्हा आपण ट्रेक पूर्ण करून खाली येतो तेव्हा जाणवते.                

          असा हा ट्रेक करण्याचे ठरवले आणि आमच्या दोन्ही गाड्या नियोजित वेळेनुसार निघाल्या काळोखी रात्र अन पावसाळी थंडगार वारा त्या मुळे सर्वच गाडी मध्ये झोपी गेले ते इतके की पहाटे कोवळ्या प्रकाशात त्यांचे जेव्हा डोळे उघडले ते स्वर्गसुख घेण्यासाठी अन आपल्या मोबाईल मध्ये ते सौंदर्य टिपण्यासाठी च आणि त्या नंतर लगेचच आम्ही फ्रेश होण्यासाठी आमचा सह्याद्रि मधील सवंगडी नामदेव च्या घरी पोहोचलो तिथे चहा नास्ता करुन आम्ही एकमेकांशी थोडक्यात ओळख करून घेतली आणि ट्रेक दरम्यान काय काळजी घ्यायची याची सुचना देण्यात आली. आत या ठिकाणी काही गोष्टी आवर्जुन सांगाव्याशा वाटतात की जेंव्हा ट्रेक लीडर काही सूचना देतात त्या तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत कारण त्या मागे त्यांचे अनुभव कामाला आलेले असतात तसेच काहीसे अनुभव आम्हाला ह्या ट्रेक दरम्यान आले .कारण प्रत्येक ग्रुप मध्ये भरपूर अंतर जाणवत होते .त्याच प्रमाणे जेव्हा असे अंतर पडते तेव्हा आपण मागील ग्रुप येवोस्तोवर थांबणे अपेक्षित असते त्याच प्रमाणे जेव्हा समोर दोन रस्ते दिसतात अन आपण खात्रीपूर्वक रस्ता नाही सांगू शकत तोपर्यत मागील अनुभवी गिर्यारोहक येउस्तवर तिथेच थांबावे लागते .असो अशा बऱ्याच गोष्टीचे नियमात पालन आपण आपल्या पुढील ट्रेक दरम्यान कराल  याची मला खात्री आहे.असा हा ट्रेक आम्ही सहा ला सुरू करणे अपेक्षित होते पण सदस्य संख्या वाढल्याने सर्वांचे आवरताना ट्रेक चालू करण्यासाठी 8 वाजले आणि आमचा ट्रेक चालू झाला शिखराच्या मध्यानापर्यत येवोस्तोवर अलगत ढगांची चादर केव्हा ओढली ते कळले च नाही तो जो अनुभव होता तो ग्रुप मधील जवळपास सर्वच जण घेत होते त्यातच जोरदार हवा आणि पाऊस सुरू झालेला  अशा परिस्थिती देखील सर्वांनीच कळसुबाई शिखर गाठले आणि आता खाली उतरताना खरी कसोटी लागणार होती पण सर्वांनी अगदी एकमेकांच्या मदतीने गड उतार केला त्यात ज्ञात असलेल्या पैकी अमित ने तर मधल्या फळीत ज्या चिकट वृत्तीने batting करावी त्याच पद्धतीने आमच्या शेवटचा ओव्हर ला काही विशेष न ठेवता सामना एक हाती जिंकून दिला त्या बद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्या सोबतच नेहमी प्रमाणे किरण आणि बाकी मंडळी असल्या मुळे लहान मुलांची मला कधीच काळजी वाटत नाही त्या प्रमाणे लहान मुलांना ज्या प्रमाणे सांभाळले आणि सुखरूप पायथ्याला आणले त्या बद्दल देखिल आम्हा पालकांच्या वतीने त्याचे आभार त्या सोबतच शिंदे सर असतिल लिलाचंद, गुप्ता जी, दोन्ही डॉक्टर असतील असा सर्वच ग्रुप मेंबर्स ने सर्वांना सुखरूप पायथ्यापर्यत पोहचवले त्या सर्वांचे मी परिवाराच्या वतीने आभार मानतो. तसेच ह्या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सहा वर्षांच्या मुलापासून वयाच्या 70 री पार केलेल्या सदस्यांनी हा ट्रेक पूर्ण केला त्या सर्वांचेच अभिनंदन.

 ट्रेकिंग करण ही केवळ एक दोघांची जबादारी नसते त्या साठी सर्वांचे च हात कामाला येतात तेच ह्या ट्रेक दरम्यान सर्वांनी अनुभवलं सर्वांचे पुनश्च: आभार .प्रत्येक ट्रेक हा आपल्याला काही न काही शिकवत असतो त्यातील च हा ट्रेक भरपूर काही शिकवून गेला आणि असेच आपल्या परिवाराचे पुढील ट्रेक देखील आनंदी अविस्मरणीय राहतील याची मी ग्वाही देतो.                

     सचिन भांड                            

     सह्याद्रि ट्रेकर्स परिवार                     

     श्रीरामपूर  .                               

sahyadritrekers.blogspot.com

      

Wednesday, June 1, 2022

काजवा मोहत्सव 2022

  सहयाद्री ट्रेकर्स आयोजित,
काजवा मोहोत्सव 2022

वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्येक घटकाला माहीत असत रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो. निसर्गातला जिवंतपणा, पक्षांच्या किलबिलाटासहित त्याच्या स्वछंदी बागडण्यातून सर्वत्र मोकळा आनंदी, ऊत्स्फूर्त जिवंतपणा भरून टाकणार असतो. निसर्गाला या येणार्‍या सृष्टीतल्या बदलाची जाणीव होते. त्यातील प्रत्येक घटक येणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपआपल्या परीने त्याच्या स्वागताची तयारी करत असतो. असाच एक चमत्कार सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, रानावनात घडत असतो. ज्यावेळी आपण निद्राधीन असतो त्याचवेळी नभोमंडल जमीनीवर पानाफुलांमध्ये अवतरलेल असत. वैशाख महिन्याच्या शेवटाला रात्रीच्या अंधारात काजव्यांचा थरार सुरू होतो. जंगलात दमटजागी, पाण्याच्या जवळपास हजारो, लाखो किंवा कोट्यवधी काजवे जमा होतात.लहानपणी शेतामध्ये काजव्यांचा मागून धावताना कित्तेक तास घालवलेत. तेव्हा एकटेदुकटे दिसणारे काजवे एखाद्या पारदर्शक डब्यात पकडून गोळाकरायचे,  किती वेळा आणि किती वर्ष हा खेळलो असेल आता आठवत नाही. लहानपणी जेव्हढे काजवे दिसायचे तेव्हढेही काजवे आता गावी दिसत नाहीत याची खंत असायची मनात. सहा वर्षापूर्वी रात्री असच कळसुबाई चढताना अचानक मला शोध लागला  भंडारदर्‍याच्या काजवा मोहोत्सवाचा. तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा काजवा मोहोत्सव पहाण्यासाठी भंडारदर्‍याला जाणे होते.  वैशाखसरताना भंडारदर्‍याच्या हवेतच बदल होत नाही तर निसर्गही कात टाकतो. चोहोबाजूंना मिट्टकाळोख पसरलेला असतो आणि काजव्यांच्या प्रकाश शलाखा रस्त्यावरून, झाडांवरून खाली दरीतून डोंगरावरून लुकलुकत असतात. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागात अजूनही निसर्ग त्याच्या मूळ रूपात शाबूत आहे. ग्रीष्माच्या शेवटी आणि पावसाच्या सुरूवातीला इथल्या डोंगरदर्‍यांमद्धे काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. रस्त्याच्या दुतर्फा काही विशीष्ठ झाडांवरच काजव्यांचा लयबद्ध चमचमाट चालू असतो. ही काजव्यांची वाढती संख्या येणार्‍या पावसाची वर्दी देतात. त्यांच्या संखेवरून निसर्गत:च येणार्‍या पावसाच्या तीव्रतेची कल्पनाही करता येते. वातावरणातील दमटपणा आणि आद्रता जशी जशी वाढत जाते तशी तशी काजव्यांची संख्या वाढत जाते. जणूकाही सर्व नभोमंडळ जमीनीवर अवतीर्ण झाल्याचा स्वर्गीय अनुभव येतो.गाडीचे दिवे बंद करून फक्त यारस्त्यांवर मनसोक्त भटकायचे. या अग्निशिखा कधी तुमच्या डोक्यावरुन तर कधी आजुबाजुने स्वछंदपणे बागडत असतात. भान हरपून तुम्ही रात्रभर नुसते निशब्द फिरत असता आणी मनमुराद ही जमीनीवरची लोभसवाणी प्रकाशफुलं वेचत असता. हा अनुभव खरच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा स्वर्गीय आनंद प्रत्येकाने घ्यायलाच हवा. एकालयीत, तालासूरात निशब्द लुकलुकाट तुमच्या चोहोबाजूला चाललेला असतो, आपण त्याचे मुक साक्षीदार बनलेले असतो. गाडीचे दिवे उघडझाप करून पहा, हे काजव्यांचे दिवेही दिव्याच्या उघडझापीला त्यांच्या चमचमाटाने उत्तर देतात आणि तोही एका तालासुरात, फक्त तुम्हाला तो ताल-सुर कानाऐवजी तुमच्या नजरेने टिपता यायला हवा.अंधार्‍या रात्री गाडीचे दिवे बंद करून ऐकटेच या झगमगीत रस्त्यावरून रॉयल सफर करून बघा, तुम्ही कुणी स्पेशल असल्याचा अनुभव नक्कीच येणार. दुतर्फा नैसर्गिक दिव्यांचा झगमगाट आणी मधून आपली सवारी चालली आहे. एखाद्या परी कथेतील वर्णन ना!.. पण हे काजवे कॅमेर्‍यात बंदिस्त करणे हे महा कर्म कठीण काम. काजवा हा "आरथ्रोपोडी" समुदायातला कीटक आहे. सुमारे दोनशेच्या वरती जाती आहेत काजवयांच्या. प्रत्येकाचे रंग रूप वेगळे, प्रत्त्येकाच्या प्रकाशात फरक, कुणाचा कमी, तर कुणाचा जास्त. परंतु रंगात फरक जरी असला तरी हिरवट-पिवळसर प्रकाशाच्या छटाच तयार करतात हे काजवे. हा दमट वाटवरणात राहणारा जीव आहे, त्याची साधारण लांबी एक ते दीड सेंटीमेटर असते. काजव्यांच्या जीवनक्रम आणि फुलपाखराचा जीवनक्रम सारखाच, फक्त काजवे हे किटकभक्षी आहेत. आधी अंडी, मग त्यातून अळया बाहेर येतात आणी मग उडणारा झगमगणारा कीटक तयार होतो. काजव्यांच्या शरीरात मागील पोटाखालच्या भागात पारदर्शी आवरण असते, त्याला क्युटिकल म्हणतात. यातच प्रकाश देणारा घटक असतो. काजव्यांच्या प्रकाश देणार्‍या अवयवामध्ये / पेशींमध्ये "ल्युसिफेरीन" नावाचा घटक असतो. तोच त्यांच्या चमचमटाला कारणीभूत असतो. काजवयांचा प्रकाश हा थंड, शांत असतो. अंधार्‍यारात्री काजव्यांचे लुकलुकणे फारच मनमोहक दिसते. हे लुकलुकणे काजवयांच्या श्वासोछवासावर अवलंबून असते. जेव्हा कीटक श्वास सोडतो तेव्हा हा प्रकाश मंदावतो, पुन्हा श्वास घेताना प्रकाश प्रखर होतो. नर काजवा मादीपेक्षा थोडा प्रखर प्रकाश देतो, म्हणूनच मादी नराकडे आकृष्ट होते.त्यातून हे कीटक अंडी घालतात अन ती अंडी पाला पाचोळ्यात वर्षभर अळीच्या स्वरूपात राहतात आणि ह्या मौसम मध्ये त्यांच्या प्रजनांनातर त्यांचा कार्यकाळ संपतो.अशा ह्या मोहत्सवाची खरी सुरवात जी झाली ती पुरुषवाडी ह्या गावापासून पण थोडेसे आपिरिचित अन दळणवळणा चा अभाव त्या मुळे हा परिसर तसा पर्यटनाच्या दृष्टीने मागे पडला आणि पुढे आला भंडारदरा म्हणूनच ह्या वर्षी गेले दोन वर्षे करोनाच्या साथीने हा परिसर पर्यटनासाठी बंद असल्या कारणाने ह्या वर्षी काजवा महोत्सव पुरुषवाडी ला घेण्याचे ठरवले सुरवातीला दोन batch मध्ये म्हणजेच मे चा शेवटचा आठवडा आणि जून चा पहिला आठवडा अस नियोजन होत पण काही सदस्यांच्या सोयी मुळे मे मधेच दोन्ही batch घेण्याचे ठरले आणि पहिल्या batch ला पाहिजे तसे काजवे पाहण्यास नाही मिळाले म्हणून ती एक मनात खंत होतीच म्हणूनच दुसरी batch अगदी तीन दिवस अगोदर पर्यत पुरुषवाडी मध्ये कुठलीच कजव्यांची हालचाल न दिसल्याने ठिकाण बदलावं लागले आणि घाटघर च नियोजन केले परंतु तिथे होणारी शनिवार रविवार ची गर्दी पाहता रविवार आणि सोमवार च नियोजन ठरलं आणि तो निर्णय खरोखरच जेव्हा सदस्यांच्या डोळ्यांचे पारणे फीटताना दिसले तेव्हा मनाला एक आत्मिक समाधान झाले .असा ह्या प्रवासाचे वर्णन करावयाचे झाल्यास नेहमी प्रमाणे आमची 8 वाजता निघणारी बस 9 वाजता तिने प्रस्थान केले.गाडीने थोडे अंतर पार केल्या नंतर ग्रुप मध्ये बरीचशी मंडळी ही नवीन होती त्यामुळे त्यांची ओळख त्यांनी करून देताना एका वेगळ्या स्वरूपात करून देताना गाडीने रस्ता केव्हा पार केला ते कळलेच नाही त्यात रस्त्यात एका कार्यालयात जेवणासाठी थांबताना त्यांनी ज्या पद्धतीने आदरातिथ्य केले ते कधी विसरुचशकत नाही आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला तिथे पोहचल्यावर आमच्या घाटघर च्या भावाच्या हातून सर्व सदस्यांचे आपल्या पारंपरिक प्रथे प्रमाणे ग्रुप च्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले.
नंतर चहाचा आस्वाद घेऊन आम्ही सर्व धरणाच्या पाठीमागे जाऊन सर्वांनीच फोटोसेशन चा मनमुराद आनंद घेतला.
त्याच प्रमाणे सध्या आपण डोंगर दऱ्या फिरताना ओसाड झालेली रानमळे बघतो त्यांचे हे वैभव पुनः उभे करण्यासाठी आपल्या परीने जाऊ तिथे वृक्षारोपण ही संकल्पना ह्या वर्षी पासून आम्ही  चालू केली त्या नुसार वृक्षारोपण चा कार्यक्रम घेतला अन  जस जसा अंधार पडू लागला तस तशी
सर्वजण खूप खुश होत होते, सर्वाना काजवे कसे पाहावे काय काळजी घ्यावी या विषयी थोडे मार्गदर्शन करून आम्ही सर्वजण सृष्टीचा अनमोल नजरा बघण्यासाठी मार्गस्थ झालो काहीजण तर काजवे बघण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेत होते, लहान मुले पण त्यांना पकण्यासाठी त्याच्या मागे पळत होते थोड्यावेळाने एक काजवा एक जणांच्या हातावर येऊन बसला मग तो काही लहान मुलाच्या हातावर देऊन त्यांना काजवा त्याच्या हातावर पकडण्याचा अनुभव घेता आला, अर्थात ह्यात काजव्याची सुरक्षितता सांभाळली, आणि सर्वांना तो इवल्याशा जीवाला किती काळजीपूर्वक हाताळायला हवे हे सांगितले, लहान मुलांनी सुद्धा मग, अगदी प्रेमाने काजवा त्यांच्या हातावर चालताना त्याला इजा होणार नाही ह्याची काळजी घेतली.  ती खूप खुश होती सारखी कजव्याच्या मागे पळत होती, त्यांना काळोखात दुसरी कसलीच भीती वाटत नव्हती.  ती बिनधास्त पणे आनंद लुटत होती, त्याच्या पालकांना भीती वाटत होती, की काळोखाय पायाखाली एखादा, सरपटणार जीव येईल पण मुले बिनधास्त होती.खरच निसर्गाची काय किमया आहे ना, ना कोणती इलेक्ट्रिसिटी , ना कोणते लाईट कनेक्शन तरीही हे काजवे लुकलुकत होते, किती अवर्णनीय क्षण होते ते, अगदी दिवाळीत रोषणाई करतो तशी सर्व झाडे शृंगार केल्यासारखी लुकलुकत होती, त्या लुकलूकण्यामुळे त्या काळोखात त्याचे सौन्दर्य अगदी फुलून दिसत होते,  आम्हा सर्वांसाठी असे हजारो काजवे आसपास बघणे ही एक वेगळीच अनुभूती होती आणि हे सर्व क्षण डोळ्यात साठवून आम्ही जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.
आणि त्या नंतर कुणाच्या मोबाईल ला range नसल्यामुळे बिना म्युझिक चा सर्वांनीच गाण्याचा अनुभव घेतला आणि सर्वजण आपापल्या तंबू मध्ये जाऊन झोपली आणि सकाळची जी सुरवात झाली ती एक दुःखद घटना कळल्या मुळे ग्रुप मधील मंडन काका यांचे थोरले बंधु यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्या मुळे सर्वांनीच परिस्थिती चे भान ठेवून लवकरात लवकर आवरण्याचा प्रयत्न करून श्रीरामपूर कडे मार्गस्थ झालो.
काजव्यांचा  हा अविस्मरणीय अनुभव प्रत्येकानेच एकदा तरी अनुभवावा.

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपूर.

Thursday, March 10, 2022

हरिहर गड,अजस्त्र आविष्कार

 

हरिहर गड 

दि.06 मार्च 2022

छंद जिवाला लावी पिसे... तसचं काहीस झालय माझ , प्रत्येक ट्रेक हा जिवाला करी वेडेपिसे..... ट्रेक म्हणजे माझ्यासाठी एक श्वास आहे. सच ही हैं 'इन पहाड़ों की हवांओं में इक नशा सा हैं'.. ..और वो बढता ही जा रहा हैं। एक दोन आठवडे सरले की याची ओढ उफाळून वर येतेच येते आणि सुरु होतात पुढच्या ट्रेक चे प्लान. इच्छा तर असते प्रत्येक आठवड्याला ट्रेक करण्याची पण नेहमी जमेलच असे नाही. निसर्गाशी  एकरुप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ट्रेकिंग, आपण निसर्गाशी बिनधास्त एकरुप व्हायचं. सह्याद्रीतील डोंगर दऱ्यात फिरतांना माझ्या डोळ्यात भरतात ते प्रचंड मोठे काळे पाषाण .काय एक एक रॉक असतात राव  , तुम्ही म्हणाल काय वेड लागलय का ह्या  माणसाला... पण खरच वेडच लावल आहे ह्या सह्याद्रीतील काळ्या भिन्न पाषाणांनी त्यांच्यातला वेग वेगळेपणा सतत मला भारावून टाकतो. तो म्हणजे, बेलाग सुळक्या मधील 'रुबाब', आणि प्रचंड  कातळातील दिमाखदारपणा तर खुप भावतो. विविध कातळ, काळकभिन्न रंगाचे, मोहक आकारांचे असे अंगावर येणारे बेलाग सुळके तर ताठ मान आणि नजर उंचावल्या शिवाय आपण त्यांना पाहुही शकत नाही. म्हणून जरा जास्तच आवडतात.कोणत्याही गडकिल्यावर जा असे हे मोठ मोठे पाषाण आपल्या स्वागतासाठी तयारच असतात. कधी कधी तर या पाषाणात पायर्‍या खोदून गडावर जाण्याचा मार्ग बनवलेले दिसतात. सह्याद्रीच्या कातळावर प्रेम करणार्‍या माझ्या पूर्वजांनी जिथे जिथे चढाई अत्यंत कठीण आहे आशा अवघड ठिकाणी सुध्दा पायर्‍या कोरून गडावर जाण्याचा मार्ग बनवला आहे त्यांच्या या स्थापत्य कलेसाठी त्यांना मानाचा मुजरा. अश्याच भक्कम कातळात 70 ते 80 डिग्रीत कोरलेल्या खड्या पायर्‍यामुळे प्रसिद्ध असलेला आणि कायम ट्रेकर लोकांचा आकर्षणाचा बिंदू ठरलेला हरिहर गड. ऐतिहासिक व अतिप्राचीन असा स्वतःच्या रांगड्या रुपाने कोणालाही त्याच्या प्रेमात पाडणारा गड. म्हणूनच काही गड किल्ले कायमच परत परत खुणावत असतात त्यातीलच एक गड म्हणजे हरिहर गड वासोटा ट्रेक नंतर ह्या वर्षीचा शेवट हरिहर ट्रेक करून करावा ही एक मनोमन इच्छा होतीच आणि त्याप्रमाणे नियोजन चालू झाले.

नाशिकच्या पश्चिमेस त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेत अनेक गडकिल्ले येतात, त्यातील हरिहर हा प्रमुख किल्ला आहे. त्र्यंबक रांगेचे दोन भाग पडतात एका भागात बसगड, उतवड फणीचा डोंगर, त्र्यंबकगड व हरिहर हे गड येतात आणि दुसर्‍या भागात अंजनेरी, घरगड हे किल्ले येतात. वैतरणा ही येथील प्रमुख नदी आहे. हरिहरगड समुद्रसपाटीपासून 1120 मीटर म्हणजेच 3400 फुट उंच आहे.

हरिहरगड च्या इतिहासात डोकावल्यास हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता.  शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे जाऊन मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली.त्या नंतर हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.  मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, “या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात. खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

असा हा ट्रेक करण्यासाठी दि.06 मार्च  रविवारी रात्री 01वाजता आमची 40 जणांची बस नारळ फोडून नाशिक कडे रवाना झाली. हरिहरची ओढ इतकी की अगदी थोडासा डुलका वगळता कोणाला फारशी झोपही लागली नाही. आम्ही नाशिक वरुन त्र्यंबकेश्वर मार्गे पहाटे साडेपाच वाजता हर्षेवाडी येथे पोहचलो. गडाच्या पायथ्याशी असलेले हे गांव. हरिहर च्या ओढीने पाच तास प्रवास करुन देखील प्रवासाचा ताण अजिबात जाणवला नाही. बसमधून उतरल्या बरोबर सकाळचा थंडगार वारा अंगावर घेत. लगेच एका तासात सर्वजण फ्रेश झाले. गावातील सोमनाथ याच्याशी आधीच संपर्क करून ठेवल्याने त्याने  चहा नाष्टा ची पूर्ण तयारी करूनच ठेवलेली असल्याने नाष्ट्यानंतर गरमागरम वाफाळत्या चहाचा आस्वाद घेऊन पुढे निघालो.

यानंतर सर्वांना ट्रेक विषयी सर्व सुचना दिल्या व त्या पाळण्याचे आदेश ही दिले.त्यानंतर आमच्या ग्रुप ला अभिमान वाटावा असा आमच्या ग्रुप सदस्या डॉ. मृण्मयी यांची नुकतच जनरल सर्जरी साठी नंबर लागल्याने ग्रुप च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्या नंतर 8 वाजता ट्रेक सुरू झाला.

सकाळच्या पहारी दहा बारा घरं असलेलं गांव किती सुरेख दिसत होत. घराघरातून पेटलेल्या चुलीतून निघणारा धूर ,गोठयातील गाई गुरं, इकडे तिकडे पळणार्‍या कोंबड्या, पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावर तीन तीन भरलेले हांडे घेऊन जाणारी महिला सकाळचे हे गावातील दृश्य तर अलोभणीय होते  त्यातचअजुबाजुला वाळलेल्या गवतात सकाळच्या कोवळ्या उन्हात आमच्या सारख्याना फोटोग्राफीची मजा काही औरच.

आता बर्‍यापैकी चढण चढण्यास सुरवात झाली. अलीकडे ट्रेकर्सनी किल्यावर जाणाऱ्या बर्‍याच वाटा शोधल्यामुळे तशी ही मळलेली वाट फारशी दिसली नाही. या वाटेवर मधे मधे लिंबूपाणी विकणारे लोक बसलेले आहेत त्यामुळे लिंबूपाणी पिऊन फ्रेश होऊनआपण पुढे जाऊ शकतो.

ट्रेक कोणताही असो वाट कशीही असो अजुबाजुचं सौंदर्य न्याहळत   ते मी आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वच ट्रेक मध्ये अगदी शेवटच्या माणसाला गडावर नेण्याची माझी जबाबदारी असल्याने मला  मधे मधे थांबुन अजुबाजुचं सौंदर्य न्याहाळत फोटोग्राफीची मजा घेता येते. त्यातच काहीजण फोटोसाठी लुडबुड करणारे असतातच सर माझा असा घ्या तसा घ्या अर्थातच मला माझ्या फोटोपेक्षा दुसऱ्यांचेफोटो काढायला आवडतातच  म्हणा.त्यातच ट्रेक छोटा असल्याने मनसोक्त फोटोसेशन केले. 

खरतर गड माथ्यावर पोहचल्यावर जो आनंद मिळतो त्याही पेक्षा तिथवर पोहचण्यासाठी केलेला घाटवाटांचा प्रवास तासनतास तुडवलेल्या पायवाटा, दमवणाऱ्या अडवाटांची पायपीट कैक पटीने आनंद आणि समाधान देऊन जात असते.दोन तासाच्या पायपीटी नंतर आता आमच्या समोर तो भव्य हरिहर उभा ठाकला. ज्याच्यासाठी इथवर आलो भव्यदिव्य पाषाणाचा खडा डोंगर आणि पाहता क्षणी धडकी भरेल अशा खड्या पायऱ्या,तरीही ओढ कायमच. जसे दिर्घप्रतिक्षेनंतर दोन मित्र एकमेकांना भेटण्यास आतुर असतात तसेच हरिहर आणि आमच्यात झाल होत. सगळेजण खुपच उत्सुक होते. आता खर थ्रील सुरू झाले...'याच साठी केला होता इथवर येण्याचा अट्टाहास ' सर्वच मेम्बर्स  एकमेकांना मदत करत   कसलीही घाई गडबड न करता त्या खड्या पायर्‍या चढू लागले.तरीही 70 ते 80 डिग्रीत कोरलेल्या असल्याने प्रत्येक पाऊल आडवे टाकत चढावे लागते, प्रत्येकी दोन पायरीत अंतर जरी जास्त असले तरी पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला खोबण्या आहेत त्यामुळे हाताने खोबणीला घट्ट पकडून सावकाश एक एक पायरी चढता येते. सह्याद्रीतल्या काळ्याभिन्न पाषाणावर प्रेम करणाऱ्या माझ्या पूर्वजांचे स्मरण करून या सरळसोट शंभर पायऱ्या पार केल्या. इथूनच शेंदूर लावलेल्या कमानीतून किल्यावर प्रवेश करता येतो. तसेच पुढे डाव्या बाजूने गडावर जाण्यासाठी कपार लागते. या कमानीतून समोरची कपार व तिच्या पलीकडील डोंगर अप्रतिम नजारा डोळ्यात भरतो वाह! या कपारीला वळसा घालून जाताना डाव्या हाताला एक नेढे दिसते

पुढे इथेही पाषाणात बाजूने कोरलेले दोन जिने पार केल्यानंतर, दोन भव्य पाषाणाच्या मधुन एक जिना वर जातो व पुढे एका पाषाणाच्या आतुन बाहेर निघतो, इथे कोथाळीगड ची आठवण होते.

अजून दोन जिने पार केल्यानंतर समोर डोम दिसतो हेच ते किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. इथून उजव्या बाजुने थोडे वर चढत गेले की पठार लागते. तसे हे पठार निमुळते आहे व मधेच उंचवटा आहे. या उंचवट्यावरुन पुढे गेल्यावर, डाव्या बाजूला खाली एक तलाव आहे व त्याच्या बाजूला हनुमान व शंकराचे मंदिर आहे. आम्हाला पायथ्यापासून दिसणारी हरिहरची आयताकृती कातळीभिंत व बाजूची दरी आता स्पष्ट दिसत होती.

 या दरीच्या बाजूने पुढे गेल्यावर समोर हरिहरच शिखर दिसु लागत.हे शिखर फारच निमुळतं असल्याने  सर्वांना अत्यंत काळजीपूर्वक वर चढून जावे लागते. शिखरावर 10 ते 15 च लोक उभे राहु शकतील इतकीच जागा आहे. त्यात वाऱ्याचा जोर असल्याने तोल जाऊ शकतो म्हणून कडेला जाऊ नये, सेल्फी अजिबात काढू नये. अशा ठिकाणी फक्त निसर्ग सौंदर्य न्याहाळाव डोळ्यात साठवून घ्याव आणि लगेच उतराव . शिखरावर जमेल तेवढ्यांचा ग्रुप फोटो घेऊन आम्ही एक एक जण उतरु लागलो.

इथून उजव्या बाजूला थोडे उताराला गेले की खुपच निमुळतं पठार आहे. इथे वाटेत पाण्याची पाच टाकी आहेत. एक दगडी कोठी आहे. इथून ब्रह्मगिरी अतिशय सुंदर दिसतो. समोरील एक बाजूच्या सर्वच डोंगररांग व दुसऱ्या बाजूला खाली वैतरणाचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. इथून परतताना एका टाक्यातील पाण्याने तोंड धुतले, चार तास चालून थकलेला जीव या थंड पाण्याने एकदम फ्रेश झाला.

आता गड उतरण्यास सुरूवात केली. म्हंटलेच आहे ना "चढण्यात शान आहे पण उतरणे अनिवार्य आहे". चढण्याचा थ्रील अनुभवल्या नंतर, खरी कसोटी लागते ती उतरण्याची. उतरताना पूर्णपणे स्वतःवर नियंत्रण ठेऊन सावकाश एक एक पायरी उतरावी लागते.

जिथे जसे जमेल तसे बॅलन्स सांभाळत प्रत्येकजण उतरत होते. काही ठिकाणी पायऱ्यांमधील अंतर जास्त असल्याने बसत बसत उतरावे लागते. उतरताना बाजूची दरी आता चांगलीच दिसू लागली होती. काहींचे भितीने पाय थरथरत होते पण एकदा का मनाने ठरवल आणि दुसरा पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा भिती निघून जाते. उतरताना प्रत्येकाने सुरक्षित अंतर ठेवून उतरावे. कारण तोल गेला दुसर्‍याला धक्का लागला तर सरसकट सगळे खाली जाण्याची शक्यता असते म्हणून शांतपणे उतरणे गरजेचे असते. अशा 80 डिग्रीत कोरलेल्या खड्या पायऱ्या प्रत्येकाने अत्यंत सावधगिरीने उतरल्या, अशाप्रकारे हरिहर च्या पायऱ्यांचा हवाहवासा रोमांचकारी थरार सगळ्यानी अनुभवला.

आता सात तासाच्या ट्रेक नंतर प्रचंड भूक लागलेली खाली उतरून सोमनाथ च्या घरात अतिशय रुचकर अशा व्हेज/नॉनव्हेज भोजनाचा आनंद घेतला त्याला जोड म्हणून व्हेज नॉनव्हेज च्या वादविवाद चा चर्चेचा तडका होताच.त्या नंतर थोडासा अराम करून सध्या सह्याद्रि मध्ये ज्या दुर्घटना घडताय त्या का होताय या बाबत थोडेसे मार्गदर्शन केले आणि सोमनाथ च्या भावाच्या हातचा गरमा गरम चहा चा आस्वाद घेऊन  हरिहरला पायथ्यापासून निरोप देत पाच वाजता आमची बस  निघाली.आणि काही क्षणातच सर्वजण दुपारची दमछाक झाल्याने  झोपी गेले पुढे नाशिक शहर सोडल्या नंतर चहा प्रेमीचे energy ड्रिंक घेतल्यानंतर जो काही उत्साह अंगात संचार ला होता तो बस मध्ये गाण्याच्या भेंड्या karoke music डान्स या मुळे सर्व थकवा हा केव्हाच निघून गेला .

 असा हा थ्रिल असणारा  हरिहर ट्रेक प्रत्येकाने एकदा   अनुभवायला काय हरकत आहे. 

सचीन भांड

सह्याद्री ट्रेकर्स

श्रीरामपूर





















Thursday, February 17, 2022

वासोटा ट्रेक

 वासोटा ट्रेक एक अविस्मरणीय सफर

दि.१२ आणि १३ फेब्रुवारी 2022

टकत असताना सह्याद्रीला उपमा देताना त्याच्याबद्दल लिहिताना शब्द अपुरे पडतात , पण थोड्याफार वाचनाने,स्वानुभावाने आणि माझ्या फोटो च्या माध्यमातून आमच्या ट्रेकचे वृत्तांत आंतरजाळावर उतरविण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो हा ब्लॉग वाचुन तुमच्याही पायाला भिंगरी लागेल यात शंकाच नाही ,अर्थात तसे झाले तर या ब्लॉगचे सर्वात मोठे यश असेल.बाकीच्या गप्पा लेखांमधुन ,फोटोंमधुन होईलच- एक अविस्मरणीय जंगल प्रवासआतापर्यंत बरेच किल्ले पाहिले. पण  वासोटा कायम कायम बघण्याची आतुरता नेहमीच लागलेली असते . काही दिवसांपूर्वी AMK सर्वांनीच सुखरूप केल्यानंतर आता एखादा निवांत आणि संपूर्ण निसर्ग सौंदर्य लाभलेला एखादा पुढचा ट्रेक घ्यावा म्हणून मंडळी आग्रही होती आणि लगेच समोर उभा राहिला निसर्ग सौंदर्याने वेढलेला वासोटा आणि प्लान झाला परंतु पुन्हा एकदा आम्हा भटक्यांच्या मानगुटीवर बसलेल्या भुताने आपले डोके वर काढले आणि ट्रेक स्थगित करावा लागला साहजिकच सर्वांचाच हिरमोड झाला परंतु एक अशा होती हे भूत जास्त काळ टिकणार नाही म्हणून सगळ्यांना ग्रुप न सोडण्याचा सल्ला देऊन निर्बंध उठन्याची वाट पाहू लागलो आणि तो दिवस उजेडला माझा साताऱ्याच्या मित्रा चा फोन आला आजच राजेंबरोबर मीटिंग झाली आणि संपूर्ण क्षमतेने वासोटा चालू करण्यास परवानगी दिली. अन क्षणाचा ही वेळ न दवडता ग्रुप वर आनंदाची बातमी दिली आणि ट्रेक ची तारीख काढून आम्ही पुढील नियोजन चालू केले. आणि सुरवातीला 40 मेंबर चे नियोजन कधी 50 शी पार झाले कळलेच नाही आणि मग ओढ लागली 12 फेब्रुवारीच्या वासोटा ट्रेकची. आणि यातच भर पडली पहिल्या कॅम्पिंगची.

 वासोटा गडाच्या इतिहासात मागे डोकून बघितल्यास  वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या या शिखरावर राहण्यास आले व त्यांनी या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ’वसंतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. तसेच या गडास व्याघ्रगड देखील म्हणतात  मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले. पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

असा हा ट्रेक ठरल्या प्रमाणे 12 तारखेला श्रीरामपूर वरून आमच्या 50 नवीन जुन्या ट्रेकर्स ची सांगड करून शनिवारी सकाळी चालू झाला .परंतु रस्ता मधील ट्राफिक मुळे रस्त कटता कटत नव्हता आणि अगदी पोहोचण्याच्या काही अंतरावर आमच्या गाडीचे एक चाक पंक्चर झाले . त्यात घाट रस्ता आणि काळोखी रात्र  ती वेळ आम्हा सर्वांसाठीच एक आव्हान होत अशा परिस्थितीत सर्वांनीच टायर बसवण्यास खूप मदत केली त्यातच  महिला भगिनींनी त्या वेळेत चिडचिड न करता खेळात मन गुंतवून ठेवल. त्या बद्दल खरच त्यांचे देखील मनापासून धन्यवाद सर्व काही आलबेल झाल्यानंतर आमचा प्रवास सुरु झाला आणि काही वेळातच आम्ही आमच्या हॉटेल वर पोहचलो तिथे पोहचल्यावर सर्वांनी फ्रेश होऊन लागलीच सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेतला त्यातही माझ्या तरी आजपर्यंत च्या खाण्यात असे चिकन खाल्ले इतके रुचकर ते होते आणि त्यानंतर मस्त बासुंदी वर ताव मारावा हा हेतू होता परंतु व्हेज वाल्यानी आमच्या साठी तीही ठेवली नाही असं हा आस्वाद घेऊन कॅम्पिंग साठी सर्व पोहचलो एव्हाना बऱ्यापैकी तसा उशीर झाला होता .कॅम्पिंग साठी बरेचशे खेळ आणि गाण्याचे नियोजन होते पण वेळेअभावी आम्ही ते घेऊ शकलो नाही.  तरी देखील जो काही वेळ मिळाला त्या वेळेचा योग्य सदुपयोग करून सर्वांनी डान्स मस्ती धमाल  मुळे  अनोळखी जणांमध्ये घट्ट मैत्री झाली. त्यानंतर रविवारी सकाळी आम्ही वासोट्याकडे जायला मार्गस्थ झालो. तब्बल एक तासाच्या बोटीच्या प्रवासात सर्वांनीच प्रतिकूल परिस्थितीत देखील मनसोक्त फोटोचा आनंद लुटला अन  आम्ही पायथ्याला पोहचलो. फॉरेस्ट ची परवानगी घेऊन लगेचच किल्ल्याकडे कूच केली.ह्या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे साठी पार केलेल्या काही मंडळींची जिद्द पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा देखील उत्साह हा वाढत होता .सहयाद्रीच्या जंगलातून आम्ही धोपटमार्गाने आम्ही किल्ल्यावरती पोहचलो. दुपारचे जेवण करून आम्ही वासोट्याच्या भटकंतीला सुरुवात केली. मारुती मंदिर, वाड्याचे अवशेष, महादेव मंदिर, बाबू कडा आणि दूरवर पसरलेला सह्याद्री नजरेत कायमचा जेरबंद करून गडउतार करण्यास सुरुवात केली .येताना पाण्यातील प्रवास तर एक सुंदर अनुभुती देऊन गेला त्यात सूर्य मावळतीला होता त्या मुळे शिवसागर चा जलाशय च रूप तर अवर्णनीय होते असा हा सुंदर नजारा मी माझ्या कॅमेरा मध्ये कैद करण्याचा प्रयत्न करून आम्ही परतीचा प्रवास चालू केला

रात्री येताना रस्त्यात जेवणासाठी थांबल्या नंतर त्या ठिकाणी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्या गाडीत बसताना माझी नजर गेली अन क्षणाचा ही विलंब न करता मी लगेच त्यांचा फोटो घेण्यासाठी त्यांच्याजवळ गेलो त्यांच्या ते लक्षात आल्याने त्यांनी जवळ बोलावून माझा मोबाईल त्यांच्या साथीदारकडे देऊन  आमचा फोटो घेण्यास सांगितले त्त्यांचे चरण स्पर्श घेताना तर अक्षरशः डोळ्यातून आनंदाचे अश्रु येत होते. खरचं असा ह्या ट्रेक ची सांगता अशा प्रकारे होऊ शकेल असे मनातही नव्हते . वासोट्याची ही केलेली जंगल सफर आम्हा सर्वांसाठी च अविस्मरणीय होती.  असंख्य आठवणी सोबत घेऊन परतणारी मंडळी पुढच्या ट्रेकचा परीक्षेत आहेत .

सचिन  भांड

सह्याद्रि ट्रेकर्स

श्रीरामपूर


















Wednesday, January 26, 2022

भिगवण पक्षी अभयारण्य आणि धर्मवीर गड स्थळदर्शन

तारीख.-23 जानेवारी 2022
भिगवण पक्षीअरण्य   

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग दरम्यान  असणारं भिगवण गाव आज पक्षी अभ्यासकांसाठी एक पर्वणी म्हणून  उदयास येत आहे ते इतके की अगदी आता ह्या अभयारण्यास महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून देखील संबोधले जाऊ लागले आहे. भिगवणजवळ असणा-या उजनी धरणाच्या परिसरात शेकडो प्रकारचे परदेशी व स्थानिक पक्षी पाहायला मिळतात. जानेवारी ते एप्रिल या काळात राज्यातला प्रत्येक पक्षीप्रेमी आणि फोटोग्राफर ही पंढरीची वारी करतोच करतो.त्यातलाच मी देखील गेले तीन ते चार वर्षांपासून नित्य नियमाने भेट देणारा त्यातूनही भिगवणच मोठ आकर्षण म्हणजे गुलाबी पायांचे नितांत सुंदर असे  फ्लेमिंगो पक्षी. त्यामुळेच ह्या वर्षी ठरवल की श्रीरामपूरकराना देखील  भिगवणला पक्षी बघण्यास घेऊन जायच .भिगवण आणि इथल्या परिसरात दरवर्षी हे परदेशी पक्षी लाखो-हजारो मैलांचे अंतर पार करून येऊन पोहोचतात. जानेवारी ते मार्च हा या पक्ष्यांना भेटण्याचा उत्तम काळ.अशी ही सफर करायच्या उद्देशाने आम्ही सकाळी श्रीरामपूर मधून निघालो भिगवण ला जाताना मराठ्यांच्या वाईट इतिहासाचा साक्षीदार असलेला धर्मवीरगड करायचे हे नियोजन होतेच ह्या गडाच्या इतिहासा संदर्भात मी खाली सविस्तर मांडणी केलीच आहे ती जरूर वाचावी .असा हा प्रवास करत आम्ही धर्मवीर गड करून झाल्यावर एक तासातच कुंभारगावला पोहोचलो. हे भिगवणजवळच  एक लहानस खेडेगाव. इथेच उजनी धरणाच विस्तीर्ण पात्र आहे. म्हणजेच पक्षी निरिक्षकांचं पक्षीतीर्थ!  परदेशातून काही काळासाठी स्थलांतर करून थंडीच्या दिवसात आपल्या इकडे राहाणारे स्थलांतरीत म्हणजे मायग्रेटरी बर्ड्स पाहण्याचे उत्तम ठिकाण म्हणून भिगवण ओळखलं जात. आता गेली काही वर्ष तर इथे हौशी पक्षीप्रेमींची मांदियाळीच जमते. अगदी पक्षीप्रेमी नसलेलेही इथपर्यंत धरणाच्या पाण्याकाठी वीकेंड साजरा करायला म्हणून येऊन पोहोचतात. दुपारी तीन वाजता आम्ही पोहचल्यावर भिगवण ला यायच आणि मच्छीचा आस्वाद घ्यायचा नाही अस होऊच शकत नाही आणि आम्ही सर्वांनी  अप्रतिम आशा मच्छी थाळीचा आस्वाद घेऊन साडेचार वाजता पक्षी पाहण्यासाठी बोट राईड चालू केली. इथल्या पक्ष्यांची काहीच माहिती नसेल तर तिथे मार्गदर्शक पुस्तकंही विकायला ठेवलेली आहेत. शिवाय गाईडही जलसफारीत सोबत असतोच.या बोटिंगच्याच माध्यमातून पक्षी पाहाण्याची संधी मिळते. धरणात भरपूर प्रकारचं जलचर खाद्य उपलब्ध असल्याने सर्व प्रमुख पक्ष्यांची इथे जत्राच भरलेली असते. इथे अगदी दोन दिवस काढलेत तरी परिसरातले ७० टक्के पक्षी पाहून होतात. ग्रेटर फ्लेमिंगो (रोहित), पेटेंड स्टॉर्क, लिटल कॉर्मोरँट, पर्पल स्वँप हेन, रडी शेल डक (चक्रवाक), नॉर्दन शॉवेलर, एशियन ओपनबिल, युरेशियन स्पूनबिल, ब्राऊन हेडेड गल, सीगल, इग्रेट, पाँड हेरॉन, ब्लॅक विंग्ड स्टिल्ट, सँडपायपर, ओरिएंटल व्हाईट एबिस, स्मॉल पॅटिनकोल आणि इतर असंख्य प्रकारचे या यादीत नसलेले पक्षी या उजनी धरणाच्या पाण्यात विहार करताना पाहाण म्हणजे पक्षीप्रेमींच्या आयुष्यातील सुर्वणक्षणच असा हा भिगवणजवळचा परिसर,  इथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.पक्षी पाहण्यासाठी पहाटे सहा वाजता आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळची नावेतली फेरी चुकवू नका.असा हा अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही संध्याकाळी सात वाजता परतीचा प्रवास चालू केला असा हा आनंद ग्रुप मधील सर्वांनी  पहिल्यांदाच घेतला असल्यामुळे सर्वांचा चेहऱ्यावर जो आनंद होता तो बस मध्ये ओसंडून वाहत होता.
















धर्मवीरगड स्थळदर्शन


भिगवण ला जाताना आम्ही धर्मवीरगड ला भेट दिली  ह्या गडाविषयी सांगायच झाल्यास 
महाराजांनी अनेक किल्ले दुरुस्त केले. काही नव्याने बांधले. यांच्याच अंगाखांद्यावर इतिहास लिहिला गेला. म्हणूनच आपल्यासारख्या भटक्यांसाठी ही ठिकाणे म्हणजे संघर्षाची प्रतीकेच म्हटली पाहिजेत. मराठय़ांच्या युद्धाच्या विजयाचे क्षण जसे या गडांनी अनुभवले तसेच काही दु:खद प्रसंगाचा आवेगही यांनी पाहिला. असाच एक दुर्दैवी आणि कठोर प्रसंग एका किल्ल्याने पाहिला. बहादूरगड असे या किल्ल्याचे नाव आणि तो प्रसंग होता स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजेंचा औरंगजेबाने केलेला अनन्वीत छळ!औरंगजेबाने शंभूराजांना संगमेश्वर येथे पकडून याच गडावर आणले. याच ठिकाणी क्रुरकरम्याऔरंग्याने शंभूराजेंचे प्रचंड हाल केले. त्यांचे डोळे काढले, जीभ छाटली परंतु तरीही शंभूराजेंनी स्वाभिमान सोडला नाही. शिवाजी राजांनी निर्माण केलेले स्वराज्य अबाधित राखण्यासाठी दिलेले हे योगदान या बहादूरगडाने अत्यंत जड अंतकरणाने अनुभवले. स्वराज्य धर्माच्या रक्षणासाठी असे योगदान जगात कुठेही आढळणार नाही. राजांच्या याच स्मृती जागविण्यासाठी अनेक शंभूप्रेमी या गडाला ‘धर्मवीरगड’ असेही संबोधतात.बहादूरगड हा भुईकोट प्रकारातील किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पेडगावात भीमा नदीच्या काठावर उभा आहे. गावाच्या नावावरूनच या गडाला ‘पेडगावचा किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याची तटबंदी भीमा नदीला समांतर अशी आहे. सध्या या भुईकोटाची अवस्था अत्यंत खराब असून आतील ब-याचशा इमारती पूर्णत: ढासळल्या असून सर्वत्र बाभळीचे रान माजले तटबंदीही ब-याच ठिकाणी पडलेली दिसते. या सर्व पडझडीत एक विशेष गोष्ट दिसते. ती म्हणजे या भकास किल्ल्यात उत्कृष्ट स्थापत्याची सुरेख मंदिरे! इतकी सुंदर आणि उत्कृष्ट मंदिरे अशा भग्न किल्ल्यात पाहणे म्हणजे एक पर्वणीच ठरते. भैरवनाथ, मल्लीकार्जुन, बालेश्वर आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे असून या सर्वात लक्ष्मी-नारायण मंदिराची मात्र बात काही औरच आहे.महाराष्ट्रात असलेल्या प्राचीन मंदिरापैकीच एक असणा-या या लक्ष्मीनारायण मंदिराचे कौतुक करायचे झाल्यास एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. हे नितांत सुंदर मंदिर भगवान शंकराच्या बालेश्वर मंदिरासमोरच उभं आहे. सध्या या दोन्ही मंदिरांच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाने ताबा घेतला आहे. ही निश्चितच सुखावह गोष्ट आहे. या दोन्ही मंदिराजवळच हत्तीच्या दोन मोटी दिसतात.यावर अजूनही पाणी वाहून नेण्यासाठीच्या पाईपची तोंडे दिसतात. या मोटींच्या पलीकडेच औरंगजेबाचा वास्तव्य असलेला इमारतींचा परिसर आपल्याला दिसतो. भली मोठी कमान, मोकळे पटांगण, नंतर दगडी चौथरा व याच्याच मागे दोन मजली वाडा दिसतो. हा वाडा ब-यापैकी शाबूत आहे. संपूर्ण चुन्याचा गिलावा केलेल्या या इमारतीतून भीमा नदीचे पात्र खूपच सुंदर दिसते.जेव्हा शंभूराजे आणि कवी कलश यांना पेडगावात आणले, तेव्हा या दोघांची औरंगजेबाशी भेट याच ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. अत्यंत हालहाल करून शंभूराजेंची कुप्रसिद्ध धिंड काढून रक्ताने माखलेल्या शंभूराजेंना बघून औरंगजेबाच्या आनंदाला पारावार उरला नाही, तेव्हा मंचकावरून उठून त्याने जमिनीवरच नमाज पढला. औरंगजेबाचे हे कृत्य पाहून कवी कलशाने शीघ्र कविता केली. ती कविता अशी होती
,‘‘यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग।लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग।ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग।त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग।।’
या कवितेचा अर्थ असा होता की, ‘‘रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमानाला बांधून आणले होते, त्याप्रमाणे संभाजी महाराजांस औरंगजेबासमोर उपस्थित करण्यात आले आहे. हनुमानाच्या अंगाला जसा शेंदूर शोभून दिसतो तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन, ते तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे.’’या अशा गंभीर प्रसंगातही कवी कलशाने कविता सादर करून संभाजी राजांचा कणखर व बाणेदारपणा औरंगजेबासमोर दाखविला. या भेटीनंतर औरंगजेबाने शंभूराजेंना आणि कलश यांना तुळापूरला हलवले. या सा-या घटना येथे आठवल्या की अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो. शत्रूच्या तावडीत सापडलेल्या व साक्षात मृत्यूसमोर असतानाही शंभूराजेंचा जाज्वल्य स्वाभिमान, अविचलपणा, संयमीपणा या बहादूरगडाच्या मातीने पाहिला.असो अशा दु:खद आठवणीत बुडालेल्या या गडाच स्थान प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात मोलाच आहे. परंतु सध्या गडाची अवस्था तोळामासाचीच आहे. गडाचं प्रवेशद्वार, मंदिर, वाडा अशा काही इमारती सोडल्या तर हा भुईकोट अखेरचीच घटका मोजत उभा आहे. पण तरीही आजही आपण या गडावर आलो की शंभूराजांच्या प्रसंगाची आठवण येऊन मन अगदी गहीवरून येते.शंभूराजांनी दिलेल्या स्वराज्याच्या योगदानाचा हा गड साक्षीदार राहिला होता. देशाच्या रक्षणासाठी मराव कस हे या गडाने पाहिल होत. आजही येथल्या मातीला हात लावला तर कदाचित तुम्हा-आम्हाला ती भावना जाणवेल देखील!आपण कित्येक गड-किल्ले पालथे घालत असतो, पण या गडाची मात्र बातच वेगळी आहे. शंभूराजांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची काळी किनार आपल्या मनाला भावुक करीत असते. त्यामुळेच गड पाहून परतताना पावले जड झालेली जाणवत असतात.🙏🙏

सचिन भांड
सह्याद्रि ट्रेकर्स
श्रीरामपू

Tuesday, January 4, 2022

अलंग मदन कुलंग ट्रेक 2022


 AMK ट्रेकAMK ट्रेक (अलंग मदन कूलंग)

1& 2 जानेवारी 2022

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईच्या   रांगेतील साधारणतः  समुद्र सपाटी पासून ४८००फूट.उंच असणारे हे त्रिकुट अजूनही इतिहासातील काही पाने शोधण्याचा प्रतीक्षेत आहे.कधीकाळी वैभवसंपन्न अशा राजवटीचे साक्षीदार अलंग मदन आणि कुलंग किल्ले आहेत.गडाचा संपूर्ण इतिहास तस पाहिलं तर आजतागायत कोणाला सांगता येत नसेल तरी   छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत ह्याने कुलंग किल्ला सन १६७२ साली जिंकून घेतला. मुघलांसाठी हा मोठा धक्का होता. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात. फत्तेलश्कर, , शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावे होती. त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळवल्याचे कळते, पण इतर तीन तोफांचे काय झाले ते माहीत नाही.शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेतच आहे.  हे किल्ले सर करणे अतिशय कठीण आहेत . किल्ल्यावर जाणाऱ्या सोप्या वाटा आणि पायऱ्या ब्रिटिश सत्तेने सुरुंग लावून नष्ट केल्या आहेत. मराठी सत्तेचा आत्मा हा गड किल्ले आहे हे ब्रिटिशांनी चांगलेच हेरले होते म्हणूनच  पुन्हा जिंकण्यास कठीण करण्यासाठी हे उद्योग ब्रिटिश सत्तेने केले होते. हरलेले किल्ले मराठी साम्राज्य पुन्हा मिळवते हे ब्रिटिशांना  माहित होते . त्यामुळे गडावर जाणाऱ्या वाटा बिकट करणे , गडावरील पाण्याच्या टाक्यामधील स्रोत विझवणे असे प्रकार ब्रिटिश सत्तेने केले. १८१८ साली मराठे शाहीचा अंत करताना ब्रिटिशांनी अनेक किल्ल्यांची अशीच दुरावस्था करून ठेवली. अश्या कठीण आणि बिकट वाट असलेल्या किल्ल्यांमध्ये अलंग - मदन-कुलंग प्रसिद्ध असण्याचे कारण हे आहे की पर्वतारोहण करताना तुम्हाला मूलभूत रॉक क्लाइंबिंगची साधने आपल्या सुरक्षेसाठी वापरावी लागतात.  आपण जेव्हा यु ट्यूब वर AMK ट्रेक चे व्हिडिओ बघतो तेव्हा नक्कीच धडकी भरते . अलंगवर ३० आणि  ७० फुटाचा रॉक पॅच  आहे तर मदन वर ४० फुटांचा रॉक पॅच  आहे . या सोबत गर्द झाडीच्या जंगलातील वाट चुकवणारे रस्ते ही  येथे आहेत. गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या  बऱ्यापैकी धोकादायक आहेत. एवढंच काय तर अतिशय निसरडी वाट देखील तुमचा अंत पहात असते अश्या सर्व कारणाने हा ट्रेक कठीण प्रकारात मोडतो. शिस्तीने ,संयमाने आवडीने हा ट्रेक केला तर तुम्ही नक्कीच अविस्मरणीय अनुभव सोबत घेऊन जाल ह्यात शंका नाही.प्रत्येक ट्रेकर चे एक स्वप्न असते आपण आयुष्यात एकदातरी अलंग मदन कूलांग हे  तीनही कील्यांचे त्रिकुट करावे.आणि जो पर्यंत आपण हे किल्ले सर नाही करू शकत तो पर्यंत आपण मी सह्याद्री फिरलोय अस नाही म्हणू शकत.आपण बऱ्याच ट्रेकर च्या तोंडून ऐकतो माझा AMK झालाय ह्या वाक्यात गर्व जरी असला त्याचा आनंद काय असतो तो ट्रेक पुर्ण झाल्यावरच कळतो.कित्येक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चार वर्ष पूर्वी मला तो माझ्या जुन्या ट्रेक मित्रा सोबत करण्याचा योग आला होता त्यातच आता आमचे ग्रुप मधील सदस्य बऱ्याच दिवसापासून मागे लागले होते AMK ट्रेक करण्यासाठी योगायोगाने नवीन वर्ष पण चालू  होत होते त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत एक अविस्मरणीय ट्रेक नेच चालू करायचे हा एक दृढ निश्चय करून तयारीला लागलो.आणि 1 आणि 2 जानेवारी ही तारीख पक्की केली.परंतु माझे सहकारी उमेश सर आणि चंदन सर याना काही कारणास्तव येता येणार नव्हते त्या मुळे मनात थोडी धाकधूक होतीच करण संपूर्ण जबाबदारी ही साहजिकच  एकट्यावर पडणार होती अ ग्रुप मधील बऱ्याच सदस्यांना AMK ट्रेक किती कठीण आहे हे माहीत नसल्यामुळे तो करण्याअगोदर त्यांची एक zoom meeting घेऊन ह्या ट्रेक विषयी बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला.जस जशी ट्रेक ची तारीख जवळ येत होती तस तशी सगळ्याची उतकंठा शिगेला पोहोचली होती  आणि तो दिवस ऊजाडला 31 डिसेंबर च्या रात्री आमचा प्रवास सुरु झाला आणि सकाळी चार वाजता आंबेवाडी गावी म्हणजेच AMK चे पायथ्या  ला असलेलं गाव.सकाळी चहा नाश्ता आणि दुपारचे जेवणाची शिदोरी घेऊन  आम्ही सर्व अठरा ट्रेकर अलंग किल्याचा दिशेने निघालो साधारणतः २ तास दाट जंगलातून प्रवास करताना रस्त्यात एक शीळा दिसते त्यावर देवी ची आणि त्रिशूळ च्या आकारात ची मूर्ती कोरलेली आहे.तिथे नारळ फोडून ट्रेक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी देवीला साकड घालून चालते झालो थोडे पुढे आल्यावर कातळात कोरलेल्या काही ठिकाणी पायऱ्या लागल्यावर थोड निश्चिंत झाल्यासारखे वाटले.कारण जंगलातील चढण सुरवातीला चांगलीच दमछाक करणारी होती पायऱ्या चढुन आल्यावर एक छोठी गुहा लागते.आमचा मुक्काम मदन गडावर  असल्यामुळे परत ह्या गुहे पाशी यावे लागणार होते म्हणून बॅगा आम्ही गुहेत ठेऊन अलंग  कडे प्रस्थान केले.  आणि लगेचच एक २५ फुटाचा खडक लागला तो  देखील सर्वांनी दोरीच्या साह्याने पार केला तो पूर्ण करतो ना करतो तोच भला मोठा ७० फुटाचा काळया पाषाणा मधील खडक आ वासून जसे आमची वाट रोखत होता बहुदा ह्या ठिकाणी पायऱ्या आणि दरवाजा असावा त्या सुरुंग लाऊन ब्रिटिशांनी उध्वस्त केल्याच्या खुणा आजही तिथे पाहायला मिळतात.आता ७० फुठी पॅच. चढण्यात शरीराची आणि मनाची कसोटी लागणार होती.आमच्या पैकी बऱ्याच जणांना बिले देऊन मोरे काकांनी वर चढण्यात मदत केली.तिथे छोटीशी गुहा आहे तिथे थोडा आराम करून परत अरुंद पायऱ्याने माथ्यावर पोहचलो. त्या ठिकाणी पूर्वीच्या राजवाड्याचे अवशेष अजूनही पहावयास मिळतात . तिथेच प्रसिद्ध असे १२ पाण्याचे टाके आहे ते पाणी पिण्यास अतिशय सुरेख आहे.आता परत खाली उतरायला तो भला मोठा पॅच रपलिंग करून उतरायचा होता रेपलींग चा तसा ग्रुप मधील बऱ्याच सदस्यांना थोडाफार अनुभव असल्या मुळे सर्व पटकन खाली उतरले. क्लाइंबिंग पेक्षा रपलिंग चा आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता खाली गुहेत आल्यावर सर्वांनीच सोबत आणलेल्या शिदोरीचा आस्वाद घेऊन लगेचच आम्ही मदनगड कडे कूच केली . अलंग ला वळसा घालून अलंग आणि मदन च्या खिंडीत येऊन पोहचलो तिथून दिसणारा मदन अगदी नावा प्रमाणे रांगडा दिसतो मदन चढताना अगदी एकच माणूस जाऊ शकेल येवढाच रस्ता एकीकडे अंगावर आलेला काळा पाषाण आणि एकीकडे खाली पाहिले तर प्रचंड मोठी दरी अशातच थोड पुढं आल्यावर खूपच अरुंद अंगावर येणाऱ्या पायऱ्या म्हणजे पूर्वीच्या स्थापत्य शास्त्राचा अदभुत नमुना च म्हणावे लागेल खरचं त्या अभियंता चे कौतुक कराव तेवढं कमीच असा या पायऱ्या जीव मुठीत धरूनच पार कराव्या लागत होत्या कारण एका बाजूला भला मोठा काळा पाषाण आणि एका बाजूला भली मोठी दरी  पायऱ्या पार केल्यानंतर आता आमच्या प्रवासाला ब्रेक लागला कारण आमच्या अगोदर एक मोठा ग्रुप होता करण पुढे भला मोठा ४० फुटाचा खडक आणि दुसऱ्या साइडला भली मोठी दरी होती त्यामुळे तिथे एकेकट्याने च रोप च्या साहाय्याने चढाई करायची असल्याने वेळ लागत होता त्यामुळं एव्हाना अंधार पडत होता जस जसा रस्ता मोकळा होत होता तस तशी प्रकाशाची जागा आमच्या टॉर्च ने घेतली  तो खडक आम्ही दोरीच्या साह्याने रात्रीच्या काळ्याभोर अंधारात  पार करून गडावर पोहचलो आणि लगेचच आम्ही गुहेत तंबू ठोकून थोडा आराम केला त्या नंतर लगेच आमच्या सोबत आलेल्या आनंदा ने गरमा गरम भात आणि शेवभाजी खाऊ घातली .जेवण वैगरे करून लगेचच आम्ही तंबूत कधी झोपी गेलो कळलेच नाही सर्व दमलेले असल्याने एव्हाना प्रत्येक तंबूतून घोरण्याचा आवाजाची जणू स्पर्धाच चालू होती सकाळी लवकर उठून सर्वांनीच सूर्योदय चा आनंद घेतला मदन वरून दिसणारा अलंग चा अफाट पसारा भंडारदरा धरणाचा जलाशय कळसूबाई शिखर रतनगड आणि कुलग चा कातळ कडा चे सौंदर्य तर अविस्मरणीय दिसत होते.मदन गडचा परिसर तसा थोडाच आहे पाण्याचे टाके आणि गुहा सोडली तर तसे फारसे काही नाही कदाचित पूर्वी ह्या गडाचा उपयोग हा कैद्यांसाठी बंधिखाना असावा. नंतर सह्याद्रि मधील आमचा कायमचा नास्ता म्हणजे चहा पोहे चा आस्वाद घेऊन आता आम्ही कूलंग कडे प्रस्थान करणार होतो तसा कूलंग ला जाणारा रस्ता सोपा पण ३ तास अलंग मदन आणि कूलंग ला वळसा घालून जावे लागणार होते मदन आणि कूळंग च्या घळाई मध्ये आल्यावर उतारावर प्रचंड अशी मातीची घासरण होती ती कशी बशी आम्ही पार करून  थोडी पायपीट करून कूलंग च्या पायऱ्या जवळआलो ह्या पायऱ्या तशा सोईच्या होत्या त्यामुळे कुलंग चढताना फारशी कसरत नाही करावी लागली.मदन गडाच्या मानाने अलंग सारखाच कुलंग चा पसारा देखील अफाट कुलंग करून आम्ही लगेचच आम्ही इकडूनच आंबेवाडी मध्ये उतरणार होतो हा रस्ता तसा खूपच निसरडा आणि जंगलातील असल्यामुळे इथे चुकण्याची दाट शक्यता असते.आम्ही आंबेवाडी पोहचे पर्यंत सायंकाळचे 6 वाजले .तिथून मागे वळून पाहिल्यावर भला मोठा दिसणारा AMK पाहून तर  सर्वांच्या चेहऱ्यावर आपण Amk सुखरूप केल्याचा आनंद गगनात मावत नव्हता .वाडीत आल्यावर लगेच आमच्या मोरे काकांनी बनवलेला सुरेख चिकन चा आस्वाद घेऊन आणि ह्या दोन दिवसांच्या अविस्मरणीय सर्व आठवणी घेऊन मार्गस्थ झालो.ह्या ट्रेक च वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला कायम ज्यांच्या पासून प्रेरणा मिळते असे साठी पार केलेले कोहली बंधूनी देखील अतिशय तरुणांना देखील लाजवेल असा उत्तम रित्या पार केला त्या बद्दल त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असा हा ट्रेक सर्वांनीच एकमेकांना मदत करत जी साथ देऊन सुखरूप पूर्ण केला  त्या बद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद 🙏🙏🚩

सचिन भांड

सह्याद्रि ट्रेकर्स, श्रीरामपूर






























































देवभूमी यात्रा

  ​ *श्रीरामपूर ते देवभूमी*: केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ आणि* ऋषिकेशचा अंगावर काटा आणणारा प्रवास!* दिनांक 09 जून ते 19 जून 2026 ​‘मनात भक्ती...